Categories
अभिवादन

विवेकवादी राष्ट्रीय संघटनांचे डॉक्टरांना अभिवादन

वार्षिकांक – २०१३

माझा बुद्धीप्रामाण्यवादी भाऊ
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त ऐकून भयंकर धक्का बसला. ते समाजात समता प्रस्थापित करणार्‍या चळवळीच्या अग्रभागी राहिले. फायद्यातील वैद्यकीय व्यवसायाचा त्याग करून त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहिले. ते साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात नेहमी व्यस्त असूनदेखील अभ्यागतांना भेटणे, पत्रव्यवहार करणे, लेखन करणे आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी विज्ञानबोध वाहिनीचा उपक्रम काटेकोर नियोजन करून त्यांनी महाराष्ट्रभर राबविला. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात अंनिसची शाखा स्थापन व्हावी अशी त्यांची जीवनातील महत्वाकांक्षा होती.
‘एक गाव, एक पाणवठा’ या जातीप्रथा झुगारणार्‍या व समताधिष्ठीत तत्व प्रस्थापित करणार्‍या चळवळीचे कार्य त्यांनी केले. गेल्या दशकापासून महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले, यामुळे अंधश्रद्धेद्वारे बुवाबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे होणारे शोषण हा दंडनीय अपराध ठरावा.
‘फिरा’चे ते खंबीर समर्थक होते. राष्ट्रीय स्तरावरील ‘फिरा’च्या अधिवेशनाचे मोठ्या प्रमाणातील आयोजन त्यांनी पुण्यात 2007 मध्ये केले होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धीप्रमाण्यवाद्यांचे अधिवेशन पुण्यात घेण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. विज्ञानाचा प्रचार व प्रसार या कार्यासाठीचा विज्ञान व औद्योगिक संचार परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली यांचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

-डॉ.नरेंद्र नायक, अध्यक्ष, FIRA (फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन)

ओडिशा रॅशनॅलिस्ट सोसायटी
ओडिशा रॅशनॅलिस्ट सोसायटी डॉ .नरेंद्र दाभोलकरांच्या रानटी खुनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करते. डॉ.दाभोलकर अंधश्रद्धा, सामाजिक अन्याय आणि काळी जादू या विरूद्ध संघर्ष करणारे महान योद्धे होते. भारतीय समाजाचे परिवर्तन व्हावे, या महान ध्येयासाठी त्यांनी बलिदान दिले. त्यांनी निर्भय, ध्येयवादी आणि ध्येयासक्त जीवन स्वीकारले. मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षता यांचे ते महान उपासक होते. त्यांचा मृत्यू हे विवेकवादी बांधवांसाठी प्रचंड मोठे आव्हान आहे. आम्हाला आशा वाटते की, निरिश्वरवादी, विवेकवादी, मुक्त विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष मानवतावादी या मूलतत्ववादी आणि सनातनी प्रवृत्तीविरूद्ध लढण्यासाठी एकजूट करतील. जोपर्यंत समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत, तोपर्यंत डॉ.दाभोलकरांच्या स्मृती चिरंतन राहतील.

डॉ.दाभोलकरांच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी एकीची भावना व्यक्त करतो.

देबेन्द्रू सुतार (सचिव) धनेश्वर साहू
ओडिशा रॅशनॅलिस्ट सोसायटी, भुवनेश्वर

बिहार रॅशनॅलिस्ट फोरम
डॉ.नरेंद्र दाभोलकर की हत्या करके आधुनिक विचारोंकी हत्या करने का प्रयास किया गया है। पर विचार कभी नही मरता है। उनके विचार आजभी लाखों व्यक्तीमें जीवित है।

-मुनिंदर के.झा.(रौशन), बिहार रॅशनॅलिस्ट फोरम, पटना

अ.भा.अं.नि.स.
अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील धडाडीचे नेते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची धार्मिक दहशतवाद्यांनी हत्या केल्यामुळे पुरोगामी संघटनांना फार मोठा धक्का बसला. त्यांचे कार्य जोमाने पुढे सुरू ठेवणे आणि देशातील धार्मिक दहशतवाद संपविणे, हीच खरी आदरांजली ठरेल.

– हरिभाऊ पाथोडे, विदर्भ संघटक, अ.भा.अं.नि.स.

फोरम अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन बाय गॉडमेन
भोंदू महाराज कल्की भगवान याच्या विरोधात मी सुरू केलेल्या संघर्षाची पहिल्यांदा दखल घेतली ती 2005 साली डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी. माझ्या या संघर्षासाठी त्यांनी महाराष्ट्र अंनिसमार्फत दिला जाणारा आगरकर पुरस्कार देऊन माझा गौरव केला होता.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रात भोंदू बाबा-महाराजाविरूद्ध उभा केलेला संघर्ष ऐतिहासिक होता. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही याची जबाबदारी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी.

-विश्वनाथ स्वामी,
प्रेसिडेंट, फोरम अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन बाय गॉडमेन, बेंगलोर

तर्कशील समाज, पंजाब
किसी इन्सान को कत्ल किया जा सकता है। उसके विचारोंको कत्ल नही किया जा सकता। एक डॉ.नरेंद्र को क्या मारते है। हम हजारों डॉ.नरेन्द्र है जो एक दिन उस मकसद को हासिल कर लेंगे जो डॉ.नरेन्द्र चाहते थे। डॉ.नरेन्द्रकी कुर्बानी व्यर्थ नही जाएगी अन्धविश्वास की किंसती मे एक सुराख साबित होगी जो एक दिन उस किसती को डुबा देंगी।

-नीरज बाला, सतपाल सिंह,
तर्कशील पंजाब सुसाईटी, पंजाब, जोन चण्डीगड

केरला मुक्तीवादी संघम
आम्ही केरला मुक्तीवादी संघम डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पाशवी खुनाचा तीव्र निषेध करतो. जातीप्रथा आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधातील त्यांच्या कर्तृत्वाने आणि धाडसी भूमिकेने त्यांना देशामध्ये व विशेषत्वाने महाराष्ट्रामध्ये विवेकवादी चळवळीचे नायक बनविले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी लढा दिला आणि त्यांच्या हौतात्म्यामुळे महाराष्ट्र शासनाला अंधश्रद्धाविरोधी वटहुकूम काढावा लागला. डॉ.दाभोलकरांच्या खुनामुळे निश्चितपणे, विवेकवादी चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असले तरी ही चळवळ त्यांच्या स्मृतींच्या बळावर फोफावेल.

– ए.के.नागप्प्पन, केरला मुक्तिवादी संघम

गोवा सायन्स फोरम
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून हे भ्याडपणाचे कृत्य आहे. जर या गुन्हेगारांना वाटत असेल की त्यांचा विजय झाला, तर ते चूक आहे. डॉ.दाभोलकरांच्या मृत्यूने आमची चळवळू पूर्वीपेक्षा सशक्त झालेली आहे.

-सिद्धी एस.पै., सदस्य,
गोवा सायन्स फोरम
पाँडिचेरी सायन्स फोरम