अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये चमत्काराला आव्हान देणे अंगभूत आणि सातत्यपूर्ण करावयाचे काम आहे, हे आम्ही जाणतो. संतांनी व समाजसुधारकांनी देखील ते केले आणि आधुनिक जगात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणार्या व्यक्ती व संघटनाही ते करीत आहे. भारतातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे पितामह डॉ. अब्राहम कोऊर यांच्या प्रेरणेतून आणि बी-प्रेमानंद यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात सुरु झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्यात देखील चमत्काराला आव्हान हा कायम आघाडीचा विषय राहिला आहे. त्यामुळे डॉ. कोऊरांपासून दिलेले आणि बी. प्रेमानंदांनी लावून धरलेले ‘सत्यसाईबाबांना चमत्काराचे आव्हान’ महाराष्ट्र अंनिसने देखील सतत जागते ठेवले आहे. त्यांचा भांडाफोड आम जनतेसमोर, प्रसिद्धीमाध्यमांसमोर कायम केला आहे. परंतु गेल्या 40 वर्षांच्या काळात सत्यसाईबाबांनी कधीही आव्हान तर स्विकारले नाहीच, उलट त्यांच्या राजकीय भक्तांकरवी धाक-दडपशाहीचा अवलंब केल्याचा आमचा अनुभव आहे.
चमत्कार ते आध्यात्मिक संप्रदाय :-
आपण दैवी, साक्षात्कारी, सिद्धपुरुष आहोत, हे समाजमनावर ठसविण्यासाठी चमत्काराचे हत्यार वापरुन प्रसिद्धी, मान्यता आणि लोकप्रियता मिळविणार्या बाबांमध्ये पुट्टपार्थीच्या सत्यसाईबाबांचा क्रमांक फार वरचा आहे. त्यांच्यासारखे अनेकानेक बाबा महाराष्ट्रातही निर्माण झाले, अन् अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने त्यातील बहुतेकांचा भांडाफोड देखील घडवून आणला. पण जे त्यातून तरुन गेले त्यांनी पुढे संस्थात्मक, संप्रदायाचे स्वरुप धारण केले आणि त्याला पुढे समाजसेवी कार्याची जोड देऊन आपली प्रतिमा उजळविण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला. त्यातही सत्यसाईबाबांचा क्रमांक वरचा आहे. त्यानंतर निर्माण झालेल्या बाबाबुवांनी शाब्दिक चमत्कारांचा (अवैज्ञानिक, अवास्तव दाव्यांचा) आधार घेऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले आणि त्यांच्या नंतर आलेले व अत्यंत जलदगतीने विस्तारलेले आसारामबापू , श्री श्री रविशंकर यांचा समावेश करावा लागेल. त्यांनी समाजाच्या अज्ञानी, गतानूगती, अवतारवादी मानसिकतेचा आणि अगतिक, दु:खी, कष्टी परिस्थितीचा फायदा घेत त्याला दैववादाची आणि चमत्काराची फोडणी दिली. त्यामुळे लाखोंच्या भक्त समुदाय त्यांच्या संप्रदायांमध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसतो.
विषमतेच्या समर्थन करणार्या परंपरेचे गोडवे गात, त्यातील तत्वज्ञानाशी आजच्या व्यवहाराची बेमालुमपणे सांगड घालून सर्वसामान्यांना आकर्षित करण्यात हे आध्यात्मिक संप्रदायवादी बर्यापैकी यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे आध्यात्मिक संप्रदायांना मिळालेल्या समुह शक्तीच्या जोरावर ही बाबा-बुवा-महाराज-बापू-दादा-ताई मंडळी समाजातील प्रभावशाली ठरणार्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, सांस्कृतिक, अर्थकारण आणि माध्यमे या सर्व क्षेत्रांमधून आपले उपद्रवमूल्य सिद्ध करीत आहे.
ज्यावेळी रामदेवबाबा योगाचे मार्केटिंग करता-करता, त्यातून मिळालेल्या प्रतिसादाला व मान्यतेला एकदम ‘स्वाभिमान’ यात्रेद्वारे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागरण यात्रेकडे वळवतात, त्यावेळी त्यांच्या हेतुबद्दल शंका उपस्थित होते. त्यापुढे जाऊन आता समाजबदलासाठी सत्ता परिवर्तन या उदात्त हेतूने राजकीय पक्ष स्थापून निवडणूकीची भाषा करतात, त्यावेळी देव-धर्म-संस्कृति-अस्मितांच्या नावांवर उद्दीपीत जनभावनांचा कच्चा माल सत्तापरिवर्तनासाठी मतपेटीत परावर्तित करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. तिकडे जीवन जगण्याची कला आणि कुंडली जागृतीचा प्रसार करणारे श्री श्री रविशंकर देखील आपला मासबेस (जनसमर्थन) वाढविण्यासाठी उपेक्षित धनगर व भटक्या समाजाला संघटीत करुन सोबत घेण्याचा कार्यक्रम सुरु करतांना दिसत आहेत.
बुवाबाजी विरोधी संघर्ष कायम :-
दैववादाला विरोध आणि प्रयत्नवादाचा आग्रह अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने कायम धरला आहे. त्यामुळे चमत्कारांचा दावा करणार्याच्या विरोधात आम्ही आव्हानाच्या पावित्र्यात राहण्याची आमची जबाबदारी मानली. आता बदलत्या परिस्थितीत आध्यात्मिक संप्रदायांच्या नावाखाली सुरु असणार्या बुवाबाजीचा भांडाफोड करण्याचे कामही आम्ही यथाशक्ति करीत आहोत. आध्यात्मिक गुरुंच्या दाव्यांमधील फोलपणा, त्यांच्या कथनी आणि करणीतील अंतर, त्यांच्या कार्यसंस्कृतीतला अंतर्विरोध सतत समाजापुढे ठेवून त्यांच्यापासून असणार्या धोक्याची जाणिव आम्ही समाजाला करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. हे खरे आहे की, लढाई विषम आहे. आध्यात्मिक संप्रदायाकडे असणारी धनशक्ती, माध्यम शक्ती, सत्ता शक्ती आणि जनशक्ती प्रचंड आहे, त्या तुलनेने आम्ही अल्पसंख्यांक आहोत. परंतु आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चिकित्सक विर्जन लावणारा एक कार्यकर्ता संप्रदायवादाच्या प्रभावाला बळी पडलेल्या शेकडो हजारो लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी निश्चितच प्रेरक ठरणार आहे. त्यामुळे इतिहासाप्रमाणे अंतिम विजय सत्याचाच राहील. या दुर्दम्य आशावादासह आम्ही चमत्कारापासून ते आध्यात्मिक संप्रदायांमुळे विकसित झालेल्या बुवाबाजीच्या सर्व प्रकारांविरुद्ध संघर्षाच्या पावित्र्यात उभे आहोत. हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो.
– अविनाश पाटील