Categories
महिला मुलाखत

निर्भीड व्हा! – कॉ. उमाताईंचा संदेश

मार्च - २०१८

तीन वर्षांपूर्वी, फेबु्रवारी 2015रोजी कॉ. गोविंद पानसरेंना सनातन्यांनी गोळ्या घातल्या. त्यात त्यांचा अंत झाला. त्यावेळी कॉ. उमा पानसरे यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. दोन गोळ्या खाऊनही त्या वाचल्या; बर्‍या झाल्या आणि पुन्हा सामाजिक कार्यात उतरल्या. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ही मुलाखत.

मीना चव्हाण : लाल सलाम उमाताई!

कॉ. उमाताई : लाल सलाम! कशी आहेस?

मीना चव्हाण : आम्ही छान आहोत. आपल्याशी गप्पा माराव्यात म्हणून आज आलो आहोत. मी प्रथम ओळख करून देते, आम्ही सर्व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. या प्रा. स्नेहल माने, या छकुताई देठे एम.एस.डब्ल्यू. करताहेत.

छकुताई : इतकी वर्षेआपण एकत्र आहोत; पण बालपणाविषयी आम्हाला काहीच माहिती नाही.

कॉ. उमाताई : तसा कधी योग आला नाही; पण आता सांगते. माझे बालपण कदमवाडीत गेले. ते पूर्वी छोटे खेडे होते. आता तो भाग कोल्हापुरात समाविष्ट झाला आहे. त्याकाळी आम्हाला कोल्हापुरात यायचं तर दोन-चार किलोमीटरचा माळ तुडवावा लागायचा! खडी टाकून केलेली वाट होती; अगदी खडबडीत. माझे वडील लष्करातून सुभेदार म्हणून रिटायर झाले.

प्रा. स्नेहल : कदमवाडीत तुमची शेतीवाडी असेल!

कॉ. उमाताई : नाही. आम्ही मुळचे कदमवाडीचे नव्हेत. आमचे गाव गोंदुकुपी कर्नाटकात आहे. आजोबा कदमवाडीत आले. मला ते आठवत नाहीत. पण आजीने 4 मुलांना घेऊन मिळवून खाण्यासाठी इकडं येऊन म्हशी पाळल्या आणि पोरांना वाढवले. माझी आजी फार प्रेमळ आणि कष्टाळू होती.

छकुताई : तुम्ही कोणत्या शाळेत होता?

कॉ. उमा पानसरे : कदमवाडीमध्ये म्युनिसिपालिटीची शाळा क्र. बारा होती. अजून ती आहे. तिथे मी सातवीपर्यंत शिकले. आठवीला कोल्हापुरात इ.पी. स्कूलला जावे लागले. इस्टर पॅटर्न स्कूल आमच्या घरापासून चार किलोमीटर अंतरावर असावे. नववीला गेल्यावर बस सुरू झाली. पण ती लांब एक-दीड किलोमीटरवर ताराबाई पार्कात उभी राहायची.

स्नेहल : शाळेत तुमचे आवडीचे कोणते विषय होते?

कॉ. उमाताई : मला भूगोल, इतिहास, मराठी हे विषय आवडायचे. मराठीची कविता शिकताना अनेकदा आम्ही रडलो आहोत.

छकुताई : एखादी कविता सांगा की!

कॉ. उमाताई : एक कविता मला आवडली होती.

माझ्या मना बन दगड!

माझ्या मना बन दगड, बन दगड आजपासून

काय अडेल तुझ्यावाचून?

गालावरचे खारे पाणी, पिऊन काय जगेल कोणी?

या कवितेतही कष्टकर्‍यांचे आणि त्यांच्यावरच्या अन्यायाचे वर्णन केले आहे. शेवटी कवी आशावाद व्यक्त करतो.

टापा ऐक आवाज, लाल धूळ उडते आज

धुळीमागून येईल खार, या दगडावर लावील धार!

छकुताई : विंदा करंदीकरांची कविता आहे ही! त्यावेळी नुकतीच चीनमध्ये क्रांती झाली होती. ‘लालधूळ’ म्हणजे या क्रांतीच्या बातम्या!

– म्हणजे लग्नापूर्वी तुम्ही कम्युनिस्ट विचाराने भारलेल्या होता. मग तुमचा परिचय कॉ. पानसरेंशी झाला आणि तुम्ही लग्नाचा निर्णय घेतलात, असे घडले काय?

