Categories
कथा

विषफूल

-सत्यजित राय
वार्षिकांक – २०१४

‘त्या बाजूला जाऊ नका बाबू!’

जगन्मयबाबू दचकलेच, आसपास कुणी आहे याची त्यांना जाणीवच झाली नव्हती, त्यामुळेच ते दचकले. आता त्यांना दिसलं की, त्यांच्या उजवीकडे वीसेक हात अंतरावर एक तेरा-चौदा वर्षे वयाचा मुलगा उभा आहे, त्याने निळ्या रंगाची हाफपँट घातली आहे, आणि अंगावर एक हिरव्या रंगाची हुलई ओढून घेतली आहे. त्याचा वर्ण काळा होता. केसांचा भांग पाडलेला होता आणि नजरेत बुद्धीची चमक दिसत होती. तो खेड्यात राहणारा असला, तरी नक्कीच शाळेत शिकत असणार. मुर्खाच्या नजरेत अशी चमक नसते.

‘कुठल्या बाजूला जाऊ नको? जगन्मयबाबूंनी विचारलं.

‘त्या बाजूला’

अर्थात जगन्मयबाबू चालताना ज्या बाजूला पहात होते, त्या बाजूला.

‘का बरं? का जाऊ नको? काय होईल गेलं तर?’

‘विष आहे.’

‘विष? कशात?’

‘त्या झाडात.’

खरं सांगायचं, तर ते झाड पाहूनच जगन्मयबाबू थांबले होते. फुलांचं झाड. बहुधा जंगली फुलं असावीत. रस्त्यापासून वीसेक हात अंतरावर एक छोटा उंचवटा होता, आणि त्यावर हे एकमेव झाड होतं. आसपासही ज्याला झाड म्हणावं, असं आणखी काही नाही. हे झाड कमरेइतकं उंच होतं. त्रिकोणी आकाराची छोटी छोटी पानं, आणि पानांच्या मध्ये-मध्ये पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची फुलं. गेले तीन दिवस जगन्मयबाबू याच रस्त्याने गेले होते, तरीही तो उंचवटा आणि ते झाड त्यांच्या नजरेला पडलं नव्हतं, याचं त्यांना आश्चर्य वाटलं. अर्थात चालताना अर्धं लक्ष रस्त्याकडे देऊनच चालावं लागतं- विशेषत: तो रस्ता कच्चा आणि नेहमीचा नसेल तर. त्यामुळे ते झाड न दिसणं ही काही नवलाची गोष्ट नाही. तो मुलगा अद्यापही तसाच थांबून त्यांच्याकडे पहात होता.

‘तुझं नाव काय?’ जगन्मयबाबूंनी विचारलं.

‘भगवान.’

‘अरे बापरे! बंगाली शिकलास कुठं?’

‘शाळेत.’

‘माझ्या मागे-मागे का येत होतास?’

‘ते काय ते माझं घर!’

जगन्मयबाबूंनी पाहिलं, जिकडे तो उंचवटा होता, त्याच दिशेला थोड्या अंतरावर बांबूच्या बेटाला लागून एक कौलारू झोपडी आहे.

जगन्मयबाबूंनी पुन्हा एकदा त्या मुलाकडे पाहिलं. आणखीही दोन-तीन प्रश्न विचारायला हवेत. त्याने त्यांना त्या दिशेला जायला मनाई का बरं केली?

‘त्या झुडुपाचं नाव काय?’

‘ठाऊक नाही.’

‘ते विषारी आहे हे कसं काय समजलं?’

‘मरतात ना!’

‘काय मरतात!’

‘साप, बेडूक, उंदीर, पक्षी….’

‘कसे काय मरतात? झाडावर बसल्यावर? की फुलं खाल्ल्यावर?’

‘झाडाजवळ गेल्यावर.’

‘जवळ म्हणजे? किती जवळ?

‘चार-पाच फूट.’

‘तू चांगला थापाड्या दिसतोयस रे! तुझ्या शिक्षकांना विचार एकदा शाळेत. फुलझाडांत कधीही असं विष असत नाही.

तो मुलगा गुपचूप पहात होता.

‘मी इथं नवीन आहे. हवापालटासाठी आलोय. समजलं? उगाच थापा मारू नकोस. या प्रदेशात अशा फुलाची गोष्ट कुणीही ऐकलेली नाही. असं कधीही होत नाही.’

‘हे फूल या प्रदेशातलं नाही. साहेबांनी आणलं.’

तो मुलगा अगदी सोडीतच नव्हता. आपल्या सांगण्यावर जगन्मयबाबूंनी विश्वास ठेवलाच पाहिजे. यासाठी त्याने जणू कंबरच कसली होती.

‘कोणत्या साहेबांनी?’

‘तुम्ही ज्या घरात मुक्काम केलाय, त्याच घरात ते रहात होते.’

‘कधी आले होते हे साहेब?’

‘दुष्काळ पडला होता ना, त्याच्या आधीच्या वर्षी.’

‘नाव काय होतं त्यांचं?’

‘नाव ठाऊक नाही. लाल तोंड होतं बघा त्यांचं, आणि केस करडे होते.’

‘त्या साहेबांनी या उंचवट्यावर ते झाड लावलं का?’

‘ठाऊक नाही.’

‘मग?’

