विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडणार या जून महिन्यामध्ये ‘दै.सकाळ’मध्ये आलेल्या बातमीने 2008 मध्ये घडलेल्या स्मृतींना उजाळा दिला. जिनीव्हा येथे सुरू असलेल्या महाप्रयोगातून विश्व कसे निर्माण झाले याबद्दलचे कोडे वैज्ञानिक लवकरच उलगडणार आहेत असा बातमीचा सूर होता.
15 अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झालेली आहे असा सिद्धांत बेल्जीयम खगोलशास्त्रज्ञ अॅबे लामाईट्रे यांनी सन 1931 मध्ये मांडला आणि त्या सिद्धांताला पुष्टी दिली जॉर्ज गॅमोव्ह या रशियन शास्त्रज्ञाने. विश्वनिर्मितीच्या बाबतीत आज सर्वमान्य असा हा महास्फोट सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार विश्वाला सुरवातही आहे आणि शेवटही. जवळ-जवळ 15 अब्ज वर्षांपूर्वी विश्वामधील सर्व पदार्थ एकत्र येण्यास सुरवात झाली. अत्यंत कमी जागेमध्ये सर्व पदार्थ समाविष्ट होत असताना त्या ठिकाणची घनता आणि दाब प्रचंड वाढला. तिथले तापमान जवळ-जवळ 100 अब्ज अंश सेल्सीयस इतके झाले. अत्यंत कमी जागेत प्रचंड वस्तुमान सामावले गेले. प्रचंड दाब आणि तापमानामुळे मोठा स्फोट झाला. आणि त्या स्फोटातून फक्त प्रकाश बाहेर पडला. या प्रकाशातूनच नंतर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन इ.मूलभूत कणांची निर्मिती झाली आणि तद्नंतर दिर्घीका, तारे, पृथ्वी व सजीवांनी या विश्वात प्रवेश केला.
दि.10 सप्टेंबर 2008 रोजी भारतातील सर्व वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरील बातम्यांनी प्रचंड खळबळ उडवून दिलेली होती. सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरवणार्या बातम्या असे त्याचे वर्णन करावे लागेल. ‘विश्वनिर्मितीच्या प्रयोगातून आज काय होणार?’, ‘महाप्रयोग की महाप्रलय’, ‘पृथ्वीवर उलथापालथ होणार का?’, ‘जगलो वाचलो तर’, ‘आज काय होणार?’, ‘उत्तर मिळणार की पृथ्वीच नष्ट होणार…?’, ‘उभे जग भयभीत?’ हे वृत्तपत्रातील बातम्यांचे मथळे पाहिल्यावर आपण तमोयुगात तर वावरत नाही ना? अशी शंका येत होती. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर कहरच केलेला होता. विविध टी.व्ही.चॅनेलवरून महाप्रयोगासंदर्भातील ज्योतिषांच्या भविष्यवाणीचा रतीबच सुरू होता. ‘ब्रेकिंग न्यूज’ मधील विषय होता, ‘ज्योतिषांच्या नजरेतून महाप्रयोगाची फलनिष्पत्ती?’, किती विचित्र प्रकार होता तो. प्रयोग करणार वैज्ञानिक आणि त्या प्रयोगावर भाष्य करणार ज्योतिषवाले! काही वृत्तपत्रे आणि चॅनेल मात्र या प्रकारापासून दूर होते.
