भारतीय समाज धर्मभोळेपणाने कर्ज काढून चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, अमरनाथ यात्रा, गंगास्नान करण्यात धन्यता मानतो. या मनोवृत्तीचे विडंबन करताना महात्मा बसवण्णा म्हणतात-
जलाशय पाहुनी डबकी मारतात
वृक्षाला पाहुनी प्रदक्षिणा घालतात
आटणारे पाणी, वाळणार्या झाडांना
आपलेसे करणारे तुम्हाला कसे जाणतील,
कुडलसंगमदेवा.
(ब. व. क्र. 580)
गंगास्नानाने अथवा वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने सत्यदर्शन होणार नाही. बाह्य अवडंबरापेक्षा अंतरंगशुद्धी महत्त्वाची आहे. गंगास्नानाने फार तर मलिन शरीर स्वच्छ होईल; पण मनातील विकारांचे काय? तुमचे मन जर संकुचित, संशयी, स्वार्थी असेल, दुसर्यांचा तिरस्कार करत असेल, सूडभावनेने पेटत असेल, तर गंगेत बुडून तरी काय उपयोग? असा प्रश्न करताना सोलापूरचे शरण सिद्धरामेश्वर म्हणतात-
एखाद्याचे मन दुखवून
एखाद्याच्या घराचा नाश करून,
गंगेत बुडल्याने काय होणार हो?
चंद्र गंगेच्या तीरावर असला तरी
त्याच्यावरचे डाग जाऊ शकतील का?
याकारणे, मन न दुखविणाराच,
कोणाचा घात न करणाराच
परम पावन पाहा,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.
(व. सि. सा. क्र. 1476)
महात्मा बसवण्णांनी देहचि देवालय मानून तीर्थयात्रा, गंगास्नान, प्रदक्षिणा, क्षेत्रदर्शन ही सर्व आचरणे निरर्थक असल्याचे पटवून दिले आहे. ‘शरणांचे अंगणचि वाराणशी’ म्हणण्याद्वारे बसवण्णा क्षेत्र महात्म्यही नाकारताना दिसतात. शरण अंबिगर चौडय्या तीर्थयात्रा अथवा क्षेत्र महात्म्याचे खंडन अधिक प्रखरपणे केला आहे. तो असा –
काशीयात्रेस गेलो म्हणणार्या
वेश्यापुत्राचे बोलणे ऐकू नये.
केदारला गेलो म्हणणार्या
हीन लोकांचे बोलणे ऐकू नये.
सेतुबंध रामेश्वरला गेलो म्हणणार्या
हीन लोकांचे मुख पाहवत नाही.
पर्वतास गेलो म्हणणार्या
पंचमहापातकींचे मुख पाहू नये.
असे का? तर,
कायाचि काशी, उदरचि केदार,
श्रम करणारे हस्तचि सेतुबंध, रामेश्वर.
महालिंग असलेले मस्तकचि श्रीशैल पर्वत पाहा.
….. –अंबिगर चौडय्या (व. सि. सार व क्र. 1486)
‘अडुसष्ट कोटी तीर्थांत बुडून काहीही उपयोग नाही, कोटी जप, ध्यान, मौन, होमहवन, व्रत, अनुष्ठान करूनही उपयोग नाही. एकशे वीसवेळा भूप्रदक्षिणा घालूनही उपयोग नाही हो. काशी, केदार, श्रीशैल, शिवगंगा येथे जाऊनही उपयोग नाही हो. हा सगळा नुसता भ्रम आहे,’ असे तोंटद सिद्धलिंगेश्वर सांगतात. या व्यवस्थेला पर्याय म्हणून बसवण्णा सत्र्ित्रसंपन्न, विवेकी शरणांचे अंगण दाखवितात.
शरणचरणी पुण्यक्षेत्र,
शरणपदी दिव्यक्षेत्र,
तया चरणी अपार संपत्ती पाहा.
तयाचे वासस्थानचि वाराणसी,
अविमुक्तक्षेत्र असे.
कूडलसंगमाचे शरण स्वतंत्र असल्याकारणे जिथे आचारविचारांनी संपन्न माणसे राहतात, तेच खर्या अर्थाने पुण्यक्षेत्र, दिव्यक्षेत्र, अविमुक्तक्षेत्र होय. ते राहत असलेली भूमीच काशी, वाराणसी आहे.
याहीपुढे जाऊन म. बसवण्णा सांगतात :
शरणांची निद्रा हाच जप पाहा.
शरणांची जागृती ही शिवरात्र पाहा.
शरण चाललेली भूमी पावनक्षेत्र पाहा.
शरण बोललेली वाणी शिवतत्त्व पाहा.
कूडलसंगमाच्या शरणाची कायाचि कैलास पाहा.
(ब. व. क्र. 873)
बसवादी शरणांचा हा वारसा आमच्या वारकरी संतांनी पुढे चालविलेला दिसून येतो. म्हणूनच संत ‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥’ ‘पवित्र ते कुळ, पावन तो देश जिथे हरिदास जन्म घेती॥’ असे म्हणतात. तात्पर्य, आमच्या महापुरुषांनी अत्यंत विवेकनिष्ठपणे अंध आचरणाला दूर सारून जगी ज्ञानदीप लावण्याचा प्रयत्न केला आहे. तो वारसा सांगणार्यांनी स्वत:च्या आचरणात हा विचार आणणे, ही या काळाची गरज आहे.
– राजू ब. जुबरे
मोबा. 08904638908