Categories
मुलाखत

युरोपमध्ये आम्ही ‘ह्युमॅनिस्ट मॅरेज’ मोहीम चालवितो – बॉब चर्चिल

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, 2017 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करणार्‍या इंग्लंडमधील ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ या प्रसिद्ध संस्थेतील संपर्क व मोहीम विभागाचे संचालक मा. बॉब चर्चिल यांनी शालेय शिक्षणानंतर वारविक विद्यापीठ व कॅनडा येथील क्वीन्स विद्यापीठ येथून तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले. हा आवडीचा विषय शिकत असतानाच ते विवेकी विचारधारेकडे वळले. त्यानंतर व्यावसायिक स्वरुपात ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल, यूके’ या संस्थेत ते 2008 सालापासून काम करू लागले, 2011 ते 2012 पर्यंत ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ युगांडा येथे आणि 2012 पासून ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’मध्ये काम करू लागले. त्यांनी ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’चे प्रवक्ता म्हणून बीबीसी न्यूज, चॅनेल 4 न्यूज, अल् जझीरा न्यूज या वाहिन्यांवर आपले विचार वेळोवेळी व्यक्त केले आहेत. मुलाखतीला सुरुवात करताना आम्ही त्यांना विचारले,

सर, तुम्ही ‘ह्युमनिस्ट इंटरनॅशनल’ या संस्थेसाठी काम करता. त्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडक्यात सांगा. तिथे तुम्ही कधी आणि कसे जोडले गेलात? तुमचे इथल्या कामाचे स्वरूप कसे आहे?

ही संघटना 1952 साली स्थापन झाली आहे व जगभरातील विविध देशांतील मानवतावादी, विवेकवादी, धर्मनिरपेक्षतावादी संघटनांची ती छत्र-संघटना आहे. ही विश्व स्तरावरील लोकशाही पद्धतीने चालणारी संस्था असून जगातील विवेकवादी संघटनांना सदस्य करून घेणे व त्यांच्या कार्यात त्यांना पाठबळ देणे व विविध उपक्रमांना आर्थिक मदत देणे आदी कामे करते. जादूटोणा, चेटूक, घातक रुढी-परंपरा, मुस्लिम स्त्रियांमधील खतना पद्धत, यावर जागतिक स्तरावर काम करते. मानवतावाद्यांचे प्रतिनिधी म्हणून हे प्रश्न ‘युनो’ समोर, जागतिक मानवाधिकार संस्थेसमोर ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’तर्फे मांडले जातात. मानवतावादी व विवेकी लोकांचे प्रश्न जागतिक मंचासमोर मांडले जातात. आमचे भारताशी फार जुने संबंध आहेत. भारतातील या संघटनेतील सदस्य संख्येने दुसर्‍या क्रमांकावर आहेत. आपण ज्या प्रश्नांवर लढत आहात ते प्रश्न जागतिक मंचावर आम्ही मांडू इच्छितो.

‘ह्युमॅनिस्ट यूके’ या संस्थेच्या इंग्लंडमधील काही विभागात, शहरात बैठका होत असत. त्या बैठकांना मी हजर राहत असे. त्यातूनच मी या संस्थेचा सदस्य झालो. त्या वेळेस ‘ह्युमॅनिस्ट यूके’ या संस्थेची नोकर भरतीची जाहिरात आली होती. त्यासाठी मी अर्ज केला व या संस्थेत रूजू झालो. माझे काम सदस्य नोंदणीशी संबंधित होते. दैनंदिन कामे सांभाळणे, सदस्यांशी संवाद साधणे ही कामे होती. इथे शिकणे व काम करणे असे दोन्हीही चालू होते. ही माझी नोकरी होती आणि युरोपात काम करणार्‍या अनेक संस्थांचे स्वरूप असेच असते. इथे पूर्ण वेळ काम करणारे लोक असतात. काही लोक स्वयंसेवक असतात, तर काही लोक पगारदार सेवक असतात आणि अशा प्रकारे विशेष प्रतिभाप्राप्त लोक व स्वयंसेवक यांचे मिश्रण असणे हे संघटनेसाठी चांगले असते. संस्था चालवण्यासाठी अशा स्वयंसेवकांचा उपयोग करून घेणे संस्थेसाठी चांगले असते.

या संघटनांच्या कामाचे स्वरूप कशा प्रकारचे असते?

