गजेंद्र सुरकार – वर्धा (विदर्भ) येथील ‘महाराष्ट्र अंनिस’चे धडाडीचे कार्यकर्ते. सर्पमित्र म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. आंतरजातीय सत्यशोधक विवाह ते बुवाबाबांचा पर्दाफाश या कार्यातही ते अग्रेसर आहे. ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार राजेश मडावी यांनी घेतलेली गजेंद्र सुरकार यांची मुलाखत आपणा सर्वांना स्फूर्तिदायक ठरेल.
आपल्या कुटुंबातील वातावरण धार्मिक आणि अंधश्रद्धायुक्त होते की, विवेकवादी?
गजेंद्र सुरकार : माझं कुटुंब अगदी मध्यमवर्गीय. वडील पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. आई पूर्णत: अशिक्षित. घरात आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण; मात्र ती अकालीच वारली. कुटुंबात मीच एकटा पदवीधर झालो. माझ्या भावांना शिक्षणात पुढं जाता आलं नाही. घरात रूढी, परंपरा अन् सण, उत्सव साजरे केले जात; मात्र कर्मकांड करताना वडिलांना कधी बघितलं नाही. पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये राहत असल्याने जातिभेदाचे तकलादू संस्कार बालमनात कधीच रूजले नाहीत. रामायण-महाभारताच्या कथा ऐकण्याकरिता देवळात जात होतो. त्यामुळे देव, आत्मा, भूत यासारख्या भ्रामक कल्पनांवर कधीकाळी विश्वासही बसायचा; परंतु कुटुंबात कट्टर धार्मिकता नव्हती. कदाचित वडील पोेलीस खात्यात होते, म्हणूनच हे घडलं असावं.
या पार्श्वभूमीवर तुम्ही सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धांनी प्रभावित होता का? तुम्हाला कर्मकांडे आणि कालबाह्य धार्मिक रूढी कराव्या लागत होत्या का?
साधारणत: समाजात प्रचलित असलेल्या व तर्कशक्तीला ताण न देणार्या काही गोष्टींना मी धर्मकार्य म्हणून मानत होतो. त्या तशा अंधश्रद्धाच होत्या. ज्या कुटुंबात वाढलो तिथे तर तर्कशुद्ध विवेक फार दूर होता. घरी सत्यनारायणाची पूजा कधी झालेली आठवत नाही; पण श्राद्ध, तेरवीचे जेवण आणि मृत्यूनंतरची सर्व क्रियाकर्मेे बघत होतो. आईसोबत आषाढी एकादशीचा उपवासही करायचो. साबूदाणा व अन्य पदार्थ मिळतात म्हणून उपवास ठरलेलाच असायचा. एक आठवण सांगतो… मी दुकानातून काही अंडी विकत घेतली. घराकडे जाताना देऊळ असल्याने क्षणभर तिथेच दर्शनासाठी थांबलो. पँटच्या खिशात अंडी होती, याचं भानही राहिलं नाही. अंडी फुटली. मला वाटलं, देवाला हे सारं कळल्यानेच असं घडलं असावं….! त्यातला कार्यकारणभाव समजण्याएवढं ते वय नव्हतंच. कुटुंबातील आम्ही सर्वजण एकदा परगावी दूरच्या नातेवाईकांकडे गेलो. त्यांच्या घरी ‘महालक्ष्मी’चे दर्शन घ्यायचे होते. मला अचानक भयंकर ताप चढला. लगेच डॉक्टरांकडे नेण्याऐवजी माझ्या अंगाला महालक्ष्मीचा अंगारा लावून देवीसमोर नतमस्तक हो, असे सांगण्यात आले. देवीला नमस्कार केल्यानेच ताप गेला, ही गोष्टही मनावर बिंबविली. वाढत्या वयासोबतच जाणिवा विस्तारू लागल्या. कर्मकांडांचे फसवे रूप हळूहळू दिसू लागले…. परिणामी माझ्या विवाहात कुणाची पर्वा न करता मी बंडखोरी केली.
लग्न जुळले की, विवाहाच्या आदल्या दिवशी अंगाला हळद लावली जाते. त्यानंतर नवरदेव होणार्या तरूणाला घराबाहेर जाता येणार नाही, अशी परंपरा अजूनही विदर्भात आहे; मात्र कुटुंबात मीच मोठा असल्यामुळे अंगाला हळद लावूनही विवाहाच्या विविध कामांकरिता कैकदा घराबाहेर निघालो. कुटुंबातील कुलदेवतेला बकर्याचा बळी देण्याची परंपरा असताना ती बंद केली. कुटुंबियांनी तगादा लावल्यामुळे ब्राम्हणाच्या ग्रहपूजा व सत्यनारायणाची पूजा करावी लागली. घर बांधल्यानंतर वास्तुशांती करून लोकांना जेवण दिले. त्याच दिवशी माझी लहान मुलगी पूजा हिचा वाढदिवस होता. ‘सत्यनारायणाच्या पूजेत माझ्या मुलीलाही बसवा’ अशी विनंती ब्राम्हणाकडे केली; मात्र तो तयार होईना. ‘पूजेप्रसंगी मुलीला बसविल्यास घरातली शांती संपेल….’ वगैरे वगैरे पालूपद त्यांनी सुरूच ठेवले होते. या घटनेने माझ्यातील विवेक जागा झाला. शेवटी कंटाळून मी त्या सत्यनारायणाच्या पूजेला ठामपणे विरोध केला. कुटुंबातील सर्व नातेवाईक हा प्रकार पाहून अस्वस्थ झाले. वृद्धांनी मनधरणी केल्यानंतर ब्राम्हणाने पर्याय सुचविला. ‘मुलीला मांडीवर घेऊन पूजा करा…!’ पूर्णपणे श्रद्धाळू नव्हतोच. सुरुवातीच्या काळात मी टेलरिंग मशिनच्या रॉ मटेरिअल विक्रीचा छोटासा व्यवसाय करत होतो. बोहणी होवो अथवा न होवो एखादा टेलर आला की, त्याला उधारीत सामान देत होतो. आधी अगरबत्ती लावून सामान विकायला घराबाहेर गेलो नाही.
