Categories
विशेष

अंधारातील वाटा

जुलै - २०१६

अ‍ॅड. अतुल आल्मेडा हे मानवता हाच धर्म मानणारे विचावंत आहेत. येशू ख्रिस्तांचे मानवता, प्रेम आणि विवेकवाद यांचा प्रसार धर्मनिरपेक्ष राहून ते करत आहेत. पूज्य साने गुरुजी ही प्रेरणा मानणारे आल्मेडा ‘अंधारातील वाटा’ या त्यांच्या प्रस्तुत ग्रंथात परखडपणे धर्मचिकित्सा करतात. आजच्या समाजातल्या विविध धर्मांमध्ये कर्मकांडांचा झालेला सुळसुळाट त्यांना अस्वस्थ करतो; त्यामुळे प्रसंगी स्वकियांवर, त्यांच्यातल्या अंधश्रद्धेवर ते वस्तुनिष्ठ राहून टीका करतात. असे असले तरीही त्यातून कुणाबद्दल वैयक्तिक निंदा किंवा कुणाला घायाळ करण्याचा त्यांचा तिळमात्र उद्देश नसतो आणि म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या त्यांच्या विधायक कार्याचा यथोचित गौरव ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देऊन केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या मनातल्या ‘अंधारातील वाटा’ उजळवण्यास नक्कीच साह्यभूत होईल, असा विश्वास वाटतो.

या पुस्तकातील एक प्रकरण वाचकांच्यासाठी येथे देत आहोत.


मंदिरदेऊळ हे देवासाठी कारागृह !

सत्यनारायणाची पूजा करणे मूर्खपणाचे आहे – गाडगेमहाराज

सर्व धर्मियांचे देव देवळात, मंदिरात बंदिस्त आहेत. देव जर बंदिस्त असेल, तर अशा बंदिस्त देवाकडून सर्वसामान्य मानवाचा उद्धार कधीच होणार नाही. मात्र हा देव (बंदिस्त) जो आपण पाहतो, अनुभवतो तो खरोखरच असा कुणी प्रत्यक्षात आहे की नाही, याची काहीच खातरजमा करता येत नाही. शिवाय प्रत्येक धर्म देव सर्वत्र चराचरात आहे, असे मानतातच. हे खरे मानले तर देवाला मंदिर, देवळामध्ये बंदिस्त करण्याची गरज काय? तरी पण सर्व धर्मांत अगदी देव न मानणार्‍या बौद्ध धर्मातसुद्धा बुद्धाला देवपण देऊन बंदिस्त करण्यात आले आहे. त्याला बंदिस्त करणे, हे देवाला पसंत नसले, तरी ज्या मानवी संस्कृतीने देव कल्पिलेला आहे, उदयास आणलेला आहे, निर्मिलेला आहे, त्या मानवाला देव देवळात, मंदिरात बंदिस्त करणे, हे त्याच्या फायद्याचे आहे. जनसामान्यांच्या श्रद्धेचा व अंधश्रद्धेचा अशा दोन्ही गोष्टींचा धूर्तपणे उपयोग करून आपली सत्ता (ती धार्मिक असो किंवा राजकीय) टिकवण्यासाठी बंदिस्त देवाचा उपयोग होतो. देव-देवींची नवनवी रुपे करून गावोगावी देऊळ, मंदिर, चर्चच्या इमारती बांधून देव बंदिस्त करण्याची परंपरा व प्रक्रिया जोरात सुरू आहे. गावात शाळा, दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल तरीही काही बिघडत नाही; पण गावात देवाला बंदिस्त करण्यासाठी देऊळ-मंदिर हवेच हवे. देऊळ-मंदिर आले की, पुजारी आले म्हणजे पुरोहितांची सत्ता व आपोआप राजकारण आलेच व त्याबरोबर भक्तगण. या पुरोहितांबद्दल येशू ख्रिस्त सांगतो, “ढोंगी साधूंपासून सावध राहा. वरून त्यांनी मेंढीचे कातडे पांघरलेले असते; पण आत ते खादाड लांडगे असतात, हे लक्षात ठेवा.”

सर्वसामान्य माणसाला दगडांच्या मूर्तीत देव दिसतो व त्याला तो शरण जातो आणि त्याची पूजा-अर्चा करून त्याच्याकरवी आपली कामे करवून घेतो. देवाला काही देणे आणि देवाकडून काही मागणे म्हणजे नवस करणे व फळ मिळविणे असा व्यवहार देवाच्या नावाने होतो. ही भ्रष्टाचाराची पहिली पायरी आहे. देण्या-घेण्याचा हा व्यवहार देवाच्या नावाने सुरू होतो. धार्मिक बुवाबाजी करणारे नेमके श्रद्धावंतांच्या याच कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊन देवाला बंदिस्त करून थांबले नाहीत, तर देवाला त्यांनी पूर्ण कब्जात आणि नियंत्रणात घेतलेले आपण पाहतो. अमूक तर्‍हेची अमूक प्रार्थना अमूक एक देव किंवा देवीकडे केल्याने अमूक कार्य होणार, अमूक एक नवस अमूक एक देव-देवीकडे केल्याने कार्य फत्ते होणार. देवदेवी एकच; परंतु रुपे अनेक, स्थळ अनेक, पूजेचे आणि प्रसादाचे प्रकार अनेक. यासंबंधी मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, ‘देव आपले चांगले करीत असेल, तर मी सत्यनारायण करेन, ही आशा, हा अवलंब खुळचट आहे. संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो, तर संकटात ढकलतो तो कोण?’ यालाच धरून संत गाडगेमहाराज म्हणतात, ‘सत्यनारायणाची पूजा करणे, मूर्खपणाचे आहे.’

