वैज्ञानिक करतात ते संशोधन, शोध लागण्याची प्रक्रिया याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. पण हे शोध आणि समाजवास्तव यांचा एकमेकांवर होणारा परिणाम, समाजाच्या गरजेमुळे लागणारे शोध, संशोधनाच्या निष्कर्षांतून निघालेल्या अनपेक्षित बदलांमुळे मिळणारी कलाटणी, अशा बदलांचा स्वीकार किंवा धिक्कार यांच्या इतिहासाबद्दल फारसं काही माहीत नसतं. विज्ञान, कला, अर्थकारण, धर्म हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, तेव्हा त्यांचा परस्परांवर परिणाम होणारच. या सगळ्यामागेही एक कार्यकारणभाव असतो. तो समजून घेणं हे माणूसपणाच्या समग्र आकलनासाठी उपयोगी ठरतं. म्हणूनच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हा खास लेख…
साधारणत: सहाव्या-सातव्या शतकानंतर जगभरातील बहुतेक समाजांमध्ये एक सर्वांगीण मंदी आली. युरोप खंडामध्ये ती होती आणि त्यांनी या काळाला ‘तमोयुग’ असं म्हटलं आहे. यातून बाहेर पडण्याच्या घटनाक्रमाची सुरवात झाली ती बाराव्या शतकात. निमित्त झालं ते कापड निर्मितीच्या व्यवसायातील बदलाचं. झालं असं की अरबव्याप्त स्पेनमध्ये एका नव्या मागाचा शोध लागला. या मागाला पायानं चालवायची ‘पेडल्स’ होती. त्यामुळे विणकरांचे हात मोकळे रहात, काम वेगानं होई आणि कापड स्वस्त पडे. या नव्या मागाचं स्वागत विणकरांकडून तसं थंडपणेच झालं, हॉलंडमधल्या विणकरांनी तर या मागाचा चक्काचूर केला. का तर त्यामुळे काही लोकांवर बेकारीची वेळ येईल म्हणून. विरोधाची ही लाट ओसरेपर्यंत आणखी एक पिढी गेली आणि चीनमध्ये सूत गुंडाळण्याच्या चातीचा शोध लागला. त्यामुळे सूत वेगानं येऊ लागलं. कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आधीचा माग आणि ही चाती एकत्र वापरायची कल्पना आली आणि या नव्या मागामुळे कापडाची निर्मिती तुफान वेगानं सुरू झाली. यावेळी मेंढपाळांनी हैदोस घातला. कारण हे कापड होतं ‘लिनन’-वनस्पतीपासून(अंबाडी/जवस) बनलेलं. मेंढ्यांची जोपासना करून त्यांच्यापासून लोकर मिळवायच्या व्यापापेक्षा ‘लिनन’ तयार करणं कितीतरी सोपं होतं. लवकरच सगळे लोक लिनन वापरू लागले, कारण ते स्वस्त होतं आणि त्याला भोकं पडली तर फेकून देता येत होतं. मग चौदाव्या शतकातल्या युरोपात सगळीकडे लिननच्या चिंध्यांचे ढीग साचू लागले. हे बघून कागद तयार करण्याचा व्यवसाय करणारे पुढे सरसावले. कागद तयार करण्यासाठी त्यांनी या लिननच्या चिंध्या वापरायला सुरवात केली. लिननपासून झकास कागद बनू लागला आणि त्यामुळे कागदाचा भाव एकदम घसरला. आणखी दंगली झाल्या, याही वेळा मेंढपाळच पुढे होते. याचं कारण आतापावेतो लिहिण्यासाठी मुख्यत्वे चर्मपत्राचा(पार्चमेंट) वापर केला जायचा आणि ते असायचं शेळ्यामेंढ्यांच्या कातडीपासून बनवलेलं. चांगला कागद स्वस्त मिळू लागला तर चर्मपत्राची मागणी कमीच होणार! भिंतींवरही कागद चिकटवावा इतका तो मुबलक झाला. लेखकांसाठी तर पर्वणीच आली, कारण लिहिता येणारे लोक आजच्याहून कितीतरी प्रमाणात कमी होते. त्यामुळे बाजारपेठेत त्यांना मागणी होती. पश्चिम युरोपमधली प्लेगची महासाथ नुकतीच आटोक्यात आली होती. अर्धेअधिक लोक या साथीला बळी पडले होते, त्यामुळे लोकांना वारसाहक्कानं जमीन-जायदाद मिळत होती. त्याच्या नोंदीसाठी कागदी घोडे नाचवायची गरज होती. साहजिकच जास्त वेतन मिळावं म्हणून त्यांनी संपही केला. लेखकांची ही मिजास उतरली ती 1450 मध्ये गुटेनबर्गचा ‘प्रिंटीग प्रेस’ आला तेव्हा!