शालेय जीवनात शिक्षकांचा प्रभाव झाला का?
पोलीस वसाहतीमधील नगरपालिकेच्या शाळेत पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले. इयत्ता चौथी ते सहावीचे शिक्षण हिंगणघाट येथील एका खासगी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर सातवी ते पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यातच झाले. माझ्या या शैक्षणिक प्रवासात विज्ञाननिष्ठ विवेकवादी शिक्षक-शिक्षिका मिळाले नाहीत. क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या पलिकडची माहिती देऊन उत्सुकता निर्माण करणारे गुरुवर्य भेटले नाहीत. सरस्वती पूजन अन् विद्येची देवता. यासारखे विषय मनात कोंबले जात होते. मी बी.ए.प्रथमला असताना प्राध्यापिका झोपे यांनी ‘संत तुकारामांचा खून झाला, ते सदेह वैकुंठात गेले नाहीत’ अशी माहिती वर्गात दिली. त्यासाठी अनेक उदाहरणं देऊन हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितला. ही गोष्ट माझ्या युवामनात कायमची रूतून बसली; मात्र वेगळा विचार मांडून बौद्धिक संस्कार देणारे शिक्षक मला मिळाले नाहीत. वर्तमानपत्र वाचून मनात उमटलेल्या प्रश्नांची काही उत्तरं शोधण्यास मी सुरुवात केली होती.
एखाद्या आकस्मिक घटनेनं तुम्ही अंधश्रद्धाविरोधी चळवळीकडे झुकला का?
महात्मा गांधीजींच्या हस्ते वर्ध्यात 30 डिसेंबर 1938 मध्ये मगन संग्रहालयाची स्थापना झाली. या संग्रहालयात दरवर्षी भारताच्या विविध राज्यांमधून आलेल्या ग्रामीण कारागिरांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले जात असे. ‘वर्धा वर्धन मेला’ या नावाने प्रसिद्धीस आलेला हा उपक्रम आता बंद झालाय. 1998 ची गोष्ट असेल. माझ्या मुलीला सोबत घेऊन प्रदर्शन बघायला गेलो. प्रदर्शनाच्या एका कोपर्यातील दृश्याने माझे लक्ष वेधले. चक्क चिमुकल्या पोरांच्या हातात साप देऊन एक-दोन व्यक्ती जनतेचं प्रबोधन करीत होत्या. ‘सदस्य नोंदणी करा’ असे आवाहन करणारा फलकही दिसला. 20 रुपये शुल्क भरून पक्षिमित्र व सर्पमित्र यासाठी अर्ज भरून त्यांच्याकडे स्वाधीन केले. काही दिवसांनंतर मला बैठकीला बोलाविण्यात आले. कोषाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. बैठकांना सतत उपस्थित राहू लागलो, यातून पक्षी निरीक्षणाचा नाद लागला. मगन संग्रहालयातच आकाश निरीक्षण मंडळ, सर्पमित्र मंडळ आणि भारत जन विज्ञानाचे काम चालायचे. प्रभाकर पुसदकर नावाचा विवेकी कार्यकर्ता ‘बालमंच’ ही उपक्रमशील चळवळ राबवीत होता. सर्व घडामोडीमागे पुसदकर यांचीच प्रमुख भूमिका होती. वैज्ञानिक दृष्टीचा आधार घेऊन समकालीन प्रश्नांची ते चिकित्सा करायचे. त्यावेळी अखिल भारतीय अंश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व मगन संग्रहालयाचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही ते जबाबदारी सांभाळायचे. दरम्यान, त्यांच्याशी संवाद वाढला. विविध उपक्रमांचा आशय समजून घेऊ लागलो.