‘साहेब इथून गेल्यानंतरच हे झाड उगवलं. पण ते लावलं असणार. ते तिथंच फिरत असायचे, हातात भिंग घेऊन.’

वनस्पतीशास्त्रज्ञ वगैरे असणार, जगन्मयबाबूंना वाटलं. मुलगा बरीच नवलाईची गोष्ट सांगतोय.

‘हे बघा ना!’ मुलाने पुन्हा बोट दाखवलं. ‘त्याच उंचवट्याच्या जवळ. तो जो दगड दिसतोय ना, त्याच्या बरोब्बर उजवीकडे.’

जगन्मयबाबूंनी पाहिलं. तिथं पांढरं-पांढरं असं काहीतरी दिसत होतं.

‘काय आहे ते?’

‘साप.’

‘साप?’

साप होता तो. आता फक्त त्याची हाडं राहिली आहेत. त्या झुडुपाची फुलं विष सोडतात हवेत. त्यामुळेच मेला तो साप.

जगन्मयबाबूंनी डोळ्यांना बायनाक्युलर लावला. हो, सापच आहे. सापाचा सांगाडा. दुर्बिणीतून त्यांनी ती फुलंही पाहिली. त्यांच्या पिवळ्या पाकळ्यांवर जांभळ्या रंगाचे ठिपके होते. काही फुलं केशरी होती. त्यांच्याही पाकळ्यांवर काळे-पांढरे ठिपके दिसत होते.

दुर्बिणीतून जगन्मयबाबूंना आणखी एक मेलेला प्राणी दिसला. तो सरपटणारा प्राणी होता, पण त्याला चार पाय होते. तो बहुधा सरडा असावा. हे प्राणी गेल्या दोनेक दिवसांत मेले असावेत.

‘म्हणजे हे प्राणी अद्यापही शहाणे झाले नाहीत? अजूनही त्या झाडाजवळ येतात आणि मरतात?’

‘रोज एकदोन प्राणी मरतातच!’

‘कसं काय? इतके प्राणी तर काही दिसत नाहीत मेलेले. फक्त दोनच तर आहेत- एक साप, आणि एक सरडा!’

‘त्या उंचवट्याच्या मागच्या बाजूला आहेत. खूप प्राणी मेल्यावर मग बांबूने त्यांना लांब सरकवून ती जागा साफ करून टाकतात.’

‘कोण?’

‘माझे बाबा.’

‘मग बांबूने त्या झाडालाच का उपटून टाकत नाहीत? उपटायचं आणि जाळायचं. म्हणजे संकटच टळेल!’

‘परत उगवतं!’

‘म्हणतो काय?’

‘हो. जाळून टाकलं तरी पुन्हा उगवतं.’

जगन्मयबाबूंना या गोष्टीला जास्त महत्व द्यावंसं. वाटत नव्हतं. कारण त्यांचा यावर पूर्ण विश्वास बसत नव्हता. फक्त पंचवीस टक्के खरं असेल हे, असं त्यांना वाटलं. आणि तेवढं वाटलं याचे कारण कुठल्यातरी पुस्तकात त्यांनी मांसाहारी झाडाची गोष्ट वाचली होती. जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, आणि त्यांच्यापैकी अनेक गोष्टी अद्याप माणसाला ठाऊक झालेल्या नाहीत.

‘या झाडाची आणखीही रोपं उगवली आहेत का?’

‘हो.’

‘कुठे?’

‘त्या जंगलात आहेत.’

‘इथे मात्र हे एकच आहे का?’

‘दुसरं तर काही दिसलं नाही बाबू!’

ही गोष्ट जर खरी असेल, तर इथं आल्यावर आरोग्यदायी हवा आणि उत्तम खाणं यांच्याशिवाय आणखीही एक कायदा झाला जगन्मयबाबूंचा. याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती. परत गेल्यावर ऑफिसमधल्या सगळ्यांना या झाडाची गोष्ट सांगता येईल. विषफूल! झाडाच्या नि:श्वासात विष! हे दोन मेलेले प्राणी दिसले नसते, तर त्या मुलाच्या बोलण्यावर जगन्मयबाबूंचा मुळीच विश्वास बसला नसता. पण तो मुलगा असं खोटं का बोलेल? हा सुद्धा एक प्रश्नच आहे. अशा प्रकारचा प्रॅक्टिकल जोक शहरातच शक्य आहे. खेड्यात कुणी असा प्रॅक्टीकल जोक करीत नाही असं कायम शहरात राहून जगन्मयबाबूंना चांगलं ठाऊक होतं. आणि त्यांच्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात आजचा दिवस हा संस्मरणीय दिवस आहे हे सुद्धा त्यांना जाणवलं. विषफुलाची गोष्ट आज त्यांनी प्रथम ऐकली.