कॉ. उमाताई : नाही, नाही. माझी लग्नापूर्वी ओळख वगैरे काही नव्हते. घरच्यांनी लग्न ठरवले. त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या एक प्रसिद्ध महिला कार्यकर्त्या होत्या. कॉ. विजयाताई भोसले. त्यांना सगळेजण भोसलेबाई म्हणत. त्या पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या पानसरेंच्यासाठी मुलगी पाहत होत्या. त्यांची गाठ माझ्या मामीशी पडली.

गावात घर नाही, रानात शेत नाही. एक पाय बाहेर, तर एक पाय तुरुंगात अशी परिस्थिती कळल्यावर मुलगी कोण देईल? पण ‘मुलगा निर्व्यसनी आहे, वकिली करतो आहे, समाजासाठी झटतो आहे,’ ही पॉझिटिव्ह बाजूही होती. ती मामींच्या लक्षात आली आणि त्यांनी माझं स्थळ सुचवलं! वडिलांनाही ते पसंत पडलं. त्यावेळी मी अकरावीला होते. ती जुनी एस.एस.सी; मॅट्रीकची परीक्षा! त्यांनी शाळेतच मला लांबून पाहिलं आणि पसंत केलं. आमचं लग्न शाहू वैदिक स्कूलमधल्या मुलाने लावले.

मीनाताई : राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर भटजी तयार करण्यासाठी ही वैदिक स्कूल सुरू केली. महात्मा फुले यांनी पुरोहितच नको, अशी भूमिका घेतली होती. शाहू महाराजांनी त्याच्या मधला टप्पा घेतला. बाह्मणेतरांनीही भटजी बनण्याची संधी दिली. त्या काळी ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव कोल्हापूरवर मोठा होता.

स्नेहल : तुमच्या लग्नाला बरेच राजकीय पुढारी आले असतील?

कॉ. उमाताई : होय. मला त्या वेळी फारसे कळत नव्हते; पण कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटलांचे नाव ऐकून होते. तेही आमच्या लग्नाला हजर होते. कोल्हापुरातील त्यावेळचे प्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक नेते, नगरसेवक, वकील, डॉक्टर, कामगार नेते असे विविध क्षेत्रातले नागरिक जमले होते.

छकुताई : तुमच्या मामींचे नाव सांगितले नाही!

कॉ. उमाताई : त्या सोनाबाई माने! त्या काळी नातेवाईक, वडीलधारी मंडळीच पुढे होऊन लग्ने जुळवत. आजच्यासारख्या विवाहसंस्था नव्हत्या. पण हे तुम्ही सगळं कशाला छापताय! सामान्य माणसासारखंच आहे हे सगळं.

मीनाताई : होय, तुमचं बालपण, लग्न सामान्यांसारखंच आहे; पण तुम्ही एका असामान्य माणसाशी संसार केलाय, असामान्य माणसाला साथ दिलीत. त्यांच्या कामात हातभार लावलात, म्हणून ते जाणून घेण्याची जिज्ञासा आम्हाला आहे.

स्नेहल : पण या चर्चेतून तुमचे विचारही कॉ. पानसरेंच्याशी जुळणारे होते, असे दिसतेय.

कॉ. उमाताई : होय. त्यांच्या विचारांबद्दल आम्हा सर्वांनाच आदर होता. माझ्या घरच्यांना तर त्यांचे फार कौतुक होते.

छकुताई : कॉ. पानसरेंना तुमच्या कविता आवडत होत्या काय?

कॉ. उमाताई : होय. त्यांना या कविता आवडायच्याच; पण सभा, अभ्यासवर्ग किंवा धरणे अशावेळी एकत्र आलेल्या जनसमुदायांसमोर ते “दौलतीच्या राजा” हे गीत म्हणत. सर्वांच्याकडून म्हणवून घेत.

मीनाताई : हे अण्णा भाऊंचे गीत असावे. त्यातील काही ओळी सांगाल का?

कॉ. उमाताई : दौलतीच्या राजा, उठून सर्जा

हाक दे शेजार्‍याला रे, शिवारी चला! शिवारी चला!

संधी लई नामी, आलीया औंदा, भांडवलशाहीचा विखारी कुंदा

आरपार खुरपून पाडाया रेंदा, उपटून मुळी घाल पायदळी,

तुडवू दे आला गेला रं, शिवारी चला॥

अशी चार-पाच कडवी आहेत. सावकारशाही, भांडवलशाही, साम्राज्यवादी यांना नष्ट करून शेवटी ‘रोवू आता बांधावर बावटा लाल’ हा निर्धार त्यामध्ये आहे.

