Categories
व्यसन

महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत व्यसनांमुळे दहा हजार मृत्यू

जानेवारी - २०१९

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील

सुमारे 98 गावांमध्ये करण्यात आलेले व्यसनांचे सर्वेक्षण

हे सर्वेक्षण करीत असतांना सर्व वयोगटातील स्त्रीपुरुषांचा सहभाग राहिला आहे, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते; एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष व्यसन करणार्‍या व्यक्तींचाही सहभाग राहिला आहे. हे प्राथमिक स्तरावर करण्यात आलेले सर्वेक्षण असून अजून व्यापक पातळीवर हे शक्य झाल्यास चक्रावून सोडणारी आकडेवारी यामुळे बाहेर येईल.

एकाच गावातील जर अनेक व्यक्तींनी फॉर्म भरून दिले असतील, तर त्यापैकी ज्यांनी कमीत कमी आकडेवारी सांगितली असेल तर शक्यतो तीच संख्या आपण अंतिम निष्कर्षात समाविष्ट केली आहे. उदा:- धुळे जिल्ह्यातील म्हसदी गावातील सुमारे 75व्यक्तींनी यात सहभाग नोंदवला. गेल्या 10वर्षांत आपल्या गावातील दारू पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या किती? यावर उत्तर देतांना अनेकांनी किमान 100ते 250चा आकडा व काहींनी त्यापेक्षाही जास्त लिहिला आहे. परंतु आपण 110मृत्यू अंतिम निष्कर्षात धरले आहेत.

दारू पिणार्‍यांमुळे गावांत व कुटुंबात भांडणतंटे होतात, दारूमुळे महिलांवर अन्याय, अत्याचार होतात, मुलांच्या व समाजाच्या शिक्षणावर वाईट परिणाम होतो, आरोग्याच्या सर्वाधिक समस्या निर्माण होतात व अवैध दारूविक्रीला स्थानिक बीट हवालदार जबाबदार आहे, यावर जवळजवळ 75ते 90टक्के लोकांचे एकमत असल्याचे लक्षात आले.

दारूबंदीच्या आड येणार्‍या घटकांमध्ये लोकांनी राजकारणी लोकप्रतिनिधी, दारूविक्रेते, प्रशासकीय यंत्रणा व पोलीस खात्याला मुख्यत्वे जबाबदार धरले आहे.

व्यसनांच्या प्रश्नावरील सर्वेक्षणाचा निष्कर्ष

सहभागी व्यक्तींची संख्या- 617

एकूण सहभागी गावे- 98

सर्वेक्षणातील प्रश्नावली व नागरिकांनी दिलेली उत्तरे पुढील प्रमाणे:-

आपल्या गावांत कायमची दारूबंदी व्हावी, असे आपणास वाटते काय- होय- 600, नाही- 06

150 गावांमधील एकूण दारूविक्रेत्यांची संख्या- 4,393

150 गावांमधील दारू पिणार्‍यांची संख्या- 2,68,878

150 गावांमधून गेल्या 10 वर्षांत व्यसनामुळे मेलेल्यांची संख्या- 10,073

कुटुंबातील व्यक्ती व्यसनाधीन आहे का?- होय- 223, नाही- 338

गावात कुठल्या प्रकारची व्यसने उपलब्ध आहेत?

दारू, तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट, तपकीर, खर्रा, ड्रग्स, हेरॉईन, ताडी, माडी, सट्टाबाजी, पत्तेबाजी, गांजा इ. व्यसने कमी-जास्त प्रमाणात जवळपास सर्वच 150 गावांमध्ये उपलब्ध आहेत, असे सर्वच 617 सहभागींचे म्हणणे आहे.

दारू पिणारी व्यक्ती दिवसाला किती रुपये कमविते?

वेगवेगळी उत्तरे आली आहेत. 150 ते 400 पर्यंत

पिणारी व्यक्ती व्यसनासाठी दिवसाला किती रुपये खर्च करते?

याचीही वेगवेगळी उत्तरे आली आहे. 100 ते 500 पर्यंत. जास्तीत जास्त व्यसनाधीन व्यक्ती कमवतच नाही, ती घरातील आईला, पत्नीला मारहाण करून, चोरी करून पैसे जमा करते व त्यातून दारू पिते असा अनुभव आहे.

दारू पिल्यानंतर ती व्यक्ती समाजात कशी वागते? त्याबद्दल थोडक्यात. (लोकांनी नोंदवलेली मते थोडक्यात)

पुढील उदाहरणे पाहा. शेकडो अनुभव.

1) दारू पिणारी व्यक्ती शुद्धीवर नसते. ती व्यक्ती बायकोला मारहाण करत असते, मुलांकडे दुर्लक्ष करते, ती व्यक्ती कधी समाजाच्या कामी पडत नाही.