चर्चला सुरवातीला या ‘प्रेस’ प्रकरणाचा राग आला कारण त्यामुळे मुक्त विचारांना चालना मिळेल आणि लोक धर्मापासून बहकतील असं त्यांना वाटलं. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की, मोठ्या प्रमाणावर माफीपत्रं छापण्यासाठीसुद्धा या प्रेसचा उपयोग होऊ शकतो! माफीपत्रं विकत घेतली तर त्यामुळे आपली काही पापं माफ होणार हे कळल्यानंतर लोक झुंडीनं ‘पापविमोचना’च्या मागे लागले. या सामूहिक मागणीमुळे चर्चला व्हॅटिकन(ख्रिस्ती धर्मपीठाचा सर्वोच्च मठ) बांधणं आणि मायकेलएन्जेलो किंवा तत्सम महागड्या कलाकरांकडून ते सजवणं शक्य झालं. हा अर्थव्यवहार पाहून काही जर्मन धर्मगुरू जणू पिसाळलेच. त्यापैकी मार्टिन ल्यूथर यानं तर 1517 मध्ये अतिशय कडक शब्दात या कारभारावर टीका केली. यातूनच रोमन कॅथॉलिक चर्च सुधारण्याच्या चळवळीला सुरवात झाली आणि प्रॉटेस्टंट पंथ उदयाला आला.

आधुनिक काळात विज्ञानाचा विकास झपाट्यानं का झाला याची आईनस्टाईननी दोन कारणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे औपचारिक निरीक्षण व तर्क यावर आधारलेले प्रयोग. दुसरं म्हणजे घटनांमागील कार्यकारणभाव शोधण्यासाठी जाणीवपूर्वक केले जाणारे पद्धतशीर प्रयत्न! आपण जो काळ इथं बघितला त्यावेळी असं होत नसे, कारण तोपर्यंत विज्ञानातल्या सगळ्या मूलभूत संकल्पनांचं आकलन व्हायचं होतं. होकायंत्राचीच गोष्ट घ्या. चीनमध्ये उगम पावलेलं होकायंत्र अरबांकडून युरोपमध्ये पोचलं, दिशा ओळखण्यासाठी त्याचा वापर सुरू झाला. पण जेव्हा ब्रिटीश व्हाईस अॅडमिरल फ्रान्सिस ड्रेक पृथ्वीप्रदक्षिणा करून 1582 मध्ये परतला तेव्हा, ‘होकायंत्राची सुई अटलांटिक महासागर ओलांडल्यानंतर गडबड करते’ अशी त्याची तक्रार होती. याचं कारण शोधण्यासाठी राणी एलिझाबेथचे डॉक्टर विल्यम गिल्बर्ट यानं 18 वर्षं घालवली आणि असा निष्कर्ष काढला की, पृथ्वी हाच दोन धु्रव असणारा एक अतिप्रचंड चुंबक असला पाहिजे. प्रयोग करण्यासाठी त्यानं लोडस्टोन(मॅग्नेटाईट असणारा चुंबकीय पदार्थ), अंबर, गंधक, काच अशा वेगवेगळ्या पदार्थांचे चेंडू तयार केले. पृथ्वीप्रमाणेच गोलाकार असणारे हे चेंडू होकायंत्रावर काय परिणाम करतात हे त्याला बघायचं होतं. हे चेंडू चुंबकीय सुईकडे आकर्षित व्हावेत यासाठी त्यानं घासले, त्यावेळी गंधक जरा जास्तच आकर्षित होतं असं त्याला दिसलं. पण या गोष्टीची नोंद करण्यापलिकडे त्यानं विशेष लक्ष दिलं नाही. 1640 मध्ये ऑटो गुरक या जर्मन संशोधकानं ही नोंद वाचली आणि हा प्रयोग पुन्हा करून पाहिला. पण सल्फरचा चेंडू घासताना तो फुटला आणि त्यातून ‘स्पार्क’ उडाला. आलं का लक्षात काय झालं होतं ते? हातानं घासल्यामुळे चेंडूच्या पृष्ठभागावर विद्युत भार तयार झाला होता. स्पार्क उडाला तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे(स्थिर विद्युत)! चीनमधल्या होकायंत्रापासून विजेपर्यंत? निघालो कुठे, पोचलो कुठे?

