Categories
चळवळ

विवेकवाद तळागाळात रूजविण्याचा निर्धार

जानेवारी - २०१४

अंनिसच्या राज्यव्यापी मेळाव्यात डॉ. दाभोलकरांना अभिवादन!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 1 सप्टेंबर 2013 सातार्‍यात पार पडलेल्या राज्यव्यापी निर्धार मेळाव्याच्या पहिल्या सत्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वैचारिक वारसा सक्षमपणे पुढे नेण्याचा तसेच त्यांचे कृतीशील व विवेकी विवार तळागाळापर्यंत रूजवण्याचा निर्धार समितीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी केला. डॉ.दाभोलकर यांनी निर्माण केलेले विवेकाचे, समतेचे नवे पर्वच माणसाला प्रगतीकडे घेऊन जाईल असा विश्वास पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने वेदभवन येथे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा राज्यव्यापी निर्धार मेळावा पार पडला. त्यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.एन.डी.पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, सुशिला मुंडे, अनिरूद्ध जाधव, डॉ. रविंद्र टोणगावकर, डॉ.प्रदीप पाटकर, महेश भागवत उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात डॉ. एन.डी. पाटील यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांनुसारच वाटचाल करण्याचे आवाहन केले ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी उभ्या महाराष्ट्रात विवेकाचं, समतेचं नवं पर्व आचारातून, विचारातून निर्माण केले आहे. त्यांच्या निधनामुळे कार्यकर्ते सैरभर झाले तरी तरूणांनी आपली श्रद्धा ठेवावी. त्यांचे विचार खोलवर गेले आहेत. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्रात गेल्या 9 ते 10 दिवसांपासून अनुभवत आहोत. कित्येक वर्षात अशी माणसे जन्माला येत नसतात. डॉ. दाभोलकर एक कृतीशील विचारवंत होते. आपला विचार समाजात रूजविण्यासाठी फार मोठी किंमत देण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. त्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. जादूटोणा बिलाच्या संदर्भात समाजाला शहाणपण शिकवायला गेलेल्या माणसाला महाराष्ट्राने कसे वागवले? डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात लढणार्‍या कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले हे फार मोठे काम आहे. त्यांचा समाज परिवर्तनाचा विचार जीवनाचा केंद्रबिंदू ठरला. त्यांनी जो विचार दिला त्या विचारांशी प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. त्यांच्या छातीत वाघाची धमक व पायात हत्तीचे बळ होते. त्यांनी हीच शिदोरी महाराष्ट्रातील असंख्य तरूणांच्या स्वाधीन केली आहे.

‘आपण सर्व दाभोलकर’ हे बोलायला सोपे आहे. मात्र ते विचार आचरणात आणणे तितकेच गरजेचे आहे. दाभोलकर हा लढवय्या शरीराने गेला असला तरी विचाराने हा योद्धा सातत्याने समाजात राहणार आहे. प्रत्येकाने दाभोलकरांच्या आचाराचे व विचारांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याकडे जे काही बळ असेल ते वापरू या. शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर राहणार असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

डॉ. शैला दाभोलकर म्हणाल्या, डॉ. दाभोलकरांचा विचार सर्व तरूणांमध्ये लवकरात लवकर पोहचला पाहिजे. आजची तरूण पिढी बदललेला विचार ग्रहण करू शकते. त्यांचा विवेकी विचार हा अतिशय महत्वाचा होता. त्यासाठी प्रत्येकामध्ये विचारांचे बीज पेरले पाहिजे.

राज्य उपाध्यक्ष डॉ. रविंद्र टोणगावकर म्हणाले, प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून विचारांची सुरवात करून विवेकवादी बनावे. कुंडली व मुहुर्त बघणार नाही असा प्रत्येकाने निर्धार करा हीच खरी डॉ.दाभोलकरांना आदरांजली ठरेल.

डॉ.प्रदीप पाटकर म्हणाले, अश्रू कोंडून ठेवले आहेत. पापण्यांच्या आड ते लपले आहेत. पुढे काय करायचा हा प्रश्नच नाही. जो डॉक्टरांनी अक्षररूपाने दिला आहे. तोच विचार आता पुढे नेवू या. अलका चाफेकर, अण्णा कडलास्कर, प्रभाकर नाईक, सुशिला मुंडे, आण्णा स्वामी, मधुकर गायकवाड, हणमंतराव भोसले, अ‍ॅड. अतुल अलमेडा, बाबा अलुगडे, किरण सगर, सुधाकर काशीद, गजेंद्र सुरकार, डॉ. महेश भागवत, प्रा. अनिरूद्ध जाधव, प्रा.वर्भेयांच्यासह राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या कार्याची महती सांगून त्यांचे विचार नेटाने पुढे नेण्याचा निर्धार केला. यावेळी अनेकजण भावूक बनले होते.

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांकाचे प्रकाशन डॉ. एन.डी. पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यास अंनिसचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत पोतदार

मोबा. 9421121328