देव जर सर्व चराचरात आहे, तर तो प्रत्येक माणसाला आपल्या हृदयात, घरात, कामाच्या ठिकाणी, व्यवसायात का दिसत नाही? किंवा अनुभवता येत नाही? देव विशिष्ट ठिकाणी व विशिष्ट वेळीच का भेटावा? याचा विचार जनसामान्य करत नाहीत. बुवाबाजी करणार्‍यांचे त्यामुळेच फावते. ‘पुरोहितांनी नेमून दिलेल्या पूजेच्या पद्धती म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजविण्याचे त्यांचे एक साधन असते,’ असे स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवले आहे. ‘कृतीशिवाय कर्मकांड हे थोतांड आहे’ असे प्राचीन तत्त्ववेत्ता चार्वाक यानेही नमूद केले आहे.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर सांगतात, “तुमचा देवावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारण्याला हो किंवा नाही, यापैकी एक उत्तर अपेक्षित असते. मी अशा प्रकारचे उत्तर देत नाही. कारण देव आणि विश्वास या कल्पना व्यक्तिसापेक्ष आहेत. नवसाला पावणार्‍या, चमत्कार करून दाखवणार्‍या देवावर माझा विश्वास नाही.”

अलिकडे ‘देऊळ’ हा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अध्यात्म अथवा देव यासारख्या संकल्पना जनसामान्यांचा कसा पगडा घेतात व देव कसा निर्माण केला जातो व पुरोहित आणि राजकीय पुढारी त्या देवाला आपल्या स्वार्थासाठी कसे वापरतात, ते अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा.

आज 21 व्या शतकात देव-धर्मास बाजारी स्वरूप आलेले आहे. ‘लाखोच्या संख्येने असलेले संन्यासी, बैरागी, गोसावी, जोगी, साधू हे समाजात दारिद्र्य, अज्ञान, आळस व व्यसने यांची वाढ करतात. तरीही लोक त्यांच्या आशीर्वादाची इच्छा बाळगतात, ही आपल्या विवेकाची शोकांतिका आहे’ असे बाबा पद्मनजी सांगतात.

देव धर्माच्या नावाने मोठे ‘मार्केट’ आज आपल्या आजूबाजूला बहरत आहे. धर्माच्या आणि देवाच्या नावाने आपले उखळ पांढरे करणार्‍या बुवाबाजीला ऊत आलेला आपण पाहतो. पण या 21 व्या शतकात विज्ञानाची प्रगती होऊनही देवा-धर्माच्या नादी लागणार्‍यांची संख्या वाढत आहे. माणूस समाजप्रिय आहे, म्हणून एकत्र येण्याची गरज. समूह जीवन, कुटुंब जीवन यांचे जीवनात स्थान. कारण कुणीही विवेकी होऊन विचार करायला तयार नाही. परंपरेला पर्याय नाही. वाडवडिलांपासून अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा निमूटपणे प्रत्येकजण पाळतो. मात्र आपण शंका घेत नाही की, हे कशासाठी? यामध्ये तथ्य किती? अज्ञान किती? सर्व लोक करतात म्हणून मी पण करतो, ही वृत्ती बदलत नाही. शिकलेली व्यक्ती चिकित्सक होत नाही. देवदेवता, प्रार्थना, नवस, उरुस, जत्रा आणि सण-उत्सव याविषयी मनन-चिंतन करत नाही, तोपर्यंत बुवाबाजी थांबू शकत नाही. मग ही परिस्थिती बदलेल कशी?

मी माझ्या जीवनाचा कर्ता आहे, देव माझ्यामध्येच आहे. त्या देवाची भक्ती करण्यासाठी कुठल्या बाबाची आणि दगडाच्या मूर्तीकडे मला नवस करण्याची, प्रार्थना करण्याची, देण्याघेण्याचा व्यवहार करण्याची बिलकुल गरज नाही, असा आत्मविश्वास जेव्हा प्रत्येक माणसात जागृत होईल, तेव्हाच देव मुक्त होईल, माणूस मुक्त होईल व समाज सुखी होईल. देवराज्य केव्हा येणार आहे, असे ख्रिस्ताला विचारले असता येशू ख्रिस्ताने सांगितले, “देवराज्य येत असल्याच्या काही खाणाखुणा दिसत नसतात. हे बघा, इथे आहे किंवा ते काय? असा कुणी दाखवू शकणार नाही. खरं म्हणजे देवराज्य तुमच्यातच आहे,” लिओ टॉलस्टॉय ‘Kingdom of God is within you’ या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात तोच विचार सांगतात. मात्र त्यासाठी मी विचारी बनायला हवे, माझ्यावरील माझा विश्वास वाढायला हवा. माणूस जोपर्यंत विवेकी होणार नाही, तोपर्यंत तो देव-धर्माच्या जोखडातून सुटणार नाही आणि मानवता या सर्वच धर्मापासून वंचित राहणार व धर्माच्या नावानेच एकमेकांचा द्वेष करत राहणार. ‘आपला समाज पोथीनिष्ठ विचारांतून बाहेर येत नाही. परिणामी आपण प्रगती साधू शकत नाही. उलट युरोपने अद्ययावततेची कास धरल्याने तो आपल्यापेक्षा सहस्रयोजने पुढे गेला.’

  • पुस्तकाचे नाव : अंधारातील वाटा (लेख संग्रह)
  • लेखक : अ‍ॅड. अतुल आल्मेडा, वसई
  • लेखक संपर्क : 9167912558
  • प्रकाशक : स्मित प्रकाशन, वसई रोड
  • संपर्क : 9326380717
  • किंमत : 100 रूपये