Categories
आंदोलन

विवेकाचा आवाज बुलंद करू या!

जानेवारी - २०१४

2 डिसेंबरच्या मुंबईच्या मोर्चास उस्त्फुर्त प्रतिसाद

जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने लोकशाहीतील सर्व सनदशीर मार्ग वापरले. अगदी धरणे, आंदोलने, मूक मोर्चा, निषेध मोर्चा, उपोषणे, पत्र लिहिणे, जिल्हाधिकार्‍यांना निवेदने देणे, स्वरक्ताने पत्रे लिहिली सगळं केलं. पण शासन काही मनावर घेईना. शेवटी ठरवून डॉ. दाभोलकरांना ‘कुणी तरी’ संपवलं. आणि शासनाला जाग आली. 20 ऑगस्टला मृत्यू आणि 22 ऑगस्टला जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचा वटहुकूम निघाला. 24 ऑगस्टला तो राज्यपालांकडे गेला. 26 ऑगस्टला सही होऊन महाराष्ट्रात लागूही झाला. केसेस दाखल व्हायला सुरवातही झाली परंतु आतापर्यंतचे सर्व अनुभव लक्षात घेता वटहुकुमाची 180 दिवसांची मुदत संपली आणि 9 डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला नाही तर? एका बाजूला हा प्रश्न तर दुसर्‍या बाजूला चार महिने उलटून सुद्धा डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे खुनी सापडत नव्हते. खुनी शोधून काढण्यातले शासनाचे अपयश पाहता धर्मांध व मूलतत्ववादी शक्तींचा प्रतिकार करायला शासन कचरतेय की काय? अशा शंका अंनिस कार्यकर्तेव समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये येऊ लागल्या. म.अं.नि.स. कार्यकर्त्यामधील अस्वस्थता, पुढे काय? आणखी किती वेळ थांबणार? अंनिसची पुढची वाटचाल काय? असे प्रश्न धडाधड कार्यकर्त्यांवर येऊन आदळायला लागले. दुसर्‍या बाजूला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, तिथेही फक्त 10 दिवसच चालणारे कामकाज. ह्या सगळ्या लगबगीमध्ये कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पुण्याच्या राज्य कार्यकारिणीत म.अं.नि.स. व महाराष्ट्रातील सर्व समविचारी, परिवर्तन वादी पक्ष, संघटना, संस्था व व्यक्ती यांच्या सहभागाने शांततामय मार्गाने ‘भव्य मोर्चा’ काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. कार्यकर्त्यांनी तो उचलून धरला. त्याचे नियोजन झाले.

सोमवार दि.2 डिसेंबर रोजी ठीक 9 वाजता राणीचा बाग, भायखळा, मुंबई येथे एका वेगळ्याच उत्साहाने निर्धाराने, प्रेरणेने वेगवेगळ्या समुदाय संघटनेचे कार्यकर्तेजमा झाले. त्यात किशोर वयीन तरूण-तरूणींपासून ते सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांचाच समावेश होता. शहरी, निमशहरी, खेडी, उच्चभ्रू अशा सर्व वस्त्यांमधील लोकांचा समावेश आश्चर्यजनक होता. मनाला प्रश्न पडला, “हे सारे कुठून येते?” सर्व मोर्चेकर्‍यांच्या छातीवर दाभोलकरांचा फोटो व ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ असे घोषवाक्य असलेले बिल्ले चमकत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, विवेकाचा आवाऽऽऽज बुलंद करू, “दाभोलकरांच्या मारेकर्‍याला शिक्षा झालीच पाहिजे” “जादूटोणा विरोधी कायदा झाला पाहिजे.” आवाज दोऽऽऽ हम एक है। अंधश्रद्धा निर्मूलन समिती आगे बढो, हम तुम्हारे साथ है। ह्या व इतर अनेक घोषणांनी राणीचा बाग परिसर दुमदुमून गेला. एका बाजूला घोषणा तर दुसर्‍या बाजूला ढोलकीच्या तालावर चळवळीची प्रेरणादायी गीते मोर्चे कर्‍यांना स्फूर्ती देत होती.