प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ यशपाल व डॉ. अनिल सदगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या भारत-जन विज्ञान जथ्था या संघटनेशी जुळलो. मगन संग्रहालयाच्या परिसरात या चळवळी चालायच्या. त्याच ठिकाणी एका खोलीत विविध भागातून पकडून आणलेले साप ठेवण्यात आले होते. सापांना दररोज सायंकाळी मोकळं सोडलं जायचं. मुलं बिनधास्तपणे सापांशी खेळायची, त्यांना अलगद हाताळायची. माझ्याही मनातली भीती कमी होऊ लागली. अस्वस्थ करणार्या प्रश्नांची उत्तरे मिळत होती. त्यामुळे नवनव्या उपक्रमांबद्दल जिज्ञासा वाढली. अ. भा. अंनिसच्या बैठकीचा मला एक दिवस निरोप आला. बैठकीचे स्थळ दाखविण्यासाठी माझ्या दुचाकीवर पंकज वंजारे नावाचा विद्यार्थी सोबत आला होता. त्यानेच सर्वांना माझी ओळख करून दिली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली आणि माझ्यावर वर्धा तालुका कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. प्रभाकर पुसदकर वेगवेगळ्या विषयांची पुस्तके द्यायचे. नव्या दृष्टीने वाचायला लागलो. इथूनच खर्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी जवळीक वाढली.
सर्पविज्ञानाकडे तुम्ही कसे वळला? यातील तुमचे अनुभव विस्ताराने सांगा?
पक्षिमित्र या संघटनेशी जुळल्यानंतर प्रभाकर पुसदकर यांनी सुरू केलेल्या सर्प प्रशिक्षणात नित्यनेमाने युवक-युवतींनी साप पकडून आणण्याचे कौशल्य मिळविले. प्रशिक्षण घेतल्यानंतर ते मलाही साप पकडण्यासाठी घराघरांमध्ये पाठवू लागले. त्यावेळी माझ्यासह प्रभाकर व शीतल नावाच्या कार्यकर्त्यांकडे दुचाकी असल्याने बराच लाभ झाला. दूरसंचार विभागाने तेव्हा काही ठराविक फोन नंबर ‘सर्प मित्र सेवा’ म्हणून दिले होते. मगन संग्रहालयासोबत त्यात माझ्याही फोन नंबरचा समावेश होता. त्यामुळे साप दिसला, की लोक मलाच बोलवायचे. एकाच दिवशी 14 साप पकडण्याचा अनुभवही घेता आला. प्रशिक्षणानंतर पहिल्यांदा ‘पाणदिवड’ साप पकडला. ही घटना आठवली, की अंगावर अक्षरश: काटे उभे राहतात; मात्र आता तो माझ्या जगण्याचाच भाग झाला. त्यामुळे असे असंख्य अनुभव मला ऊर्जा देतात…. लढायला सांगतात… त्यातील काही निवडक अनुभव सांगतो….
अनुभव 1 : वर्ध्यापासून आठ कि.मी.अंतरावरील शेतशिवाराच्या विहिरीतून साप पकडण्याकरिता बोलावणे आले. विहिरीचे खोदकाम सुरू होते. विहिरीची खोली 80 फूट, तर रूंदी साधारणत: 20 फूट असेल. विहिरीत सात फुटाचा नाग दबा धरून बसला होता. झाडाची फांदी टाकताच फुत्कार सोडायचा. पाणी बरेच असल्याने साप पकडणे अशक्य झाले. माघारी परतलो; मात्र शेतकरी गयावया करू लागला…. ‘विहिरीच्या बांधकामासाठी 3 लाख रुपये खर्च झाले. सापाच्या भीतीमुळे मजुरांनी काम सोडले. कसंतरी करा; पण साप पकडा,’ मी विचारात पडलो. एवढ्यात माझी नजर शेतात ठेवलेल्या क्रेनकडे गेली. याच क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून मुरूम काढला जात होता. या क्रेनमध्ये बसलो. माझ्या कंबरेला बांधलेली दोरी घेऊन नागरिक बाहेर उभे होते. एक जिगरबाज युवकही माझ्या सोबतीला घेतला. क्रेनचा पंजा विहिरीमध्ये विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर अत्यंत शिताफीने मी सापाला ताब्यात घेतले. विहिरीबाहेर येताच शेतकर्यांच्या आनंदाला जणू पारावारच उरला नव्हता. थोडाफार हाच अनुभव दुसर्या घटनेतही आला. 32 फूट खोल असलेल्या एका विहिरीतून साप पकडला. ढोलीत बसून वर येत होतो. डोक्यावर दगड, मुरूम पडत होते. त्यामुळे लोकांनी विहिरीत शिडी सोडली; मात्र वजनाने ती तुटली. पुन्हा नवीन दोर सोडण्यात आला. सोबत टोपली बांधून कसाबसा सापासोबत वर आलो. परड (घोणस) जातीचा साप पकडताना त्याने बोटाला दंश केला. विषारी नसलेला दात माझ्या बोटात तुटल्याने रक्तस्त्राव झाला. लगेच सापाला सुरक्षित स्थळी सोडून रुग्णालयात भरती झालो. डॉक्टरांचा अहवाल नॉर्मल निघाल्याने वाचलो. तेव्हापासून विहिरीतला साप पकडताना विशेष खबरदारी घेतो.
