10 एप्रिल हा डॉ.अब्राहम कोवूर यांचा जन्मदिवस. डॉ.अब्राहम कोवूर यांच्या ‘बिगॉन गॉडमॅन’ आणि ‘गॉड, डेमन्स अँड स्पिरीट’ या पुस्तकांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. त्याची मराठीसह भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. हरियाणा-पंजाब या राज्यात कार्यरत असलेल्या ‘तर्कशील’ या संघटनेसही डॉ.कोवूर यांच्यामुळेच प्रेरणा मिळाली. अंनिसचेही प्रेरणास्थान डॉ.कोवूर हेच आहेत. पंजाबमधील आतंकवादी कालखंडात(1984-85) या पुस्तकांचे पंजाबी, हिंदी अनुवादाचे प्रकाशन पंजाबमध्ये झाले. तेव्हा तिथे बरीच तिखट प्रतिक्रिया उमटली. त्याचप्रमाणे अनेक लोक ‘तर्कशील’ संघटनेत सामीलही झाले. पंजाबमधील त्या फॅसिस्ट काळात तर्कशीलच्या कार्यकर्त्यांना प्रखर संघर्ष करावा लागला. अशाच एका अतिरेक्यांच्या जाळ्यात सापडलेल्या तरूणाच्या वाचनात डॉ.कोवूरांची पुस्तके आली व तो तरूण अंर्तबाह्य बदलून गेला. आतंकवादाच्या एका टोकाकडून बुद्धिप्रामाण्यवादाच्या दुसर्या टोकाकडे त्याचा कसा प्रवास झाला याबद्दलचा लेख ‘तर्कशील’ संघटनेच्या ‘तर्कशील’ या हिंदी मासिकात स्वत: त्या तरूणाने(मोहनजीत थरीके) लिहिला. त्या लेखाचा राजीव देशपांडे यांनी केलेला स्वैर अनुवाद आम्ही डॉ.अब्राहम कोवूर यांच्या जन्मदिनानिमित्त वाचकांसाठी देत आहोत.
– संपादक
माझ्या जन्मानंतर जेव्हापासून मला समजायला लागले तेव्हापासून माझा भूताखेतांशी संबंध आलेला आहे. आमचे एकत्र कुटुंब होते. हे आमचे कुटुंब भूताखेतांनी ग्रस्त झालेले व धार्मिक कर्मकांडांनी जखडलेले असे होते. आमच्या कुटुंबातल्या चार बायकांना भुतांची बाधा झाली होती. या बायकांचे भूत उतरविण्यासाठी अनेक बुवा, बाबा, तांत्रिक, मांत्रिक यांचे दररोज उंबरठे झिजविले जात होते तर अनेक डेरे, गुरूद्वारा दररोज पालथे घातले जात होते. कोणा बाबाच्या सल्ल्याप्रमाणे शीख धर्मातील ‘अमृतपान’ विधी लुधियाना येतील गुरूद्वारा मंजी साहिब आलमगीर येथे केला गेला. परंतु माझ्या आईवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तिची भूतबाधा काही संपुष्टात आली नाही.
तो पंजाबमधील आतंकवादी कालखंड होता. मी आतंकवादाचे मनापासून समर्थन करीत होतो. दररोज अत्यंत नेमाने गुरूद्वारात जाऊन येत होतो. संत जर्नेलसिंह भिंद्रनवाल्याना आम्ही एका प्रेषिताच्या रूपात पाहात होतो. त्यांच्या कॅसेट सतत ऐकत होतो. त्यातील हिंदूंना मार देण्याचही भाषा चांगली वाटत असे. 1984 मध्ये जेव्हा ‘अकाल तख्त’वर हल्ला झाला तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. देशाधर्मासाठी ‘शहीद’ बनण्याची ‘झिंग’ चढली होती. शत्रू असलेल्या हिंदूंना मारून टाकणे जणू आयुष्याचे ‘ध्येयच’ बनून गेले हेते. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या खुनानंतर आम्ही एकमेकांचे अभिनंदन केले होते.
याच दरम्यान मी शिक्षण मध्येच सोडले आणि टी.व्ही. दुरूस्तीचे दुकान थाटले. आतंकवाद्यांना मदत करण्याच्या इच्छेनं मन भरून गेले होते. एके दिवशी दुकानात मला चार अतिरेकी येऊन भेटले. त्यांनी आपल्याबद्दल सांगून भूक लागल्याचे सांगितले. मी त्यांना घरात नेऊन खुशीने रोटी दिली. झाले, त्या दिवसापासून त्यांचे आमच्या घरी जाणे येणे सुरू झाले. आणि त्यांच्यासोबत मी छोट्या मोठ्या कारवायात सहभागी होऊ लागलो. मला सुरवातीपासूनच वर्तमानपत्रे, मासिके, कादंबरी वाचण्याचा भरपूर नाद होता. हिंदूंना बसमधून उतरवून मारल्याच्या वर्तमानपत्रातील बातम्यांनी मला आनंद वाटत असे. बँक लूट किंवा रेल्वेवरील हल्ल्यांच्या बातम्या वाचून तर माझा आनंद द्विगुणित होत असे.
