प्राचार्य सविता शेटे. बीडच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य. ‘मअंनिस’च्या माध्यमातून महिला विभागापासून राष्ट्रीय अनुसंधान विभागापर्यंत वेगवेगळ्या विभागात, सामान्य कार्यकर्ता ते राज्य कार्यवाह अशा वेगवेगळ्या पदावर काम केलेले व्यक्तिमत्त्व. परंपरा, रूढी आणि महिलांचं दुय्यमत्व नाकारण्यापासून ते पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्यासाठी जागृती करणार्या प्रचारक; प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवरचे टीकेचेच नव्हे, तर हिंसेचे हल्लेही सहन करणार्या कणखर आंदोलक अन् अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही जगणं समृध्द करण्यासाठी आहे या ठाम विचाराने ‘मअंनिस’ ला जगण्याचा अविभाज्य भाग बनविणार्या समर्पित; पण विवेकी कार्यकर्त्या. ‘प्रजापत्र’ दैनिकाचे संपादक सुनील क्षीरसागर यांनी अंधश्रद्धां निर्मूलन वार्तापत्रासाठी त्यांच्याशी संवाद साधत अंधश्रद्धां निर्मूलनाची चळवळ, श्रद्धां–अंधश्रद्धां–विवेकवाद अन् समाजनिर्मिती या बहुआयामी प्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत.
आपल्या कुटुंबाची सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमी काय होती? कर्मकांड अथवा विधी, प्रथा यांना कितपत स्थान होते?
माझं मूळ गाव औसा. वडील प्राथमिक शिक्षक. आई गृहिणी. आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ. तसं धार्मिक म्हणता येईल असंच आमचं कुटुंब. परंपरांचा फारसा पगडा म्हणता येईल, असं नाही; पण परंपरेने चालत येणार्या गोष्टी जसं की पारंपरिक पूजा-अर्चा, सणवार हे घरात चालायचं. शिक्षणाबाबत मात्र घरात प्रचंड जागरूकता होती. आम्ही चार बहिणी आणि भाऊ उच्चविद्याविभूषित होऊ याकडेच कुटुंबाचा कल होता. वडिलांना त्याकाळी राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता. वडील शिक्षक असल्याने त्यांना समाजात मान होता. त्यांची वेगळी प्रतिमा होती. शेटे गुरुजी हीच त्यांची ओळख होती. त्यांच्या या प्रतिमेचा आम्हाला मोठा फायदा झाला. समाजात वावरताना, शिक्षण घेत असताना एक आदर्श शिक्षक म्हणून असलेली त्यांची प्रतिमा आम्हाला जबाबदारीची जाणीव करून द्यायची. माझी आई उत्तम गृहिणी. शिक्षण चौथी असले, तरीही गृहकर्तव्यदक्ष अशीच तिची ओळख करून देता येईल. अशा कुटुंबात मी वाढले. औसासारख्या गावात असलेलं हे कुटुंब. त्या काळात आमच्या कुटुंबात कर्मकांड अथवा विधी यांना बर्यापैकी स्थान होतं. सगळे सणवार पूजा-अर्चा, व्रतवैकल्य धार्मिक गोष्टी घरात घडायच्या. हे मी लहानपणापासून अनुभवलंय, पाहत आली आहे. गमतीची गोष्ट म्हणजे लहानपणी मी या गोष्टीही केल्या आहेत. लिंगपूजा करणे, ‘शिवलिलामृत’चा अकरावा अध्याय वाचणे, सोमवारचे श्रावणी उपवास करणे, हरितलिकेची पूजा करणे इत्यादी गोष्टी मी केल्या आहेत. आई आणि इतरांवर या सर्व गोष्टींचा मोठा पगडा होता आणि आजही समाजात महिलांवर अशा सर्व गोष्टींचा पगडा जास्त जाणवतो.
शिक्षणाचा या सर्व गोष्टींवर काय परिणाम झाला?
निश्चितच. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोष्टी कळणं सोपं गेलं. मी लहान असताना मला कधी हे जे काही चालू आहे, ते वाईट आहे, चुकीचं आहे, असं कळत नव्हतं. शिक्षणातूनही तसं काही शिकवलं जात नव्हतं. कुटुंबात पारंपरिक वातावरण असल्याने हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर नाही, असं कधी कोणी सांगितलं नाही. मी जेव्हा शिक्षणासाठी बाहेर पडले तिथून पुढे हे कळायला लागलं. दहावी, बारावीपर्यंत या सर्व गोष्टीत काही वेगळं आहे असं वाटत नव्हतं, कोणी सांगितलं नव्हतं किंवा तसा विचारही केला नव्हता. घरात परंपरेने हे सर्व चालत येत होतं. समाजातही हे परंपरेने चालायचं त्यामुळं त्याला कोणतं वेगळं स्वरूप किंवा वैचारिकता देण्याचा विषय किमान दहावी, बारावीपर्यंत नव्हता. नंतर मात्र जसं शिक्षणासाठी बाहेर पडले, अनेक गोष्टींवर विचार करायला लागले, त्यातून काय बरोबर, काय चूक, याबद्दल माझी स्वत:ची मतं तयार व्हायला लागली. ती मतं मी मांडायला लागले. तिथूनच मी माझी भूमिका मांडत गेले. माझ्या पुढील शिक्षणाचा माझ्या वैचारिकतेवर निश्चित परिणाम झाला.
