Categories
अभिवादन

थांबणार नाही… झुकणार नाही… न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाही!

सप्टेंबर - २०१६

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसर्‍या स्मृतिदिनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा निर्धार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 20 जुलैपासून ‘हिंसेला नकार… मानवतेचा स्वीकार’ ही मोहीम राज्यभर राबविली. नवी दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वरील एक दिवसाच्या धरण्याने तिची सुरुवात झाली. या मोहिमेत राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील शाखांनी विविध कार्यक्रम घेत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाला गती देण्याची व दाभोलकरांच्या सनातनी खुन्यांना अटक करण्याची मागणी केली. त्या मोहिमेची सांगता 20 ऑगस्ट रोजी दाभोलकरांच्या तिसर्‍या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात दिवसभर होणार्‍या कार्यक्रमाने झाली. त्या दिवसभराच्या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर; जिथे सनातन्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा गोळ्या घालून निर्घृण खून केला, तिथून निघणार्‍या निषेध मोर्चाने झाली. गेली 36 महिने दर 20 तारखेला सकाळी कार्यकर्तेयेथे जमून दाभोलकरांच्या सनातनी खुन्यांना पकडण्याची मागणी करत आहेत. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळेच ‘थांबणार नाही… झुकणार नाही… न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाही!’ ही भावना घेऊन शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांना त्यांच्या तिसर्‍या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी 20 ऑगस्टला सकाळी सहा वाजल्यापासून केवळ ‘अंनिस’चेच नव्हे, तर पुण्यातील व राज्यभरातील विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, कलाकार, मान्यवर, विविध राजकीय-सामाजिक पक्ष-संघटनांचे नेते आणि समाजातील सज्जन प्रवृत्ती जपणारे सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने पुण्यातील ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुला’वर जमा होऊ लागले होते. त्यात कष्टकरी, कामगार, कर्मचारी, महिला, विद्यार्थी असे समाजाच्या सर्व स्तरातील लोक होते. त्यात तरुणांची संख्या मोठी होती. बरोबर सव्वासातला सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाला अभिवादन केले.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 20 ऑगस्ट, 2016 ला तीन वर्षेपूर्ण झाली; पण अजूनही खुनाचा तपास तितक्या गंभीरपणे होताना दिसत नाही, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या संदर्भातही हीच स्थिती आहे. त्याबद्दलची चीड कार्यकर्त्यांत तर आहेच; पण त्याचबरोबर समाजातील विवेकी आणि विचारी नागरिकांतही आहे आणि म्हणूनच केवळ आदरांजलीचा सोपस्कार पार पाडण्यासाठी नव्हे, तर शासनाच्या या बेजबाबदारपणाविरोधातील आपली चीड व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते, लोक एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाले होते. खुनाच्या तपासातील दिरंगाईचा निषेध करण्यासाठी संपूर्ण पुलाच्या कठड्याला काळे कापड गुंडाळण्यात आले होते. कार्यकर्तेकाळ्या फिती पुलाच्या कठड्याला बांधत होते, अनेक कार्यकर्त्यांनी काळे टी शर्ट घातले होते. 36 काळ्या फुग्यांचा गुच्छ निषेध म्हणून आकाशात सोडण्यात आला.

