Categories
अघोरी प्रथा

यात्रेतील पशुहत्याचा गळफास सोडवताना…

मार्च - २०१३

महाराष्ट्रात जत्रांचा हंगाम सुरु झाला आहे. नवस फेडण्यासाठी दिले जाणारे प्राण्यांचे बळी हे यापैकी अनेक यात्रांचे समान वैशिष्ट्य आहे. प्रचंड पशुहत्या, कमालीची अस्वच्छता, अंगात येणार्‍या स्त्रियांची झुंबड यामध्ये लाख दोन लोख लोक सुखाने वावरत असतात. लक्षावधीच्या त्या जनसमुदायाला या प्रथेमागचे शोषण व अमानुषपणा जाणवतच नाही. उलट त्यांना ती प्रथा पाळणे हाच धार्मिक आचार व अधिकार वाटतो. भाविक परंपरा जपणारे आणि ती मानाने मिरवणारे असतात. त्यांना या प्रकाराविरोधात समजावण्यासाठी कशाला वेळ, श्रम व पैसा फुकट घालवायचा?  गाडगेमहाराजांनी जेथे गुडघे टेकले तेथे तुम्ही कोण लागून गेलात? या शेरेबाजीची आता सवय झाली आहे. या चळवळीवर एक आक्षेप हिंदुत्ववादी हेतुःपुरस्सर घेतात. त्यांचे मत असे की, बकरी ईदला हजारो बोकडांचा बळी दिला जातो. त्याविरुद्ध न बोलता तुम्ही आमच्याच धर्मामागे का लागता? याचे एक उत्तर असे आहे की, हिंदू धर्म असे मानतो की, प्रत्येक प्राणीमात्रात देव आहेच. स्वाभविकच बोकडाचा जीव सुरी मानेवर फिरवून घेतला जातो त्यावेळी त्यामध्ये असलेल्या देवाचा आपण काय विचार करतो? आपण आपल्याच धर्मातील उदात्ततेचे अवमूल्यन करीत नाही का? हा प्रश्न खरे तर प्रत्येक हिंदू अभिमान्यांनी स्वतःला विचारावयास हवा. अर्थात परवडत नसताना सणवार म्हणून किंवा कर्जबाजारी होऊन बोकड बळी देणे ही कोणत्याही धर्मात असो अंधश्रद्धाच आहे.कारण ते गरीबाला गरीब ठेवण्याचे हुशारीने रचलेले कटकारस्थान आहे. सर्व विरोधासह समितीने आजपर्यंत यात्रेमध्ये होणार्‍या पशुहत्या सुमारे दीडशे ठिकाणी थांबवल्या आहेत. ही गोष्ट खरीच आहे की, हे यश मर्यादित आहे. कारण पशुहत्या होणार्‍या यात्रांची संख्या महाराष्ट्रात जवळजवळ तीन ते चार हजार एवढी जास्त आहे. शिवाय ज्या ठिकाणी आम्ही पशुहत्या थांबवतो त्या ठिकाणी यात्रेचे दिवस सोडून छुपके छुपके ती चालूच राहते. या सार्‍या मर्यादांना घेऊन आम्ही लढत आहोत.

यात्रेतील पशुहत्या म्हटली की, मला चिवरी (जि. उस्मानाबाद) येथील चित्तथरारक अनुभव आठवतो. त्याला बरोबर दोन दशके झाली. आम्ही सत्याग्रह केला त्याच्या आदल्या वर्षी त्या यात्रेत पाच हजार बोकड आणि दहा हजार कोंबड्या मारल्याच्या यात्रा कमिटीच्या पावत्या फाटल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्ण महिनाभर धडक प्रचार मोहीम राबवली. अलुरे गुरुजी या गांधीवादी माजी आमदारांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह चांगली साथ दिली. यात्रेला येणारे बहुसंख्य अनुसूचीत जाती व भटक्या विमुक्त जातीमधील होते. त्यामुळे मागास समाजाच्या वस्ती वस्तीतून या प्रथेविरोधात रान उठवले. प्रतिसाद चांगला होता. पण एके ठिकाणी मार खावा लागला तर दुसरीकडे कार्यंकर्त्यांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला. स्थानिक वृत्तपत्रांनी विषय उचलून धरला आणि यात्रेच्या आदल्या दिवशी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी चिवरीत बैठक घेऊन पशुहत्येला कायद्याने बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. वातावरणात प्रचंड ताण आला.