अनुभव 2 : नागपुरात सर्पप्रबोधनाचा कार्यक्रम करून मी घरी पोहोचताच मित्राचा फोन आला… ‘दुचाकीच्या सीटखाली साप दडून बसला आहे….’ रात्रीची वेळ होती. लगेच दुचाकीची सीट बाहेर काढून सापाला पकडले. एवढ्यात मित्र ओरडला… ‘मण्यार..ऽऽऽ’ माझी घाबरगुंडी उडाली आणि सापाला फेकून दिले; परंतु काही वेळानंतर त्याला पकडून बरणीत जेरबंद केले. रात्रभर झोपलो नाही. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ.कलंत्री यांना ही घटना सांगताच म्हणाले…‘अरे मी उपचाराची सारी व्यवस्था करून ठेवली. घरी झोपण्यापेक्षा रुग्णालयात झोप, रिस्क घेऊ नको…’ सर्पविज्ञान प्रबोधनाचे आतापर्यंत 5 हजारांपेक्षा अधिक कार्यक्रम केले. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत दिवंगत प्रा. ठाकूरदास बंग यांच्या आग्रहामुळे शेतकरी प्रबोधन यात्रेत गेलो होतो. शेतकर्यांना माहिती दिल्यानंतर घोणस (परड) सापाला बरणीत टाकले; परंतु त्यातून लगेच बाहेर कसा निघाला, हे कळलेच नाही. सर्व नागरिक शांतपणे माहिती ऐकत होते. प्रा. बंग सरांच्या पायाजवळ जाऊन घुटमळत होता. रात्रीच्या वेळी सर्पप्रबोधनाचे कार्यक्रम मी कधीच घेत नाही; मात्र एका कार्यकर्त्याने खूप आग्रह विनंती केल्याने वर्धमनेरी या गावात गेलो. विषारी सापांची माहिती देताना वीज गेली…. किर्र अंधार पसरला. लोकांचा गोंगाट वाढला. त्यामुळे मीदेखील विचलीत झालो अन् साप हातून सुटला….लोक सैरावैरा झाले. एकमेकांच्या अंगावरून उड्या टाकून पळू लागले. गोंधळाची परिस्थिती पाहून लोकांना शांत केले. कुणाला काही इजा झाली असेल, तर सांगा अशी विनंती केली. एक तरुण पुढे आला. प्रथमोपचार करून त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांना सर्व घटनाक्रम समजावून सांगितला. तपासणीनंतरच गावकरी समाधानी झाले. वर्ध्यात बारा हजार विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम करताना साप माझ्या बनियनमध्ये शिरला. बनियानला दंश केल्याने ती जागा विषाने ओली झाली. सावध झालो नसतो, तर क्षणात संपलो असतो…!

सापाला सुरक्षित ठिकाणी सोडतानाही फार मोठा धोका असतो. एकदा गावाला जायचे होते अन् पकडलेला सापही वाटेत सोडायचा होता. त्यामुळे पत्नी रजनीला घेऊन दुचाकीने निघालो. पिशवीत बांधून ठेवलेला साप मागच्या सीटजवळ असलेल्या हुकला लटकविला. दुचाकी अत्यंत वेगात जात असतानाच पत्नी प्रचंड किंचाळली. क्षणभर तिच्या तोंडातून आवाजच निघाला नाही. मी मागे वळून बघतो तर नाग साप फणा काढून तिच्या खांद्यावर आणि शेपटी मांडीवर दिसत होती. … प्लीज हालचाल करू नको, तशी राहा…. असा धीर देऊन दुचाकीचा वेग कमी केला. रस्त्याच्या कडेला दुचाकी थांंबविणार होतो; मात्र…. अंगावरून सर्रकन खाली उतरून नाग साप झाडीत निघून गेला…. वनविभागातर्फे आयोजित केलेल्या प्रबोधन कार्यक्रमासाठी साप घेऊन गोंदिया येथे गेलो. कार्यक्रम करून बसने परत येताना मांडूळ जातीचा साप माझ्या हातून निसटला. बसमधील प्रवाशांना दिसताच आरडा-ओरड सुरू झाला. सापाच्या धास्तीने प्रवासी चक्क सीटवर उभे झाले. चालक-वाहक हैराण झाले…. ‘बसमध्ये गारूडी आहे. त्याला शोधा’ अशी मागणी होऊ लागली. प्रकरण चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने मीदेखील अस्वस्थ झालो. गोंधळ वाढतच होता. बस सुसाट वेगाने धावत होती. बसमध्ये गारूडी कुणाला दिसला नव्हता. इतक्यात माझ्याच सीटखाली साप सरपटताना दिसला. त्याला कचकन् पकडून मी खिशात कोंबले. हे दृश्य एका व्यक्तीने बघितले; मात्र गप्पगार झाला…. दरम्यान, ही बस नागपूर शहरात शिरली. थांबा आला. साप खिशात कोंबताना मला बघणारी ती व्यक्ती प्रचंड तणावातच खाली उतरली…..
