Categories
अभिवादन

डॉक्टर, तुमचा कार्यकर्ता तुमच्या शिवायच लढत आहे!

ऑगस्ट - २०१५
डॉक्टर.....
तशी तुम्ही गेल्यानंतरची
प्रत्येक 20 तारीख
घेऊन येते
प्रचंड वेदना, उद्वेग आणि संताप...

पुन्हा पुन्हा आठवते
ती 20 ऑगस्टची
दुष्ट सकाळ......
हाताच चहाचा कप असताना
कानावर आदळलेली ती
क्रूर बातमी.......
महाभयंकर भूकंपासारखी
आतून बाहेरून हादरवून टाकणारी....
आपण काहीतरी चुकीचं ऐकतोय
हे स्वत:लाच समजावू पाहणारी.....
हे दु:स्वप्न आहे
असं ओरडून ओरडून सांगणारी......

रात्रीच तर तुम्ही भेटला होतात
जातपंचायतीवरील महाचर्चेत.....
आणि भेटणार आहात तुम्ही पुन्हा
पुढच्या कार्यक्रमांतही.....

माझ्या कामाची जबाबदारी सांगण्यासाठी
तासभर बोलायचंय तुम्हाला
माझ्याशी....

जादूटोणा विरोधी कायद्याची लढाईही
लढायची आहे आपल्याला एकत्रच....

गेली कित्येक वर्षे तुम्ही
पालथा घालताय अख्खा महाराष्ट्र
पुन्हा पुन्हा......

तरी अजूनही वाट पाहत आहेत
अनेक गावं, शाळा आणि कॉलेजं
तुम्हाला यायचं आहे पुन्हा
तिथेही विचार रूजवण्यासाठी......

महाराष्ट्राला ऐकायचांय
तुकोबा, जोतिबा आणि हेबूजी
तुमच्याच तोंडून पुन्हा पुन्हा
हवे आहात तुम्ही
‘सावध ऐका पुढल्या हाका’ म्हणण्यासाठी.......
‘आम्हीच खरे धार्मिक’ हे
पटवून देण्यासाठी......
‘अंधश्रद्धा निर्मूलन ते विवेकवाद’
हा प्रवास मांडण्यासाठी.....

अशी किती कामं सांगू डॉक्टर
जी केवळ आणि केवळ
तुमच्याविना अडून राहतील.....

खेद खूप याचा वाटतोय डॉक्टर
‘पृथ्वीमोलाचं तुमचं व्यक्तिमत्व’
तुम्ही ज्यांच्यासाठी लढत होता
त्यांच्यापेक्षा
ज्यांच्या विरोधात लढत होता
त्यांनीच अधिक जाणलं
तुमच्या वक्तृत्वाची नशा
आणि कर्तृत्याची कक्षा
अशीच फोफावत राहिली
तर.....
उघडी पडतील पाळंमुळं
त्यांच्या ‘अमर्याद’ सत्तेची,
राखरांगोळी होईल त्यांच्या
‘शोषणप्रिय’ स्वप्नांची
हे जाणलं होतं त्यांनी
म्हणूनच धाडले त्यांनी मारेकरी
तुमच्यावर गोळ्या झाडायला......

हे होणारच आहे कधीतरी
कदाचित होती तुम्हाला कल्पना
तरीही राहिलात तुम्ही लढत
लढाई कठीण असताना....
कारण तुमचा होता विश्वास
‘विज्ञान निर्भयता आणि नीती’वर

डॉक्टर,
ठरल्याप्रमाणं झाडल्या त्यांनी गोळ्या
संपवला तुमचा देह
पण फसला त्यांचा बेत,
वाया गेल्या गोळ्या
तुमच्या चितेच्या ज्वालांनी
पेटल्या असंख्य मशाली,
तुमच्या सरणाचे निखारे
विखुरले अखंड महाराष्ट्रात
मृत्युनंतरही तुम्ही
जिवंत राहिलात विचारात
घुसळून निघाला देश
घुमू लागले नारे
‘आम्ही सारे दाभोलकर, आम्ही सारे दाभोलकर’
भरू लागले वर्तमान पत्रांचे कॉलम,
टी.व्ही.चे पडदे
आणि वाडी वस्तीवरचे रस्ते
विवेकाच्या विचारांनी,
धर्मांधांच्या निषेधांनी!
बापाच्या खूनाची भळभळती जखम
उरी घेऊन
वेदनांचेच शस्त्र करून
उभे राहिलेत कार्यकर्ते
लढण्यासाठी
जिद्दीनं
पुन्हा एकदा नव्याने
युवा होतेय चळवळ
बालक, युवक, अबला आणि सबला
सारेच लागलेत जमू
डॉक्टर,
तुमचा कार्यकर्ता
आजही मनापासून लढतो आहे
विवेक विचार रूजवण्यासाठी
प्राणपणाने झटतो आहे!

तुमचं नसणं जाणवतंय पावला पावलाला
तरीही वाट चालतो आहे.....
हातात हात घेऊन
निर्धारानं लढतो आहे.....

चालताना वाटेत पुन्हा पुन्हा 20 तारीख येते
दु:ख, संताप, उद्वेग, जिद्द
आणि वेदनांचा मिलाफ होऊन
जखम नव्याने भळभळून वाहते
तरीही
मुर्दाड यंत्रणा, संवेदनाहीन शासन
आणि अल्पस्मृती असलेला समाज
सर्वांना जागं ठेवत
कार्यकर्ता बोलत आहे
कधी उपक्रमातून,
कधी व्याख्यानांतून,
कधी परिसंवादातून,
तर कधी रिंगणातून
विवेकाचे विचार पेरत आहे
प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला
अंगी हत्तीचं बळ आणून
विचारांची बांधिलकी मांडत आहे
डॉक्टर,
तुमचा कार्यकर्ता तुमच्या शिवायच लढत आहे!

कृष्णात कोरे

संपर्क : 8600230660/7058401031