समोरच्या वस्तुस्थितीआधारे सुसंगत तर्क करता आला तर तो शोधाचा मार्ग सोपा होतो. चौदाव्या शतकाच्या मध्यात युद्धात वापरण्यासाठी तोफा लोकप्रिय होऊ लागल्या तशी धातूंची आवश्यकता वाढू लागली. त्यामुळे जमिनीत अधिक खोलवर शिरण्याची गरज निर्माण झाली. जमिनीत जेवढं खोल जावं तसा ओलसरपणा वाढतो हे लक्षात आलं. खाणीमध्ये साठणारं पाणी खेचण्यासाठी तेव्हा जे पंप वापरले जात ते तीस फुटापेक्षा जास्त उंचीवर पाणी खेचू शकत नसत. या अडचणीवर उपाय सापडायला सतरावं शतक उजाडावं लागलं. गॅलिलिओचा एक समर्थक टॉरिसेली यानं असा अंदाज बांधला की, याचा संबंध वातावरणाच्या दाबाशी असावा. मग त्यानं एका माणसाला पार्याची बंद नळी घेऊन उंच पर्वतावर पाठवलं. पायथ्याशी असलेल्या हवेच्या दाबापेक्षा माथ्यावर दाब कमी होता. पण पार्यानं भरलेल्या नळीच्या वरच्या टोकाला मोकळी जागा कुठून आली? तोपर्यंत सगळे लोक जी गोष्ट नसते असं म्हणत होते ती होती ती-निर्वात पोकळी किंवा व्हॅक्युम! झालं. बॅरोमीटर आले, एअरपंप आले, ‘इंटरस्टेलार स्पेस’ म्हणजे तारकांमधलं अवकाश याकडे बघण्याची नवी दृष्टी आली आणि महत्वाचं म्हणजे एक नवी मिती खुली झाली.
औपचारिक संशोधन नसण्याच्या त्या काळात असंही व्हायचं की, एखाद्या बाबतीत जाणवलेला कार्यकारणभाव दुसर्या ठिकाणी वापरायची बुद्धी होते आणि नवी दिशा मिळते. सुरवातीची घड्याळं लंबकाची होती. पण त्यांचा समुद्रप्रवासात काही उपयोग होत नसे. शिवाय तिथं रेखांश दाखवू शकेल अशा घड्याळाची आवश्यकता असायची. पूर्व आणि पश्चिम दिशांना सागरी मोहिमा निघण्याच्या त्या काळात रेखांश कळणं ही गरजेची गोष्ट असे. पुढे पंधराव्या शतकात कुलुपांमध्ये स्प्रिंगचा वापर झाला आणि नंतर ती घड्याळांमध्ये वापरली जाऊ लागली तेव्हा हा प्रश्न सुटला. तरीही अचुकतेसाठी टिकाऊ आणि मजबूत स्प्रिंगची आवश्यकता होती. 1740 च्या दरम्यान “घड्याळं, कुलुपं आणि हत्यारं बनवणारा” बेंजामिन हंटस्मन घड्याळासाठी चांगल्या ‘स्प्रिंग’च्या शोधात होता. तो एका काचेच्या कारखान्याजवळ रहात असे. तिथं त्यानं पाहिलं की जुन्या फुटलेल्या बाटल्यांचे तुकडे उच्च तापमानाला पुन्हा वितळवत तेव्हा त्यांना मिळणारी काच ही चांगल्या दर्जाची असे. तेव्हा त्यानं हीच युक्ती पोलादाबाबत वापरायचं ठरवलं. 1600 अंश तापमानाला हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याला हवं होतं ते मिळालं- कोणतीही गोष्ट कापू शकेल इतकं मजबूत असणारं ‘ओतीव पोलाद’. त्यापासून त्यानं जगातली सर्वोत्कृष्ट स्प्रिंग तर बनवलीच, शिवाय हे पोलाद म्हणजे औद्योगिक क्रांतीसाठी अभूतपूर्व वरदान ठरलं. लेथ आणि इतर मशिन टूल्स, मायक्रोमीटर्स, प्रिसीजन इंजिनिअरिंग, स्टीम इंजिन सिलिंडर्स आणखी काय काय…. ‘स्वप्नी जे देखिले नाही, ते ते तैसेची होतसे’ असा हा बदल होता.