युगांडा व यूके येथील संस्थांमध्ये मी काम केले. ते राष्ट्रीय स्तरावरचे होते व त्यात माझी भूमिका जास्त करून स्वयंसेवकाची होती. ह्युमनिस्ट यूके ही संस्था मुख्यतः मानवतावादी लग्ने, बारसे, अंत्यविधी; तसेच अन्य प्रकारचे नैतिक, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी स्वरुपाचे कार्य करते. नैतिक प्रकारात अवयवदान हे ऐच्छिक असावे की अनिवार्य, गंभीर आजारी लोकांचा स्वेच्छा मरणाचा अधिकार असे विषय येतात. धर्मनिरपेक्ष प्रकारात सरकारी खर्चावर चालणार्‍या धार्मिक शाळांत (फेथ स्कूल), मानवतावादाचा अभ्यासक्रमात समावेश करणे हे येते. ‘ह्युमॅनिस्ट असोसिएशन ऑफ युगांडा’ ही मात्र त्या देशात मानवतावादी कार्य करणार्‍या विविध संस्थांची छत्र संघटना होती. ही संस्था वेगवेगळे प्रशिक्षण देते. उदा. महिलांचे धोक्यात असलेले जीवन या अंतर्गत सेक्स वर्कर्स यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे. तिथे काही मानवतावादी शाळासुद्धा आहेत. ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ ही संस्था मात्र विविध देशांतील मानवतावादी व विवेकवादी संघटनांची आंतरराष्ट्रीय स्वरुपाची छत्र संघटना आहे. इथे सर्व संघटना एका नेटवर्कमध्ये जोडल्या गेल्या आहेत. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर, ‘युनो’मध्ये मानवतावादी संघटनांचे प्रतिनिधित्व करते.

आपण ह्युमॅनिस्ट विवाहाचा उल्लेख केलात. त्याविषयी अधिक सांगाल का?

हा प्रकार युरोप व जगातील अन्य देशांत लोकप्रिय होऊ लागला आहे. कुठल्याही धार्मिक विधीला स्थान न देता धर्मनिरपेक्ष, कायदेशीर व नागरी असा हा समारंभ असतो. यात संबंधित लोक आपल्या प्रथा, परंपरा व आपली आवड-निवड यानुसार हवे तसे बदल करू शकतात. अशा प्रकारचे मानवतावादी विवाह, नामकरण विधी, अंत्यविधी केल्यास त्यात सर्वांना सामील होता येते. धार्मिक विधीत ते शक्य नसते. कारण वेगळ्या धार्मिक विचारांचे, नास्तिक विचारांचे लोक यांना त्यात भाग घेणे कठीण जाते. या विवाहात किंवा कार्यक्रमांत खर्च वाचविणे हा मुख्य उद्देश नसून त्यातील धार्मिक कर्मकांड दूर करणे व हे विधी सर्वसमावेशक करणे हा असतो.

अशा प्रकारची मानवतावादी लग्ने कायदेशीर मानली जातात काय?

या बाबतीत वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी अशी लग्ने कायदेशीर मानली जातात, तर काही ठिकाणी ती तशी मानली जात नाहीत. इंग्लंड आणि वेल्समध्ये हे लग्न वैध मानले जात नाही; परंतु स्कॉटलंड येथे अशी लग्ने वैध मानली जातात. तिथे ती अत्यंत लोकप्रिय देखील आहेत व धार्मिक विवाहांपेक्षा ही मानवतावादी लग्ने अधिक होत आहेत. जिथे ती वैध नाहीत तिथे संयुक्त प्रकारात लग्ने होतात, ज्यामध्ये विवाहाची नोंदणी व मानवतावादी विवाह असे एकत्रितपणे केले जातात. उत्तर आयर्लंडमध्ये सुद्धा या विवाह प्रकारास लोकप्रियता लाभू लागली आहे; परंतु चर्चचा मात्र या विवाहास विरोध होत आहे. याचे कारण चर्चमध्ये होणारी लग्ने कमी होऊ लागली आहेत, हे असावे. मानवतावादी लग्ने लावून देण्यासाठी, अंतिम संस्कार करण्यासाठी, नामकरण करण्यासाठी काही स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले गेले आहे. या विधीत धर्मगुरूला अजिबात स्थान नसते. यामध्ये स्थानीय प्रथा परंपरांचा आवडीप्रमाणे समावेश केला जातो, त्यात परिवर्तन देखील केले जाते.

इंग्लंडला आम्ही एक प्रगत राष्ट्र मानतो. तिथे इकडच्या प्रमाणे भूत, जादूटोणा, चेटकीण अशा अंधश्रद्धा आहेत काय? त्याची काही उदाहरणे सांगाल काय?

अंधश्रद्धा तिकडे सुद्धा नक्कीच आहेत; परंतु त्यांचा नकारात्मक असा सामाजिक परिणाम फारसा दिसून येत नाही. बरेच लोक भुतावर विश्वास ठेवणारे आहेत; पण ते अत्यंत अल्प आहेत व बरेचसे या बाबतीत तटस्थ आहेत. बर्‍याच अंधश्रद्धा या स्थलांतरित नागरिकांमुळे आलेल्या दिसतात. मुलींना लग्नासाठी शाळेतून काढणे, त्यांची खतना करणे या बाबी पाकिस्तानी व अन्य मुस्लिम देशांतून आलेल्या स्थलांतरित लोकांमध्ये दिसून येतात. एक-दोन प्राणघातक प्रकरणे चेटूक या प्रकारची सुद्धा झालेली आहेत. स्थानीय लोकात अशा प्रथा फारशा आढळत नाहीत. ‘दी ओमेन किंव एक्झोर्सिस्ट’ अशा सिनेमांमध्ये जे दाखवले जाते ते काल्पनिक असते, असे मा. बॉब यांनी सांगितले. एंजल, भूत वगैरे प्रकार इकडे आहेत; परंतु त्यांच्या आहारी जाऊन नुकसान झाल्याची फारशी उदाहरणे इकडे नाहीत. याचा समाजावर काही विपरीत परिणाम झालेला दिसत नाही. इंग्लंडमध्ये अशा घटना घडत नसल्या तरी नायजेरियासारख्या देशात होतात व त्या बाबतीत आमची संघटना लक्ष घालत आहे.

