मी आपल्या पुढे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्यातील विस्ताराच्या आणि संकल्पाच्या काही बाबींची नोंद ठेवणार आहे. मागील महिन्यात आम्ही इंदौर (मध्यप्रदेश), धारवाड (कर्नाटक), दिल्ली आणि जयपूर (राजस्थान) येथे जाऊन आलो. अर्थातच निमंत्रणावरून जाहीर व्याख्याने, निषेध फेर्या, उद्घाटन व सादरीकरण कार्यक्रम आणि प्रशिक्षणासाठी. त्याशिवाय हरियाणा, पंजाबमधल्या भेटी, मुलाखतींच्या अभ्यास दौर्याचा वृत्तांत वेगळा आहे.
कबीर जन मंचच्या वतीने डॉ. सुरेश पटेल सतत संपर्कात आहेत. त्यांनी पाठपुरावा करून मध्य प्रदेश राज्याच्या इंदौर व परिसरातील गावांमधुन अनेकदा आपले कार्यक्रम गेल्या दोन वर्षांत आयोजित केले आहेत. आता कर्नाटकात देखिल बेळगांव नंतर धारवाड, बंगलोरसह इतर काही ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करू इच्छिणारे संपर्कात आहेत. जयपूरमध्ये तर राजस्थान राज्यभरातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटीत काम सुरू करण्यासाठी नुकतेच प्रशिक्षणाचे आयोजन केले गेले. उपेंद्र शंकर नामक समाजवादी विचारधारेतील मित्रांनी पाठपुरावा करून आग्रहाने दौरा करायला लावला. राजस्थानमधील 5, 6 जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटनांच्या सहकार्याने शिबीर व कार्यक्रम घेतले. त्यामुळे आता तिथे पार्श्वभूमी तयार झाली आहे. तसेच दिल्ली मधे देखिल मागणीनुसार सतत जाऊन शाळा, कॉलेज, संस्थांसोबतच्या कार्यक्रमांमुळे सोबत काम करणार्यांची यादी तयार आहे. त्यामुळे पुढील काही काळात महाराष्ट्राच्या लगतच्या राज्यांमधून आणि दक्षिण, ईशान्य भारतातील काही राज्यांमधील संपर्कासह आपण उत्तर भारतातील हिंदी भाषिक भागातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्याची रूजवात करू शकणार आहोत.
दिल्लीतील पाच दिवसीय कालावधीत आम्ही दलित संघटनांच्या पुढाकाराने झालेल्या निषेधात सहभागी झालो होतो. अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात झालेल्या जंतर मंतर येथील सभेत अनेक राज्यातून बर्याच पक्ष संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेसमर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर स्टुडिओ सफरमध्ये आपण ‘विवेक फिल्म’ स्पर्धेतील निवडक 11 फिल्मस्चे सादरीकरण ठेवले होते. नागराज मंजुळेंच्या आटपाट फिल्मस् आणि महाराष्ट्र अंनिस, सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या वतीने आयोजित विवेक फिल्म स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसर्या स्मृती दिनानिमित्त आयोजित उपक्रमांतील निवडक फिल्मस्च्या सादरीकरणाचे अभियान आपण दिल्लीतील सडक नाट्य चळवळीचे शहीद सफदर हाशमींच्या स्मृती जागविणार्या स्टुडीओ सफदर मधुन सुरू केले आहे. ते आता महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विविध ठिकाणी मागणी नुसार घेऊन जायचे आहे. तसेच 1 नोव्हेंबरला शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जयंती दिनानिमित्त ‘विवेक जागर दिन’ म्हणून समितीच्या प्रत्येक शाखेत कार्यकर्ते, कुटुंबिय, समविचारी आणि नवीन इच्छुकांसाठी देखील ‘विवेक फिल्म महोत्सव’ आयोजित करावयाचा आहे.