सप्टेंबर 1991 मध्ये पोलिसांनी मला अटक केली आणि माझ्यावर बॉम्ब ठेवल्याचा आरोप ठेवून खटला भरण्यात आला व माझी संगरूर येथील जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तिथे मी सुखमनी साहिब(गुरूग्रन्थ साहिबची एक वाणी)चे सतत पठण करीत असे व इतर वेळेत वर्तमानपत्र वाचणे वइतर साथीदारांबरोबर गप्पागोष्टी करीत दिवस घालवित असे. या गप्पागोष्टीतील प्रमुख भाग शहीद बनलेल्याच्या संबंधीत असे व हे शहीद सिंह आपल्याला मदत करतात व मारले गेलेले हिंदू ‘भूत’ बनतात असे आमचे मानणे होते.
एक दिवस जेलमध्ये मी ‘पंजाब ट्रिब्यून’ हे वर्तमानपत्र वाचीत होतो. त्यातील एका लेखाचे शीर्षक होते, “ज्या माणसाला भूतंखेतंही घाबरत होती.” लहानपणापासूनच भूताखेतांशी संपर्क असल्याने माझे त्या शीर्षकाने लक्ष वेधले व तो लेख मी मोठ्या एकाग्रपणे वाचला. हा लेख मेघराज मित्र यांनी लिहिला होता. लेखक पंजाबधील बुद्धीप्रामाण्यवादी आंदोलनाचे प्रचारक होते. त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले होते, की मी एक सामान्य माणूस आहे आणि माझ्या वाचनात इशसेपश ॠेव चशप (पंजाबीत व हिंदीत त्याचे नाव ‘देवपुरूष हार गये’ असे आहे.) हे पुस्तक आले व ते वाचून मी भूतांना पळविण्याच्या उद्योगाला लागलो. हे पुस्तक पंजाबीत प्रकाशित झाल्याचा उल्लेखही लेखात होता. त्या क्षणीच मी हे पुस्तक वाचण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1992 मध्ये मला जामीनावर सोडण्यात आले. पुन्हा अटक होऊ नये या उद्देशाने घरातील लोकांनी मला बहिणीकडे पाठविले. तिथे बरीच जुनी पुस्तके, कादंबर्या होत्या. वेळ घालविण्यासाठी ती पुस्तके, कादंबर्या मी वाचू लागलो. ‘देवपुरूष हार गये’ हे पुस्तक माझ्या डोक्यातून अजूनही गेले नव्हते. त्याचा शोध चालूच होता, आणि एक दिवस लोखंडी सामान ठेवलेल्या कोनाड्यात मला मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ नसलेले एक पुस्तक मिळाले. धूळ झटकून ते पुस्तक वाचावयास मी सुरवात केली तर ते पुस्तक होते डॉ.अब्राहम कोवूर यांचे ‘देवपुरूष हार गये.’ मी अधाशासारखे ते पुस्तक वाचून काढले. बहिणीच्या घरून पुन्हा माझ्या घरी येताना मी ते पुस्तक माझ्याबरोबर घेऊन आलो आणि माझा मित्र हरचंदसिंहालाही वाचून दाखविले.
या पुस्तकाने माझ्या मेंदूतल्या पेशी पेशीला जागवले. माझ्या आयुष्याचा उद्देशच या पुस्तकाने बदलून टाकला. मग मी डॉ.कोवूरांचे दुसरे पुस्तक ‘देव और दानव’ हे शोधून वाचून काढले. माझ्या डोक्यातली धर्माची सारी जळमटे साफ झाली. माझे अंतर्मन धर्मापासून मुक्त झाले. माझ्या मनातील द्वेषाची आग या पुस्तकांमुळे लुप्त झाली. माझ्या मनात मानवतेचे एक सुंदर रूप जागवले गेले आणि हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन यात मला काहीच फरक दिसेना. मनात ‘तर्कशील’च्या सभासदांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. परंतु त्यावेळेस तर्कशीलच्या सभसदांची संख्या खूपच मर्यादित असल्याने मी त्यांच्याशी पुस्तक वाचल्यानंतरही दोन वर्षे संपर्क साधू शकलो नाही.