पकडून आणलेले साप घरात ठेवल्यानंतरही शेकडो किस्से घडले. कुटुंबियांचा रोष ओढवून घ्यावा लागला. पत्नी रागावेल म्हणून सापाची बरणी घरात न ठेवता जिन्याखाली ठेवली. सकाळी उठून गोंदिया येथे रवाना झालो. वाटेतच पत्नीचा फोन आला…. ‘अहो बरणीतला नाग सुटला. तुम्ही आम्हाला मारायला लागले का?’ माझ्या मनाचा थरकाप उडाला. झाले असे, की बरणीच्या झाकणाला थोडी फट होती. त्यातून बाहेर निघून साप कुंडीतील फुलझाडावर जाऊन बसला. पत्नी सकाळी पाण्याकरिता नळाजवळ जाताच तिच्यावर फणा काढून फुत्कार सोडला. वॉर्डातील सर्व नागरिक माझ्या घरासमोर गोळा झाले. काहींनी शिव्यांची लाखोली वाहिली. क्षणाचाही विलंब न करता माझ्या सर्पमित्राला फोन करून घरी पाठविले. मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. असे अनेक किस्से घडलेत. पकडून घरी आणलेला साप सुटल्याने मोहल्ल्यात भांडणेही झालीत; मात्र मी डगमगलो नाही. कार्य सुरूच होते.
साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यापुरतेच मी मर्यादित राहिलो नाही. सापाबद्दल गैरसमज दूर करणे, प्रथमोपचार, सर्पदंशाची लक्षणे यासारख्या विविध पैलूंवर प्रबोधन करत होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारे स्टिकर, पोस्टर, कॅलेंडर, भित्तिपत्रक, पुस्तिका व ध्वनिफीत तयार करून लोकांपर्यंत पोहोचवू लागलो. सामाजिक बांधिलकी जपणारी मंडळी, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने आर्थिक मदत केली. हे प्रबोधन साहित्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय व वनविभागाच्या कार्यालयांना पाठविले. सर्पदंशाने मृत पावलेल्या व्यक्तीला आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रशासनाविरुद्ध लढा दिला. अठरा जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देऊन सर्पमित्रांची फळी तयार केली. या कार्यामुळे माझी नवी ओळख निर्माण होऊ लागली. कार्यकर्त्यांशी संवाद दिवसेंदिवस वाढू लागला. परिणामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम वाढविण्यास फार मोठी संधी मिळाली. कार्यकर्ता म्हणून स्वतंत्र ओळख झाली. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेमुळे दोन सर्पमित्र संमेलन, सर्पप्रबोधन यात्रा आयोजित करू शकलो. सर्पमित्रांना ओळखपत्र देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकलो. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध वाढविण्यास डॉक्टरसाहेबांचेच मार्गदर्शन कारणीभूत आहे. सर्पविज्ञानावर प्रबोधन करण्यासाठी एवढे प्रचार साहित्य राज्यात इतर कुणी काढले असेल, असे मला वाटत नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आपण कसे आलात?
सर्पप्रबोधनाच्या कार्यामुळेच म.अं.नि.स.शी जुळलो. सापांमुळे अनेक वाद झाले. माझ्यावर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले; मात्र याच वादांमुळे ‘कार्यकर्ता’ म्हणून घडत गेलो, प्रसिद्धी मिळत गेली. प्रारंभी ‘अभाअंनिस’ सोबत काम करत होतो. माणसं जोडण्यात मला आनंद वाटतो; शिवाय दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पुढाकार घेऊन कृतीत उतरविल्याशिवाय मला समाधान वाटत नाही. काहींना हे खटकत असे. त्यामुळे माझ्याबद्दल हेतूपूर्वक गैरसमज पसरविले जात; शिवाय जात हा घटकही कारणीभूत असावा. तरीही कार्य सुरूच होते. ‘अभाअंनिस’तर्फे 2002 मध्ये नागपंचमीला प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मी माझ्याजवळील साप सोबतीला घेतले. आधी ठरविल्याप्रमाणे विषारी साप हातात घेऊन प्रबोधनाचे तीन कार्यक्रम प्रात्यक्षिकाद्वारे मला सादर करायचे होते; परंतु ‘अभाअंनिस’च्या जिल्हाध्यक्षांनी माझ्या प्रात्यक्षिकांना मज्जाव केला. यातून वाद निर्माण झाला. साप पकडणे, माहिती देणे आणि प्रत्यक्षात विषारी साप हातात घेऊन लोकांमध्ये वैज्ञानिक जाणिवा वाढविणे, प्रबोधन करणे या तिन्ही टप्प्यांमध्ये फरक आहे. मला दिलेली वागणूक अन्यायकारक वाटल्याने त्याच दिवसापासून ‘अभाअंनिस’पासून वेगळा झालो. सर्पप्रबोधनाचा कार्यक्रम मला कोणत्याही स्थितीत करायचाच होता. किशोर जगताप यांनी तशी संधी दिली. साप घेऊन घरी परतलो. फ्रेश झालो. जगताप म्हणाले, ‘धाडस करा अशक्य काहीच नाही. तुम्ही करू शकता.’ भीतभीतच पहिला कार्यक्रम केला. हिंमत वाढली. त्याच दिवशी सर्पप्रबोधनाचे तीनदा कार्यक्रम पूर्ण केले. त्यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही. ‘भारत जन विज्ञान जथ्था’ या बॅनरखाली मला ज्यांनी घडविले, त्यांनीही नापसंती दर्शविणे सुरू केले. त्यामुळे मी ‘सर्पमित्र मंडळ’ या नावाखाली कार्यक्रम घेऊ लागलो. नव्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद वाढला. सभा, बैठका होऊ लागल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा वर्ध्यात सुरू करावी, अशी इच्छा माझ्यासह अनेकांनी व्यक्त केली. तेव्हा ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ ‘अभाअंनिस’कडे येत होते. त्यातील एक अंक माझ्याकडे होता. या अंकातील माहितीवरून डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याकडे मी संपर्क केला. रामचंद्र तावरे हे कार्यकर्त्यांचे संपर्कसूत्र म्हणून काम पाहत होते. डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला. कार्याचा अहवाल मागितल्यानंतर तेही पाठविले. हा अहवाल मिळताच मला व अन्य कार्यकर्त्यांना इचलकरंजी येथे येण्याचे निमंत्रण दिले. दशकपूर्ती निमित्त तिथे अधिवेशन सुरू होते. डॉ.दाभोलकरांशी दीर्घ चर्चा करून आम्ही वर्ध्यात आलो.