असं म्हटलं जातं की, श्रद्धां आणि अंधश्रद्धां यातील सीमारेषा पुसट असते. श्रद्धां आणि अंधश्रध्देच्या आपल्या संकल्पना कशा आणि कधी स्पष्ट होत गेल्या?
तेच आता सांगितलं. लहानपणी तसा श्रद्धां, अंधश्रद्धां या कोणत्याच गोष्टीचा फारसा संबंध नव्हता. कौटुंबिक वातावरणातही त्याचा अभाव होता. दहावीपर्यंत तर हे काही कळतच नव्हतं. मी एका सामान्य कुटुंबातील सामान्य मुलगी होते. बारावीनंतर मात्र हळूहळू काही गोष्टी कळायला लागल्या. बी.एस्सी. होमसायन्सला प्रवेश घेतला. त्यातून बाहेरच्या जगात ‘एक्सपोजर’ मिळालं आणि त्यातून अनेक गोष्टी कळत गेल्या. श्रद्धां आणि अंधश्रद्धां यांच्यातल्या पुसटशा रेषा जाणवायला लागल्या. त्याच काळात चळवळीतल्या लोकांचा परिचय झाला. त्यांच्याशी भेटणं, त्यांना ऐकणं, वैचारिक भाषणं ऐकणं, यातून विचारांची मेजवानी मिळत गेली आणि काय चूक, काय बरोबर, आपण जे वागतोय किंवा घरातलं जे वातावरण आहे, समाजात जे दिसतंय ते नेमकं काय आहे, हे कळत गेलं. खरंतर बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. करताना रोजच परीक्षा असंच रोजच चित्र असायचं. त्यामुळे इतर गोष्टींना वाव मिळायचा नाही. आज मात्र शिक्षण बहुआयामी होऊ लागलं आहे. विद्यार्थ्यांना ‘एक्सपोजर’ देणारं होऊ लागलं आहे. मी शिक्षण घेताना तसं वातावरण नव्हतं. मात्र मला हळूहळू काय चूक, काय बरोबर याचं सामाजिक भान येऊ लागलं होतं. महिलांना निम्न दर्जा देणार्या, दुय्यमत्व लादणार्या गोष्टींना मी लहानपणापासूनच विरोध करायची. पुढे दाभोलकर सरांच्या संपर्कात आल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होत गेल्या. तशी चळवळीत कार्यकर्ता म्हणून मी 2000 साली आले. मात्र 90-91 पासूनच या सर्व बाबींशी संबंध यायला सुरुवात झाली होती आणि यातूनच हळूहळू अनेक संकल्पना स्पष्ट होत गेल्या.
आपण अंधश्रद्धां निर्मूलन समितीकडे कधी वळलात? यामागे कुठला एखादा प्रसंग किंवा परिस्थिती होती का? कोणाचा प्रभाव होता का?
माझ्या बाबतीत असा कुठला प्रसंग घडला आणि मी या चळवळीकडे वळले, असं झालं नाही किंवा परिस्थितीमुळे या चळवळीत ओढली गेले, असंही नाही. मुळात शिक्षण घेत असताना, शिक्षणासाठी बाहेर राहात असताना वेगवेगळी चर्चासत्रं, वेगवेगळी व्याख्यानं यातून श्रद्धां-अंधश्रद्धां हे कळू लागलं होतं. समाजात जे काही चालतं, त्यात परिवर्तन होणं गरजेचं आहे, हे समजत होतं. त्यातच माधव बावगे संपर्कात आल्यानंतर त्यांच्याकडून ‘मअंनिस’बद्दल खूप काही ऐकलं आणि त्यातून उत्सुकता वाढत गेली. मग ते जे काही करतात ते छान आहे, वेगळं आहे असं वाटत गेलं. त्यातच लातूरमध्ये डॉ. दाभोलकर सरांचं व्याख्यान ऐकलं. त्यांची वैचारिक भूमिका पटली आणि या भूमिकेवर काम करण्याची गरज आहे हेही प्रकर्षाने पटलं. ते काम आपणही केलं पाहिजे, मला ते करता येईल, असं वाटलं आणि यातून मी या चळवळीकडे ओढली गेले.