पण मजा म्हणजे या काठझुमरी गावात त्यांचं येण्याचं ठरलंच नव्हतं. ते डाल्टनगंडाला आपल्या बहिणीकडे, पंधरा दिवसांची सुट्टी घालवून येऊ म्हणून गेले होते. गेल्या वर्षापासूनच त्यांना जरा धाप लागण्याचा त्रास सुरू झाला होता. डॉक्टर म्हणाले होते की कोरड्या हवामानाच्या गावी काही दिवस राहून या, बरं वाटेल. ओळखीच्या मित्रांनीही असाच सल्ला दिला होता. ‘तुम्ही लग्न तर काही केलं नाहीत, आता इतके पैसे कुणासाठी ठेवणार? जरा खर्च बिर्च करा! आमच्यावर करणार नसाल, तर स्वत:वर तरी करा!’ हे ‘इतके पैसे’ त्यांना एकाजॅकपॉटमध्ये मिळाले होते. तीन दिवस रेसच्या मैदानावर गेल्यावर चौथ्या दिवशीच त्यांना जॅकपॉट लागलं. एका झटक्यात दोन कोटी रूपये मिळाले होते. पण घोड्यांचा त्यांनी कधीही अभ्यास केला नव्हता, रेसबद्दलची माहिती कधी वाचली नव्हती. फक्त एका मित्राच्या आग्रहावरून ते रेसच्या मैदानावर गेले होते. थोडंसं कुतुहल म्हणून. त्यांचे डॉक्टर म्हणतात की, त्यांना हा दम्याचा त्रास ते जॅकपॉट लागल्यानंतरच सुरू झाला होता. असं होऊ शकतं. जगन्मयबाबूंच्या स्वत:च्याही लक्षात आलं होतं की, त्यांच्या स्वभावातही या अचानक धनलाभामुळे थोडा बदल झाला होता. बेताची परिस्थिती असताना ते मोकळ्या हाताने खर्च करीत, आता ते खूप हिशेबी झाले आहेत. कार घेण्याचं सामर्थ्य असूनही त्यांनी कार विकत घेतली नाही. मित्रांना पार्टीही दिली नाही, फक्त घरी बोलावून मिठाई खाऊ घातली. लाडक्या भाच्याच्या वाढदिवशी त्याला भेट देण्यासाठी शंभर रूपये किमतीचं खेळणं विकत घेतानाही खूप घासाघीस केली, आणि अखेर पन्नास रूपयांचंच खेळणं विकत घेतलं. कोरड्या हवेच्या ठिकाणी पंधरा दिवस राहून येण्याची कल्पना जेव्हा पुढे आली, तेव्हा बर्‍याच मित्रांनी त्यांना अमूक गावी अमूक हॉटेल अमूक टूरिस्ट लॉजमध्ये उतरण्याचा सल्ला दिला होता. त्यांचे दर जगन्मयबाबूंना सहज परवडणारे असेच होते; पण अखेरच्या क्षणी त्यांनी खर्च वाचविण्यासाठी डाल्टनगंजला बहिणीच्या घरी मुक्कामाला जाणंच नक्की केलं. ते पंधरा दिवस बहिणीकडेच राहिले असते; पण बहिणीच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी कांजिण्या आल्यावर त्यांचे मेहुणे स्वत:च त्यांना म्हणाले, ‘एकदा काठझुमरीच्या मूर साहेबांच्या बंगल्यात मुक्काम करून पहा ना! ब्रिटीश पद्धतीचा बंगला आहे, खाणंपिणंही तिथे चांगलं आणि स्वस्त आहे, चेंजही होईल, विश्रांतीही होईल. अर्थात मूर साहेब आता हयात नाहीत. चारेक महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं. पण त्यांची पत्नी आहे. तिथेच रहाते. ती आपला बंगला प्रवाशांना भाड्याने देते हे मला ठाऊक आहे.’

म्हातार्‍या मिसेस मूरनी काहीही हरकत घेतली नाही. पण त्या म्हणाल्या, ‘ही बाजू मिस्टर मूरच पहात. इथे येऊन रहाणारे काही नेहमीचे लोक होते. पण सध्या तरी त्यांच्यापैकी कुणाचंही इथे येत असल्याबद्दलचं काही पत्र किंवा निरोप नाही. त्यामुळे तुम्ही इथे राहू शकता.’

तीन दिवस डाल्टनगंजला राहून, तीन दिवसांपूर्वीच जगन्मयबाबू गेल्या शुक्रवारी मूर साहेबांच्या बंगल्यात येऊन उतरले. आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यासारख्या माणसासाठी सुटी घालवायला यापेक्षा अधिक जंगली जागा नाही. पहिली गोष्ट म्हणजे क्लायमेट. आल्यापासून एकदाही त्यांना दम्याचा त्रास झाला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, कलकत्त्याचे रहिवाशी जगन्मयबाबू बारीक कल्पनाही करू शकले नव्हते की ट्रक, बस, लॉरी, टॅक्सी, रेडिओ, टी.व्ही., टेलिफोन, सिनेमा माणसांचा कोलाहल या गोष्टी आसपास नसल्यावर किती छान टॉनिकचं काम होतं! त्यांच्या आता लक्षात आलं की, कलकत्त्याची माणसं कायम अवघडलेलीच रहातात; हात-पाय मोकळे करण्याचा खरा अर्थ जगन्मयबाबूंना इथे काठझुमरीला आल्यावरच समजला.