वर्ध्यातील राष्ट्रीय युवा संघटनेच्या कार्यालयात 13 सप्टेंबर 2002 ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी मी, किशोर जगताप, नरेंद्र कांबळे, प्रशांत गुजर उपस्थित होतो. डॉ.सिद्धार्थ बुटले यांच्या घरी भेट घेऊन आम्ही त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर जिल्ह्यात स्वतंत्रपणे प्रबोधनाचे कार्य सुरू झाले. इचलकरंजी येथे डॉ.नरेद्र दाभोलकर यांनी अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत विदर्भातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यात ‘मअंनिस’च्या उद्दिष्टांची माहिती दिली. विविध उपक्रमांचे स्वरूप समजावून सांगितले. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, डी. डी. बंदिष्टे, प्रा. एन. डी. पाटील यांची भेट झाल्याने आम्ही फारच प्रभावीत झालोत. 2003 मध्ये गांधी विचारकांच्या सहकार्यामुळे ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ व व्याख्यान आयोजित केले. वर्ध्यातील आमचा हा पहिलाच कार्यक्रम होता. ‘अभा.अंनिस’च्या काही कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम उधळून लावण्याचे इशारे मिळत होते. ‘अध्यक्षपद घ्या; मात्र आमच्यात काम करा’ असेही आमिष दाखविण्यात आले. आम्ही या प्रलोभनांना बळी पडलो नाही. प्रस्थापितांची मदत न घेता प्रशिक्षण शिबिर आणि व्याख्यान यशस्वी करून दाखवले. विरोधासाठी विरोध हा माझा गुणधर्म नाही.

आपण रूढी, परंपरा नाकारल्याची उदाहरणे?
मी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरू केल्यापासून सत्यनारायण अथवा कोणत्याही कर्मकांडांना थारा दिला नाही. क्रोधापेक्षा करुणा व उपहासापेक्षा प्रेमाला महत्त्व द्या, या डॉ.दाभोलकरांच्या शिकवणीशी कधी प्रतारणा केली नाही. पत्नीच्या श्रद्धांचा उपहास टाळला. बदल हळूहळू होईल, त्यामुळे कार्य सुरूच ठेवले. त्यानंतर कुटुंबातच बदल जाणवले. काही दिवसांतच घरातील देऊळ, देवांचे फोटो व पूजेचे साहित्य नातेवाईकांना देऊन टाकले. दोन्ही मुलींच्या जन्म कुंडल्या घरात होत्या, त्या फाडल्या. हुंडा न घेता व ज्योतिषांकडे न जाता तिन्ही भावांची लग्ने करण्याची मानसिकता तयार केली. त्यात यश आले. वडील मरण पावल्यानंतर भावांनी तेरवीचा कार्यक्रम घेतला; परंतु हजर झालो नाही. वडिलांचे नेत्रदान केले. आम्ही कुटुंबातील सर्वजण देह व अवयवदानाचा संकल्प केला आहे. माझी लहान मुलगी पूजा हिचा आंतरधर्मीय विवाह सत्यशोधक पद्धतीने नुकताच लावून दिला. वर्ध्यातील परिवर्तनवादी विविध संस्था व शेकडो मान्यवरांनी फुले उधळली आणि केवळ पेढा खाऊन नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. जेवण व इतर सर्व अनावश्यक गोष्टी टाळून परंपरेला छेद दिला. माझ्या मुलीच्या लग्नापूर्वी 15 आंतरजातीय विवाह लावून दिले होते. माझा जावईदेखील देव, दैववाद पाळणारा नाही. बुद्धिनिष्ठेने जगायचं, प्रबोधनाचे केवळ शाब्दिक ढोल वाजविण्यात अर्थ नाही. तशी कृतिशीलता दाखवली पाहिजे. ज्या दिवशी गोडधोड शिजवलं जाते, तोच दिवस आमचा दिवाळी-दसरा!

आपल्या कार्याला विरोध झाला का?
