Categories
परिवर्तन

रेड्याची मान बळीप्रथेतून कायमची सुटली

जुलै - २०१६

जत तालुक्यातील हळ्ळी येथील यात्रेत दीडशे वर्षांपासून दहा रेड्यांचा बळी देण्यात येतो. मात्र अंनिसच्या पुढाकाराने यावर्षीपासून या बळी प्रथेला मूठमाती मिळाली असून, गावकर्‍यांनी बळीप्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेड्याच्या बळीऐवजी नैवेद्याचे पूजन करून यात्रा संपन्न झाली. त्यामुळे या परिसरातील रेड्यांची मान बळीप्रथेतून कायमची सुटली आहे. हळ्ळी या गावात चंद्रदुर्गा देवीची यात्रा होते. या यात्रेत दहा रेड्यांचा बळी देण्यात येत होता. 31 मे रोजी गावची यात्रा होती. या बळी प्रथेबद्दल अंनिसकडे तक्रार आल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन या प्रथेविरोधात गावकर्‍यांचे प्रबोधन केले. यावेळी गावकर्‍यांनी ग्रामसभा बोलावून, ही प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ग्रामसभेत नारळाचा नैवेद्य देण्याचा ठरवही पास करण्यात आला. या ग्रामसभेत पोलीस प्रशासन, अंनिस व यात्रा कमिटी सहभागी झाले होते. ही प्रथा बंद करण्याच्या कृती सांगली अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, कौस्तुभ पोळ, जावेद पेंढारी, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम आदी कार्यकर्त्यांनी सहभाग दिला.

-चंद्रकांत शिंदे