महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ हा उपक्रम ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण व भिवंडी या चार शाखांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात आला.
सर्वप्रथम 29 डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्याच्या वतीने कल्याण येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी आवश्यक सरकारी धोरण आखावे, ही मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
या उपक्रमाचा भाग म्हणून 31 डिसेंबर रोजी डोंबिवलीत व्यसनविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. 250 विद्यार्थी संपूर्ण रॅलीत ‘एक दो एक दो, बिडी-सिगारेट छोड दो,’ तसेच ‘हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा पिणार नाही बीयर’, अशा घोषणा देत होते. शाहीर शिंदे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे गाणेही म्हटले. नववर्षाचे स्वागत हे दारू पिऊन करू नये, सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लोकांनी; विशेषतः तरुण पिढीने लांब राहावे, हा संदेश विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या माध्यमातून दिला.
संध्याकाळी डोंबिवली, अंबरनाथ व कल्याण येथे ‘द दारूचा नव्हे, तर द दुधाचा’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत दूध वाटप करण्यात आले व व्यसनविरोधी घोषणा देऊन नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. याचवेळी सभासद नोंदणी अभियान राबवून नवीन सभासदांची नोंदणीही करून घेण्यात आली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला, अंबरनाथ शाखेने तर दोन तासांत शंभर नवीन सभासदांची नोंदणी केली.
भिवंडी शाखेतील कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने अभियान राबवत छातीवर व्यसनविरोधी पत्रके चिकटवून बाजारात फेरी मारली व रिक्षा चालकांशी, नागरिकांशी संवाद साधून त्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले व नववर्षाचे स्वागत दारू न पिता करण्याचे आवाहन केले.
– उत्तम जोगदंड, कल्याण