माझ्या कार्याला फार टोकाचा विरोध झाला नाही. वडिलांची तेरवी केली नाही, म्हणून नातेवाईक नाराज होते. मुलीचे लग्न जातीबाहेरच्या युवकाशी लावून दिल्याने जात बुडविली, असे टोमणे ऐकायला मिळाले. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देऊनही आले नाहीत. जे नातेवाईक आले ते देखील लग्नाची पद्धत आणि मुलाचे ‘कांबळे’ आडनाव ऐकून नाक मुरडताना दिसले. परंतु सुरकार कुटुंबात मीच सर्वांत मोठा मुलगा असल्यामुळे उघडपणे विरोध झाला नाही. वॉर्डातील काही मंडळी थोडेफार फटकून वागत होती; मात्र गत अनेक वर्षांपासून प्रबोधन करणे हाच माझा श्वास असल्याने घराशेजारची कुटुंबे आत्मियतेनेच वागतात. आपल्या ध्येयाविषयी निष्ठा आणि सर्पमित्र ही ओळखच विरोधाप्रसंगी मदतीला धावून आली. गणेशमूर्ती संकलन करताना सनातन संस्थेच्या व्यक्तींनी माझ्याविरुद्ध भडकविण्याचे काम केले होते. लोकांनीच हा प्रयत्न परतवून लावला. जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भात जागृती करताना बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षाने मला रस्त्यात अडवून धमकावले. परंतु सर्पमित्र म्हणून मला तो अनेक वर्षांपासून ओळखत होता. त्यामुळे विरोधाचे चर्चेत रूपांतर झाले. ‘तू कायद्याचा मसुदा वाचला काय?’ हा प्रश्न मी विचारताच ‘तुमच्याकडे असेल तर आणून द्या,’ अशी मागणी त्याने केली. या घटनेनंतर माझी त्याच्याशी अनेकदा भेट झाली; परंतु या विषयावर तो कधीच बोलला नाही. ‘अ.भा.अंनिस’च्या काही थिल्लर कार्यकर्त्यांकडून मला जो मन:स्ताप सहन करावा लागला, त्याची आठवण मनात अजूनही कायम आहे. मात्र कामातील सातत्य त्यांच्याशी ठेवलेला संवाद यामुळे तेही माझ्या कामाची किंमत करायला लागले. कधी कधी अनावधनाने का होईना, शाबासकीही देऊ लागले. संवादाने, कामाने माणसे बदलतात, हा विश्वास निर्माण झाला.
आपल्या कुटुंबाची साथ या कार्यात कशी मिळते?
पत्नी रजनी व माझ्या स्वाती व पूजा या दोन्ही मुलींनी जात आणि धर्माचा खोटा अभिमान कधीच पाळला नाही. अगदी साध्या पद्धतीने व सदसद्विवेकबुद्धीने जीवन जगायचं हे तत्त्व त्यांच्या जीवनात उतरलं आहे. कुटुंबातील सुख-समाधानाच्या कल्पनांची तुलना इतरांशी न करता आपल्या पद्धतीनं आयुष्य फुलवायचं, संकटं सहन करायची… याच भांडवलामुळे मला कुटुंबाकडून सतत ऊर्जा मिळत आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर, भाई वैद्य, प्रा. सुभाष वारे व अंनिस, राष्ट्रसेवा दलाचे शेकडो कार्यकर्ते माझ्या घरी येऊन गेलेत. त्यांच्याशी चाललेल्या चर्चांचा परिणामही माझ्या कुटुंबावर झाला. केवळ स्वत:च्या कुटुंबापुरते न जगता समाजाच्या हिताकरिता काम करतात. वृत्तपत्रांमधून नाव येते. हे सर्व बघूनच माझी पत्नी व दोन्ही मुली पाठीशी उभ्या झाल्या. सामाजिक चळवळीबद्दल आस्था निर्माण झाली. परिवर्तनाची सुरुवात कुटुंबापासूनच झाल्यामुळे माझ्यातही नैतिक बळ आले. आत्मविश्वास वाढला. शेवटचा श्वास असेपर्यंत चळवळीचे काम सुरूच राहील.

अं.नि.स.मधील विविध कार्याचा अनुभव सांगा? बुवा, भांडाफोड, पुस्तकविक्री, आंदोलने, सर्पविज्ञान
‘महाराष्ट्र अं.नि.स.’चे कार्य सुरू केल्यामुळे चळवळीला गती मिळाली. वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची प्रभावळ निर्माण झाली. वक्ता म्हणून गावखेड्यांमध्ये भाषणांसाठी जाऊ लागलो. ‘महाराष्ट्र अंनिस’कडे वर्षभर उपक्रमांचे नियोजन असल्यामुळे कार्यकर्ते सक्रिय राहतात. उपक्रमशीलता वाढते. केवळ बाबांचा भांडाफोड करणे, प्रबोधन करणे एवढ्यावरच न थांबता समाजामध्ये विधायक उपक्रम कसे रूजतील याचीही माहिती डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्र अंनिसमध्ये आल्यानंतर मी खर्या अर्थाने घडत गेलो. वैचारिक अधिष्ठान मिळाले. बाबांचा भांडाफोड करताना कधी तोंडघशी पडलो नाही. आतापर्यंत सात बाबांचे कारस्थान उघडकीस आणले. पोलिसांचे सहकार्य मिळाल्याने कधी अडचण निर्माण झाली नाही.
