काही-काही माणसांचं असणंच अवघा अवकाश व्यापून टाकणारं असतं. डॉ. प्रकाश बंद्रे सर हे त्यापैकी एक. माझी त्यांची पहिली भेट गोरेगाव येथील अंनिसच्या साप्ताहिक बैठकीत झाली. त्या बैठकीत बंद्रे सर बोलत होते आणि आम्ही सगळे ऐकत होतो. मी नुकतीच अंनिसची सदस्य झाले होते. त्या बैठकीमध्येच त्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, त्यांचा गाढा व्यासंग, त्यांची कडवी तत्त्वनिष्ठा सगळंसगळं एका बैठकीतच लक्षात आलं माझ्या. वयाच्या 85 व्या वर्षी Ph.D. मिळवायची म्हणजे हे सारे गुण हवेतच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर त्यांनी Ph.D. केल्यानंतर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकारी देखील त्यांना भेटायला आले होते.
त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. काय काय नाही केलं त्यांनी त्याच्या 86 वर्षांच्या कालखंडात… मुंबईत कांदिवली येथे राम मनोहर लोहिया ट्रस्ट स्थापन केला व या ट्रस्टच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. पाठोपाठ 1972 मध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची गरज लक्षात घेऊन ‘बालक-विहार’ ही मराठी माध्यमिक शाळा स्वत:च्या घरातून सुरू केली. जेव्हा शाळेला स्वत:ची जागा मिळाली, तेव्हा शाळेच्या बांधकामात मुलांना देखील श्रमदान करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. या शाळेत त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. शाळेची जागा त्यांनी वेळोवेळी अंनिसच्या कार्यक्रमांसाठीसुध्दा उपलब्ध करून दिली. हे कमी होते म्हणून की काय, सहकार्यांच्या मदतीने आशय नावाची सांस्कृतिक संस्था सुरू केली. या संस्थेत मुलगी झाली हो’ या नाटकाचे प्रयोग, नामवंत व्यक्तींची व्याख्याने यासारखे विविध दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले.
बंद्रे सर हे लेखकही होते. मधु लिमये यांच्यावरील पुस्तक आणि छत्रपती शाहू महाराज, जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तिका त्यांच्या नावावर आहेत. वर्तमानपत्रातून देखील त्यांनी वेळोवेळी लिखाण केले आहे.
समाजवादी विचारांच्या बंद्रे सरांनी राष्ट्रसेवा दलामध्ये मृणालताई यांच्या सोबत कित्येक वर्षे काम केले. सात-आठ वर्षांपूर्वी मेधा पाटकर यांच्या आंदोलनात देखील उडी घेतली. पुरोगामी विचारांचे बंद्रे सर शेवटच्या काही वर्षांमध्ये अंनिसशी कार्यकर्ता व देणगीदार या नात्याने जोडलेले होते. अंनिसच्या मुंबईतील गोरेगाव शाखेचे अध्यक्ष होते. या वयातही ते लोकलने प्रवास करून ते अंनिसच्या साप्ताहिक बैठकींना हजर राहत असत.
त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावर मात करायची. गेल्या दोन वर्षांत त्यांनी वृद्धाश्रम सुरू करायचे मनावर घेतले होते. त्यासाठी लागणार्या सर्व कायदेशीर बाबींची माहिती देखील त्यांनी गोळा केली होती. मृत्यूने जर घाला घातला नसता तर हे देखील काम त्यांनी पूर्णत्वाला नेले असते. त्यांची अजून एक इच्छा अपूर्ण राहिली, ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर चित्रपट बनविण्याची व त्यासाठी त्यांची आयुष्यभराची कमाई ते पणाला लावणार होते.
जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केलेल्या बंद्रे सरांची तत्त्वांशी किंचितही तडजोड न करण्याची वृत्ती आजच्या व्यावहारिक समाजाला रुचण्यासारखी नसल्यामुळे ते बरेच वेळा टीकेचे धनी झाले.
बुद्धिवादी व कट्टर निरीश्वरवादी बंद्रे सरांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर कोणतेही कर्मकांड न करता त्यांचा देह इस्पितळाला दान करण्यात आला. त्यांच्या मृत्यूमुळे परिवर्तनवादी चळवळीची अपरिमित हानी झाली आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या बंद्रे सरांना महाराष्ट्र अंनिसची भावपूर्ण आदरांजली!
– शुभदा निखार्गे,
मअंनिस, गोरेगाव शाखा