दुसर्‍या दिवशी सकाळी यात्रा सुरु झाली. झुंडीझुंडीने भाविक लक्ष्मीआईच्या देवळाकडे येऊ लागले. देवळाच्या उजव्या बाजूला पोलीसांचा भला मोठा फौजफाटा होता. त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या हा गुन्हा आहे तो केल्यास दंड व शिक्षा दोन्ही होऊ शकते असा इशारा वारंवार दिला जात होता. भाविकांच्याकडील बोकड, कोंबड्या पोलीस जप्त करत होते. कार्यकर्ते देवळाकडे येणार्‍या सर्व रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. ‘ग्यानबा तुकाराम, बोकडाचे काय काम’ ही घोषणा करत गाणी म्हणत हँडबील वाटत कार्यकर्त्यांचे काम चालू होते. ताटात चपात्या, गुळ भात, नारळ असा नैवेद्य घेऊन भक्तांच्या रांगा पुढे सरकत होत्या. पशुहत्या पूर्णपणे बंद होती. देवळाच्या समोर तरण्याताठ्या मुलीपासून ते म्हातार्‍या बायांपर्यंत सर्व वयातील स्त्रीया आळोखे पिळोखे देत कपड्याची शुद्ध न बाळगता बेभानपणे घुमत होत्या. त्यांच्याच बाजूला हलगी ताशे याच्या कडकडण्यात चिंध्याचा घागरा, हातात आसूड, मोकळे केस, पायात चाळ आणि पूर्ण चेहर्‍यावर शेंदरासारखा गडद रंग फासून डझनवारी पोतराज घुमत होते. दुपारी 12 वाजता काशिनाथ घोडगे नावाचा तरुण शंभर दीडशे जणांच्या घोळक्याने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मंदिरासमोर आला. हात उंच करून त्यात पकडलेले कोंबडे देवीसमोरच बळी देण्याचा त्याचा हट्ट होता. त्याला पोलीसांनी बाजूला घेतले. वातावरण तणावपूर्ण बनत गेले. कोंबडे मारावयास दिले जाणार नाही याची खात्री पोलीस, आम्ही सत्याग्रही आणि काशिनाथ व त्याचे साथीदार या सर्वांनाच पटली. आणि मग अगदीच अनेपेक्षित घडले. तोंडाला शेंदूर फासून घुमणार्‍या एका पोतराजाने काशिनाथच्या हातातून कोंबडे हिसकावून घेतले. त्याची मान स्वतःच्या दाताखाली घातली. ती कचाकचा चावली. ती धडापासून वेगळी केली. धड फेकून दिले. कोंबडीचा मानेपासूनचा पुढचा भाग तसाच स्वतःच्या तोंडात धरून ठेवला त्यातून गळणारे रक्त काशिनाथच्या सहकार्‍यांनी हातावर घेतले. काशिनाथच्या कपड्यावर त्यांचे पंजे उमटवले. आणि हिंदू धर्म की जय अशा घोषणा देत काशिनाथला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. आम्ही तक्रार नोंदवूनही पोलीसांनी याबाबत कारवाई करण्याचे टाळले. यानंतर माळरानावर पसरलेल्या काही भाविकांनी ही परवानगी समजून आपल्या सुर्‍या सरसावल्या. जवळपास पाच सहाशे बकर्‍या व हजारभर कोंबड्या कापल्या गेल्या. पोलीसांनी काही ठिकाणी सुर्‍या आणि कातडे जप्त केले खरे पण त्यांनी प्रामुख्याने मंदिरासमोरच्या मैदानावरच आपले लक्ष केंद्रीत केले. यात्रेतील पशुहत्या रोखण्याचे एक पाऊल पुढे पडले. यात आम्ही समाधानी होतो.

– डॉ. नरेंद्र दाभोलकर