पुस्तकं विकण्याचा अनुभव नव्हता. टेलरिंग मटेरियलचा व्यवसाय करत होतो. डॉक्टरांशी संपर्क असल्यामुळे त्यांच्याच सूचनेवरून पुस्तक विक्रीला सुरुवात केली. एकदा दोन्ही हातात पुस्तकांच्या बॅगा घेऊन उसासे टाकत दुसर्या मजल्यावर चढलो. डॉक्टर आणि मंडपे सर तिथे हजर होते. मला बघताच डॉक्टर म्हणाले, ‘तुझी ही अवस्था पाहून माझे जुने दिवस आठवले….’ माझ्यात स्फूर्ती आली. शिक्षकांच्या शिबिरांसाठी पुस्तके घेऊन प्रत्येक ठिकाणी हजर व्हायचो. विदर्भात भटकंती केली. डॉक्टरांचे व्याख्यान झाल्यानंतर पुस्तक घेण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. अक्षरश: पुस्तके माझ्या हातातून हिसकावून पैसे देणारे असंख्य वाचक मला मिळाले. कार्यकारिणीची बैठक असली, तरी पुस्तकांच्या बॅगा माझ्या सोबतीलाच राहायच्या. या व्यवसायामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला. जादूटोणाविरोधी कायदा व्हावा, यासाठी वर्ध्यात स्वत:च्याच गालावर ‘थप्पड मार’ आंदोलन केले. सर्पविज्ञान प्रबोधनाचे 5 हजारपेक्षा जास्त कार्यक्रम केले. त्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन एक प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. आत्तापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक सापांना वाचवू शकलो. सर्पदंश पीडितांना योग्य उपचार व शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून आजही संघर्ष करत आहे. यातून पीडितांना न्याय मिळत असल्यामुळे व्यक्तिगत संकटांची आता मला भीतीच राहिली नाही.
आपल्या आयुष्यातील संघर्षाचे प्रसंग सांगा?
पोटाची खळगी भरण्यासाठीच मला अधिक संघर्ष करावा लागला. चळवळीचं काम करताना तुलनेने असे प्रसंग वाट्याला आले नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरताना ‘सुसंवादातून प्रबोधन’ हे सम्यक सूत्र डोळ्यापुढं ठेवलं होतं. त्यामुळे हिंदुत्ववादी; तसेच अन्य प्रतिगामी संघटनांकडून मला त्रास झाला नाही; ‘अ.भा.अंनिस’च्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत बदनामीपासून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत त्रास दिला, हा प्रकार मला प्रचंड वेदना देणारा होता. त्यातून मी सावरलो. मुलीचा आंतरधर्मीय विवाह लावून देतानाही संघर्ष झाला नाही. कारण सुरकार आणि कांबळे कुटुंबियांमध्ये समन्वय होता. माझ्यासमोर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा आदर्श असल्याने कटुतेच्या विषवल्लींवर सत्यशोधक पद्धतीने नांगर फिरविला….

मागे वळून पाहताना आपणास काय वाटते?
वर्धा शहरात 180 रुपये घेऊन आलो. शिक्षण अर्धवट होते, ते पूर्ण केलं. टेलरिंग व्यवसायाचे साहित्य विकताना बर्यापैकी माणसं जोडण्याचं कौशल्य मिळविलं होतं. कुटुंब प्रमुखाच्या जबाबदार्या पेलवत असतानाच चळवळीकडे आलो. चळवळीची पार्श्वभूमी कुटुंबाला नव्हतीच; मात्र प्रारंभीचे संस्कार उपयोगात आले. संविधान संस्कृतीबद्दल आस्था वाढली. सर्पमित्र म्हणून ओळख मिळाल्याने मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकांचे अधिक-उणे समजून घेता आले. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी माझ्या सर्व उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी दिली. प्रसंगी चुकाही लक्षात आणून दिल्या. वंचितांच्या कल्याणासाठी झटणार्या परिवर्तनवादी संघटनांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सहर्ष पाठिंबा मिळाला. कुटुंबाचा गाडा रेटताना मी जखमी झालो, तर शेकडो संस्था, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ताही मदतीला धावून येऊ शकतो. चळवळीत नसतो, तर फाटक्या आयुष्याला ठिगळं लावत माझ्या अस्तित्वाचं विसर्जन झालं असतं. मला सर्पदंश झाल्यानंतर शहरातील औषध विक्रेत्यांनी 12 व्हॉयरल गोळा करून रुग्णालयात मोफत आणून दिल्या. डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची सावली सोबत असल्यामुळेच उन्हाची सवय झाली. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब विवेकवादी झालोत. यापेक्षा आयुष्यातील सुखार्थ कोणता?
गजेंद्र सुरकार, वर्धा संपर्क : 9822219100
-मुलाखतकार, शब्दांकन : राजेश मडावी मोबा. 8380097991