‘करायला गेलो एक आणि झालं ते भलतंच’ अशा कथाही काही कमी नाहीत. जहाजांचे तळ पाण्यामुळे सडू नयेत यासाठी त्याला ‘पिच’ हे डांबरासारखं द्रव्य लावण्याची इंग्लंडमध्ये पद्धत होती. 1776 मध्ये अमेरिका स्वतंत्र झाली तसा पिचचा पुरवठा कमी झाला. या दरम्यान 1778 मध्ये स्कॉटलंडमधल्या आर्चिबाल्ड कॉक्रेन(नववा अर्ल ऑफ डनडोनाल्फ) यानं डांबर तयार करण्याची पद्धत शोधून काढली. त्याचा उपयोग ‘पिच’ऐवजी करता येईल हे त्याच्या लक्षात आलं. आपल्या जमिनीतल्या कोळशाच्या दोन्ही खाणींमधला कोळसा वापरून डांबर तयार केलं तर आपल्याला प्रचंड पैसा मिळेल असं त्यालावाटलं. त्यानं आपळी इस्टेट जामीन ठेवून भांडवल मिळवलं आणि भट्टीतून डांबर तयार करायला सुरवात केली. पण मध्येच इतर हितसंबंध उपटले आणि ब्रिटीश सरकारनं आपल्या जहाजांच्या तळाला तांब्याचे पत्रे ठोकायची सुरवात केली. या सगळ्या भानगडीत कॉक्रेन इतका कंगाल झाला की, पुढे डांबराचं पेटंट आणि तुरटी, सोडा, मीठ मिळवण्याच्या पद्धती शोधूनही त्याचं नुकसान भरून निघालं नाही. डांबर तयार करण्यासाठी कोळसा तापवायच्या भट्टीतून निघणार्या वाफा ठिणगीच्या संपर्कात पेट घेतात हे कॉक्रेनच्या लक्षात आलं होतं. तसं त्यानं त्याचा मित्र जेम्स वॅटला सांगितलंही होतं. यातून निष्पन्न एवढंच झालं की, 1792 मध्ये वॅटचा सहकारी विल्यम मडॉर्क यानं ‘कोल गॅस’च्या शोधाचं श्रेय मिळवलं.

न्यूटन ज्यावेळी ग्रहांच्या गतीचा अभ्यास करत होता त्याच वेळी जर्मन गणितज्ञ आणि तत्वज्ञ गॉटफ्रिड लाईबनित्झ हा त्याच विषयावर स्वतंत्रपणे काम करत होता. गतीतील अतिसूक्ष्म बदल मोजण्यासाठी ज्या प्रकारच्या गणिताचा(कॅलक्युलस) वापर करायला लागतो, तो करताना लाईबनित्झला प्रश्न पडला होता की, अशा गणितातून विश्वातील सगळ्याच गोष्टींच्या अस्तित्वाचं मूलभूत एकक सापडेल का? हाच विचार पुढे नेत तत्वज्ञ इमॅन्युएल कान्टनं ‘निसर्गाचं तत्वज्ञान’ मांडलं. ‘सर्वांभूती एकत्व’ सांगणार्या या तत्वज्ञानाचा पुढे अनेक तत्ववेत्त्यांनी विस्तार केला आणि काव्य, संगीत, राष्ट्रीयत्व या संकल्पनांमध्ये क्रांती घडवून आणली. आधुनिक वैद्यकशास्त्राचा मार्ग प्रशस्त करण्यातही या तत्वज्ञानाचं योगदान आहे. कारण फे्रेंच शल्यविशारद झेवियर बिचॅट हाही या तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता होता. शरीरातील सर्वात सूक्ष्म एकक काय याचा शोध घेता घेता 1810 पर्यंत त्यानं शरीरातील उतींचे(टिशू) एकवीस प्रकार शोधून काढले. अशा अभ्यासासाठी थडगी उकरून मुडदे पळवण्याची फॅशन त्यानं सुरू केली. या सगळ्या धडपडीतून त्याच्या असं लक्षात आलं की जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्या मृत शरीरातील उतींमध्ये काही बदल झालेले असतात. मृत व्यक्तीचा आजार आणि त्यानुसार शरीरात झालेले बदल यातील कार्यकारण संबंध शोधता शोधता विकृतीशास्त्राचा (पॅथॉलॉजी) जन्म झाला. यातूनच एखादा आजार हा एखाद्या विशिष्ट इंद्रियापुरताच मर्यादित असू शकतो ही आधुनिक वैद्यकातील संकल्पना वाढीला लागली आणि म्हणूनच सूक्ष्म जीवाणू शोेधण्याची संधी निर्माण होऊ शकली.
