पिंपरीतील भोंदूबाबा स्वामी ग्यानदीपक उर्फ दीपक मोटवानी याला जादूटोणा विरोधी कायद्याखाली पोलिसांनी जेरबंद केल्याची बातमी विविध वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
25 दिवसांपूर्वी या बाबाचे विरोधात पिंपरीतील एका कुटुंबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्याचे धाडस केल्यामुळेच हे घडू शकले. अन्यथा गेली 15 वर्षे चालू असलेला देवावताराच्या नावाखालचा हा गोरख धंदा चालूच राहिला असता. एका कुटुंबाने हे धाडस केले असले तरी आणखी बर्याच महिला व कुटुंबाची फसवणूक झाली असल्याचे नाकारता येत नाही. सोने दुप्पट करून देतो, दैवीशक्तीने आपले सर्व प्रश्न सोडवतो, माझ्या अंगी साई(सिंधीचे दैवत झुलेलाल यासाठी तो वापरत असलेला प्रतीशब्द) बसलेला असल्याने तोच तुमच्याकडे मंदिरासाठी पैशाची मागणी करतो. अशा नानाविध थापा मारून दीपक मोटवाणी फसवणूक व लूट करत असे. एवढेच नाही तर या भोंदूबाबाने दोन वर्षांपूर्वी 2 दिवसांच्या मुलीलाही एका पिंपरीतील बड्या असामीला दत्तक दिले आहे असेही समजते. या शिवाय ओंकार सोसायटीत या बाबाचे फ्लॅटस् आहेत तिथे हा आणखी वेगळे धंदे करत नाहीना याचीपण पोलिसांनी माहिती घ्यावी. तसेच या बाबाकडून फसवल्या गेलेल्या नागरिकांनी, विशेषत: महिलांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा(9422517570) माहिती देणारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. असे समितीचे पुणे शहर अध्यक्ष डॉ.राजेंद्र कांकरिया व पुणे शहर कार्याध्यक्ष अॅड.मनीषा महाजन यांनी आवाहन केले आहे.
डॉ. राजेंद्र कांकरिया, पुणे.
मोबा. 9422517570