एकाही चॅनेलवाल्याला वाटले नाही की, भारतातील एखाद्या प्रतिथयश वैज्ञानिकाची मुलाखत प्रसारित करावी. महाप्रयोगासंदर्भात चर्चा घडवत योग्य अशी माहिती वैज्ञानिकांच्या माध्यमातून द्यावी. चॅनेलवाले तसे करणार नव्हतेच. कारण वैज्ञानिक भडकपणे मांडणी करणार नाहीत आणि आपण ती अद्भूतता रंगवलेली आहे. ती निष्फळ ठरवतील हे चॅनेलवाल्यांना माहीत होते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्हीही प्रसारमाध्यमांच्या आचरटपणामुळे सामान्य लोक भयभीत झालेले होते. बहुतांश लहान मुले दि.10 सप्टेंबर 2008 रोजी शाळेला गेलीच नाहीत. रस्ते ओस पडलेले होते. दबलेल्या आवाजात विचारणा होत होती की, ‘खरंच जग नष्ट होणार काय?’ एकूणच या प्रकरणावर रडावे की हसावे हेच कळत नव्हते. मानवजातीला कोणताही धोका न पोहचवता. खरं म्हणजे प्रसारमाध्यमांचे काम सत्य पुढे आणण्याचे आहे. माहिती देणे बाजूलाच राहिले आणि ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली चमत्कारीक माहितीचा बाजारच मांडलेला यानिमित्ताने दिसला. स्वत:चे टी.आर.पी.(TRP) रेटींग वाढवण्याच्या नादात आपण जनतेची दिशाभूल करत आहोत याचा त्यांना विसर पडलेला दिसला. सर्वसामान्यांनी या माध्यमावर विश्वास ठेवताना विचार करूनच ठेवायला पाहिजे हे मात्र यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवले.
दि.11 सप्टेंबर 2008 रोजी वृत्तपत्रातील बातम्यांनी मात्र भडकपणाची सवय लागलेल्या वाचकांची घोर निराशा केली. बातम्यांचे स्वरूपही पालटलेले होते. ‘महाप्रयोगाची पहिली चाचणी यशस्वी’, ‘महाप्रयोग सुरू’, ‘पहिला टप्पा सुरू’, ‘अनोख्या वैश्विक नाट्याला प्रारंभ’ इ. बातम्यांचे मथळे याची साक्ष देतात. काही बातम्या तर अशा अविर्भावात होत्या जणूकाही महाप्रयोग आपणच केला. ‘विश्वनिर्मितीमध्ये भारतीय दांपत्य’, विश्वनिर्मितीमध्ये कोल्हापुरातील तरूण. अशा प्रकारच्या वस्तूस्थितीदर्शन बातम्या दैनिकांनी 10 सप्टेंबर 2008 रोजी द्यायला काही अडचण होती का? काही बातम्यांनी मात्र विचार करायला लावला. ‘जगबुडीच्या धास्तीने वृद्धेचा मृत्यू’, ‘महाप्रलयाच्या भीतीने तरूणांच्या आत्महत्या’ अशा प्रकारच्या बातम्यांनी वृत्तपत्रांना आत्मपरिक्षण करायला लावले की नाही हे माहीत नाही. तरूणांच्या आत्महत्येला किंवा वयोवृद्धांच्या मृत्यूला कोण जबाबदार हे सुद्धा या गोंधळामध्ये कोणीही विचारले नाही. भडकपणे वाचण्याची, पाहण्याची, ऐकण्याची अभिरूची सर्वसामान्य वाचकाच्यात काही प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली आहे हे मात्र मान्यच करावे लागेल.
दि.12 सप्टेंबर 2008 नंतर महाप्रयोगासंदर्भात बातम्या येणे पूर्णपणे थांबललेले होते. कारण बातमीतील थरार, अद्भूतता, रहस्य प्रसारमाध्यमांच्या दृष्टिकोनातून निघून गेलेला होता. आज एकविसाव्या शतकात इंटरनेटसारखे प्रभावी माहितीचे माध्यम असताना, प्रयोगासंदर्भातील सत्य माहिती जनतेसमोर आणण्याची तसदी प्रसारमाध्यमांनी घेतली नाही. महाप्रयोग करणार्या संस्थेने त्यासंदर्भातील माहिती त्यांच्या संकेतस्थळावर (httt://www.cern.ch) दिलेली असताना ती जाणून घेण्याची आच ना प्रसारमाध्यमांना, ना जाणत्यांना, ना सर्वसामान्यांना. हा महाप्रयोग ज्या संस्थेने सुरू केला ती संस्था सर्न(CERN) आणि महाप्रयोगासाठी उभारलेला प्रकल्प लार्ज हेड्रॉन कोलायडर अर्थात एलएससी याबद्दल जाणून घेणे उचित ठरेल.
