अजित दळवी लिखित ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग भावे नाट्यमंदिर, सांगली येथे पाहण्याची संधी मिळाली. समाजातील एका प्रश्नासाठी आयुष्यभर एकाकी झुंज दिलेल्या रघुनाथराव धोंडो कर्वे या महान समाजसुधारकाच्या जीवनावर हे नाटक आधारलेले आहे. नाटक पाहताना अनेकदा डोळ्याच्या पापण्या अश्रूंनी ओल्या झाल्या. समाजाच्या रोषाविरोधात ठामपणे एकाकी झुंज देताना र. धों. ना एकूण चार खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यातील पहिले दोन खटले ते हरले. तिसरा खटला त्यांनी जिंकला. चौथ्या खटल्याचे वास्तव तर चीड आणणारे आहे. हा खटला र. धों. च्या मृत्यूनंतर त्यांच्यावर भरला गेला. म्हणजे सरकारदरबारी त्यांच्या मृत्यूची दखल देखील नव्हती. लैंगिकतेबाबतचे गैरसमज आणि कुटुंबनियोजनाचे महत्त्व आज आपणाला पटले आहे आणि शासन व समाजाने ते मान्यही केले आहे; पण र. धों. च्या काळात हा विषय म्हणजे भयानक पापकृत्य समजले जाई. संपूर्ण समाज अज्ञानाला कवटाळून बसलेला असताना र. धों. त्या लैंगिकतेच्या अज्ञानाविरोधात आपल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात तथाकथित धर्मरक्षकांच्या दंभावर प्रहार करीत होते. ‘अज्ञानाच्या महासागरातील विवेकाचे बेट’ अशा द्रष्ट्या पुरुषाच्या सामाजिक कार्याचे योग्य मूल्यमापन आज नाट्याच्या रुपात होत आहे, हे पाहून समाधान वाटते. उशिरा का होईना समाज सत्य स्वीकारतो. र. धों. च्या बाबतीतही या वचनाची प्रचिती येत आहे.
सत्याचा पाठपुरावा हे मोठे अग्निदिव्य असते. संपूर्ण समाज अज्ञानाची पाठराखण करतो, हा विरोधाभास वाटला, तरी ते वास्तव आहे. ‘सत्य न मरते, दळभारे’ हे जरी खरे असले, तरी सत्यशोधकाला यातनेतून जावे लागते. सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यावा लागतो. येशूला सुळावर चढावे लागते. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी यांना सनातन्यांच्या गोळ्यांनी ठार मारले जाते. र. धों. च्या वाट्याला जरी असा हृदयद्रावक मृत्यू आला नाही, तरी जिवंतपणीच त्यांना मृत्यूहूनही अधिक वेदना भोगाव्या लागल्या. पण आज र. धों. चे ‘समाजस्वास्थ्या’ बाबतचे विचार सर्वमान्य झाले आहेत. र. धों. जिंकलेत; त्यांचे सनातनी विरोधक हरलेत.
‘समाजस्वास्थ्य’ नाटकात र. धों. च्या बुद्धिप्रामाण्यवादाचे समर्थन आहेच; पण त्याच्याबरोबरच एका चिरंतन संघर्षावरही भाष्य आहे. हा संघर्ष आहे मूल्यविचाराबाबत, नीती-अनीतीसंदर्भात, श्लील-अश्लील प्रश्नाबाबतच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. हा प्रश्न र. धों. च्या काळापेक्षाही सध्या अधिक गंभीर बनू पाहत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण प्राणपणाने रक्षण करायला हवे. नाहीतर काळाबरोबर ‘समाजस्वास्थ्या’साठी मूल्यांचा फेरविचार करणे अशक्य होईल आणि समाजाला अंधारयुगाकडे नेणार्या हुकूमशाही शक्तींचा विजय होईल. या प्रश्नावर ‘समाजस्वास्थ्य’ नाटकात सूचक भाष्य करून नाटककारांनी आपणा सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे. याबद्दल लेखक आणि दिग्दर्शक यांचे मन:पूर्वक कौतुक करायला हवे.
‘समाजस्वास्थ्य’ मासिकात आणि इतरत्र केलेल्या लिखाणांत र. धों. नी बुद्धिप्रामाण्यवादांचा समर्थपणे पुरस्कार केला आहे. बुद्धिप्रामाण्यवादावर भाष्य करताना त्यांनी म्हटले आहे – ‘बुद्धीच्या कसोटीवर न उतरणार्या सर्व धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धांशी आणि रुढींशी संघर्ष करून या देशाच्या जनतेच्या मनात शास्त्रीय दृष्टिकोन आणि सहिष्णुता रुजविण्याचा प्रयत्न करणे हा आमचा हेतू आहे.’
हाच हेतू महाराष्ट्र अंनिसचाही आहे. र. धों. एकाकी लढले. डॉ. दाभोलकरांनी मात्र मोठे संघटन उभे करून बुद्धिप्रामाण्याची पताका फडकत ठेवली. या संघटनात्मक शक्तीला बळ देणे, हे आपले कर्तव्य आहे.