हे गीत कॉ. पानसरे खड्या आवाजात म्हणत, सर्वांच्याकडून म्हणवून घेत. ही गोष्ट अनुभवण्याचीच होती.

स्नेहल : लग्नानंतर तुम्ही समाज कार्यात कधी आलात?

कॉ. उमाताई : लग्नापासून सुरुवात झालीच; पण प्रत्यक्ष पक्षाची अधिक ओळख व्हायला मला दोन वर्षे गेली. घरी नेहमी यांचे कॉम्रेड मित्र येत, कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांचे एक मोठे कुटुंबच होते. आम्ही एकमेकांच्या घरी अनेकवेळा जात असू. एकमेकांच्या दु:खात सहभागी होत असू. एकमेकांच्या घरी गेल्यावर अगदी चुलीपर्यंत जात असू.

स्नेहल : दोघेही आंदोलनात सहभागी व्हायचा काय?

कॉ. उमाताई : होय, एखादा मोर्चा असेल, धरणे असेल, तर आम्ही दोघेही त्यात असायचो. पुढे मुलं झाल्यावर त्यांच्यासह जात असू.

मीनाताई : मग अशा वेळी घरकामाचं काय? जेवणाचं काय?

कॉ. उमाताई : सकाळी लवकर उठून मी आवरायची. जेवण करायची, कधी वडा-पावावर भागवावे लागायचे. कधी त्या भागातले पक्ष कार्यकर्तेमोर्चा संपल्यावर आपल्या घरी बोलवत. त्यामुळे जेवणाचा प्रश्न कधी उभा राहिला नाही.

छकुताई : तुम्ही कधी तुरुंगात गेलात का?

कॉ. उमाताई : खूप वेळा आम्हाला अटक झाली. दिवसभर हॉलमध्ये ठेवायचे आणि संध्याकाळी सोडायचे. मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस व्हॅन उभी करायचे आणि पोलीस अटक करायचे. हॉलमध्ये सुरुवातीला गडबड-गोंधळ व्हायचा; पण कार्यकर्ते लवकरच सर्वांना व्यवस्थित बसवायचो. मग गाणी सुरू व्हायची. चळवळीची गाणी म्हणणारे हौशी कार्यकर्ते वही घेऊनच आलेले असायचे.

त्यानंतर प्रमुख पुढार्‍यांची भाषणे व्हायची. पोलिसांच्या अटकेचा असा फायदा पक्ष कार्यकर्ते करून घ्यायचे. हॉल मोफत, बैठक व्यवस्था, फॅन, लाईट, पाणी याबरोबर कधी चहा-नाश्ताही सरकारी खर्चाने मिळायचा! आणि एक अभ्यासवर्गच व्हायचा!

काही वेळा आंदोलन तीव्र असायचे. लाठीमारही व्हायचा; पण अटक झाल्यावर उपक्रम ठरलेलाच.

मीनाताई : एखादे तीव्र आंदोलन सांगा.

कॉ. उमाताई : जमीन बळकाव आंदोलन मोठे झाले. जमीनदारांच्याकडे शेकडो एकर जमीन होती. त्यातील काहीजण राजकीय पुढारी होते, काँग्रेसचे नेते होते. तेव्हा कसणार्‍यांना जमीन द्या, असे म्हणून ‘जमीन बळकाव आंदोलन’ केले गेले. पोलिसांनी 144 कलम पुकारले. कडक पहारा ठेवला. आंदोलनकर्त्यांना खाजगी जमिनीत प्रवेश करण्यापूर्वीच अटक केली. अनेक ठिकाणी लाठीमार झाला. आंदोलनकर्त्यांना अटक केली, त्यावेळी कॉ. पानसरेंनाही अटक झाली होती. त्यांना महिनाभर तुरुंगवास झाला. देशभर कम्युनिस्टांची धरपकड झाली, तेव्हा पानसरेंनाही पकडले होते. बी. टी. रणदिवे, कॉ. डांगे यांच्याकडून त्यांनी तेव्हा भांडवलग्रंथाचे धडे घेतले. पक्षाचे बाहेर असलेले कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांना कुटुंबीयांना आधार दिला.

या आंदोलनातली अजून एक गंमत आहे. ती पानसरे नेहमी भाषणातून सांगत.