सर्न(CERN)
1952 मध्ये भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठी युरोपियन देशांनी स्थापन केलेली ही संस्था Europian Counsil for Nuclear Research या नावाने ओळखली जाते. अणूमधील घटकांच्या संशोधनासाठी ही संस्था अस्तित्वात आलेली आहे. व्यापक दृष्टिकोन बाळगणार्या संस्थेने चालवलेल्या प्रयोगाबाबत नको तो गाजावाजा प्रसारमाध्यमांनी करण्याची खरंतर गरजच नव्हती. अर्थात विज्ञानजगताने प्रसारमाध्यमांचे आभार मानण्याची गरज आहे. कारण वैज्ञानिक कोणते वैज्ञानिक प्रयोग करतात. ते कधी करतात याची कोणालाच माहिती नसते. प्रसारमाध्यमांच्यामुळे या महाप्रयोगाबद्दलची माहिती जनतेला मिळाली. अर्थात अतिरंजीत. पण असो. यानिमित्ताने वैज्ञानिक समाजाच्या हितासाठी काहीतरी प्रयोग करताहेत हे तरी समजले. हेही नसे थोडके. सध्या अस्तित्वात असलेले जगातील सर्वात मोठे वैज्ञानिक उपकरण लार्ज हेड्रॉन कोलायडर Large Hadron Collider (एलएचसी) सित्झर्लंडमधील जिनीव्हा जवळ कार्यरत आहे. जमिनीखाली 100 मीटर अंतरावर स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या दोन देशांच्या सीमेवरील आल्पस पर्वतराजीमध्ये 27 किलोमीटर वर्तुळाकृती परिघामधील बोगद्यामध्ये हे उपकरण बसवलेले आहे. मूलभूत कणांना गतीमान करून भौतिकशास्त्रज्ञ विश्वातील लहानात लहान कणाच्या शोधात आहेत. विश्वाच्या संकल्पनेमध्ये क्रांतीकारी बदल या निमित्ताने होण्याची शक्यता आहे. विश्वातील लहानात लहान कण ते विश्वाचा अवाढव्य पसारा काय आाहे या दोन्हीचा वेध यानिमित्ताने घेतला जाणार आहे. या 27 किलोमीटर परिघामध्ये 9300 अतिसुवाहक चुंबकांचा वापर केलेला आहे. द्रवरूप हेलियमचा वापर करून या ठिकाणचे तापमान -271 अंश सेल्यिअस इतके राखलेले आहे. नऊ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 450 अब्ज रूपये खर्चाचा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास 14 वर्षे लागलेली आहेत. 1994 मध्ये प्रकल्पउभारणीला सुरवात झाल्यानंतर सन 2008 मध्ये तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला आहे.
या वर्तुळाकृती बोगद्यातून प्रोटॉन कणांच्या शलाका दोन विरूद्ध दिशेत पाठवल्या जाणार असून त्यांचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका म्हणजे सेकंदाला 3 लाख किलोमीटर असणार आहे. प्रोटॉन कणांचा वेग हळूहळू वाढवला जाणार असून शेवटच्या टप्प्यात ते प्रकाशाच्या वेगाने जाणार आहेत. या प्रचंड वेगाने जाणारे कण नंतर एकमेकांवर आदळले जातील. कण आदळल्यानंतर जो स्फोट होईल ती विश्वनिर्मितीच्या वेळेस झालेल्या महास्फोटासारखाच असेल. या स्फोटातून जे बाहेर पडेल त्यांचा अभ्यास करून मग निष्कर्ष काढले जाणार आहेत. अर्थात या निष्कर्षाला बराचसा कालावधी लागणार हे निश्चित.
– प्रा. डॉ. नितीन शिंदे