Categories
संपादकीय

‘वेंकी’चा गौरव

एप्रिल - २०१५

ज्या युरोपमध्ये विज्ञानाची सुरवात झाली तेथेच विज्ञान प्रसाराचे काम करण्यासाठी रॉयल सोसायटीची स्थापना इ.स.1660 साली झाली. आयझॅक न्यूटन, हंफ्रे डेव्ही, अर्नेस्ट रूदरफोर्ड अशा मातब्बर वैज्ञानिकांनी रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. रॉयल सोसायटीचे कार्यालय इंग्लंडमध्ये आहे. या पाश्चात्य संस्थेचा एवढा उदोउदो कशासाठी असा प्रश्न कदचित आपल्या थोर संस्कृतीचे रक्षक विचारतील. पण याला कारणही तसेच आहे. भारतीय वंशाचे ब्रिटनस्थित वैज्ञानिक वेंकटरामन रामकृष्णन यांची रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. एका संकुचित कोषाच्या बाहेर पडून विज्ञान जगातील हे धैर्य व उदारता याचे कौतुक करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आस्था असणार्‍या आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे जनुकीय वैज्ञानिक सर पॉल नर्स यांच्याकडून रामकृष्णन 1 डिसेंबर 2015 रोजी स्वीकारतील. अमेरिकेतून ब्रिटनला परतल्यावर 16 वर्षांनी त्यांना हा सन्मान मिळाला. सध्या ते ब्रिटीश वैद्यकीय संशोधन मंडळाच्या केंब्रिज येथील प्रयोगशाळेचे उपसंचालक व रॉयल सोसायटीचे फेलो आहेत. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे रॉयल सोसायटीची सूत्रे येण्याची ही पहिलीच वेळ आहे. रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून यापूर्वी रामानुजन, जगदीशचंद्र बोस, सी.व्ही.रामन, मेघनाद सहा आदींची निवड झाली होती.

पेशीतील घटक रायबोसोनची रचना उलगडून पेशीमध्ये प्रथिनांचे संश्लेषण कसे होते व प्रतीजैविकांचे कार्य कसे चालते यावर रामकृष्णन यांनी प्रकाश टाकला होता. या संशोधनाबद्दल त्यांना 2009 मध्ये ‘नोबेल’ पारितोषिकाने सन्मानीत करण्यात आले होते.

‘वेंकी’ या टोपणनावाने मित्रांमध्ये परिचीत व्येंकटरामन रामकृष्णन यांचा जन्म तामीळनाडूतील चिदंबरम् येथे झाला. विज्ञान शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि संशोधनक्षेत्रात त्यांनी लौकिक मिळविला.

व्येंकटरामन यांचा ब्रिटनमध्ये जो सन्मान होतोय त्याबाबत आपण सर्वांनी एक बोध घ्यायला हवा. मूळचे ब्रिटनचे नसलेल्या परक्या वंशाच्या माणसाचा ब्रिटनमध्ये सन्मान होतोय. कारण ब्रिटनमधील विज्ञान प्रसाराला याची मदत होईल हे त्यांनी जाणले आहे. विज्ञानाच्या सामर्थ्याच्या मुळाशी जात, धर्म आणि वंश यांचा अडसर नसतो म्हणूनच ते सर्वव्यापी आणि शक्तीमान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान, धर्म आणि राजकारण या तीन महत्वाच्या संस्थांची चिकित्सा करायला हवी.

धर्म आणि राजकारण या जगभरच्या मानवीसमूहातील अती महत्वाच्या अशा कार्यप्रणाली होत. या संस्थांचे वैशिष्ट्य असं की, त्यांच्याइतके विशिष्ट विचारांना घट्ट धरून ठेवण्याचा अहंकार इतर कोणामध्येही नसेल. श्रद्धाळूंचा ठामपणा आणि बदल स्वीकारण्यास नकार(ठळसळवळीूं) ही विकृतीच होय. दुसरी बाजू ऐकून न घेण्याचा उद्दामपणा त्यांच्यात असतो. आपण स्वीकारलेल्या विचारात मूलभूत चूक असू शकते असं धर्मवाद्यांना व राजकारण्यांना वाटत नाही. आपण सगळे एकाच देवाची लेकरे आहोत असं धर्म सांगतो. मग हिंदू, मुसलमान, खिश्चन समान का नाहीत? ते एकमेकांच्या उरावर का बसतात?

विज्ञानाचा स्वभाव याच्या उलट आहे. विज्ञानातील गृहिते व तत्वे चूक ठरविण्याचे स्वातंत्र्य प्रयोगकर्त्यांना असते. न्यूटनचे गतीशास्त्र, पुंजवादाच्या व सापेक्षतावादाच्या संशोधनातून सुधारावे लागले. अणुपातळीवर किंवा प्रकाशाच्या वेगाजवळ जाणार्‍या गतीमान पदार्थांबाबत न्यूटनचे गतीशास्त्र अपुरे पडते. म्हणून न्यूटन कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या संशोधनातील अपुरेपणा स्वीकारावा लागतो. हे विज्ञान क्षेत्रात घडते हेच त्याचं सामर्थ्य आहे. चुका सुधारात विज्ञान पुढं जातं म्हणून ते अधिकाधिक पूर्ण होत जाते. वैज्ञानिक हा कलावंताप्रमाणे जगाकडे नवीन डोळ्यांनी पहातो.

जगाच्या पाठीवरील सर्व देशातील महाबुद्धीवंत अमेरिका-ब्रिटनमध्ये स्वीकारले जातात. वंश श्रेष्ठता बाजूला ठेवली जाते आणि ‘नोबेल’ समिती वस्तुनिष्ठ पद्धतीने कर्तृत्वाचा सन्मान करते.

विज्ञान हे असं मानवाला मुक्त करणारे महान साधन आहे. हे लक्षात घेतलं तर धर्म, आणि गलिच्छ राजकारण यांच्या अहंकारी कोषात वावरणार्‍या लोकांना उदारमतवादी कसं करता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या पार्श्वभूमीवर वेंकटरामन यांचा सन्मान हे एक पाऊल आहे असं समजायला हरकत नाही. पंडीत नेहरूंचे एक प्रसिद्ध वचन आहे ‘खर्‍या संस्कृतीची स्फूर्ती विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मिळते.’ ब्रिटीशांना हे कळते फक्त भारतात आमचीच संस्कृती श्रेष्ठ अशी दर्पोक्ती काढली जाते. विकासाला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला हा मोठा अडसर आहे.