अंनिसमधील आपला प्रवास कसा झाला?
जगणं समृद्ध करणारा छान प्रवास चालू आहे. मला हे काम आवडतं, मनापासून आवडतं आणि म्हणूनच या कामात मी सुरुवातीला ओढली गेले आणि नंतर झोकून दिलं. 1990-91 पासून मी संपर्कात होते. त्यावेळी वाचन, वेगवेगळ्या परिषदांना उपस्थित राहून ऐकणं, विचार करणं अशी कामं व्हायची; मात्र अंनिसच्या निकषाप्रमाणे 2000 सालापासून मी कार्यकर्ती म्हणून कामाला सुरुवात केली. बीड शहर शाखा कॉ. नामदेव चव्हाण, सुनील क्षीरसागर यांच्या सहकार्याने सुरू केली. कार्याध्यक्ष म्हणून मी सुरुवातीला काम केलं. तीन वर्षांतच मला राज्य कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली. महिला सहभाग विभागात, राष्ट्रीय अनुसंधान विभागात काम करता आलं. महिला सहभाग विभागाची राज्य कार्यवाह म्हणून मी काम केलं. राष्ट्रीय अनुसंधान विभागाची राज्य कार्यवाह म्हणून सध्या मी कार्यरत आहे.

ही पदं एकवेळ बाजूला ठेवूयात. मुळात कोणत्याही पदापेक्षा आम्ही सारेच अगदी डॉ. दाभोलकरही एक कार्यकर्ता म्हणूनच साध्या पध्दतीने काम करत आलो. डॉ. दाभोलकर खरे तर एवढ्या मोठ्या उंचीचे, चळवळीची सुरुवात करणारे, ही चळवळ वाढविणारे; पण आमच्या सोबत काम करताना अत्यंत साध्या पध्दतीने एक कार्यकर्ता म्हणून ते काम करायचे आणि तेच आम्हाला करता आलं. विशेष म्हणजे ‘मंअनिस’ मध्ये काम करताना खूप वेगळ्या विषयावर व्यक्त होता आलं, काम करता आलं. पर्यावरण, कर्मकांड, वैज्ञानिक जाणिवा या विषयांवर काम करताना अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये जाता आलं. तरुणांशी संवाद साधता आला. विविध स्तरातील महिलांशी बोलता आले. हे सर्व करताना अत्यंत छान वाटतं, मजा येते. आपण हे जे काही करतोय ते लोकांना भावतंय. लोक ते उचलून धरताहेत, असंही जाणवलं. ते माझे अनुभव आहेत. हे सर्व करताना काही त्रास देणार्या गोष्टीही घडल्या मात्र त्यातूनही आत्मविश्वास वाढला आणि जगण्याची, विचारासाठी संघर्ष करण्याची एक नवी प्रेरणा मिळाली. या सर्व गोष्टींचा आनंदच वाटतो. ‘मअंनिस’मधील हा प्रवास जगण्याचं बळ देणारा आहे.
प्रवाहाच्या विरोधात चालायचं म्हटलं की त्याचा त्रास होतो. आपल्याला असे काही अनुभव आले का?
होय, मलाही असे काही अनुभव आले आहेत. कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर सुरुवातीला समाजातून त्याला विरोध होतच असतो. हे माझ्याच बाबतीत घडतं असं नाही, तर सर्वांच्याच बाबतीत हे घडत असतं. एखादा नवा विचार, एखादी नवी संकल्पना समाज सहज स्वीकारत नाही. जी चाकोरी पडलेली असते, त्या चाकोरीबाहेर जायचं असेल तर विरोध होत असतो. यात वेगळं काहीच नाही. आपला इतिहास हेच सांगतोय. मग शिक्षणाचं काम करताना फुले-शाहूंना आलेले अनुभव असतील किंवा आगरकरांना आलेले अनुभव असतील. अगदी अंधश्रद्धांविरोधी चळवळीत काम करताना स्वत: दाभोलकरांना आलेले अनुभव असतील. विरोध हा होतच असतो. तो कालही होता, आजही आहे, उद्याही होत राहणार म्हणून हे काम थांबवायचं नसतं. थांबवायचं नाही. आपल्या उच्च कृतीतून जी माणसं खूप मोठी झाली. त्यांचं चरित्र पाहिलं तर त्यांनी खूप मोठा विरोध पत्करला हे स्पष्ट होतं. त्यामुळे लहानमोठ्या प्रसंगांचा परिणाम माझ्यावर झाला नाही, होत नाही.