‘करायला गेलो एक….’ याचं जरा वेगळं उदाहरण… एकोणिसाव्या शतकाच्या मध्याचा काळ. या काळात मलेरियामुळे अतिपूर्वेकडील ब्रिटीश वसातीतले प्रशासन अधिकारी आणि सैन्यातले लोक पटापट मरत होते. कृत्रिम क्विनाईन तयार करण्यात यश आलं तर ही अडचण सुटणार होती. जावामधील डच वसाहतींमधून नैसर्गिक क्विनाईन मिळत होतं खरं, पण त्यासाठी ते भरमसाठ किंमत आकारत. त्यामुळे अर्थकारणही महत्वाचं होतंच. याच काळात रसायनशास्त्राला अगदी बहर आला होता. पर्किन हा रसायनशास्त्रज्ञ होता. कृत्रिम क्विनाईन बनवून ब्रिटीश साम्राज्य वाचवणारा ‘हिरो’ बनण्याची त्याची इच्छा होती आणि त्या दिशेनं त्याची धडपडही चालू होती. भरपूर प्रयोग केल्यानंतर 1856 मध्ये पर्किनला एक मजेशीर चिकट पदार्थ मिळाला, पण क्विनाईन नक्कीच नव्हता. तेव्हा त्यानं चिडून तो सिंकमध्ये फेकला आणि जगातला पहिला अॅनिलिन रंग त्याला गवसला…. पर्किन अक्षरश: लक्षाधीश झाला!
आपण आतापर्यंत जी उदाहरणं पाहिली त्यात सतत आणि चिकाटीनं प्रयोग केले जात होते, मग त्यांचा परिणाम अपेक्षेप्रमाणे असो वा नसो. पण ज्या एका गोष्टीनं आधुनिक विज्ञानयुगाचा पाया घातला असं आपण म्हणतो ती गोष्ट म्हटली तर फारच साधी होती. हॅन्स लिपर्शेनं 1608 मध्ये टेलिस्कोपचा शोध लावला. तेव्हा त्याची प्रतिमावर्धन क्षमता 3x होती. (‘डच पर्स्पेक्टिव्ह ग्लास’ हे तेव्हाचं मूळ नाव. 1611 मध्ये जिओवानी डेमियानीनं त्याला टेलिस्कोप असं नाव दिलं) याची जी माहिती गॅलिलिओला मिळाली त्यानुसार त्यानं स्वत:चा 9ु क्षमतेचा टेलिस्कोप बनवला आणि 25 ऑगस्ट 1609 ला त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 7 ते 10 जानेवारी 1610 दरम्यान त्याला गुरूचे तीन चंद्र दिसले तर 13 जानेवारीला चवथा चंद्र दिसला. कोपर्निकसचं गृहीतक आणि हा ‘चक्षुर्वैसत्यम्‘ पुरावा! पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असण्याच्या कल्पनेला सुरूंग लागला, माणसासाठी ईश्वरानं जग निर्माण केलं या तत्वज्ञानाचा पायाच उखडला. अॅरिस्टॉटलची विश्वरचनेची संकल्पना कुठल्या कुठे फेकली गेली. “विश्व हे एखाद्या सतत चालणार्या घड्याळासारखं स्वयंनिर्भर आहे आणि ‘ईश्वर’ बहुधा आता दुसर्या कोणत्या तरी कामाला निघून गेला असावा” असं न्यूटन धीटपणे म्हणू शकला.