‘डब्ल्यु डॉट डब्ल्यु डॉट डब्ल्यु डॉट अॅन्टी सुपरस्टिशन डॉट ओआरजी’ ही समितीची इंग्रजीतील वेबसाईट पुढाकार घेऊन आपले सहकारी दिपक गिरमे (पुणे) यांनी 15 वर्षांपूर्वी तयार केली होती. प्रायोगिकतेच्या उत्साहातून सुरू झालेला त्याचा प्रवास आता व्यावहारिकतेच्या काटेकोरपणाकडे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी इंग्रजीसह हिंदी (महाअंनिस डॉट कॉम) आणि मराठी (महाअंनिस डॉट ओआरजी) ह्या तीनही संकेत स्थळ (वेब साईट) उद्घाटन भारतातील जेष्ठ वैज्ञानिक व शैक्षणिक मार्गदर्शक प्रोफेसर यश पाल यांच्या हस्ते दिल्लीत केले गेले. जेष्ठ सर्वोदयी डॉ. एन. सुब्बाराव आणि महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक दयानंद कांबळे याप्रसंगी सहभागी होते. चळवळीचे मित्र मॅग्नम ओपसचे गिरीश लाड यांनी हिंदी, मराठी वेब साईट बनवायला मदत दिली आहे.
मदर तेरेसांना संतपद बहाल करण्याचा कार्यक्रम 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान रोमन कॅथोलिक ख्रिश्चनांचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकन सिटीत झाला. नोबेल व भारत रत्न सारखे सर्वोच्च सन्मान मिळालेल्या मदर तेरेसांना तुमच्या धर्माची मान्यता म्हणून ‘संत’ पद द्यायचे असेल तर जरुर द्या, पण त्यासाठी दोन चमत्कार त्यांनी केल्याचा संत पदाचा निकष रद्द करा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिस 2003, 2009 सालापासून करीत आली आहे. गॅलीलिओला केलेल्या शिक्षेबद्दल 400 वर्षांनंतर जगाची माफी मागणार्या व्हॅटिकन सिटीचे धर्मगुरू पोप यांनी ख्रिश्चन कॅथोलिक धर्माला कालसुसंगत ठेवण्यासाठी मदर तेरेसांना संत पद बहाल करताना दोन चमत्कार केल्याचा निकष लावला तर ह्या चमत्कारांचा दावा सिद्ध करा असे आव्हान आम्ही दिल्लीतील पत्रकार परिषदेत जाहीर केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 ऑक्टोबरला जाणार असल्याबद्दल देखिल आम्ही त्यांचा तीव्र निषेध जाहीर केला. जिल्हा परिषदेत ग्राम सेवक म्हणून कार्यरत असताना गैरव्यवहाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या नरेंद्र सुर्वेनामक व्यक्तिचा नंतर अनेक प्रकारच्या चमत्कारांचा दावा करणार्या नरेंद्र महाराजात रूपांतर होते. एन.डी. पाटील, डॉ. लागू, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हात पाय तोडा असे जाहीर बोलणारा आणि राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्तेव पत्रकारांबद्दल शिवीगाळाचे प्रवचन करणारा माणूस कसे काय धार्मिक, आध्यात्मिक जगद्गुरू असू शकतो असा सवाल आम्ही गेली 20 वर्षे महाराष्ट्रात सतत विचारतो आहोत. त्याबदल्यात महाराष्ट्र अंनिस च्या कार्यकर्त्यांना आपल्या अनुयायांकडून मारहाण करण्याला चिथावणी देण्याचे काम नरेंद्र महाराजांनी केले आहे. अशा भोंदूगिरी, बदमाशी करणार्या व्यक्तिच्या कार्यक्रमाला देशाच्या संविधानाची आणि त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनासारख्या नागरिकत्वाच्या कर्तव्याची जबाबदारी सांभाळणार्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील व्यक्ती असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊ नये असे आवाहन लेखी पत्र देऊन आम्ही केले आहे. त्याचा विरोध व्यक्त करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर यायचे काय? याचाही विचार आम्हाला करावा लागेल.
याचा अर्थ विवेकाचा आवाज द्विगुणीत करण्याच्या प्रयत्नांची वाट इतकी सुकर नाही, याची आम्हाला जाणीव आहे. पण इतिहासात अंतिम विजय विवेकी विचार आणि व्यवहाराचाच झालेला आहे हे देखील आपल्याला माहीत आहेच की !
अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस