Categories
शाखा वार्ता

चंद्रपुरात डॉ. संजय कोसनकर आणि तृप्ती वाढोल यांचा आंतरधर्मीय विवाह सोहळा संपन्न

जानेवारी - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा चंद्रपूरच्या पुढाकाराने डॉ. संजय चोखोबा कोसनकर (रा. चंद्रपूर) व तृप्ती सुरेश वाढोल (रा. वणी, जि. यवतमाळ) यांचा आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह सोहळा संत गाडगेबाबा यांचे स्मृतिदिनी मातोश्री सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे रविवार, दि. 20 डिसेंबर 2015 रोजी संध्याकाळी 4 वाजता अ‍ॅड. ह. ना. जांभुळे यांचे अध्यक्षतेखाली, ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य सहचिटणीस व विदर्भ प्रमुख गजेंद्र सुरकार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. लग्नाच्या अवाढव्य खर्चाला व अनावश्यक जुन्या रुढी परंपरांना नाकारून महात्मा जोतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधकी चळवळी अंतर्गत ‘सत्यशोधकी विवाह पद्धतीने’ गजेंद्र सुरकार व पी. एम. जाधव यांनी विवाह सोहळा पार पाडला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम. जाधव यांनी केले. गजेंद्र सुरकार यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‘महाराष्ट्र अंनिस’च्या आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह करणे ही काळाची गरज आहे, असे मत अ‍ॅड. जांंभुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. ‘अंनिस’चे शहर शाखा सहसचिव अशोक मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. कोसनकर यांचे नातलग, मित्रमंडळी व ‘अंनिस’चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ‘अंनिस’चे कार्यकर्ते कैलास गर्गेलवार, नारायण चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

पी. एम. जाधव, चंद्रपूर