सौंदत्तीच्या यल्लाम्मा देवी कर्नाटकची. तिच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्राची सीमा ओलांडतात; परंतु सातारा जिल्ह्यात जणू चमत्कारच घडला. या देवीची स्वयंभू मूर्ती म्हणे इथं प्रकटलीय. विशेष म्हणजे या मूर्तीच्या नावावर अंधश्रद्धेचा बाजार मांडणार्या कथित भोंदू हणमंत पुजारी उर्फ मामाजी(खरे नाव हणमंत महादेव कटकदौंडे, राहणार उदयमनगर, म्हसवड, ता.माण, जि.सातारा) भोंदू दुकानगिरी धुमधडाक्यात सुरू होती. संबंधित भोंदूगिरीबाबत तक्रार देण्यासाठी युवक क्रांती दलाचे सातारा जिल्हा प्रमुख राजकुमार डोंबे व त्यांचे सहकारी सातार्यात अंनिसच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रशांत पोतदार यांना फोन करून लेखी तक्रारच घेऊन आले. सोबत म्हसवड नगरपरिषद कार्यालयाचे पत्रही आणले होते. हा हणमंत पुजारी अगदी मोक्याच्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम परवाना न घेता, कोणतेही रजिस्ट्रेशन नसताना, बांधकाम व अनधिकृत देणग्या गोळा करत असल्याचे पुरावेच अंनिसला दिले. याबरोबरच गावातील लोकांच्या फसवणुकीच्या तक्रारीचे 7 अर्जही सोबत आणले होते. या तक्रारी संतोष धनंजय शिंदे, सौ.अनिता राजेंद्र सोनवणे, सुनिल भगवान शिंदे, प्रकाश बाजी लोखंडे, शांतिलाल गजेंद्र सरतापे, अजिनाथ लक्ष्मण केवटे, बाळासो नाना शेलार सर्वांचा तक्रारीचा सूर साधारण एकच होता तो असा… अनधिकृत बांधकाम, अनधिकृत देणग्या गोळा करणे, अंबाबाईची पट्टी व परडी करण्यास भाग पाडले त्यासाठी 21000/- रूपये घेतले, अमावास्या पौर्णिमेला कोंबडा, बोकड यांचा बळी दिला जातो. यल्लमादेवीच्या नावाची भीती भक्तांना दाखवून त्यावर उपाय करण्यासाठी पैशाची मागणी करणे. पैसे न दिल्यास देवीचा कोप होऊन तुमच्या संसाराचे वाटोळे होईल, अंगात देवी आणून पट्टी बांधणे, महिलांना लिंब नेसवणे, करणीबाधा यावर उपाय करणे, यल्लमा रेणूका देवीची यात्रा भरवून मोठ्या प्रमाणात चोळी पातळ करणे, महाप्रसाद देणे, होमशांती करणे.
हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे अंनिसच्या टिमच्या लक्षात आल्यानंतर सातार्याहून भगवान रणदिवे, रोहित घाडगे, शंकर कणसे, युवराज झळके व प्रशांत पोतदार तसेच लोकमतचे सातारा जिल्हा आवृत्ती प्रमुख सचिन जवळकोटे व फोटोग्राफर जावेद खान हे सर्वजण प्रत्यक्ष भोंदू हणमंत पुजार्याच्या म्हसवड या ठिकाणी 28 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 10.00 वाजता जाऊन धडकलो. हणमंत पुजारी एकटाच देवळाच्या परिसरात थांबला होता. त्याच्याशी चर्चा करण्यापूर्वी पोलीस स्टेशनला काही गडबड व दंगा होऊ नये म्हणून याची कल्पना फोन करून दिली होती. पुजार्याला बाहेर बोलावून तुझ्या विरूद्ध लोकांच्या लेखी गंभीर तक्रारी आहेत व तु करत असलेले सर्व प्रकार गंभीर बेकायदेशीर असून तू हे सर्व बंद करणार असशील तर तुला एक संधी देऊ अन्यथा तुझ्याविरूद्ध फौजदारी कायदेशीर कारवाई करावी लागेल असे म्हणताच हणमंत पुजारी जाम घाबरला व मी करत असलेले सर्व प्रकार फसवेगिरीचे, बेकायदेशीर आहेत हे मी मान्य करतो व यापुढे असे करणार नाही असे लेखी लिहून देतो. माझ्याविरूद्ध फौजदारी कारवाई करू नका. यानंतर आम्ही सर्वजण त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये स्वत:च्या हस्ताक्षरात त्याने माफीनामाच अंनिसला लिहून दिला. अशा प्रकारे अंनिस व लोकमत टिमला म्हसवडकरांची तसेच माण तालुक्यातील लोकांची होणारी आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणूक थांबवण्यात यश आले.
-भगवान रणदिवे, सातारा.