इस्लामपूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेल्या अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबद्दल तपास यंत्रणांचा व शासनाचा तीव्र धिक्कार केला आणि कॉ. गोविंद पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित म्हणून पकडलेले सनातनचे साधक समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेची चौकशी करण्याची मागणी असलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या व हजारो सर्वसामान्य नागरिकांच्या सह्या असलेले काळे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार असल्याची घोषणा केली व त्यावर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पहिली सही करण्याची विनंती केली. त्यानंतरच्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी, पुरोगामी नेत्यांच्या खुन्यांना सरकार नक्कीच पकडेल; पण ते खर्‍या आरोपींना कधीच पकडणार नाही, असे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, हे सरकार काही स्वत:च्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांना पकडणार नाही. त्यामुळे सरकारवर विविध मार्गाने जनतेचा दबाव वाढवला पाहिजे. त्यानंतर तेथे हजर असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी सही केली. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाचा तपास गतिमान करण्यासाठी दबाव वाढविला पाहिजे व त्यासाठी आता नेहमीपेक्षा वेगळे मार्ग चोखाळण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन केले. ‘प्रश्न तुमचा, उत्तर डॉ. दाभोलकरांचे’ या ‘साधना प्रकाशन’च्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो’ हे गाणे झाले आणि त्या गाण्याने भारावलेल्या वातावरणातच निषेध मोर्चाला पुलावरून सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी प्रकाश आंबेडकर, बाबा आढाव, डॉ. शैला दाभोलकर, अविनाश पाटील, सुभाष वारे, अभिजित वैद्य, डॉ. संजय दाभाडे, अतुल पेठे, संध्या गोखले, गणेश विसपुते, शमसुद्दीन तांबोळी आदी मान्यवर होते, तर त्यांच्या पाठीमागे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’, ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’ आणि प्रतिगाम्यांवर हल्लाबोल करणार्‍या जोमदार घोषणा देत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींचे फोटो असलेले; तसेच ‘लक्ष्य तो हर पल पाना है, विवेकी समाज बनाना है’, ‘मिळून आपण बनवू सारे, दाभोलकर, पानसरे’ अशा घोषणा लिहिलेले फलक उंचावत अंनिसची, क्रांतिकारी पुरोगामी आशय असणारी गाणी गात ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांबरोबर राष्ट्र सेवा दल, एसएफआय, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, युक्रांद, लोकायत, युवा भारत, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, दलित-आदिवासी अधिकार आंदोलन, नवसमाजवादी पर्याय, मुक्तिवादी संघटना अशा संघटनांचे शेकडो कार्यकर्तेचालत होते. मोर्चा मनपा, शनिवार वाडा, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, अलका चित्रपटगृह, दांडेकर पूल या मार्गेसाने गुरुजी स्मारकावर पोचला. वाटेत अलका चित्रपटगृहापासून साने गुरुजी स्मारकापर्यंत रावसाहेब पटवर्धन शाळेच्या मुला-मुलींनी हातात दाभोलकरांचे फोटो असलेले व घोषणा लिहिलेले फलक हातात धरून मोर्चाच्या दुतर्फा मानवी साखळी केली होती.

साने गुरुजी स्मारकावर मोर्चा पोहोचल्यावर निषेध सभेस सुरुवात झाली. निषेध सभेचे प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर गेल्या तीन वर्षांत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला व जरी आजपर्यंतची आव्हाने आपण यशस्वीपणे पेलली असली, तरी अजूनही धोका टळलेला नाही, याची जाणीव करून देताना सनातन्यांनी आरोपींचे फोटो नाचवत काढलेल्या आजच्या मोर्चाचे उदाहरण दिले; तसेच ज्या मेहेंदळे गॅरेज सभागृहामध्ये आपण 20 ऑगस्टचा कार्यक्रम घेत होतो, ते सभागृह बरोबर 20 तारखेला एका आध्यात्मिक संस्थेने बुक केले होते. हे निदर्शनास आणून देऊन, त्यांनी कार्यकर्त्यांना सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले. खुनाच्या तपासाबाबत गेले कॉग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणि आताचे भाजप-शिवसेनेचे सरकार यात काहीही फरक नसल्याचे सांगून तपासयंत्रणा पुरेशा सक्षमतेने काम करताना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले व न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावरील व न्यायालयातील लढा दीर्घकाळासाठी तीव्रतेने लढवावा लागणार असल्याचे सांगून या दीर्घकाळच्या लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

प्रास्ताविकानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतील प्रत्येक आव्हान संघटनेने पेलल्याचे नमूद करून त्याचे श्रेय संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याला असून त्याने या काळात आपल्या क्षमतेच्या पलिकडे जाऊन संघटनेसाठी काम केल्याचे अभिमानाने नमूद केले. पण त्याचबरोबर डॉक्टरांच्या खुनानंतर ‘अंनिस’ला पाठिंबा देणार्‍या देशभरातील डाव्या, पुरोगामी संघटना आणि समविचारी विवेकी लोकांचाही या श्रेयात महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनासंदर्भातील रस्त्यावरील आणि न्यायालयातील लढा, जादूटोणाविरोधी कायदा, जात पंचायतीविरोधातील लढा आणि त्यासंबंधीचा कायदा याबाबतचा लढा आपण देऊ शकलो. त्याचबरोबर रिंगणनाट्य, नुकताच झालेला लघुपट महोत्सव याच्या आधारे संघटना निषेधाचे, संघर्षाचे आणि संघटनाविस्ताराचे नवनवीन सांस्कृतिक मार्ग यशस्वीपणे चोखाळू शकली, असे त्यांनी सांगितले.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनासंबंधी आणि देशात होणार्‍या अत्याचारांच्या घटनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका व्यक्त करावी; तसेच तातडीने योग्य ती कार्यवाही करावी; अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले, प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री फडणवीस संवेदनशील असल्याचे भासवतात; पण पुढे काहीच करत नाहीत. खरेतर आता त्यांनी बोलण्याची गरज आहे. नाहीतर त्यांना बोलते करण्यासाठी ‘अंनिस’ला ‘स्पीक आउट सीएम’ अशी मोहीमच उभारावी लागेल.