महाराष्ट्रात विविध भागांमध्ये आंदोलने झाली. कार्यकर्त्यांना अटक झाली. त्यांना न्यायालयापुढे उभे केले. सर्वांनी आपला गुन्हा मान्य केला. सर्वांना परवानगीशिवाय प्रवेश केल्याबद्दलचे एकच कलम लावण्यात आले; पण तरीही शिक्षा मात्र वेगवेगळ्या झाल्या. तुरुंगात गेलेल्या एका हुशार कार्यकर्त्याने आत बसून झालेल्या शिक्षा आणि कोर्टातील न्यायाधिशांची माहिती गोळा केली. तेव्हा दिसून आले की, ज्याठिकाणी राखीव जागा किंवा आर्थिक सवलती घेऊन शेतमजुराचा, कष्टकर्‍याचा मुलगा शिकला आणि न्यायाधीश बनला आहे. तिथे कोर्टाने कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा दिली. शिक्षा जाहीर करून लगेच कोर्ट उठले. म्हणजे त्या न्यायाधिशाला कळत होते की, हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, सामाजिक न्यायासाठी लढत आहेत. त्यांचा मुद्दा बरोबर आहे; पण कायदा मोडला आहे म्हणून शिक्षा द्यावी लागणार आहे. मग किमान शिक्षा द्यावी.

ज्या ठिकाणी पिढीजात श्रीमंत, जमीनदाराचा मुलगा न्यायाधीश होता, त्याला म्हटले, ‘हे अतिरेकी आहेत, भयंकर आहेत, इतरांच्या जमिनी बळकवायला निघाले आहेत. त्यांना कायद्याने सांगितलेली मोठ्यात मोठी शिक्षा देणे गरजेचे आहे.’ त्यांनी सहा-सहा महिन्याच्या शिक्षा दिल्या. त्यामुळे एक दिवस, पंधरा दिवस, तीन महिने, सहा महिने अशा विविध शिक्षा देण्यात आल्या. यावरून कायद्याचा अर्थ लावताना न्यायाधिशाच्या वर्गाचा, जातीचा परिणाम होतो, हे स्पष्ट झाले.

मीनाताई : पण हे भयंकरच आहे. न्यायावर जात, धर्म, वर्ग यांचा परिणाम होतो, हे खरे असेल, तर सामान्यांना न्याय मिळणार कसा? पोलीस तपास अधिकारी मुद्दाम कमकुवत दुवे ठेवतात काय की, ज्याच्यामुळे हिंदुत्ववादी अतिरेकी आता सुटताना दिसताहेत. तुम्हाला काय वाटते?

कॉ. उमाताई : होय, तसे दिसते आहे. हेमंत करकरेंनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून मालेगाव बाँबस्फोटातील खरे गुन्हेगार शोधून काढले. 2002 ते 2008 पर्यंत झालेले सर्व बाँबस्फोट हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी केले होते, यासंबंधीच्या वीस ऑडिओ, व्हिडीओ सी.डी. जप्त केल्या. पण आता भाजप सरकार आल्यावर कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि त्यांच्या सहकार्‍यांना सहज जामीन मिळाला.

मीनाताई : अलिकडेच भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंनी मराठा-दलित संघर्ष घडवून आणला; पण त्यांना अटक होत नाही. त्याच्या उलट शहीद दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्यांना पकडले जात नाही, हे काय आहे?

स्नेहल : सामान्यांच्या मनात शंका आहेत.

कॉ. उमाताई : होय, शंका आहेतच; पण भारतीय घटना भक्कम आहे. लोकशाही मार्गाने दबाव वाढवला तर पोलिसांना खुन्यांना पकडावेच लागेल. त्यांना शिक्षा करावीच लागेल.

छकुताई : म्हणजे भारतीय संविधानच आपल्याला न्याय देईल, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

कॉ. उमाताई : होय; पण त्यासाठी जनचळवळ वाढवावी लागेल.

मीनाताई : पण आज जनचळवळ सुरू आहेच. कम्युनिस्ट पक्ष दर आठ-पंधरा दिवसांनी रस्त्यावर आहे. अंनिस मागण्या करते.

कॉ. उमाताई : सगळेजण आंदोलने करताहेत; पण वेगवेगळी पुरोगामी आणि डाव्यांच्या एवढ्या चिरफाळ्या आहेत, त्यामुळे आंदोलनाचा परिणाम होत नाही. प्रत्येकआंदोलन दुबळे होते. म्हणून कॉ. पानसरे म्हणत, ते लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणत, रेषेच्या अलिकडच्यांना एकत्र करा. पक्षसंघटनांमध्ये रेष मारा- जे या बाजूचे आहेत, त्यांच्या बारीकशा कुरघोड्यांकडे, दोषांकडे दुर्लक्ष करा आणि बरोबर घ्या. आपापसांतले मतभेद सामोपचाराने मिटवा. मतभेद टोकाला नेऊ नका! बारीकशा तात्त्विक मतभेदाला फार महत्त्व देऊ नका. एक व्हा!