तुमच्या देशात छद्मविज्ञानाबाबत काय परिस्थिती आहे?

इंग्लंडमध्ये फारशी उदाहरणे सापडत नाहीत; परंतु अमेरिकेच्या बाबतीत काही छद्मविज्ञानाची उदाहरणे आहेत, जी इंटरनेटमार्फत पसरली आहेत. त्यातील एक आहे लसीकरणविरोधी मोहीम. या बाबतीत आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत. कारण रोगराई वाढून याचे वाईट परिणाम होऊ शकतात. चुंबक चिकित्सा; तसेच हर्बल मेडिसीन सारख्या पर्यायी चिकित्सा पद्धती तिकडे सुद्धा काही प्रमाणात आढळून येतात. यात चुकीचे उपचार झाल्याने किंवा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची काही प्रकरणे ऐकली आहेत. याशिवाय कट-सिद्धांत (Conspiracy Theory) सारखे प्रकार अचानक दिसून येतात. उदाहरणार्थ चंद्रावर मानवाने ठेवलेले प्रथम पाऊल. याबाबतीत सुद्धा कट-सिद्धांत मांडला जातो. तो मांडताना अत्यंत शिस्तबद्धपणे मांडला जातो व प्रथमदर्शनी लोक त्यावर विश्वास देखील ठेवतात. ती खोडून काढण्यासाठी तिथल्या तिथे आपल्याकडे पुरावा नसतो, त्यामुळे ती लगेच खोडून काढता येत नाही. आमचे सदस्य पर्यायी उपचार पद्धतीच्या बाबतीत वास्तव सांगून व योग्य उपचाराविषयी मार्गदर्शन करत असतात. युगांडामध्ये एका चर्चच्या पाद्रीने घोषित केले होते की, एड्स रोग केवळ प्रार्थनेने बरा करता येतो, तरी लोकांनी औषधोपचार न करता चर्चमध्ये यावे. असेच होमिओपॅथीच्या बाबतीत घडते आहे.

आधुनिक विज्ञानाला चर्चचा विरोध होतो आहे काय?

मुख्य प्रवाहातील चर्चकडून असा काही विरोध होत नाही. काही तुरळक अन्य चर्च असू शकतील जे विरोध करत असतील. चर्च ऑफ इंग्लंड असा काही विरोध करत नाही. डार्विनच्या सिद्धांताला सुद्धा काही चर्चनी विरोध केला असेल. तसेच ‘एलजीबीटी’ प्रकरणी सुद्धा काही प्रमाणात विरोध झाला; परंतु तो विरोध निवळतो आहे. ‘गे’ या प्रकाराविषयी जागृती करण्यासाठी काही संघटना झटत आहेत. ‘गे’ म्हणजे काय, ते आपल्या आसपास अस्तित्वात आहेत, असे मुलांना सांगितले जात आहे; परंतु त्याला काही चर्च विरोध करत आहेत. कारण असे करणे म्हणजे मुलांना ‘गे’ होण्यासाठी तयार करणेच होय, तसेच त्यांच्या बालसुलभतेच्या ते विरुद्ध आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे; पण हा युक्तिवाद छद्मविज्ञान या प्रकारात मोडतो. आता याविषयी कायदे पारित होत असल्याने यापुढे त्यांचा विरोध मावळेल अशी अपेक्षा आहे.

तुम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला हजर राहिलात. त्या परिषदेच्या बाबतीत आपला अभिप्राय काय आहे?

या परिषदेने व ‘मअंनिस’च्या कार्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे. जागतिक स्तरावर कार्य करणारी ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ ही संघटना डॉ. दाभोलकर यांना चांगल्या प्रकारे ओळखते, तसेच त्यांच्या मृत्यूनंतर ‘मअंनिस’ने केलेले कार्य, जादूटोणाविरोधी कायदा हे कार्य जाणून आहे. मोठ्या संख्येने आपला वेळ व शक्ती खर्च करून काम करणारे कार्यकर्ते, त्यांनी राज्यात विविध ठिकाणी व राज्याबाहेर तळमळीने तीस वर्षे केलेले काम खरोखरच प्रशंसनीय आहे व आम्ही ते जाणून आहोत. संघटनेचे हे काम मी ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’कडे पोचवणार आहे. स्वयंसेवक म्हणून स्वेच्छेने कार्य करून ‘मअंनिस’ने जगातील अशा संघटनांसमोर एक चांगला वस्तुपाठ घालून दिला आहे. अन्य देशात याचे अनुकरण झाले पाहिजे.