अतिरेक्यांना मदत केल्याचा मला आता पश्चाताप होत होता. त्यांच्या कारवायांबद्दल मनात चीड निर्माण होत होती. 27 ऑगस्ट 1993 ला पोलिसांनी मला पुन्हा पकडले. त्यावेळेस के.पी.एस.गिल, पंजाब पोलिसांचे प्रमुख होते आणि बियांतसिंह मुख्यमंत्री होते. त्यावेळेस पंजाबमध्ये आतंकवाद संपविण्यासाठी अतिरेकी कारवायात सामील असलेल्यांना पकडून मारून टाकण्याची मोहीम चालू होती. पोलीस मला पकडून कोठे घेऊन गेले आहेत, कोणत्या पोलीस ठाण्यात ठेवले आहे ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. मला लुधियानातील शेरपूर पोलीस चौकीत इतर पाच मुलांबरोबर ठेवण्यात आले होते. तिथे आमचा भरपूर छळ केला जात होता.
एके दिवशी डी.एस.पी.नछतरसिंह जे 50-55 वर्षांचे होते त्यांनी त्यांच्या कार्यालयात मला बोलावले व म्हणाले, “मोहनजीत, उद्या रात्री तुम्हाला मारावे असा वरून आम्हाला आदेश आला आहे. तुम्हाला जर पूजा-पाठ करायचा असेल तर करून घ्या, आंघोळीचीही मी तुम्हाला परवानगी देतो व गुरबाणीचे गुटकेही उपलब्ध करून देतो.” मी त्यांना म्हटले, “श्रीमानजी, आता माझे ईश्वर तुम्हीच आहात, मारणे किंवा सोडणे हे तुमच्याच हातात आहे. पण मी आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की, आता मी आतंकवादी नाही तर आता मी एक ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ आहे. माझा आता कोणत्याही धर्मावर अगर ईश्वरावर विश्वास नाही कारण या धर्मानेच मला ठाण्याचा आणि जेलचा मार्ग दाखविला.” त्यानंतर डी.एस.पी.ने मला धन्ना भगत, रविदासाच्या दगड तरंगवण्याबाबत आणि गुरूनानाकांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मी माझ्या कुवतीप्रमाणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मग जेव्हा त्यांची खात्री पटली तेव्हा ते मला सी.आय.ए.चे ए.सी.पी.श्री.चट्टोपाध्याय यांच्याकडे घेऊन गेले व त्यांना सांगितले हा कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. एस.पी.नी पण मला अनेक प्रश्न विचारले. मी त्याची उत्तरे बुद्धीप्रामाण्यवादी व वैज्ञानिक पद्धतीने दिली. त्यांची खात्री पटली व दुसर्या रात्री पोलिसांनी चकमक घडवून आणून माझ्याबरोबरच्या इतर तीनजणांना मारून टाकले व मला आणि दुसर्या मुलाला लुधियाना तुरूंगात धाडले. त्यानंतर डिसेंबर 1993 मध्ये मला जामीन मिळाला व माझी सुटका झाली. तेव्हापासून मी बुद्धीप्रामाण्यवादी आंदोलनाचा हिस्सा बनून गेलो आहे.
मित्रांनो, जर मी ईश्वर आणि धर्माला मानणारा असतो तर मला नक्कीच खोट्या चकमकीत ठार मारले गेले असते. पण माझ्या बचावण्यात मेघराज मित्र यांचा लेख आणि ‘देवपुरूष हार गये’चे वाचन यांचा वाटा फार मोठा व महत्वाचा आहे. बुद्धीप्रामाण्यवादी वाचनामुळेच मी शैतानातून माणूस बनलो. धर्माच्या गुंत्यात अडकून माझ्या आयुष्याचा 26 वर्षांचा काळ मी वाया घालवला याचा मला आता खूपच पश्चात्ताप होतो आहे. आज माझी मुले जन्मत:च धर्म आणि ईश्वर या खोट्या कल्पनांपासून मुक्त आहेत, आणि ते अतिशय सुखाचे जीवन जगत आहेत. आता आमच्या कुटुंबात भूताखेतांचे येणेही बंद झाले आहे. ‘तर्कशील’चे नाव ऐकूनच त्यांनी आमच्या कुटुंबातून धूम ठोकली आहे.
तेव्हा माझी सर्व वाचकांना आणि माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की, माणसाचे गुण आत्मसात करण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी साहित्य जास्तीत जास्त वाचा. धर्माने माणसाला कधीच काहीही दिलेले नाही. उलट खूपसं त्याच्याकडून हिसकावून मात्र घेतलेले आहे. धन्यवाद!
– मोहनजीत थरीके, लुधियाना, पंजाब
(मासिक तर्कशील वरून साभार)
अनुवाद : राजीव देशपांडे