Categories
जात पंचायत

गर्भवती मुलीचा खून करणार्‍या बापास फाशीची शिक्षा

जुलै - २०१७

अंनिसच्या जातपंचायतीला मूठमाती या अभियानाचे मोठे यश

दि. 28 जून 2013 ची नाशिकची सकाळ. एकनाथ कुंभारकरने एक रिक्षा सोबत घेतली.सातपूर भागात राहणार्‍या आपल्या विवाहित मुलीचे घर गाठले.आई आजारी असल्याने आपण घेण्यास आलो असल्याचे त्याने मुलगी – प्रमिलास सांगितले. नऊ महिने गरोदर असलेली प्रमिला बापासोबत रिक्षा बसली. त्या दिवशी प्रमिलाचा वाढदिवस असल्याने ती खूष होती. काही वेळाने रिक्षा पवार हॉस्पिटलसमोर थांबली.एकनाथने गुपचूपपणे लपवलेला दोर काढला व तो प्रमिलाच्या गळ्याभोवती आवळला. प्रमिला जोरात किंचाळत होती. रिक्षाचालक विरोध करेपर्यंत प्रमिलाचा जीव गेला होता. रिक्षाचालकाने एकनाथला पकडून चोप दिला. एकनाथ तेथून पळाला. पुढे एका टपरीवर शांतपणे बिडी पित उभा राहिला. रिक्षाचालकाने प्रमिलाला जिल्हा रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी प्रमिलाला मृत घोषित केले.पोलिसांनी एकनाथला पकडले. परंतु त्याच्या तोंडावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. उलट ‘प्रमिला जीवंत असल्यास मी तिला पूर्णपणे मारतो नंतर तुम्ही मला अटक करा,’ अशी विनंती तो पोलिसांना करू लागला. तोपर्यंत प्रमिलाची आई अरुणा रुग्णालयात पोचली. तीने टाहो फोडला. माझ्या मुलीचा जीव घेणार्‍या माझ्या नवर्‍याला फाशीची शिक्षा द्या, असे तिने पोलिसांना सांगितले.

प्रमिलाने असा काय गुन्हा केला होता की, तिच्या वाढदिवसाला बापाने केक तोंडात भरविण्याऐवजी गळा दाबून खून करावा. प्रमिला भटके जोशी समाजाची. शेजारीच राहणार्‍या दीपक कांबळे या तरुणाशी तिचे प्रेम जुळले. दीपक मातंग समाजाचा. होणार्‍या विरोधाचा अंदाज आल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न केले.

एक वर्षानंतर पुन्हा ते घरी आले. दोघांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारले. एकनाथ व अरुणा यांनी प्रमिलाची गरोदरपणात काळजी घेतली. मग एकनाथने अचानक असा खून का केला असावा? नाशिक येथील पुरोगामी संघटना एकत्र येऊन आम्ही निषेध मोर्चा काढला. मोर्चा संपल्यानंतर मी विचार करत होतो. काही प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. एकनाथने प्रमिलाचा खून करण्यासाठी वाढदिवसाचा दिवस का निवडला असावा? अनेक वेळा एकांतात असूनही तेव्हा खून न करता नवव्या महिन्यात ती गर्भवती असतानाच का खून केला असावा? ते बाळ जन्माला येऊच नये, असे त्याला का वाटले असावे? या प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो. डॉ. दाभोलकरांना फोन करून काहीतरी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी दुसर्‍या दिवशी ’जातिअंतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारा लेख लिहून पाठवला. डॉक्टरांच्या सूचनेनुसार तो लेख मी दैनिक ‘सकाळ’चे संपादक उत्तम कांबळे यांच्याकडे पोच केला. पुढच्या दिवशी तो लेख वाचून अण्णा हिंगमिरे नावाची व्यक्ती दैनिक सकाळच्या कार्यालयात आली. ते प्रमिलाचे नातेवाईक होते. प्रमिलाच्या खुनामागे जातपंचायतीचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मुलीचा जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह केल्याने त्यांना जातपंचायतीने जातीतून बहिष्कृत केले होते.आम्ही चर्चा केल्यानंतर पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.हिंगमिरे व मअंनिसचे कार्यकर्तेगंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस तक्रार दाखल करून घेतील की नाही, अशी शंका असतांना पोलिसांनी पंचांना अटक केली.पंचांच्या घरचे दोन सदस्य नगरसेवक होते. शिवाय माजी महापौर त्यांना वाचविण्यास आले होते.

