श्रीमंतांची चैन, मध्यमवर्गीयांची गरज आणि गरीबांना वाटणारे आकर्षण याचबरोबर या व्यवसायातील कंपन्यांचा नियोजनबद्ध प्रचार व व्यवहार या कारणाने घराच्या दारात ‘गाडी’ ही आजकाल सामान्य बाब झाली आहे. वाहन हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे अपत्य. पण त्यालाही अंधश्रद्धेचा विळखा पडलाय याचे आश्चर्य वाटते.
श्रीमंत, मध्यमवर्गीय अथवा गरीब मनुष्य असो वाहन खरेदी करताना किंवा घरी घेऊन येताना प्रथम पाहतो तो शुभदिन व त्याचबरोबर शुभवेळ. याचाच वापर मार्केटिंग तंत्रानुसार वाहन कंपन्या करतात आणि साडेतीन मुहुर्ताच्या दिवशी म्हणजे दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, दसरा व अक्षयतृत्तीया या दिवशी नवीन गाड्यांची भरपूर विक्री करतात. त्याचबरोबर महिन्याची संकष्टी अथवा एखादा शुभ दिवस आला की, परिस्थिती अशीच असते. मुहुर्तावर गाडी खरेदी केली की, मग घरी आल्यावर या वाहनांची ‘पूजा’ केली जाते. या कर्मकांडामुळे नक्की काय घडते? घरात ‘लक्ष्मी’ म्हणून प्रवेश करणार्या गाडीपासून आपणाला अपघात होऊ नये व गाडी आपणासाठी ‘लकी’ लागावी याकरता तिची पूजा केली जाते. थोडा विचार केला तर लक्षात येईल की, मुहुर्तावर गाडी खरेदी करून, शुभदिवशी व शुभवेळी गाडी घरात आणल्याने गाडीला अपघात होणार नाही का? यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. मुळात गाडी ज्या दिवशी कंपनीत पूर्ण झाली त्या दिवशी मुहुर्त पाहून गाडी बनवली का? गाडी पूर्ण झाल्यावर विक्रेत्याकडे सोपवण्यापूर्वी गाडीची यथासांग पूजा झाली का? ज्या मोठ्या वाहनातून उदा.ट्रक, कंटेनरमधून या नवीन गाड्या वेगवेगळ्या शहरात पोहचवल्या जातात. त्या मोठ्या गाड्यांचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा म्हणून प्रत्येकवेळी त्या गाड्यांसमोर नारळ फोडतात का? कापूर जाळतात का? चारही चाकाखाली लिंबू चिरडतात का? थोडा विचार करा.
मग त्या नवीन वाहनाचा एवढा प्रवास झाला असताना(त्यामध्ये ढशीीं ीळवश सुद्धा आली) तोही कर्मकांडाविना मग हा कर्मकांडाचा गोंधळ कशाला? पुन्हा नवीन गाडी काही वर्षांनी विकताना पुन्हा नव्याने हा कर्मकांडाचा प्रयोग आवश्यक आहे का? एकदा नवीन वाहनाची पूजा केल्यावर त्याची ‘वाहनशांती’ झाल्यावर केवळ मालक बदलला म्हणून पूजा करायची? सुरवातीला अपघात होऊ नये म्हणून पूजा करायची आणि मग अपघात झालेवर गॅरेजमधून गाडी दुरूस्ती केल्यावर परत पूजा करायची?
‘अमावास्या’ हा दिवस तर वाहनपूजेसाठी पर्वणीच आहे. वाहनधारक त्या दिवशी ‘वेळ’ काढून गाडी धुतात, हळदकुंकू वाहतात, हार घालतात, नारळ फोडतात व “आम्हाला अशीच सुरक्षित साथ दे” अशी प्रार्थना हात जोडून करतात. खरे तर वाहनांचा अन् अमावास्येचा काय संबंध? बहुसंख्य लोकांना अमावास्या म्हणजे काय? असे विचारले तर ठरलेले उत्तर म्हणजे ‘निषिद्ध दिवस’. मुळात अमावस्या हा ‘खगोलीय अविष्कार’ आहे. तो दर महिन्याला होणारच. जगात ज्यावेळी ‘वाहन’ ही काय चीज आहे ही कल्पनासुद्धा मानवाला ठाऊक नव्हती तेव्हापासून नित्यनेमाने ‘अमावास्या’ होतच असते. अमावास्येला अंधार अधिक असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालवताना अधिक काळजी घेणे हा त्यावर उपाय. नारळ फोडून अथवा इतर कर्मकांडे करून रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडणार नाही व अपघातही टळणार नाही एवढे कळले तरी पुरे.
वाहनांच्या क्रमांकामध्ये फॅशन व प्रतिष्ठेबरोबर अंधश्रद्धेची सरमिसळ झाली आहे. वाहनांच्या क्रमांकाची बेरीज(फक्त बेरीज का? प्रश्न विचारायचा नाही) आपल्या शुभांकानुसार असावी यासाठी अतिरिक्त पैसे मोजले जातात. वाहनक्रमांकाची बेरीज 9 किंवा 7 असावी असा समज जास्तीत जास्त लोकांमध्ये आहे. 10 वीत गणितामध्ये नापास झालेली व्यक्तीसुद्धा ही आकड्यांची बेरीज प्रतिष्ठेची करते. 7 अथवा 9 या अंकांना अवास्तव महत्व देताना या दोन आकड्यांमधील 8 हा आकडा मात्र नकोसा वाटतो. ‘आठ आणि नाट’ अशी सुभाषिते प्रसिद्ध आहेत. खरे तर ‘लायसन्स’ देतेवेळी वाहन निरीक्षक वाहनधारकाला गाडी व्यवस्थित येते की नाही यासाठी गाडीने 8 नंबरचे वळण काढावे लागते. याचाच अर्थ जो 8 हा अंक वाहनांशी खर्या अर्थाने संबंधित असतो तोच वाहनांच्या क्रमांकासाठी अशुभ का? पण लक्षात कोण घेतो?
वाहनांच्या(चारचाकी) ड्रायव्हरच्या समोरील भागावर एखाद्या देवदेवतेची प्रतिमा ठेवलेली असते. या प्रतिमांना उदबत्ती लावून प्रवास सुखाचा व्हावा अशी इच्छा व्यक्त करून गाडी सुरू होते. तरीही अपघात होतात. अपघातात संरक्षणासाठी ठेवलेल्या या प्रतिमा चक्काचूर होतात. ‘संरक्षक देवता’ समोर असूनही अपघात होतो कसा? दोन देवांमध्ये संवाद घडत नाही का? वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित गाडी चालवणे हाच अपघात टाळण्याचा खात्रीशीर उपाय आहे.
मानवी बुद्धीतील ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचे’ ‘अॅव्हरेज’ वाढले तरच ‘जीवनवाहन’ योग्य गतीने सुरक्षित व सुखाचा प्रवास करू शकेल. होय ना!
– उमेश सूर्यवंशी