‘कुंकू आणि नवर्याचा किंवा मंगळसूत्र आणि लग्नाचा काहीही संबंध नाही. नवरा मेल्यानंतर कुंकू न लावणे आणि मंगळसूत्र न घालणे याला कोणताही आधार नाही. त्यामुळे नवरा मेल्यानंतरही मनाची आणि मेंदूची कवाडे उघडी ठेवून उत्स्फूर्तपणे निर्णय घेऊन महिलांनी जीवनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका आणि रूढी, परंपरांच्या अभ्यासिका डॉ.तारा भवाळकर यांनी केले. सांगलीत विधवा जागृती संमेलन आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सौभाग्याचे लेणे म्हणून विधवा महिलांना कुंकू लावून गळ्यात मणीमंगळसूत्र बांधण्यात आले.
आटपाडीच्या लताताई बोराडे यांच्या पतीचे लग्नानंतर अवघ्या पंचविसाव्या दिवशीच निधन झाले. संसाराच्या उंबरठ्यावर विधवापण आल्याने त्या खचून गेल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्या सध्या शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहेत. त्यांनी अलिकडे विधवा महिला विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून विधवा महिलांसाठी काम सुरू केले आहे. त्यांनी नीता केळकर यांच्याकडे आम्हाला सुवाशिनीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. असा दर्जा कसा द्यायचा, असा प्रश्न पडल्यानंतर या अनोख्या उपक्रमाचा जन्म झाला. यावेळी बोराडे यांना सर्वांसमक्ष सौभाग्याचे लेणं देण्याचे ठरले. त्यामुळे या कार्यक्रमाला येताना बोराडे आपला लग्नातील हिरवा शालू नेसूनच आल्या. त्यांना कुंकू लावण्यात आले. मणीमंगळसूत्र, पायातील जोडवी देण्यात आली.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, आपला सर्वांत जवळचा साथीदार म्हणजे मन असते. आपल्यात उत्स्फूर्तपणे निर्णय घेण्याची ताकद असते. मनाची आणि मेंदूची कवाडे उघडी ठेवून निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागून जीवनाचा आनंद घ्यायला कोणाचीच हरकत असायचे कारण नाही. कोण काय म्हणतेय, याची अजिबात पर्वा करू नका. केवळ दुसर्याला आपल्या वागण्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. जे कुंकू आपण लहानपणापासून लावतोय, ते पतीनिधनानंतर पुसायचे कारण नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करण्याची गरज नाही. कपाळावरच्या लाल ठिपक्याने आणि गळ्यातल्या काळ्या मण्यांच्या माळेने थोडसं महिलेचे संरक्षण होत असेल तर करायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.