मूर साहेबांचा बंगला पाहिल्याबरोबर जगन्मयबाबूंना छान वाटलं. मागे दूरवर पर्वतांची रांग, त्यानंतर पुढं आल्यावर प्रथम जंगल, त्यानंतर समतल नसलेला मोठा माळ, त्यावर इथे-तिथे लहानमोठे उंचवटे, आणि त्याच्या आणखी पुढे आल्यावर मागे उंच-उंच झाडं असलेला, चिमणी आणि कौलांचं छत असलेला, पाश्चात्य पोस्टकार्डावरच्या फोटोसारखा मूर साहेबांचा बंगला. या बंगल्याच्या व्हरांड्यातून आत आल्यावर खोल्यांची स्वच्छता, सुंदर फर्निचर, खिडक्या आणि दरवाज्यांच्या पडद्यांवरची नक्षी पाहून जगन्मयबाबूंना वाटलं, की रेसच्या मैदानात जॅकपॉट लागण्यापेक्षा सुट्टी घालवण्यासाठी असा बंगला मिळणं ही काही कमी भाग्याची गोष्ट नाही.

इथं आल्याबरोबर जगन्मयबाबूंनी आपला रोजचा दिनक्रम ठरवून टाकला होता. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा घेऊन फिरायला जाणं, परत आल्यावर ब्रेकफास्ट. त्यानंतर बंगल्यांच्या व्हरांड्यात निंबासमोरच्या कंपाऊंडमध्ये बसून मासिक वाचणं. बहिणीच्या घरून ते ‘रीडर्स डायजेस्ट’ मासिकाचे पंचवीसएक अंक घेऊन आले आहेत. त्यानंतर आंघोळ-जेवण आणि थोडी वामकुक्षी. नंतर चहा घेऊन पुन्हा पायी फिरायला जाणं. रात्री साडेआठपर्यंत जेवण आटोपून झोपी जाणं.

आज सकाळी फिरून आल्याबरोबर त्यांनी बनवारी चौकीदाराकडे विषफुलाबद्दल चौकशी केली. अर्थात लगेच फुलाचा विषय न काढता त्यांनी थोडी प्रस्तावना केली.

‘भगवान नावाच्या कुणा मुलाला ओळखता तुम्ही?’

‘हां, बाबू. भिसुवाका बेटा है वो.’

‘भिसुवा कोण आहे?’

चौकीदार म्हणाला की, भिसुवा सॉ मिलमध्ये मजुरी करतो. चौधरीबाबूंची या काठझुमरीतच एक सॉ मिल आहे, तिथे तो काम करतो.

‘भगवानच्या घराच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला एका प्रकारच्या फुलांचं झाड आहे. ते झाड म्हणे वातावरणात विष पसरवतं. ठाऊक आहे तुम्हाला?’

‘हां, बाबू!’

‘ही गोष्ट खरी आहे?’

‘मर जाता है साप, बिच्छू, चूहा…’

बनवारी त्यांच्यापुढे ब्रेड आणि ऑम्लेट ठेवून टी-पॉट आणायला गेला.

‘इथं तीनेक वर्षंपूर्वी एक साहेब आला होता?’ बनवारी परत आल्यावर जगन्मयबाबूंनी त्याला विचारलं. एकेकाळी मूरसाहेब स्वत:च पत्नीला घेऊन प्रत्येक हिवाळ्यात इथे येत. तीन वर्षांपूर्वी कुणी साहेब इथं आला होता की नाही हे बनवारीला ठाऊक नव्हतं.

दुपारनंतर एकदा बाजाराच्या बाजूला जायचं जगन्मयबाबूंनी ठरवलं. बाजार पन्नाहाट इथून दोनेक मैल अंतरावर. रेल्वे स्टेशनही तिथेच आहे. इथं यायचं असेल तर रेल्वे स्टेशनहून सायकलरिक्षा करावी लागते. पन्नाहाटहून ट्रेनने थेट डाल्टनगंजला जाता येतं. पहिल्या दिवशी इथे आल्याबरोबर जगन्मयबाबू एकदा बाजाराच्या बाजूला गेले होते. तिथे दोन बंगाल्यांशी त्यांची ओळख झाली होती. पोस्टमास्टर नुटबिहारी मजूमदार आणि रॉयल हॉटेलमध्ये उतरलेले पवित्रबाबू नावाचे एक गृहस्थ. पानाचा ठेला शोधताना त्यांच्याशी ओळख झाली. याआधीही एकदा ते इथं आले आहेत असं त्यांनी सांगितलं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा व्यवसाय करतात. रॉयल हॉटेल म्हणे फक्त नावालाच हॉटेल होतं. त्याला थ्री स्टार धर्मशाळा म्हणणंच योग्य ठरलं असतं. ते फार विनोदी गृहस्थ वाटले. वय तीस-पस्तीसपेक्षा अधिक नसावं. ‘तुम्ही कुठं उतरलात? काठझुमरीत तर उतरायला जागाच नाही. चौधरी कंपनीच्या कुणाशी ओळख आहे वाटतं?’

‘नाही, मी मूर साहेबांच्या बंगल्यात उतरलोय.’

‘तो – ते झाडांनी वेढलेलं कॉटेज ना? कुठली झाडं आहेत ती?’

जगन्मयबाबू म्हणाले, ‘अगदी बरोबर. मी तिथेच उतरलोय. पण त्या घराभोवतीची झाडं कोणती आहेत ते मात्र मला सांगता येणार नाही. मी पक्का शहरी माणूस आहे. फार-फार तर आंबा, जांभूळ, पेरू, केळी, नारळ यांची झाडं आणि वड-पिंपळ ओळखू शकतो. त्यांच्या व्यतिरिक्त विचारलंत की मुश्कील!’