एखादी संकल्पना, एखादा विचार रूजवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागते. मग रूढी परंपरा नाकारण्याचा आपला प्रवास कधी सुरू झाला?
मुलगी म्हणून भेदभाव करणार्या परंपरांना मी लहानपणापासून विरोध करत होते. अंधश्रध्देला विरोध मात्र त्यानंतरचा. स्त्री म्हणून, मुलगी म्हणून होणारा भेदभाव, तू मुलगी आहेस म्हणून तू असं केलं पाहिजेस, हे केलं नाही पाहिजे, या गोष्टींना मी सुरुवातीपासून नाकारलं. तसा माझ्या घरात मुला-मुलींमध्ये कधीच कसलाच भेद नव्हता. आम्ही ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा प्रकल्प आत्ता राबवतोय. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी ते खूप पूर्वी केलं. काहींना हे प्रातिनिधिक वाटतं; पण मला तसं वाटत नाही. स्त्रीच्या सन्मानाला ठेच पोचविणार्या गोष्टी; मग ते मुलगी पाहणं असेल, दहा-पाच लोकांनी तिला प्रश्न विचारणं असेल, कुठं चालायला दाखवणं असेल, कधी मुलानं विचारणं आणि तिनं सांगत राहणं, हे थांबायला हवं. जोडीदाराची निवड अत्यंत विवेकाने, समपातळीवर, सन्मान राखून व्हायला हवी. हे माझं मत होतं आणि वरच्या सर्व गोष्टी मी नाकारल्यात. हुंडा न देणे, लग्नात कुठल्याही विधींना स्थान न देणे, अगदी नोंदणी पध्दतीने आम्ही विवाह केला. मुलगी पाहणे किंवा तसे इतर कोणतेही प्रकार होऊ दिले नाहीत. घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता; पण तो समाजात असं चालत नाही, लोकं नावं ठेवतील यासाठी नव्हता, तर या सर्व गोष्टीमुळे माझ्या लग्नाला उशीर होईल. केवळ माझ्या अटींमुळे वेळेत लग्न होणार नाही, या जाणिवेने होता आणि खरोखरच त्या काळाच्या तुलनेत माझ्या लग्नाला उशीर झाला होता. कुंडली पाहून किंवा हस्तरेषा पाहून लग्न ठरवायला मी नकार देत होते. लग्न करायचंय, जोडीदार निवडायचाय म्हणजे सहजीवनाच्या किमान गोष्टींची माझी अपेक्षा होती आणि विशेष म्हणजे घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला तरी त्यांनी त्यांचा विरोध माझ्यावर लादला नाही. आणि म्हणून मी विजयची निवड केली. विवाहानंतरही मी प्रथा, परंपरा, देवाशी निगडित कर्मकांड, व्रतवैकल्ये याला मी त्यामागची भूमिका, वैज्ञानिक कारणे सांगून विरोध करत गेले.

एक स्त्री म्हणून हे सर्व करताना, रूढी, परंपरा नाकारताना तेव्हाची कुटुंबाची सामाजिक प्रतिक्रिया काय होती?
अर्थातच सुरुवातीला विरोध झाला; पण कुटुंबाने त्यांच्या कधी गोष्टी माझ्यावर लादल्या नाहीत. आमची मतं जुळत नव्हती. म्हणून त्यांनी सहमत व्हायचा प्रयत्न केला. धार्मिक बाबतीत मी अनेक गोष्टी नाकारल्या; पण तरीही मी असंच केलं पाहिजे, असा हट्ट त्यांनी कधी केला नाही. आजही माझ्या अनेक गोष्टी त्यांना पटत नाहीत. ते प्रतिक्रिया देतात; पण लादत नाहीत. सुरुवातीला घरातून प्रथमदर्शनी असलेला विरोध नंतर मावळत गेला. मी माझ्या मुद्द्यावर, भूमिकेवर, विचारावर ठाम असल्याने नंतर सासरीही फारसा विरोध झाला नाही. जे माझ्या विवेकबुध्दीला पटलं नाही, ते मी केलं नाही. समाजात कोणी थेट समोर येऊन फारसा विरोध केला नाही. थोड्याबहुत चर्चा होतात; पण मी आणि माझे कुटुंबिय त्याला फारसं मनावर न घेता विवेकबुध्दीवर काम करत गेलो. समाज असेल, कुटुंब असेल, दोन्ही बाजूने हीच भूमिका कायम राहिली.
रुढी–पंरपरांना विरोध करत असताना, त्याची सामाजिक प्रतिक्रिया उमटत असताना कधीतरी आपण हे सर्व का करतोय? किंवा आपणच हे केलंच पाहिजे का? असं कधी वाटलं का? त्यातून बाहेर कशा पडलात?