मोर्च्याच्या अग्रभागी डॉ. दाभोलकरांचे फोटो असलेली सुमो आणि सोबतीला वारकर्‍यांच्या पारंपरिक वेशातील वाभळे महाराज आणि त्यांचे सहकारी रूढी, परंपरा, कर्मकांडावर झोड उठविणारे किर्तन म्हणत होते. पादचारी ह्या द़ृश्यांकडे आश्चर्याने पहात होते. विविध संघटनांची व्यक्त होण्याची अभिनव पद्धत आम्ही अनुभवत होतो. जहाल आणि मवाळ हे दोन्ही गट एकच ध्येय समोर ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. पण कुठेही वाहने अडवणे नाही, रांग मोडणे नाही, असभ्य घोषणा नाही. कमालीचे शिस्तपूर्ण वातावरण, तब्बल दहा हजारांचा जनसमुदाय इतक्या शिस्तीत राणीचा बाग ते आझाद मैदान चालू शकल्या हे एव्हाना सिद्ध झालं होतं.

सहभागी झालेल्या संस्थांमध्ये लोकविज्ञान, जनता दल सेक्युलर, घर बनाओ, घर बचाओ, गिरणी कामगार संघर्ष समिती व त्यांचे नेतृत्व दत्ता इस्वलकर, श्रमिक क्रांती संघटना, लोक जनशक्ती पार्टी, सर्वहारा जन आंदोलन, माकप, भाकप, भीमशक्ती सामाजिक संघटना, युवक बिरादरी, जैतापूर प्रकल्प, पर्यावरण चळवळ, आम आदमी पार्टी, शिक्षक भारती, सोशॅलिस्ट पार्टी, युवा क्रांती सभा, अपना परिवार, विद्यार्थी भारती, पत्रकार, नेचर अ‍ॅक्टिव्हिस्ट, राष्ट्र सेवा दल, तसेच सिने अभिनेत्री अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, नंदू माधव, शाहीर संभाजी भगत इ.मंडळींचा सहभाग होता. यांच्यासह शैला दाभोलकर, डॉ. हमीद व कन्या मुक्ता दाभोलकर त्याचबरोबर दाभोलकर कुटुंबातील अनेक जण या मोर्च्यात सहभागी झाले होते.

मोर्चा आझाद मैदान येथे पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी म.अं.नि.स.चे अध्यक्ष डॉ.एन.डी.पाटील होते. सभेच्या सुरवातीला म.अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, “हा कायदा प्रथम महाराष्ट्रात संमत व्हावा व नंतर संपूर्ण भारतात व्हावा. संविधानाच्या आधारावर हे राज्य चालले पाहीजे. तसेच राष्ट्रद्रोह्यांवर शासन कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला.

मुक्ता दाभोलकर ह्या आपल्या भाषणात म्हणाल्या की, ह्या प्रचंड जनसमुदायाने दाखवून दिले की फक्त जात आणि धर्माच्या नावावरच लोक एकत्र येत नाहीत. तर विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठीही एकत्र येतात. सभेला विविध संघटनांचे नेते व मान्यवर यांनी आपली परखड मते व्यक्त केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रकाश करात, प्रकाश आंबेडकर, हुसेन दलवाई, मेधा पाटकर, कपील पाटील, पुष्पाताई भावे व आमदार विद्या चव्हाण या सर्वांनी दाभोलकरांच्या खुन्याचा धिक्कार करत याचा तपास, गांभीर्याने का होत नाही याबद्दल शासनाला सुनावले. तसेच कायदा हिवाळी अधिवेशनात संमत करण्याचे सरकारला आवाहन केले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन माकपचे जनरल सेक्रेटरी प्रकाश करात यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर शेवटी सभेचे अध्यक्ष डॉ.एन.डी.पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “महाराष्ट्राच्या परंपरेचा मान राखण्यासाठी फुले, आंबेडकरांचा वारसा चालवण्यासाठी डॉक्टरांनी लावलेली विवेकाची ज्योत तेवत ठेवली पाहीजे. महाराष्ट्र सरकारने आपली इच्छा शक्ती दाखवली तर विरोधकांची विरोध करण्याची हिंमत नाही. पोलिटीकल विल शासनाने दाखवावी, अन्यथा शासनाची अवस्था शोचनीय होईल. देशाच्या गृहमंत्र्यांनी गुन्हेगार पकडण्याची बातमी देऊन स्वत:चे हसे केले आहे.”

नवा माणूस घडवण्याची ‘मुस’ डॉ.दाभोलकरांनी आपल्याला दिली. ही चळवळ अशीच पुढे नेऊ असे ते शेवटी म्हणाले. ‘हम होंगे कामयाब’ ह्या समुह गीताने ह्या निर्धार सभेची सांगता झाली.

सुशीला मुंडे

मोबा. 9404870434