मीनाताई : तुम्ही पानसरेंचे विचार मांडत आहात. त्यांनी ठरवलेल्या काही गोष्टी पूर्ण व्हाव्यात असा काही प्रयत्न करता आहात का?

कॉ. उमाताई : कॉ. पानसरेंची क्षमता मोठी होती. त्यांनी ठरवलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करणे कोणा एकाला शक्य नाही. काहीजणांनी एकेक काम पूर्ण केले, तर शक्य होईल.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर, छत्रपती शाहूंच्या जीवनावर शंभर-शंभर व्याख्याने द्यायचे ठरविले होते. आज पुस्तकरुपाने त्यांचे विचार लोकांच्यापर्यंत पोचवले जात आहेत. पण एखाद्या तरुणाने, त्यांची राहिलेली व्याख्याने पूर्ण करण्याचे ठरवावे. त्यांनी शमशुद्दिन मुश्रीफ यांची शंभर व्याख्याने महाराष्ट्रभर करण्याचे ठरविले होते; पण एक व्याख्यान झाल्यावर कॉ. पानसरेंना गोळ्या घालण्यात आल्या. त्यांची व्याख्याने महाराष्ट्रभर ठेवण्याचे आव्हान आहे. “हेमंत करकरेंचा खून कोणी केला?” हे मुश्रीफांचे पुस्तक लोकांच्यापर्यंत पोचवले पाहिजे.

त्यांना संत तुकारामांचे विज्ञाननिष्ठ अभंग एकत्र करून छापायचे होते, सुरेल आवाजात गाऊन घ्यायचे होते. आपल्यामागे सक्षम कार्यकर्ते तयार करावेत, हे उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य होताना दिसत आहे.

कॉ. पानसरेंनी शंभर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची चरित्रे लिहून घेतली. कोल्हापूर घडवणार्‍या शंभर समाज कार्यकर्त्यांची चरित्रे लिहिण्याचा संकल्प निम्म्याच्या वर पूर्ण झाला; उरलेला कार्यकर्तेलेखकांनी पूर्ण केला पाहिजे.

मीनाताई : कॉम्रेड ‘अंनिस’बद्दल तुम्ही काय म्हणाल?

कॉ. उमाताई : ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांबद्दल मला आदर आहे. दाभोलकरांच्या मागे कार्यकर्त्यांनी काम वाढवले आहे. दोन कायदे करून घेतले आहेत, तुमचे वार्तापत्र अधिक जोमाने सुरू आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करते.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्याशी तुमचा संपर्क आहे का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, 40 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये जटा निर्मूलनाची चळवळ सुरू झाली. यलम्मादेवीची दहशत एवढी होती की, तिच्यासंबंधी कुणीही वेगळा विचार करू शकत नव्हते. त्यामुळे देव न मानणारे कार्यकर्तेच या जटा निर्मूलन कामात पुढे होते. त्यात कम्युनिस्टांचा सहभाग मोठा होता. आम्ही भारतीय महिला फेडरेशन तर्फे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी जटा निर्मूलनाचे कार्यक्रम घेतले.

मीनाताई : अभिनंदनाबद्दल आभार; पण अजून पुढे जाण्यासाठी सूचना कराल काय?

कॉ. उमाताई : सूचना नाही; पण विनंती करीन. तुम्हा कार्यकर्त्यांची क्षमता अधिक आहे. तुम्ही चारही विचारवंतांचा विचार समजून घ्यावा. त्याचा प्रचार-प्रसार करावा. पूर्वी बुवा सत्ताधार्‍यांना मते मिळविण्यासाठी मदत करत. आता बुवा सत्तेवर बसले आहेत, धर्मांध सत्तेवर बसले आहेत. अशावेळी राजकारणापासून तुम्ही दूर राहणे म्हणजे त्यांना मदत केल्यासारखे होईल. ऐक्याच्या कामात तुम्ही पुढाकार घेऊ शकता. विवेकी विचार सर्वांपर्यंत पोचवू शकता, ते करावे एवढीच विनंती मी करीन. धन्यावाद कॉम्रेड ! पुन्हा एकदा सलाम !

शब्दांकन : अनिल चव्हाण

मोबा. 9764147483