Categories
अभिवादन

नगर जिल्ह्याचा पुरोगामी चेहरा कॉ. पी. बी. कडू पाटील

फेब्रुवारी – २०१७

ब्रिटीशकालीन राजवटीत अन्यायाविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध झगडणारं व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध झगडणारं वादळ शांत झालं, असं कॉ. पी. बी. कडू-पाटील (आप्पा) यांच्या निधनानंतर वाटलं. 1942 सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या हाकेला ओ देऊन आप्पांनी ना. ग. गोरे, साने गुरुजी यांच्यासोबत हिरिरीने भाग घेतला. कठोर कारावासही भोगला. आप्पांनी कम्युनिस्ट पक्षाच्या साम्यवादाचा पंथ स्वीकारला. मार्क्स लेनीन यांचे तत्त्वज्ञान अभ्यासले. ते महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट पक्षात मोठे नेते झाले. त्यांनी धरणग्रस्तांची चळवळ करून प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांच्यासाठी महाराष्ट्राला पुनर्वसनाचा कायदा करण्यास भाग पाडले; तसेच महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळणार्‍या शेतमजुरांसाठी रोजगार हमीचा कायदा करावयासही भाग पाडले. आप्पा 1972 ते 1978 या काळात विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. खंडकरी जमीन मालकाच्या लढ्यात त्यांनी कॉ. माधव गायकवाडांच्या साथीने तब्बल 50 वर्षे लढा दिला आणि खंडकरी जमीन मालकांना जमिनी मिळवून दिल्या.

मी आणि कडू-पाटील डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सोबत त्यांच्या चळवळीत भाग घेत होतो. असे असताना डॉ. दाभोलकरांच्या बरोबर कधी अंनिसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी झालो, हे कळलेच नाही. दाभोलकरांनी शनी शिंगणापूरचा स्त्री-पुरुष समतेचा लढा 2002 सालीच सुरू केलेला होता. सनातन्यांनी अखेर नगर जिल्ह्याची शांतता-सुव्यवस्था धोक्यात आणली होती. माझ्याही घरावर हल्ले झाले होते. परंतु आप्पांनी सर्व धर्मांध लोकांचा रोष ओढवून घेऊन शनी शिंगणापूर आंदोलनात सक्रिय झाले. नगरच्या कलेक्टर ऑफीसपुढील धरणे आणि सद्भावना उपोषण त्यांनी नेटाने पुढे नेले. डॉ. लागू, पुष्पा भावे, डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर आदींना त्या सत्याग्रहात एक दिवसाची शिक्षा झाली. या आंदोलनाची प्रमुख धुरा सांभाळण्यात आप्पांची मदत फारच मोलाची आणि महत्त्वाची होती. ते या आंदोलनात असल्यामुळे अनेक सनातन्यांची बोलती बंद होत होती.

नगर जिल्ह्यातील ‘बेड्या तोडू गुलामीच्या’ या अंनिसच्या अभियानाची सांगता कडू-पाटील यांच्या अधिपत्याखाली, निळूभाऊंच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती. नगर जिल्ह्यातील अनेक देवरसपण करणार्‍या भोंदू बुवा-बाबांचा भांडाफोड करण्यात कडू-पाटील यांचा मोठा सहभाग होता. अंनिसच्या चळवळीचा एकेकाळी बाबा, बुवा, मांत्रिक, भगत आदी सामाजिक, मानसिक, शोषण करणार्‍या बदमाषांना धाक होता तो कॉ. कडू-पाटलांचा.

अं.नि.स.ने याच काळात यात्रेतील पशुहत्याबंदीची चळवळ नगर जिल्ह्यातही हाती घेतली. त्यात प्रामुख्याने वरवंडी (ता. राहुरी), बहिरवाडी (ता. नेवासा) येथील यात्रेत हजारो बकरे, कोंबड्यांचा बळी देऊन भक्तलोक यात्रोत्सव साजरा करत, नवसाची बोकडे मारत. अशा लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, बाबा आढाव यांना बरोबर घेऊन कडू-पाटील यांनी स्थानिक लोकांच्या सभा-बैठका घेऊन मतपरिवर्तन केले. आज दोन्ही यात्रांतील पशुहत्या बंद झाली. त्यांनी त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्वत:च्या गावी आणले, लोकांची बैठक घेतली आणि शाळा काढली. परिसरातून धान्य, पैसा यांची मदत मिळवली. नगर जिल्ह्यात रयत संस्था आप्पांचा सिंहाचा वाटा आहे. असे बहुआयामी, सर्वसंपन्न, साम्यवादी व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही. दि. 19 जानेवारी 2017 रोजी हा धगधगता अग्निकुंड विझला. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पार्थिव शरीरासमोर त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊन लाल सलामी दिली. तो प्रसंग सर्वांना गहिवरून टाकणारा होता. आप्पांची दोन मुले अरुण कडू, विजय कडू हे सामाजिक कामात सतत अग्रस्थानी राहून काम करतात. अरुण कडू-पाटील (संपर्क : 7588600999) हे महाराष्ट्र अंनिसच्या अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष असून, त्यांच्याकडून उत्तरोत्तर आप्पांच्या अंनिसच्या चळवळीत जोमाने काम होवो, ही अपेक्षा करतो आणि आप्पांच्या स्मृतीला उजाळा देऊन थांबतो. लाल सलाम!

कॉ. बाबा आरगडे, नेवासा

संपर्क : 9921769712