एकोणिसाव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीबरोबर वाहतूक आणि दळणवळणाच्या गरजा वाढला. जलवाहतुकीसाठी कालवे काढले जाऊ लागले. त्यासाठी आवश्यक असलेल्या खोदाईच्या प्रक्रियेत जीवाश्म सापडू लागले. यापैकी काही जीवाश्म सध्या अस्तित्वातच नाहीत अशा प्राण्यांचे होते. त्यामुळे मोठीच अडचण निर्माण झाली. विश्वनिर्मितीच्या वेळी ईश्वरानं सगळी सृष्टी एकदम निर्माण केली असेल तर त्यापैकी काही प्राणीजातींबाबत तरी तो अयशस्वी झाला होता, असं म्हणावं लागेल. नाहीतर हे प्राणी अजूनही अस्तित्वात असायला हवे होते. आणि ज्या अर्थी या जाती माणसाला माहीतच नाहीत, त्याअर्थी माणूस निर्मितीच्या क्षणी अस्तित्वातच नव्हता; असंही म्हणावं लागेल. म्हणजे काही सजीव आधी निर्माण झाले आणि काही नंतर! पुढे भूगर्भशास्त्रज्ञांनी जेव्हा संपूर्ण जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या काळाची नोंद हा अभ्यास संपवला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, पृथ्वीच्या वयाच्या तुलनेत जीवसृष्टी अस्तित्वात आल्याचा काळ नगण्य आहे. ही सगळी माहिती आणि स्वत:ची निरीक्षणं यांचा मेळ घालून नव्या दृष्टिकोनातून उत्क्रांतीवादाची मांडणी डार्विननं केली. त्यातूनच लक्षात आलं की, आपण रहातो ते जग ऐहिक, भौतिक घटनांतून बनलं आहे, ईश्वरानं स्वत:सारखा दिसणारा विशेष प्राणी-माणूस तयार केलेला नाही, तर उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून आजचा माणूस अस्तित्वात आला आहे. आपण सगळे म्हणजे एक रसायनांचं भेंडोळं आहोत.
यातल्या बहुतेक शोधकथा काहीशा अपरिचित आहेत. परस्पर संपर्काची साधनं उपलब्ध नसण्याच्या काळातही कुतूहल, निरीक्षण, तर्क, प्रयोग, सामाजिक उपयोजन यांच्या आधारे माणसानं कशी प्रगती केली, याचा नमुना म्हणून ती सांगितली. पृथ्वीच्या जन्मापासूनच्या साडेचार अब्ज वर्षांपैकी गेली दोन लाख वर्षं म्हणजे 0.01 टक्के इतका अत्यल्प काळ माणसाला मिळाला. तरीही या दोन लाख वर्षांत, त्यातही ‘शहाणा’ झाल्यानंतरच्या चाळीस हजार वर्षांत आणि त्यातही गेल्या पाचशे वर्षांत माणसानं वैज्ञानिक प्रगतीची ही विलक्षण झेप घेतली.
मात्र संपर्काचं तंत्रज्ञान विकसित झाल्यावर परिस्थिती बदलली आहे. आज प्रत्येक समूहासाठी स्वतंत्र प्रयोगशील माणसांची गरज उरलेली नाही. जगातल्या कोणत्याही कोपर्यातली कल्पकता, वेगळेपण हरपत चाललं आहे. प्रत्येक प्रश्नावर आयती उत्तरं तयार आहेत, ‘क्लिक’सरशी उपलब्ध होत आहेत. रोजच्या व्यवहारातल्या लहान-मोठ्या समस्यांवर स्वत:हून उत्तरं शोधणं बंद होत चाललं आहे. माणसाची स्वतंत्र बुद्धी हे त्याचं उत्तर प्राण्यांहून वेगळं ठरवणारं वैशिष्ट्य आहे. मात्र आपण फारच आळशी झाल्यामुळे अनुकरणप्रिय होत चाललो आहोत. माहिती तंत्रज्ञानाच्या या धोक्याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे. बुद्धी स्वतंत्रपणे चालवण्यात मानवी पुरूषार्थ आहे, ‘कॉपी-पेस्ट’ अशा अनुकरणात नाही….