या पवित्रबाबूंना आणि नुटबिहारींना एकदा विचारून पहायला हवं. चौकीदाराचं कन्फर्मेशन पुरेसं. नाही. खरं तर जगन्मयबाबूंना कोलकत्त्याला गेल्यावर या विषफुलासंबंधी लेख लिहायचा आहे. आजवर कुणीही त्याबद्दल लिहिलेलं नाही. त्या बाबतीत ते पथप्रदर्शक-पायोनियर ठरतील.

नुटबिहारींना विचारून काही विशेष समजलं नाही. ते म्हणाले, ‘मी गेल्याच वर्षी बदली होऊन इथं आलोय. स्थानिक गोष्टींबद्दल मला फारशी माहिती नाही. तुम्ही त्यापेक्षा दुसर्‍या कुणाकडे तरी चौकशी करा.’

पोस्ट ऑफिसहून जगन्मयबाबू बाजाराकडे गेले. पान घ्यायचं होतं, आणि एक वही विकत घेता आली, तर खूपच चांगलं! लिहिण्यासाठी तयार व्हायला हवं ना! पेन आहे जवळ, पण वही काही त्यांनी बरोबर आणली नव्हती.

पवित्रबाबूंशी एक चहाच्या टपरीसमोर भेट झाली. बेंचवर बसून ते एक बंगाली वर्तमानपत्र वाचीत होते. म्हणाले, ‘या, चहा घ्या! अरे भारद्वाज, दोन कप आण- एकाऐवजी दोन!’

जगन्मयबाबूंनी थेट मुख्य प्रश्न विचारला, ‘तुम्ही विषफुलाचं नाव ऐकलं आहे?’

पवित्रबाबूंनी पेपरची घडी घातली आणि जगन्मयबाबूंकडे पाहिलं. ‘निळं-जांभळं-केशरी? तालहारला जाताना उजवीकडे आहे, तेच ना? एका उंचवट्यावर?’

‘तुम्हाला तर जणू सगळंच ठाऊक आहे!’

‘सांगितलं ना तुम्हाला-यापूर्वी चार वेळा येऊन गेलोय इथं! गेल्या दोन वर्षांपासून ते झुडुप इथं दिसतंय. पहिल्यांदा जेव्हा ते दिसलं होतं, तेव्हा त्या उंचवट्याजवळ एक डुकराचं. पिल्लू मरून पडलेलं होतं.’

‘म्हणता काय! पण याबद्दल तुम्ही कुणालाही काहीच सांगितलं नाहीत? तुम्ही तर कलकत्त्याचे रहिवाशी आहात- पेपरमध्ये वगैरे?’

पवित्रबाबूंनी उडवून लावलं. ‘यात सांगण्यासारखं काय आहे? निसर्गात काय-काय आहे याबद्दल कुणी सगळं पेपरमध्ये थोडंच लिहितं? आणखीही किती हजार प्रकारची विषफुलं, विषफळं, विषारी किडे, विषपक्षी या पृथ्वीवर आहेत, कुणाला ठाऊक आहे? अहो महाराज, कलकत्त्याची हवाच विषारी आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आयुष्य पाच सेकंदांनी कमी होतं तिथं-कुणीतरी लिहिलं होतं असं. असं असताना फुलाच्या विषाबद्दल कोण चौकशा करीत बसेल?’

‘पण इथले लोक-त्यांच्यासाठी हे फूल म्हणजे एक धोकाच नाही का?’

‘त्या फुलाजवळ गेलं नाही म्हणजे झालं! पाच-सात फूट दूर राहिलं की आपण सुरक्षित! ही गोष्ट इथल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.’

चहा घेऊन झाल्याबरोबर जगन्मयबाबू उठले. ऑक्टोबर महिला अर्धा संपला होता, सूर्यास्त झाल्याबरोबर लगेच थंडी पडते. सर्दीची जोखीम न घेतलेलीच बरी.

चहाच्या दुकानाजवळच्याच एका स्टेशनरीच्या दुकानातून एक वही विकत घेऊन जगन्मयबाबू घरी परतले, तेव्हा संध्याकाळचे सव्वासहा वाजले होते. त्यांना मनातून खूप उत्तेजीत झाल्यासारखं वाटत होतं. पक्कं कन्फर्मेशन मिळालं होतं, आता ते त्या फुलाबद्दल लिहू शकत होते. त्या लेखाकडे एखादा वनस्पतीशास्त्रज्ञाचं लक्ष लागेल, तर मोठंच काम होईल. काठझुमरीचं नावही लोकांना माहीत व्हायला हवं. टुरिस्ट डिपार्टमेंटला तरी ठाऊक आहे का हे नाव? तसं तर काही दिसत नाही.

लेखनाची सवय नसल्याने वही उघडून, हातात पेन घेऊन अर्धा तास बसूनही काहीच लिहून झालं नाही. इतक्या झटकन् होणार नाही. जरा नीट, विचार करून लिहायला हवं. विषफूल… हे नाव दोन वेळा जगन्मयबाबूंनी मनातल्या मनात उच्चारलं. विषफूल….! या शीर्षकाचा लेख लोक वाचल्याशिवाय रहाणार नाहीत.