मात्र प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्रात जातपंचायतीचे अस्तित्व असल्याची ब्रेकिंग न्यूज केल्याने सामाजिक दबाव तयार झाला.ही बातमी पाहून औरंगाबाद व लातूर या ठिकाणचे पीडित आमच्याकडे आले.त्यांनाही याच जातपंचायतीने बहिष्कृत केले होते.नाशिकहून सुटका झाल्यानंतर आरोपींना औरंगाबाद व लातूर या ठिकाणच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.

मअंनिसने समविचारी संघटनांना सोबत घेऊन जातपंचायतीच्या विरोधात मोर्चा काढला. मात्र डॉ. दाभोलकर म्हणाले की आपण येथेच न संपवता आपण एक अभियान सुरू करू.त्याप्रमाणे ’जातपंचायत मूठमाती अभियान’ सुरू करण्यात आले. उत्तम कांबळे यांनी ’कधी संपणार जातपंचायती?’ हा लेख लिहून माझा संपर्क क्रमांक जाहीर केला. फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात, त्याप्रमाणे तक्रारींचा ओघ सुरू झाला. नाशिकला एक परिषद घेण्याची डॉक्टरांना युक्ती सुचली. दि 8 ऑगस्ट 2013 रोजी नाशिकला पहिली जातपंचायत मूठमाती परिषद झाली. या परिषदेचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचे डॉक्टरांनी ठरविले. प्रमिलाचा खून झालेल्या ठिकाणची माती आम्ही आणली. सभागृहात ठेवलेल्या रोपट्यास मूठ-मूठभर माती टाकून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. समतेचे रोपटे वाटावे याकरिता शेजारीच डॉक्टर संविधानाची प्रस्ताविका घेऊन उभे होते. प्रमिलाची आई अरुणा या परिषदेला उपस्थित होती. पुढील आठवड्यात म्हणजे 15 ऑगस्ट 2013 रोजी लातूरला अशीच परिषद घेण्यात आली व परिषदेचे उद्घाटन अशाच पद्धतीने करण्यात आले. पुढे पाचव्या दिवशीच डॉक्टरांचा निर्घृण खून झाला. सर्व कार्यकर्तेखचून गेले होते. मात्र वैचारिक विरोधकास उत्तर देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचे सर्वांनी ठरवले. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी बळ दिले. पुढे जळगाव, महाड व पुणे येथे जातपंचायत मूठमाती परिषदा झाल्या.

प्रमिलाचा खून झालेल्या ठिकाणची माती राज्यभर पोच झाली. जातपंचायतच्या विरोधात कोणताही कायदा नसताना राज्यात शेकडो गुन्हे दाखल झाले.प्रबोधनाच्या मार्गेपंधरा जातपंचायती बरखास्त करण्यात मअंनिसला यश आले. जेजुरी, माळेगाव (नांदेड), मढी (अहमदनगर) येथील यात्रेत आता जातपंचायत होत नाही. दाखल होणार्‍या गुन्ह्यांची दखल उच्च न्यायालय व राज्य सरकारनेही घेतली. एका याचिकेत उच्च न्यायालयाने सरकारला कायदा बनविण्यास सांगितले. येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे मतांच्या राजकारणासाठी आघाडी सरकारने कायदा बनवला नाही. मअंनिसने प्रसार माध्यमांना सोबत घेऊन हा विषय लावून धरला. मोठा सामाजिक दबाव तयार झाला. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, इतर मंत्री व विविध सचिवांची भेट घेतली. शासनाच्या ‘बार्टी’ या संस्थेसोबत मअंनिसने कायद्याचा मसुदा बनवला तो सरकारला सादर केला. 13 एप्रिल 2016 रोजी शासनाने ’सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ संमत केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.

प्रमिलाच्या खुनानंतर जातपंचायत दृश्य स्वरुपात होणे बंद झाले. परंतु प्रमिलाच्या बापाला शिक्षा होण्यासाठी मागणी वेळोवेळी होत होती. ऑनर किलिंगच्या घटनेत पुराव्याअभावी आरोपी मोकाट सुटले जातात. या घटनेतील सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी उत्कृष्टपणे खटल्याचे कामकाज चालवले. रिक्षाचालक प्रमोद अहिरे याच्यावर दबाव असतानाही त्याने साक्ष फिरवली नाही. याचा परिपाक म्हणजे चार वर्षांत निकाल लागला. दि.19 जून 2017 रोजी नाशिक जिल्हा न्यायालयाने एकनाथ कुंभारकर यास फाशीची शिक्षा ठोठावली.

एका बाजूने आरोपीला फाशी तर दुसर्‍या बाजूने एका कायद्याची निर्मिती यामुळे प्रमिलाचे बलिदान व्यर्थ गेले नाही, असेच म्हणावे लागेल.

-कृष्णा चांदगुडे