त्यांच्यानंतर ‘एस.एम.जोशी फौंडेशन’चे सुभाष वारे यांनी सभेला संबोधित करताना आजच्या दारूण परिस्थितीची जाणीव उपस्थितांना करून दिली. मोदींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने आता विरून गेलेली असल्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे व त्यामुळे जनतेत असंतोष पसरत आहे. त्या खोट्या आश्वासनांना जनता नक्कीच प्रत्युत्तर देईल; पण हा असंतोष संघटित करण्यासाठी आपण सक्रिय असले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

त्यानंतर मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी यांचे भाषण झाले. ते म्हणाले, मुस्लिम सत्यशोधक समाजासारख्या संघटनांना डॉ. दाभोलकरांनी आधार दिला, आमच्या सर्वच कार्यक्रमांना, आंदोलनांना ते आम्हाला मदत करायचे. त्यामुळे आम्हाला बळ मिळाले. त्यांच्या खुनानंतर हा वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालवत आहे. आज मुस्लिम सत्यशोधक समाज नव्याने उभारत आहे. त्यात ‘अंनिस’ची मदत आहेच. बकरी ईदनिमित्त मुस्लिम सत्यशोधक समाज, प्राण्यांचे रक्त सांडून नका, तर रक्ताचे दान करा असे आवाहन करत रक्तदान शिबिरांचे जे कार्यक्रम आयोजित करते, त्यात ‘अंनिस’चा सहभाग आहे.

अलिकडच्या काळात देशभरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांचा ऊहापोह करीत मनीषा गुप्ते यांनी आज सनातनी हिंसाचाराचा आश्रय घेत, आम्ही सांगू तेच सत्य असा माजोरी पवित्रा घेत अल्पसंख्याक आणि स्त्रियांना लक्ष्य करीत असल्याचे प्रतिपादन आपल्या भाषणात केले.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आजच्या परिस्थितीला संघ परिवारच जबाबदार असल्याचे सांगत संघ परिवारावर थेट हल्ला चढविला व त्यांच्या विरोधात संघर्ष उभारण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

स्त्रीमुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या विद्याताई बाळ यांनी स्त्रीवादी चळवळीचा परीघ आता विस्तारला असून स्त्रीवादी चळवळ आणि ‘अंनिस’च्या चळवळीने आता परस्परांशी जोडून घ्यावयास हवे, असे प्रतिपादन केले. त्या पुढे म्हणाल्या, अविनाश पाटील आपल्या भाषणात, ‘स्पीक आउट सीएम’ अशी मोहीम अंनिसला उघडावी लागेल, असे म्हणाले. त्यावरून मला एक घटना आठवली. एका बलात्काराच्या प्रकरणातील दोन मुलींनी आत्महत्या केल्या होत्या. तेव्हा आम्ही ‘स्पीक आउट’ मोहीम चालवली होती. ‘आत्महत्या करू नका, बोलते व्हा’ असे आवाहन आम्ही स्त्रियांना, जनतेला करत होतो; पण आज अविनाश पाटलांना ‘स्पीक आउट’चे आवाहन सरकारलाच करावे लागत आहे!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. संजय दाभाडे यांनी आपल्या भाषणात भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशभर दलित-आदिवासींवर जे हिंसक हल्ले होत आहेत, त्याकडे लक्ष वेधत म्हणाले की, जरी हिंसक हल्ले होत असले, तरी त्याला होणारा प्रतिकारही तेवढाच तीव्र आहे. रोहित वेमुला ते अगदी अलिकडील गुजरातमधील प्रकरण पहिले तर सर्व ठिकाणी प्रतिकार झालेला आहे आणि हा प्रतिकार करण्यात तरुण आघाडीवर आहेत हा सकारात्मक बदल आहे. या बदलाला स्थायी स्वरूप तेव्हाच मिळेल, जेव्हा समोर बहुसंख्येने बसलेले तरुण, दलित-आदिवासी, स्त्रिया यांच्यावरील अत्याचारांविरोधातील लढ्यात सहभागी होतील, नवउदारवादी आर्थिक धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंघटित कामगारांच्या लढ्यात सामील होतील. सांस्कृतिक संघर्षातही आघाडीवर असतील आणि सर्वसामान्य माणसांच्या प्राथमिक दैनंदिन प्रश्नाबाबतही सेवाभावी वृत्तीने वस्तीपातळीवर काम करतील.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष अशोक धिवरे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात प्रशासनातील लोकांकडे धर्म, जात याबाबतचे कितपत आकलन असते, असा प्रश्न उपस्थित करत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या तपासाच्या दिरंगाईबाबत जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच प्रशासनही जबाबदार असल्याचे सांगितले. पोलीस दलात असूनही दाभोलकरांशी आपला संपर्क होता. त्यामुळेच 35 वर्षांच्या प्रदीर्घ पोलिसी सेवेनंतर दाभोलकरांनी मला संघटनेत आणल्याचे सांगून दाभोलकरांबरोबर प्रत्यक्षात काम करण्याची संधी शेवटची दोन-तीन वर्षेच मिळाल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी निषेध सभेचा अध्यक्षीय समारोप केला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य संजय बनसोडे यांनी निषेध सभेच्या सत्राचे सूत्रसंचालन केले.