मी जे काही करत आहे किंवा जी काही वैचारिक भूमिका म्हणून निर्णय घेतला आहे, तो माझ्या विवेकी मनाला पटला म्हणून घेतला आहे. त्यामुळे हे मीच का करतेय किंवा थांबलं पाहिजे का, असं कधीच वाटलं नाही.
या सर्व प्रक्रियेत कुटुंबियांचे आई–वडिल–पती–मुलगा यांचे सहकार्य कसे होते?
अगदीच उत्तम. या सर्वांचे उत्तम सहकार्य होते म्हणूनच मी काम करू शकले. संपूर्ण पाठिंबा होता. हे सहकार्य नसतं, तर आज मी जिथं आहे तिथं कधीच पोचलेच नसते. माझे वडील प्राथमिक शिक्षक. शिक्षणाबाबत त्यांच्या जाणिवा स्पष्ट होत्या. त्या काळात औसासारख्या गावातून मुलीला दुसर्या गावात हॉस्टेलवर ठेवून शिकविण्याची हिंमत त्यांनी दाखविली. अगदी कर्नाटकातल्या धारवाडमध्ये जाऊन मी शिक्षण घेतले. लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे प्रोत्साहन आणि प्रेरणा त्यांनी दिली आणि तेथूनच मी घडत आले. शिक्षण, नोकरी, विवाहाचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच त्यांनी दिले असे नाही, तर माझ्या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा आणि ते पूर्ण करण्याची मदत त्यांनी दिली. चळवळीत कामाला लागले आणि त्यावेळीही आणि नंतरही माझ्या भूमिकांसोबत राहण्याचे काम त्यांनी केले. मला जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे विजयची निवड केली. विजयसोबतची वाटचाल अत्यंत आनंदाची राहिली आहे. माझा जोडीदार (विजय) आणि सर्वच सासरची माणसं यांनी मला अपेक्षित स्पेस दिली. विजय आणि चिन्मय (मुलगा) यांनी सर्व प्रकारचं सहकार्य दिलं. अनेकदा काही वेगळे प्रसंग घडले, हल्ले झाले. त्या काळातही या सर्वांनी सहकार्य केलं. अगदी चिन्मयवरही लहानपणापासून हे संस्कार आम्ही रूजविले. ‘मअंनिस’चं कोणतंही कुठल्याही प्रकारचं काम करताना त्यांनी आडकाठी आणली नाही. घरातल्या कौटुंबिक जबाबदारीत मी अडकून पडले नाही, पडावं लागलं नाही आणि म्हणूनच मला हे काम करता आलं. विजयबद्दल बोलायचं तर त्यांनी सुरूवातीलाच मागे राहून पाठिंबा दिला, मदत केली आणि नंतर आता तो देखील सक्रिय झाला आहे. आज बीड शाखेचा तो कार्याध्यक्ष आहे. माझं सारं कुटुंब या चळवळीशी जोडलं गेलं आहे.
‘मअंनिस’च्या माध्यमातून आपण कोणत्या स्वरुपाची आंदोलनं केली?
या चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलने आणि उपक्रम राबविता आले. बीडमध्ये सुरुवातीला गडगे महाराज नावाचा एक भोंदू बाबा होता. त्याचा आम्ही भांडाफोड केला. भांडाफोड होताच तो पळून गेला. त्यानंतर त्याच्या अटकेसाठीची आंदोलने आम्ही केली. कलकी महाराजांचे कारनामे उघड करण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला, त्यात पोलिसांची चांगली मदत झाली. ‘मअंनिस’ला ज्या-ज्यावेळी जी-जी आंदोलने अपेक्षित होती, ती-ती आंदोलनं उभी केली. कायद्यासंदर्भातील आंदोलनं उभी केली. डॉक्टर असतानाच्या त्यांच्या संपूर्ण संघर्षात साथ देत वेगवेगळी आंदोलनं उभी केली, शनीशिंगणापूर येथे चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सत्याग्रह, सत्यसाई बाबा, नरेंद्र महाराज विरोधात धरणे, विवाहपूर्व एचआयव्ही चाचणी सक्तीची करणे याबाबत सह्यांचे निवेदन, जादूटोणाविरोधी कायदा करावा, यासाठी धरणं दिली, रक्ताने सह्या करण्याची आंदोलनं राबविली, काळ्या फिती लावून आंदोलनं राबविली, महिलांशी निगडित कामंही मोठ्या प्रमाणावर करता आली. अंधश्रद्धांंमुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते, ते थांबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मोर्चे, समविचारी संघटनांचे कार्यक्रम यात सक्रिय सहभाग घेतला. नंतर कायदा होण्यासाठी आणि आता डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास यासाठी सतत आंदोलन चालू आहे.

