Categories
बुवाबाजी

पानीवालेबाबाने केला पोबारा : अंनिसमुळे नागरिकांमध्ये जागृती

जुलै - २०१७

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात अनेक दिवसांपासून झोपडीवजा कुटीमध्ये रुपन कल्याण बरूआ ऊर्फ पाणीवाले बाबाने बस्तान मांडले होते. दैवीशक्तीने पाणी देऊन रोगांवर उपचार करून भोळ्याभाबड्या नागरिकांना लुटण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. मात्र भुसावळच्या अंनिस शाखेच्या पदाधिकार्‍यांनी आव्हान देताच त्याने बस्तान गुंडाळून पोबारा केला.

पाणीवाले बाबा गेल्या अनेक दिवसांपासून कंडारी परिसरात पाणी-मंत्राने अनेक आजार दुरुस्त होतात, असा दावा करीत होता. त्याच्याकडे येणार्‍या लोकांची संख्या वाढली होती. या संदर्भात सूज्ञ व जाणकार नागरिकांनी मात्र अंनिस शाखा भुसावळमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार अंनिस शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्तेव अध्यक्ष श्यामकुमार वासनिक यांनी बाबांशी संपर्क साधून हा प्रकार थांबविण्याची सूचना केली. तसेच आपला पाणीमंत्राचा चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले; अन्यथा जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यासंदर्भात बाबाला लेखीपत्र देण्यात आले. त्यामुळे तथाकथित बाबाने आपला गाशा गुंडाळून पोबारा केला.

अरूण दामोदर, सागर बहिरूणे, अंजना निरभवणे, मनोज नंदागवळी, चंद्रकांत चौधरी, प्रा. सोपान बोराटे, सुमंगल अहिरे, अ‍ॅड. सुनील पगारे, एस. झेड. गवळी, नितीन मोरे, आनंद मित्र, राजेश तायडे, भन्ते सुमन तिस्क आदी कार्यकर्ते यामध्ये सामील होते.

श्यामकुमार वासनिक, भुसावळ