2) दारू पिल्यानंतर व्यक्ती समाजात भांडणे करणे, कोणाला शिव्या देणे, चोर्‍या करणे असे कृत्य करते, कुटुंबाला त्रास देते व दारू पिण्यासाठी घरातील सामान विकते.

3) दारू पिणारी व्यक्ती हा व्यसनाधीन असल्यामुळे समाजात तिला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा नसते. आपल्या स्वत:चे अस्तित्व व व्यक्तिमत्त्व, पैसा, संपत्ती, माणुसकी इ. सर्व गोष्टी व्यसनामुळे गमावून बसते.

4) दारू पिणारी व्यक्ती ही उद्धट व असभ्य वागत असते व सतत बडबड करीत असते व सतत शिव्या देत असते. पुन्हा पुन्हा तेच बोलत असते. तसेच सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हा की तिच्या घरच्यांना फार मानसिक व शारीरिक छळ सोसावा लागतो व पत्नी व मुला-बाळांची आबाळ होते.

5) दारू पिल्यानंतर ती व्यक्ती समाजात कुणाला शिव्या देते. आपल्या पत्नीला, मुलाला मारझोड करते. दारू पिण्यासाठी ती व्यक्ती कोणाचे वाहन, सायकल, रात्री सर्व विकून ती दारू पिते आणि समाजात शिव्या देत असते.

दारू पिणार्‍या व इतर व्यसन करणार्‍या व्यक्तींबद्दल समाजाचे मत, त्यांची प्रतिमा इ.

पुढील उदाहरणे पहा.

1) दारू पिणार्‍या व्यक्तीला समाजात कवडीची किंमत नसते. त्या व्यक्तीला समाजात तिचे नातेवाईक, अन्य लोक सर्व तिला वाईट नजरेत बघत असतात. तिच्याशी लोक चांगले बोलत नसतात. तिला असे वाटते की आत्महत्या करून घ्यावी.

2) दारू पिणार्‍या व्यक्ती व इतर व्यसन करणार्‍या व्यक्तींबाबत समाजात त्यांना आदराचे स्थान नसते. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यसनाधीन म्हणूनच पाहिले जाते.

3) दारू पिणार्‍या व्यक्तीला समाजामध्ये मान-सन्मान मिळत नाही. तिला कायम बेवड्या, दारूड्या म्हणूनच हाक मारत असतात. समाजामध्ये लोक बोलतात की त्या व्यक्तीवर भरवसा ठेवायचा नाही. तिला उसणे पैसे द्यायचे नाही. कारण ती गोड बोलून सगळ्यांनाच लुटत असते.

4) लोक सांगतात की, त्यांच्या घरात ज्या व्यक्ती राहतात त्या जर व्यसन करत असतात, तर घरातल्या व्यक्तीचे जर लग्न करायचं आहे, तर मुलगी बघायला जातात, तेव्हा वधूपिता सांगतो की, त्यांच्या घरात दारू पिणार्‍या व्यक्ती राहतात. म्हणून लग्न होऊ शकत नाही.

5) दारू पिणार्‍या व्यक्तीबद्दल गावातील समाजात वाईट बोलले जाते आणि त्या व्यक्तीला समाजात गावात काहीच किंमत राहत नाही. तिला इतर कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घेता येत नाही.

आपल्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत का? होय- 223, नाही- 338.

दारूच्या व्यसनामुळे तुमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे का? होय- 153, नाही- 143.

दारू पिणार्‍यांमुळे कुटुंबात, गावांत समाजात भांडणतंटे होतात काय? होय- 564, नाही- 45.

दारूमुळे महिलांवर अन्याय, अत्याचार, शोषण होते, असे आपणास वाटते काय? होय- 580, नाही- 16.

दारूमुळे शिक्षणावर वाईट परिणाम होतो, असे आपणास वाटते काय? होय- 571, नाही- 4.

दारूमुळे आरोग्याच्या सर्वाधिक समस्या निर्माण होतात, असे आपणास वाटते काय? होय- 509, नाही- 14.

दारूविक्रीला स्थानिक बीट हवालदार जबाबदार आहे का? होय- 373, नाही- 144.

दारूविक्रेत्यांना दुसरा पर्यायी कामधंदा उपलब्ध आहे का? होय- 444, नाही- 53.

गावातील दारूबंदी का होत नाही? याला कोणते घटक जबाबदार आहेत, असे तुम्हाला वाटते? यांवर लोकांची मते बर्‍याच प्रमाणात सारखीच आढळतात. गावातील पुढार्‍यांपासून ते लोकप्रतिनीधी यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी बीट हवालदार आणि पोलीस प्रशासनाला दोषी ठरवले आहे, तर स्थानिक दारू विक्रेत्यांची प्रचंड दहशत यामुळे वाढत आहे.

लेखक संपर्क : 9527206057