समाजात सण, उत्सव, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद या संदर्भात नवी संकल्पना, नवा विचार देताना, रूजविताना त्यांची नेमकी प्रक्रिया काय असते?
मी स्वत: शिक्षिका आहे. प्राचार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी, तरुणांशी माझा संबंध नेहमीच येतो. आणि नवे विचार किंवा नव्या संकल्पना वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविताना वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जातात. अगदी स्वत:च्या घरापासून सुरुवात केली जाते. प्रत्येक कार्यक्रमातून विवेकी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचा प्रयत्न केला. मी प्राचार्य असल्याने मला विद्यापीठात चांगला ‘अॅक्सेस’ आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयांतून पोचता आले. त्यातून पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविता आले. फटाकेविरहीत दिवाळी, पर्यावरणपूरक होळी, पर्यावरणीय गणेशोत्सव, सर्पविज्ञान हे चार प्रमुख कार्यक्रम आम्ही राज्यभर राबविले. राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयात यासाठी जाता आले. लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत हा विचार पोचविता आला. व्याख्यानं, चित्रफितींची प्रदर्शनं, सीडी दाखविणं या माध्यमातून हे विषय पोचविता आले. या सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, याचा आनंद वाटतो. विद्यार्थ्यांसाठी विवेकवाहिनी. विवेकवाहिनीचे संघटन 2002 मध्ये चालविले गेले. ‘माझा विकास माझ्या हाती, हक्क हवेत; पण कर्तव्य आधी’ हा डॉ. दाभोलकरांचा विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन युवकांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करता आला. शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोचता आले. मी गेली तीन वर्षांपासून ‘नॅक’ बेंगलोरच्या पीअर टीमवर काम करते. तेव्हा देशातील, विविध राज्यातील अनेक महाविद्यालयांना पीअर टीम सदस्य, समन्वयक सदस्य म्हणून भेटी देण्याचा योग आला. तिथेही मी जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचा उपयोग व विकास यावर विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी बोलते; प्रसंगी अहवालातही शिफारस करते.

‘मअंनिस’मध्ये वेगवेगळ्या विभागात काम करताना आपले अनुभव काय आहेत?
अत्यंत छान आहेत. काहीतरी वेगळं शिकविणारे, शिकायला देणारे आहेत. विभागात राज्य सहकार्यवाह आणि राज्य कार्यवाह म्हणून काम करताना वेगवेगळे अनुभव आले. एक वेगळंच वास्तव समोर आलं. अंधश्रद्धांंचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहेत. खर्या अर्थाने त्याच अंधश्रद्धांंच्या वाहक असतात हे लक्षात घेऊन मग आम्ही त्या दृष्टीने काम केलं. त्यासाठीची संवाद यात्रा असेल. लातूरमध्ये घेतलेली महिला जाहीरनामा संकल्प परिषद असेल. वेगवेगळ्या महाविद्यालयात झालेले कार्यक्रम, पत्रकार संवाद या सर्वांचा चांगला परिणाम दिसून आला. राष्ट्रीय अनुसंधान विभागाच्या माध्यमातून देशभरात कार्यक्रम करता आले. इंदौरमध्ये व्याख्यान क्लब, साहित्यसभा, महाविद्यालये यांच्या माध्यमातून काम करता आले. इतर राज्यांतून काम वाढविणे, त्याला सपोर्ट देणे हे काम करता आले. महिला विभागात कार्यवाह म्हणून काम करताना सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती या 3 ते 12 जानेवारीच्या कार्यकाळात विशेष कार्यक्रम राबविले गेले. सहा महसूल विभागात अंधश्रद्धां निर्मूलनाची कामे करता आली. आधी अंधश्रद्धां निर्मूलनातून महिला सक्षमीकरण प्रबोधन अभियान मागच्या वर्षी ‘लिंगभेदाला नकार, संविधानाचा स्वीकार’ हा विषय घेऊन काम केले. शनी शिंगणापूर मध्ये महिलांना प्रवेश नाकारण्याच्या घटनेची पार्श्वभूमी त्याला होती. आम्ही नवरात्रात स्त्रीशक्ती जागरण राबविले. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणे यासाठीची जागृती या माध्यमातून केली. राष्ट्रीय अनुसंधान विभागाची राज्य कार्यवाह म्हणून काम करताना अगदी धारवाड, गुलबर्गा, आळंद, कर्नाटकमधून भाषणे दिली. मला कन्नड भाषा येत असल्याने तेथील लोकांना त्यांच्या भाषेत बोलून आपल्याशी जोडणं सोपं होत गेलं. महाराष्ट्रात अंधश्रद्धां निर्मूलनाचा कायदा झाल्यानंतर यात कर्नाटकने पुढाकार घ्यावा, यासाठी काम उभारले आहे.