या निषेध सभेच्या सत्रानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व इचलकरंजीचे कार्यकर्तेस्वामी सर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संविधान पोवाडा पारंपरिक अविर्भावात सादर केला. तुडुंब भरलेले साने गुरुजी सभागृह हलगी आणि डफाच्या तालावर वीस मिनिटे जणू नाचत होते. अर्थगर्भता आणि लय-ताल हे पोवाड्याचे वैशिष्टय ठरले. पोवाडा संपल्यावर संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करत स्वामी सरांना उत्स्फूर्तपणे खडी ताजीम देत पोवाड्याला दाद दिली.

पुढील कार्यक्रम होता ‘साधना प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या अतुल पेठे व राजू इनामदार यांनी लिहिलेल्या ‘रिंगण नाट्य’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा. डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले, 20 ऑगस्ट 2013 ला दाभोलकरांचा खून झाला. त्यानंतर बसलेल्या धक्क्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीतून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि शांततामय मार्गाने लोकांसमोर आणि शासनासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी केलेला उपाय म्हणजे हे ‘रिंगण नाट्य!’ वेदना, दु:ख यांची अहिंसक अभिव्यक्ती म्हणजे हे ‘रिंगण नाट्य!’ या ‘रिंगण नाट्या’त कार्यकर्त्याला कलाकार आणि कलाकाराला कार्यकर्ता बनविण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शैलाताईंनी पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. प्रकाशनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना अतुल पेठे म्हणाले, गेली तीन वर्षेडॉक्टरांचा खून समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, बदलता समाज समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, हे सगळं थांबलं पाहिजे, असं वाटत आहे; पण भावना व्यक्त होण्याच्या काही थांबत नाहीत. अस्वस्थता येते, त्यातूनच कलेची निर्मिती होते. त्या अस्वस्थतेतूनच रिंगण नाट्याची निर्मिती झाली. रिंगण हा अस्वस्थतेचा उद्गार आहे. सध्या रिंगणनाट्यात महाराष्ट्र अंनिसचे 500 कार्यकर्ते सहभागी आहेत. आजवर रिंगणनाट्याचे 600 च्या वर प्रयोग झाले आहेत. नाट्य हा अभिव्यक्तीचा जिवंत प्रकार. ते प्रवाही असते, बंदिस्त नसते. सनातन्यांनी सॉक्रेटिसला विरोध केला; पण महाराष्ट्रात, गुजरातेत त्याचे स्वागत झाले. रिंगणनाट्य हे विचारसन्मुखता आणते, ते गांभीर्याने करायची, ऐकायची, पाहायची बाब आहे. पुस्तक रचनेसाठी ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांचे आभार मानून त्यांनी आपले भाषण संपविले.

नाटक हे माध्यम सामाजिक कार्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे डॉ. दाभोलकरांनी फार पूर्वीच ओळखले होते, असे सांगून डॉ. शैलाताई पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर पुढे म्हणाल्या, आज अतुल, राजू व रिंगणनाट्यातील कार्यकर्ते त्यांचे हे काम पूर्ण करत आहेत. चळवळ पुढे चालू ठेवण्याच्या कामी रिंगणनाट्याने खूपच महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यासाठी अतुल, राजू यांनी खूपच परिश्रम घेतले. आज स्मृतिदिनाच्या दु:खद प्रसंगी अशा चांगल्या पुस्तकाचे प्रकाशन करावे लागत आहे. चांगला सामाजिक कार्यकर्ता इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वाचून तयार होतो; पण ‘रिंगण’मधून हे सर्व त्याला मिळते.