आज बायनाक्युलरची गरज वाटली नाही. सकाळी सातच्या सुमाराला त्या उंचवट्याजवळ पोचल्यावर रस्त्यावरून साध्या डोळ्यांनीच त्यांना तो मृत प्राणी दिसला, तो होता एक ससा, मेलेल्या सापाचा सांगाडा आणि मेलेला सरडासुद्धा अद्याप तिथेच पडलेला आहे. मृत प्राण्यांची संख्या आणखी वाढल्यावर कदाचित भगवान किंवा भगवानचा बाप येऊन ती जागा स्वच्छ करतील.

ते झाड रस्त्यापासून किती अंतरावर आहे याचा हिशेब करण्याचा जगन्मयबाबूंनी प्रयत्न केला. वीस हात? पंचवीस हात? झाडाला आणखी जवळ जाऊन नीट पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती. पाच हातांपेक्षा अधिक जवळ गेलं नाही, म्हणजे झालं!

पण त्या मुलाचा निष्कर्ष जर चुकीचा असेल, तर?

जर सात आठ हातापर्यंत फुलाच्या विषाचा प्रभाव असेल तर?

जगन्मयबाबू तीन पावलं पुढे जाऊन पुन्हा मागे आले. साप, ससा, सरडा, डुक्कर, किड्यांची वगैरे गोष्ट त्या मुलानी सांगितली नव्हती. टोळ, मुंग्या, डास, माशा हे सारे या झाडाच्या विषाने मरतात का? की छोट्या किड्यांना त्या विषाचा त्रास होत नाही? आणि मोठे प्राणी? त्यांच्या लेखासाठी या गोष्टी ठाऊक असणं आवश्यक आहे. आज काही तो मुलगा दिसत नाही. एकदा त्याच्या घरी जावं का? त्याची एक मुलाखत घ्यावी बरीचशी वृत्तपत्रं करतात, त्याप्रमाणे?

हा प्रश्न मनात आल्याबरोबर त्यांना वाटलं, काही घाई नाही, सगळं होईल. जरा धीर धरायला हवा. हाताशी आणखी सात दिवस वेळ आहे.

इथलं वातावरण चांगलं आहे, त्यामुळे भूक खूप लागते. ब्रेकफास्टचा विचार करीत करीत जगन्मयबाबू घरी परतले. बांबूचं कुंपण घातलेलं मोठं कंपाऊंड. दोन लाकडी गेट एक पश्चिमेला, एक उत्तरेला.

ज्या गेटने जगन्मयबाबू आता आत आले, त्या उत्तरेच्या गेटवर आजही एका लाकडी नेमप्लेटवर मूरसाहेबांचं नाव लिहिलेलं आहे. गेटपासून गेलेली वाट कॉटेजच्या समोरच्या व्हरांड्याजवळ संपते. जी मोठी-मोठी झाडं आहेत, ती बंगल्याच्या मागच्या बाजूला आहेत. त्यांच्यापैकी एका झाडाच्या खोडाजवळ जगन्मयबाबूंना एक ओळखीचं झुडूप दिसलं.

तेच झुडूप, आणि त्याला तीच विशिष्ट फुलं.

विषफूल!

जगन्मयबाबूंची भूक जणू जादूप्रमाणे नष्ट झाली.

हे झुडूप काल तिथे नव्हतं. जगन्मयबाबू त्याच मोठ्या झाडाच्या खोडाजवळ खुर्चीत बसून काळ सकाळी ऊन खात होते. तेव्हा त्यांना काहीही काम नव्हतं, फक्त थंडीतलं ऊन खायचं होतं. त्यांची नजर तेव्हा सगळीकडे फिरत होती. अगदी त्या मोठ्या झाडाच्या खोडाजवळही. हे त्यांना आठवतंय, कारण तेव्हा त्यांना वाटलं होतं की, त्या झाडाच्या खोडाचा रंग निलगिरीच्या झाडाच्या खोडाच्या रंगासारखा आहे. पांढरा. निलगिरीचंही झाड त्यांना ओळखता येत असे.

ते काय आहे?

एक पक्षी.

करड्या रंगाच्या डोक्यापासून रोपटीपर्यंत. चिमणीएवढाच छोटा. तो पक्षी जमिनीवर उड्या मारीत चोचीने काहीतरी खातोय, आणि मध्ये मध्ये खाणं थांबवून डोकं उंचावरन ‘चिडिक्, चिडिक्’ असा आवाज करतोय. त्या फुलझाडापासून तो दहा एक हात अंतरावर आहे. आणखी दोन छोट्या उड्या मारून तो पक्षी त्या झाडाच्या आणखी जवळ गेला. जगन्मयबाबूंनी आणखी वाट न पहाता हाताने जोरात दोन टाळ्या वाजवल्या. पक्षी आवाज करीत वेगाने उडून गेला. जगन्मयबाबूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला, पण झाड तर तिथे आहेत तसंच राहिलंय.

त्याची व्यवस्था लावता येईल का? समोर रस्त्यावर अनेक ढेकळं पडलेली आहेत.

एक ढेकूळ उचलून जगन्मयबाबूंनी त्या झुडुपावर नेम धरून फेकलं. ते झुडुप थरथरलं. लागलं ढेकूळ! पण फक्त एक ढेकूळ मारल्याने काही फायदा होईल का?