हे सर्व करताना काही संघर्षाचे प्रसंग उभे राहिले का? त्याबद्दल काय सांगाल?
हे गृहीतच आहे. काही वेगळं करायचं म्हटलं तर जो संघर्ष सर्वांच्या वाट्याला येतो, तो माझ्याही वाट्याला आला. माझ्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले; मात्र त्यातून मी खचून गेले नाही. मी जे बोलते ते करते, अशी प्रतिमा निर्माण झाली. मासिक पाळीदरम्यान महिलांनी मंदिर प्रवेश करण्यात काहीच गैर नाही. मी स्वत: तसं केलं आहे, असं मी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलले. इथल्या प्रतिगामी, सनातनींना ते रूचले नाही. बाईचे मानसिक संतुलन बिघडले, असा अग्रलेख एका दैनिकाने लिहिला. त्यावर खूप चर्चा झाली. पण मी मनाला लावून घेतलं नाही. याबाबतीत मी दाभोलकरांशी बोलले त्यांनी सांगितलं असं होतं, असं खचून जायचं नाही. या प्रसंगानंतर माझ्या घरावर हल्ला झाला, दगडफेक झाली, दोनदा गाडी फोडली, काळे फासल्याची चर्चा झाली, मी खचले नाही. असे प्रसंग येतच असतात. मात्र त्यामुळे काम थांबवावे, असं काही वाटलं नाही. आम्ही बीड येथे विवेक जागराचा वादसंवाद हा डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात कलकी महाराजांच्या भक्तांनी गोंधळ घातला होता. त्याचा न्यायालयीन लढा अनेक वर्षं चालला.
या चळवळीत काम करताना स्त्री म्हणून काही वेगळे अनुभव आले का?
नाही. स्त्री म्हणून अमूक एक गोष्ट घडली, असे काही अनुभव नाहीत.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून हा ‘मअंनिस’च्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागेल, असा प्रसंग होता त्या प्रसंगावेळची भावना काय होती? आज त्या प्रसंगाकडे आणि त्यानंतरच्या घटनाक्रमांकडे आपण कसे पाहता?
डॉ. दाभोलकरांचा खून हा शब्दात न सांगता येण्यासारखा होता. आम्हा सर्वांनाच धक्का देणारा होता. अचानकपणे घडलेली ही घटना सर्वच कार्यकर्त्यांना हादरून टाकणारी होती. आजही त्यांचा खून आणि त्यांचं जाणं आठवलं की, आम्ही भावनाविवश होतो. ‘अंनिस’चा कार्यकर्ताच काय; कुठल्याही सामान्य माणसाला त्या प्रसंगाने त्रासच झाला. व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचे तर तो क्षण म्हणजे पोरकं झाल्याची भावना निर्माण करणारा होता. मी कोलकत्ता येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले होते. त्याच्या काही दिवस अगोदरच या परिषदेत पर्यावरणासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धां निर्मूलन समितीचे कार्य या विषयावरील पेपरच्या सादरीकरणासाठी माझे डॉक्टरांशी बोलणे झाले होते. कॉन्फरन्स सुरू होती. मी दुसर्या रांगेत बसले होते. माझ्याशेजारी माझी नायझेरियाची मैत्रीण बसली होती आणि अचानक विजयचा फोन आला. त्याने डॉक्टरांच्या खुनाची माहिती दिली. विश्वासच बसत नव्हता. काय होतंय, काहीच कळत नव्हतं. मी थेट रडायला सुरुवात केली. माझ्याशेजारच्या मैत्रिणीलाही काय झाले, कळत नव्हते. माझे वडील गेले, त्यावेळी जी भावना होती, अगदीच ती भावना मनात दाटली होती. पुन्हा एकदा बाप गमावल्याची वेदना हृदयात निर्माण झाली होती. बरेच दिवस त्याच वेदनेत आम्ही काढले आहेत. त्या वेदनेची तीव्रता खूप दिवस होती. आजही डॉ. दाभोलकरांचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येतं. त्यांच्या जाण्यानं खूप नुकसान झालं. अगदी आभाळ कोसळलं. मात्र यातून सावरण्याचं बळही सरांच्याच विचारानं दिलं. सर नेहमी म्हणायचे ‘माणूस थांबू शकतो; काम थांबता कामा नये.’ या भूमिकेतून आम्ही पुढचं वर्षभर जिद्दीनं काम केलं. प्रत्येक कार्यकर्ता कृतिशील झाला. आता सर नाहीत. त्यामुळे हे काम पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे, याच भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले. एकही हिंसक कृत्य न करता सरांच्याच पध्दतीने, दर्जाने काम करण्याची क्षमता सरांच्याच तालमीत तयार झालेले कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दाखविली. सरांच्या जाण्याचे दु:ख आहे, वेदनाही आहे. आजही त्रास होतो. मात्र हा त्रास पचवतानाच ‘मअंनिस’चे काम वाढविणे आणि दुसर्या पातळीवर त्यांच्या मारेकर्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणे, या दोन पातळीवर काम करावे लागले, सुरू आहे. आज प्रत्येक गोष्टीत सर आठवत राहतात. सरांच्या विचारांची शिदोरी घेऊनच पुढे जाण्याचे काम आम्ही सर्व करत आहोत.

