Categories
भानामती

अल्पवयीन मुलीस शेण खाऊ घालणार्‍या बाबावर गुन्हा दाखल

जुलै - २०१७

धनगरवाडी, ता. चाकूर येथील एक महिला व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस करणी, भानामती होते, त्यांना ज्यांनी करणी, भानामती केली त्यांची नावे भोंदू बाबाकडून जाहीर करवून घेण्यासाठी त्यांना भोंदू बाबाकडे नेऊन पीडितांचे केस, हात-पाय, नाक दाबून गावातील दोन महिला व एक पुरुषाचे नाव वदवून घेऊन शेण खातो का? शेण खाल्लास तरच सोडतो नाही, तर नाही म्हणून अक्षरश: शेण खाऊ घालून गिळावयास लावले. एवढेच नाहीतर त्यांना पालथे पाडून हंटरने अमानुषपणे जबर मारहाण केली. या सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओ तयार करून संबंधितांकडून तो व्हायरल करण्यात आला. या अमानुष किळसवाण्या घटनाक्रमामुळे त्याच गावातील दोन महिला व एका पुरुषाची नावे जाहीर केल्याने संतापलेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांकडून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.

हा अतिशय किळसवाणा व्हिडीओ महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव यांना मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व्हिडीओ दाखवून याचे होणारे गंभीर परिणाम याबाबत चर्चा केली. पोलीस अधीक्षक यांनी शिष्टमंडळासमोरच तात्काळ चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अंनिसचे प्रतिनिधी येतील, त्यांची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव तथा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीचे शासकीय सदस्य माधव बावगे यांनी चाकूर गाठले. प्रकरणाची सविस्तर माहिती व त्याचे होणारे परिणाम याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली.

चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व पोलीस निरीक्षक यांनी व्हिडीओ पाहून वेळीच दखल घेऊन खातरजमा करून प्रमुख आरोपी प्रभाकर ऊर्फ बबन केसाळे, पंडित भीमराव कोरे, गंगाधर भागोजी शेवळे, दगडू गंगाधर शेवाळे, कलुबाई माधव कोरे (सर्व रा. धनगरवाडी) यांच्या विरुद्ध रजिस्टर नं. 172/2017 नुसार जादूटोणाविरोधी कायदा कलम 3, तंत्र अधिनियम कलम 67 कलम 500, 323, 506 भादंविनुसार गुन्हा नोंद केला. दक्षता अधिकारी पोलीस निरीक्षक विकास जाधव हे तपास करीत आहेत.

पोलीस यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेबद्दल महाराष्ट्र अंनिसच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करून भोंदू मांत्रिकासह सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून ज्यांची नावे घेतली गेली त्यांना काही होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष प्राचार्य अनिरूद्ध जाधव, राज्यप्रधान सचिव माधव बावगे, जिल्हाध्यक्ष मनोहरराव गोमारे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.

बाबा हलकुडे