एकोणिसाव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीबरोबर वाहतूक आणि दळणवळणाच्या गरजा वाढला. जलवाहतुकीसाठी कालवे काढले जाऊ लागले. त्यासाठी आवश्यक असलेल्या खोदाईच्या प्रक्रियेत जीवाश्म सापडू लागले. यापैकी काही जीवाश्म सध्या अस्तित्वातच नाहीत अशा प्राण्यांचे होते. त्यामुळे मोठीच अडचण निर्माण झाली. विश्वनिर्मितीच्या वेळी ईश्वरानं सगळी सृष्टी एकदम निर्माण केली असेल तर त्यापैकी काही प्राणीजातींबाबत तरी तो अयशस्वी झाला होता, असं म्हणावं लागेल. नाहीतर हे प्राणी अजूनही अस्तित्वात असायला हवे होते. आणि ज्या अर्थी या जाती माणसाला माहीतच नाहीत, त्याअर्थी माणूस निर्मितीच्या क्षणी अस्तित्वातच नव्हता; असंही म्हणावं लागेल. म्हणजे काही सजीव आधी निर्माण झाले आणि काही नंतर! पुढे भूगर्भशास्त्रज्ञांनी जेव्हा संपूर्ण जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या काळाची नोंद हा अभ्यास संपवला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, पृथ्वीच्या वयाच्या तुलनेत जीवसृष्टी अस्तित्वात आल्याचा काळ नगण्य आहे. ही सगळी माहिती आणि स्वत:ची निरीक्षणं यांचा मेळ घालून नव्या दृष्टिकोनातून उत्क्रांतीवादाची मांडणी डार्विननं केली. त्यातूनच लक्षात आलं की, आपण रहातो ते जग ऐहिक, भौतिक घटनांतून बनलं आहे, ईश्वरानं स्वत:सारखा दिसणारा विशेष प्राणी-माणूस तयार केलेला नाही, तर उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून आजचा माणूस अस्तित्वात आला आहे. आपण सगळे म्हणजे एक रसायनांचं भेंडोळं आहोत.
यातल्या बहुतेक शोधकथा काहीशा अपरिचित आहेत. परस्पर संपर्काची साधनं उपलब्ध नसण्याच्या काळातही कुतूहल, निरीक्षण, तर्क, प्रयोग, सामाजिक उपयोजन यांच्या आधारे माणसानं कशी प्रगती केली, याचा नमुना म्हणून ती सांगितली. पृथ्वीच्या जन्मापासूनच्या साडेचार अब्ज वर्षांपैकी गेली दोन लाख वर्षं म्हणजे 0.01 टक्के इतका अत्यल्प काळ माणसाला मिळाला. तरीही या दोन लाख वर्षांत, त्यातही ‘शहाणा’ झाल्यानंतरच्या चाळीस हजार वर्षांत आणि त्यातही गेल्या पाचशे वर्षांत माणसानं वैज्ञानिक प्रगतीची ही विलक्षण झेप घेतली.
मात्र संपर्काचं तंत्रज्ञान विकसित झाल्यावर परिस्थिती बदलली आहे. आज प्रत्येक समूहासाठी स्वतंत्र प्रयोगशील माणसांची गरज उरलेली नाही. जगातल्या कोणत्याही कोपर्यातली कल्पकता, वेगळेपण हरपत चाललं आहे. प्रत्येक प्रश्नावर आयती उत्तरं तयार आहेत, ‘क्लिक’सरशी उपलब्ध होत आहेत. रोजच्या व्यवहारातल्या लहान-मोठ्या समस्यांवर स्वत:हून उत्तरं शोधणं बंद होत चाललं आहे. माणसाची स्वतंत्र बुद्धी हे त्याचं उत्तर प्राण्यांहून वेगळं ठरवणारं वैशिष्ट्य आहे. मात्र आपण फारच आळशी झाल्यामुळे अनुकरणप्रिय होत चाललो आहोत. माहिती तंत्रज्ञानाच्या या धोक्याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे. बुद्धी स्वतंत्रपणे चालवण्यात मानवी पुरूषार्थ आहे, ‘कॉपी-पेस्ट’ अशा अनुकरणात नाही….
-डॉ. आशुतोष मुळ्ये