त्यांनी एका मागोमाग एक अशी तीस ढेकळं त्या झुडुपाच्या दिशेने फेकली. ते कधीच क्रिकेट खेळले नाहीत, त्यामुळे फेकलेली निम्मी ढेकळं त्या झुडपाजवळून गेली; पण बाकीची लागली. झुडूप खाली वाकलं.

‘वो फिर खडा हो जाएगा बाबू।’

भगवान. तो गेटच्या बाहेरून हातात पुस्तक घेऊन त्यांच्याकडे पहात होता. चेहर्‍यावर हसू.

‘होऊ दे उभं! जगन्मयबाबू म्हणाले; पण काही वेळासाठी निश्चिंती!’

भगवान निघून गेला.

ही घटना चौकीदार आणि माळी यांनीही पाहिली, हे बंगल्याकडे नजर वळवल्यावर जगन्मयबाबूंना समजलं. ते दोघेही निकम्मेच दिसताहेत. जरा त्यांना मदत करायला पुढे आले असते तर?

ब्रेकफास्ट खाता खाता त्यांना वाटलं, की चौकीदार आणि माळ्याने त्यांना मदत केली नाही, यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत. इथं आल्याबरोबर त्यांना थोडी आगाऊ बक्षिसी द्यायला हवी होती. माळी तर त्यांना स्टेशनवरून आणण्यासाठी आला होता. मिसेस मूरनी टेलिग्रामने तसं कळवलं होतं. कुलीऐवजी त्यांनी माळ्याच्याच हाती आपलं सामान सोपवलं होतं. एक सूटकेस, एक बेडिंग, एक मोठा तोटी असलेला फ्लास्क. स्वत:च्या हातात त्यांनी फक्त छत्री आणि बहिणीने दिलेली मिठाईची हंडी घेतली होती. बंगल्यावर पोचल्यानंतर त्यांनी माळ्यासाठी वीस रूपये बाहेर काढूनही पुन्हा खिशात ठेवून दिले होते. त्यांनी विचार केला,

‘जाण्याच्या दिवशी देऊन टाकू; आधी बघू तर खरं बेटा कसं काम करतोय ते!’

दोघांनीही काम चांगलंच केलं. पण त्याशिवाय एक पाऊल पुढे येऊन पाहुण्याशी बोलणं, हवं-नको विचारणं- हे दोघांपैकी एकानंही केलं नाही. काठझुमरीतली फक्त हीच एक गोष्ट जगन्मयबाबूंना ‘लेस दॅन परफेक्ट’ वाटली. आता त्यांना जाणवलं की दोष थोडा त्यांचा स्वत:चाच आहे.

‘या घराच्या आसपास ती झुडुपं आणखी आहेत की काय?’ चहात साखर ढवळता ढवळता जगन्मयबाबूंनी चौकीदाराला विचारलं. चौकीदार म्हणाला, बंगल्याच्या परिसरात तेवढं एकच झुडूप आहे आणि ते आज पहिल्यांदाच त्याला दिसलंय.

‘हे झुडूप रातोरात उगवतं की काय?’

‘वैसा ही तो लगता है, बाबू!’

‘जरा लक्ष ठेवा. आणखीही दिसलं तर मला सांगा.’

बनवारीने सांगण्यापूर्वीच जगन्मयबाबूंच्या नजरेला पडलं. वामकुक्षी करून बाहेर व्हरांड्यात आल्याबरोबर.

व्हरांड्याच्या पूर्वेकडच्या कोपर्‍यामागून त्या ओळखीच्या फुलांचा एक गुच्छ डोकावत होता. झुळुकीने तो गुच्छ हलत होता. पंधरा हातांपेक्षा अधिक दूर नव्हता.

आपल्या पायातली शक्ती जणू निघून चालली आहे असं जगन्मयबाबूंना वाटलं. कसबसं एक पाऊल पुढे जाऊन ते वेताच्या खुर्चीत बसले. एकदा त्यांनी माळ्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण गळ्यातून आवाजच फुटला नाही. गळा कोरडा पडला. डोकं गरगरू लागलं. हात-पाय गार पडले.

वारा पूर्वेकडूनच येत होता. त्या झुडुपाकडूनच, याचा अर्थ त्या फुलाचा विषारी नि:श्वास-

जगन्मयबाबू आणखी विचार करू शकले नाहीत. इथं आणखी काही वेळ बसून चालणार नाही; दरम्यान त्यांना जाणवलं की, त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होतो आहे.

शरीर आणि मनाचं उरलं सुरलं सगळं बळ एकवटून जगन्मयबाबू खुर्चीतून उठले आणि पाय ओढीत ओढीत दिवाणखाना पार करून बेडरूममध्ये आले व आपलं शरीर त्यांनी बिछान्यावर झोकून दिलं.

रात्री काय स्वैपाक करू असं चौकीदारानं विचारल्यावर ते म्हणाले- ‘काहीच नको-भूक नाही.’

तरीही बनवारी स्वत: होऊनच एक ग्लास गरम दूध बाबूंना देण्यासाठी घेऊन आला. त्याने खूप विनवल्यावरही बाबूंनी कसंबसं अर्धा ग्लास दूध घेतलं आणि उरलेलं परत दिलं.

