Categories
वास्तुशास्त्र वेचक-वेधक

वास्तुशास्त्राबद्दल भंपक सल्ले देणार्‍या पाहुण्याला घराबाहेर हाकला!

मे - २०११

तुम्ही पै पै करून साठवलेल्या पैशातून घर बांधता. घर पाहायला हौसेनं अनेकांना बोलावता; पण घरी आलेला एखादा अतिहुशार पाहुणा ‘घराचा दरवाजा या दिशेला का? बाथरूम मध्येच का ठेवले? खिडकीला उभे गज का बसवले? देवघर एवढे लहान कसे? असले काही तरी विचारून तुम्हाला भीती घालू लागला तर अशा पाहुण्याला लगेच घराबाहेर काढा. कारण असली माणसे तुम्हाला तुम्ही बांधलेल्या घराचे सुख कधीच लाभू देणार नाही, असा रोखठोक सल्ला आर्किटेक्ट जीवन बोडके व डॉ.जयश्री चव्हाण यांनी कोल्हापूर येथे दिला. लोकांत वास्तुशास्त्राबद्दल विनाकारण भीती निर्माण करण्याचे प्रमाण शहर व ग्रामीण परिसरात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

            ते म्हणाले, “जशी जागा उपलब्ध आहे तसे घर बांधले तर काही बिघडत नाही. घरात वारा, प्रकाश खेळता राहील याची जरूर दक्षता घ्यावी. घरात मांत्रिकाने दिलेली दहा-बारा हजार रूपयांची वस्तू ठेवण्यापेक्षा एक छोटीशी काचेची बाटली आणि त्यात एक फूल ठेवा. ते फूल तुमचे मन दिवसभर प्रसन्न ठेवण्यास उपयोगी पडेल. घरात रोज स्वच्छता ठेवा. दारात छोटीशी रांगोळी काढा, रेडिओवर चांगली गाणी ऐका, घरात एकमेकांशी सुसंवाद ठेवा, नियमित व्यायाम करा. नोकरी, व्यवसाय मनापासून करा.” ते म्हणाले, “या विषयावर मोठ्या जनजागृतीची गरज आहे. कारण घराची बांधणी चुकली असे सांगून घरातल्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूची भीती घालणारे काही जण शहर व परिसरात आपला ‘धंदा’ करत आहेत. प्रत्येकाला व्यवसाय, उद्योग, नोकरीत काही ना काही अडचण असतेच. या अडचणीचा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध नाही. शेतमजुरापासून ते राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात. घराच्या दरवाजाची दिशा बदलली, किचन कट्टा बदलला, देव्हारा संगमरवरी केला म्हणून आपल्या अडचणी सुटत नाहीत. मांत्रिकावर विश्वास ठेवला तर आपल्यातला आत्मविश्वास बघता बघता संपून जाईल. त्यामुळे बोगस वास्तुशास्त्राची भीती ठोकरून द्या एवढेच आमचे आवाहन आहे.” वास्तुभित्या पोटीच्या या ब्रम्हराक्षसाला आवर घालणे हे आव्हानात्मक काम करणार्‍या जीवन बोडके व डॉ.जयश्री चव्हाण यांना धन्यवाद!

सौ.भावना कुलकर्णी