Categories
संपादकीय

गुरुत्वलहरींचा शोध

मार्च - २०१६

काही दिवसांपूर्वी विज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक घटना घडली. अल्बर्ट आइनस्टाइननी निदान केलेल्या गुरूत्वलहरींचे अस्तित्व जगभरातील शास्त्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नामुळे सिद्ध झाले. या शोधाचे मुख्य श्रेय अमेरिकेतील लायगो वेधशाळा प्रकल्पाला द्यायला हवे. लायगो म्हणजे लेसर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी. भारतातील पुणे येथील आयुका, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.

काय आहे या गुरूत्वलहरींचे महत्व?

गुरुत्वलहरींच्या शोधामुळे मानवाच्या एका भव्य स्वप्नाच्या पूर्तीकडे जाण्याची वाटचाल गतिमान झाली आहे. आपण ज्या विश्वाचे प्रवासी आहोत, ते कधी निर्माण झाले आणि कसे निर्माण झाले, या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी तत्वज्ञ गेली कित्येक शतके धडपड करीत आहेत. या ध्येयाच्या जवळ जाण्यात गुरूत्वलहरी आपली मदत करू शकतात. अखेर तत्त्वज्ञांच्या प्रश्नाचे उत्तर विज्ञानातून मिळण्याची शक्यता आहे. हेच विज्ञानाचे महानपण होय.

1915 साली आईन्स्टाईन यांनी व्यापक सापेक्षतावादाचा म्हणजेच जनरल रिलॅटिव्हिटीचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतातून गुरुत्वलहरींचे अस्तित्व विश्वात असावे, असा निष्कर्ष त्यांनी त्याच वेळी मांडला होता. पण हा निष्कर्ष स्वीकारायचा तर त्याला सबळ पुरावा हवा. हा पुरावा शोधण्याच्या प्रयत्नाला 1960 पासून सुरवात झाली. अखेर यश आले ते 100 वर्षांनी 2015 साली. खात्री पटल्यावर नुकतीच त्याबाबत घोेषणा करण्यात आली. आइनस्टाइन यांनी व्यापक सापेक्षता सिद्धांत मांडण्यापूर्वी विवक्षित सापेक्षता म्हणजे स्पेशल थेअरी ऑफ रिलॅटिव्हिटी मांडली होती. विवक्षित सापेक्षता सिद्धांतातून आपल्या व्यवहार ज्ञानाच्या विरोधात अनेक आश्चर्यजनक निष्कर्ष सिद्ध झाले. गतिमान घड्याळे हळू चालतात किंवा मागे पडतात, गतिमान वस्तूची लांबी गतीच्या दिशेत संकुचन पावते, रेस्ट वस्तुमानापेक्षा पदार्थाचे वस्तुमान गतीमान अवस्थेत वाढते. हे अजब निष्कर्ष विवक्षित सापेक्षतावादाचे फलित म्हणून समोर आले.

आइनस्टाइनचा सापेक्षता सिद्धांत भौतिक विश्वाचे स्वरुप आणि त्यातील घडामोडींचे आकलन करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतो यात शंकाच नाही. पण या सिद्धांताचे परिणाम मानवी जीवनावरही झाले आणि ते अजूनही होत आहेत. त्यातील पहिला परिणाम म्हणजे आपल्या भौतिक गरजा पुर्‍या करण्यासाठी झालेला उपयोग आणि विनाशासाठी झालेला दुरूपयोग. पण अण्वस्त्रांनी जेवढा नरसंहार झाला नाही त्यापेक्षा सापेक्षता सिद्धांताचा विपर्यास करून प्रचलित झालेल्या सापेक्ष नैतिक मूल्यांच्या निर्मितीमुळे झाला. गुरुत्व लहरींच्या शोधापेक्षा सापेक्षता सिद्धांताचा विपर्यास करून मूल्यांची झालेली मोडतोड हा अधिक गंभीर परिणाम होय. उत्क्रांतीवाद, युजेनिक्स आणि मूल्यांची सापेक्षता (रिलॅटिव्हिझम) यांच्या प्रभावाखाली हिटलरने ज्यू लोकांची शिरकांड केले. आजही जगात सर्वत्र आणि भारतात मूल्यसापेक्षता हैदोस घालीत आहे हे नीट समजून घेऊन वैश्विक मूल्यांच्या रक्षणासाठी सज्ज व्हायला हवं.

आइनस्टाइन हा ज्यू होता. त्याला जर्मनीतून पलायन करून अमेरिकेला जावे लागले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो सर्वश्रेष्ठ संशोधक ठरला. पण ज्यू लोक कनिष्ठ आणि जर्मन आर्यश्रेष्ठ या विकृतीने पछाडलेल्या हिटलरला धडा मिळाला. तो आइनस्टाइनच्या शोधामुळेच. आइनस्टाइनने त्यावेळचे अमेरिकेचे प्रेसिडेंट रूझवेल्ट यांना पत्र लिहून E = mc2 या सूत्रानुसार अण्वस्त्र बनविता येईल हे पटवून दिले. त्यानुसार अण्वस्त्र निर्मितीचा प्रोजेक्ट सुरू होऊन अणुबाँबची निर्मिती झाली. दुसर्‍या महायुद्धात जर्मनी आणि जपान यांचा पाडाव करण्यासाठी अण्वस्त्र कामाला आले. ज्ञानवंतामुळे हिटलरसारख्या दुष्टाला धडा मिळाला. जगाच्या पाठीवर सध्या चालू असलेल्या मूल्यांच्या मोडतोडीला असेच उत्तर द्यावे लागेल.

शतशः आभार!

नुकताच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना सातारा नगरपरिषदेचा डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार मिळाला. त्याची रूपये एक लाखाची रक्कम त्यांनी ‘अंनिस’ला देणगी म्हणून दिली.

माजी मंत्री पतंगराव कदम यांनीही त्यांना मिळालेल्या भाऊसाहेब थोरात सहकार पुरस्काराची एक लाख रूपयाची रक्कम ‘अंनिस’ला देणगी म्हणून दिली.

अहमदनगर येथील दिव्य मराठीचे पत्रकार महेश पटारे यांना प्रेस क्लबचा रूपये पाच हजारचा शोध पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला. ही रक्कम त्यांनी ‘अंनिस’ला देणगी म्हणून दिली.

सर्वांचे ‘अंनिस’तर्फे शतशः आभार!