‘साम टी. व्ही.’ चे संपादक संजय आवटे यांनी आपल्या भाषणात चळवळ व्यापक होत असताना प्रबोधनाची भाषणाव्यतिरिक्त असणारी इतरही माध्यमे आपण वापरली पाहिजेत, असे प्रतिपादन केले. पण सांस्कृतिक एल्गार करताना आपण सामान्यांशी नळ जोडणारी भाषा वापरली पाहिजे. सामान्याच्या शहाणपणावर विश्वास ठेवला पाहिजे नाहीतर आपण संपून जाऊ, असा इशारा देत संजय आवटे यांनी सुरेश भटांच्या ‘हे असे आहे, परंतु हे असे असणार नाही’ या गजलेने आपल्या भाषणाचा शेवट केला.

त्यानंतरच्या सत्राच्या सुरुवातीला इचलकरंजीच्या संचाने गाणी सादर केली. त्यानंतर ‘सापडलं रे सापडलं’ हे ग्रामसभा व संविधान यासंदर्भातील रिंगण नाटक सादर करण्यात आले.

अखेरच्या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागराज मंजुळे यांच्या ‘आटपाट’ या संस्थेसह घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील लघुपटांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला व त्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. (या बाबतचा सविस्तर वृत्तांत याच अंकात इतरत्र दिला आहे.) त्यानंतर झालेल्या समारोपाच्या सत्रात नागराज मंजुळे यांनी लघुपट महोत्सवाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला व लघुपट विजेत्यांचे अभिनंदन केले. सामाजिक प्रश्नांपासून दूर जाण्याच्या या काळात अंधश्रद्धा या एकाच विषयावर 268 फिल्म्स आल्या, हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत त्यांनी निष्क्रियता ही सर्वांत वाईट, चांगली माणसे निष्क्रिय होणे म्हणजे सैतानाची भरभराट होय, असे प्रतिपादन केले. त्यामुळे अंधश्रद्धा या विषयावर लोक इतके सक्रिय झाल्याबद्दल त्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.

त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी आपल्या भाषणात आपण पानसरे यांचे कुटुंबिय म्हणून बोलत नसून एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात आजच्या चिंताजनक परिस्थितीत केवळ विचारांचा वारसा सांगून उपयोग नाही, तर संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येऊन फौज निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.

या सत्राचे अखेरचे भाषण डॉ. हमीद दाभोलकर यांचे झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांत डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा लढा कुठलेही गालबोट लागू न देता आपण चालू ठेवलेला आहे. लोकशाहीचे चित्र काळवंडलेले असतानाच्या या काळात उद्वेगांना वाट करून देत आपण वाटचाल करीत आहोत. डॉक्टरांच्या मागे चळवळीचे काय होईल, याची काळजी असताना आज परिस्थिती आशादायक आहे. आव्हानांना सामोरे जाण्यास आम्ही सज्ज आहोत. अनेकजण जोडले जात आहेत; पण मारेकरी मोकाट आहेत. लोक विचारत आहेत, ‘पुढे काय?’ त्याला आमचे उत्तर असे की, व्यापक विवेकी समाजाच्या निर्माणाची लढाई चालूच राहील. संविधानाच्या रक्षणासाठीची लढाई हा त्याचाच एक भाग आहे. आमचे असे म्हणणे राहील की, ‘डॉक्टरांचे मारेकरी सापडले तर त्यांना आजन्म ‘अंनिस’चे काम करण्याची शिक्षा दिली जावी.’ म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की, डॉक्टर कोणते काम करत होते आणि त्यांच्या खुनाने समाजापासून काय हिरावून घेतले गेले आहे. आपल्या भाषणाचा शेवट करताना डॉ. हमीद म्हणाले, they tried to burry us; but they did not know we were seeds.

या सत्राचे सूत्रसंचालन ‘महाराष्ट्र अंनिस’च्या सांस्कृतिक विभागाचे कार्यवाह योगेश कुदळे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, पाहुणे यांचे आभार मानताना जाहीर केले की, 20 जुलै 2016 ला दिल्ली येथून सुरू झालेल्या ‘हिंसाके खिलाफ मानवता की ओर’ या मोहिमेची या वर्षापुरतीची सांगता आज 20 ऑगस्ट 2016 ला थांबणार नाही… झुकणार नाही… न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाही!’ या निर्धारासह करत आहोत.

– राजीव देशपांडे, देविदास इंगळे