दूरवरून ढोल वाजण्याचा आवाज येत होता. कुठेतरी जत्रा होणार आहे असं त्यांनी बाजारात ऐकलं होतं. तिथं संताळ आदिवासींचा नाच होणार. किती वाजले आहेत कोण जाणे. अंगावर ब्लँकेट ओढून घेतल्यावरही जगन्मयबाबूंची थंडी काही जात नव्हती. आणखी एक चादर अंगावर घेतल्यावर बरं वाटू लागलं. हळूहळू जगन्मयबाबूंना झोप लागली.

यापूर्वी काही दिवस एकदम सकाळीच जाग येत आहे. आज तसं झालं नाही. मध्येच जाग आली, जाग आल्यावर खोलीत प्रकाश दिसल्यावर त्यांना थोडं खटकलं. त्यानंतर आठवलं की, त्यांनी स्वत:च बनवारीला आज खोलीत कंदील लावून ठेव’ असं सांगितलं होतं. अद्यापही थंडी होतीच. वारा बाहेर उघडणार्‍या खिडकीतूनच येत होता. पण खिडकी तर त्यांनी झोपण्याआधी बंद केली होती. नंतर कुणी उघडली की काय?

जगन्मयबाबूंनी पहाण्यासाठी मान उंचावली.

खिडकीजवळ ड्रेसिंग टेबल. त्यावर ठेवलेल्या कंदिलाचा उजेड खिडकीच्या दारांवर पडतोय.

फक्त खिडकीच्या दारावरच नव्हे तर बाहेरून जी गोष्ट डोकावतेय, तिच्यावरही. त्या प्रकाशातच ओळखू येतेय ती वस्तू.

तेच झुडुप. त्याच प्रकारचं झुडुप, तीच फुलं, पिवळी, जांभळी, नारंगी.

विषफूल!

जगन्मयबाबूंना जाणवलं की, त्यांच्या गळ्यातून किंकाळी बाहेर येत आहे; ती तोंडातून बाहेर पडल्याबरोबर ते बेशुद्ध पडतील; आणि झालंही तसंच.

रेल्वेचा डबा रिकामा पाहून जगन्मयबाबू जरा निश्चिंत झाले, कारण लोकांचं सान्निध्य त्यांना आता बरं वाटत नाही. काठझुमरीत अगदी स्वप्नासारखं सुंदर पहिले तीन दिवस गेल्या दोन दिवसांत कसे काय संकटात परिणत होऊ शकतात, याचाच या सात तासांच्या प्रवासात त्यांना गुपचुप, एकटे बसून विचार करायचा होता. पण गार्डची शिट्टी वाजली, आणि मग ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. पन्नाहाटचे पोस्टमास्तर नुटबिहारी मजूमदार. त्यांच्याशी बाजारातल्या भेटीनंतर पुन्हा भेट झाली नव्हती.

‘काय म्हणताय मोशाय?’ एवढ्यातच परत चाललात की काय? की तुम्हीही बेतोलला निघालात?’

‘बेतोल या स्टेशननंतरचं स्टेशन. तिथं जत्रा आहे. मी बायकोच्या हुकुमावरून खरेदीसाठी चाललो आहे.’

‘असं!’

‘तुम्ही कुठं निघालात?’

‘डाल्टनगंज’

‘प्रकृती बिघडली की काय? दोन दिवसांतच पुल्ड डाऊन?’

‘हो जरा…’

नुटबिहारीबाबू मला हलवून हसले आणि म्हणाले, ‘जाऊ द्या! त्या गृहस्थांचं नशीब चांगलं!’

‘नशीब? कुणाचं?’

‘मी पवित्रबाबूंच्याबद्दल बोलतोय.’

‘का बरं?’

‘अहो, ते गेल्या दहा वर्षांपासून वर्षातून दोन महिने मूर साहेबांच्या बंगल्यात येऊन रहातात. ही त्यांची एक प्रकारची मोनॉपॉलीच आहे. ऑक्टोबर आणि मार्च. मोठे लेखक आहे ना! पवित्र भट्टाचार्य- नाव ऐकलं नाहीत? लेखनासाठी इथे येतात. लिहितात, आणि भगवान नावाच्या, एका मजुराच्या मुलाला बंगाली शिकवतात; हौस म्हणून शिकवतात. जरा आदर्शवादी गृहस्थ आहेत, दुसरं काय? तुम्ही गेलात हे ऐकून अगदी नाचायलाच लागतील. आपली नेहमीची जागा सोडून हॉटेलमध्ये उतरावे लागल्याने खूप नाराज झाले होते ते. म्हणाले होते, मूरसाहेब हयात असते, तर असा गोंधळ झाला नसता. मूरबाईंनीच गोंधळ केला.

बेतोल स्टेशनवर नुटबिहारी उतरून गेल्यानंतर गाडी सुटताना जगन्मयबाबूंना दिसलं की, प्लॅटफॉर्मच्या कडेला, लोखंडी रेलिंगच्या मागे त्याच फुलांची झुडुपं आहेत- एक दोन नव्हेत, संपूर्ण मैदानाभर किमान शंभर तरी!

आणि त्या झुडुपांच्यामध्येच खेळताहेत बकर्‍यांची तीन करडं!

अनुवाद : विलास गिते