अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कोल्हापूर यांचे वतीने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती बिंदू चौक येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमामध्ये दारूच्या बाटलीस मा.सई खराडे(माजी महापौर, कोल्हापूर) यांचे हस्ते जोडा मारण्यात आला. तसेच ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे हस्ते गुटखा व तंबाखूची होळी करण्यात आली. यावेळी सखाराम बापू खराडे महाविद्याल्यातील डी.एड. व बी.एड. विद्यार्थिनी, महावीर महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त होता कामा नये असा कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणाले, “समाजातील युवकांचे व्यसनप्रमाणात वाढ झाली असून, येथे जमलेल्या सर्व मुलींनी असा निश्चय करावा- ‘दारू पिणार्या व्यक्तीबरोबर लग्न करणार नाही’, याला यवुक युवतींनी प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे यांनी अंनिस उपक्रमाचे कौतुक करताना, अंनिसच्या पाठीशी भविष्य काळातही ठाम राहण्याची ग्वाही दिली. कॉ.गोविंद पानसरे म्हणाले की, अंनिसचे कार्य समाजाला पुढे नेणारे असून, समाजाला दिशादर्शक आहे, अंनिसकडून युवक युवतींनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.
यावेळी गोकुळ दूध संघाकडून दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सूर्यवंशी यांनी केले. समाज व्यसनमुक्त रहावा यासाठी प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. समारंभाचे संयोजन अंनिस कार्यकर्ते धनाजीराव जाधव, अरूण पाटील, प्रविण बंकापुरे, कॉ.शिवाजी शिंदे, पंडित ढवळे,, कॉ.के.डी.खुर्द, कॉ.सुशिला यादव, स्वाती कोरे यांनी केले.
यावेळी द-दुधाचा, द-दारूचा नव्हे’ ‘हॅप्पी न्यू इयर खाऊ नका गुटखा पिऊ नका बियर’ अशा घोषणा देण्यात आल्या.
– रमेश वडणगेकर, कोल्हापूर