अंधश्रद्धां निर्मूलन चळवळीकडे युवकांना आकर्षित आणि प्रशिक्षित करण्याचा प्रवास कसा असतो?
यासाठी अनेक उपक्रम केले जातात. विशेषत: अंधश्रद्धां निर्मूलन समितीचा वेगळा युवा विभाग कार्यरत आहे. सरांचा कल पहिल्यापासून युवकांकडे होता. युवकांचा कलच परिवर्तनाला दिशा आणि गती देत असतो, हा सरांचा विश्वास होता. आम्ही ज्या-ज्या वेळी संघटनेत चर्चा करायचो त्या-त्या वेळी आपल्या चळवळीचं वय काय हा विषय होता. त्यावर चर्चा व्हायची आणि त्यातून हे वय चाळीस-पंचेचाळीसच्या पुढे जातंय, असं दिसायचं. त्यातूनच मग युवा सहभाग वाढवायचा हा अजेंडा आला. त्यासाठी ‘विवेकवाहिनी’ची स्थापना झाली. तरुणांना समाजाची जाण, भान आणि ज्ञान देत युवाशक्ती निर्माण करून देशाची दिशा बदलण्याचा दाभोलकरांचा विचार होता. 2002 मध्ये वैज्ञानिक जाणिवा कृती परिषदेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला होता. त्यातूनच ‘विवेकवाहिनी’ची कल्पना पुढे आली. आजच्या युवकाला जबाबदारीचं आकलन, परिस्थितीचं भान देत सत्य, अहिंसा, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कळून कृतिशील करणं गरजेचं आहे, ही डॉक्टरांची भूमिका होती आणि त्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. यातून ‘विवेकवाहिनी’ची रचना झाली. डॉ. दाभोलकरांनी न तक्रार करता न थकता दहा-दहा प्राध्यापकांच्याही ‘विवेक वाहिनी’च्या कार्यशाळा घेतल्या. न्याय, धर्मनिरपेक्षता बिंबवली. ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ असे कार्यक्रम हाती घेतले. विवेकी जगायचं असेल तर व्यसनमुक्ती गरजेची असल्याची भूमिका घेतली. आज तरुणांना वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्याखाली एकत्र आणून धर्मांधता वाढविण्याचे प्रयत्न होत असताना धर्मनिरपेक्ष, विवेकी विचार, संविधानाची शिकवण, यावर आधारित जात, धर्म, लिंगावर संकुचित न होणारं सन्मानाचं जगणं शिकवणे आणि शोषणमुक्त निर्भय जगण्यासाठी संघटन वाढविण्याचे काम ‘विवेकवाहिनी’च्या माध्यमातून आम्ही केले. डॉक्टरांच्या तृतीय स्मृतिदिनी ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ हे अभियान देशभर हाती घेतले. युवकांना माहिती दिली गेली. हिंसा आवश्यक नाही, अहिंसक मार्गाने प्रतिकार करता येतो. गांधीजींचा खून झाला पण त्यांचा विचार संपला नाही. दाभोलकरांचा खून करून चळवळ संपवता येईल, असं ज्यांना वाटत होतं ते त्यांना जमलं नाही. माणसांना मारता येतं; विचारांना नाही. विचारांमधून समाज घडतो, हे आम्ही तरुणांना सांगत आहोत. भगतसिंग, राजगुरू, शिरीषकुमार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वातंत्र्य आणि स्वराज्याचे संदर्भ आजही घ्यावे लागतील. विवेकी आणि कृतिशील युवक घडविण्याचे काम या माध्यमातून आम्हाला करता आलं, या सर्वच गोष्टींचा आनंद होतो. फार छान वाटतं.
अंधश्रद्धां वाढीस लागण्याची, दृढ होण्याची नेमकी कारणं काय असतात?
मी शिक्षण घेताना तसा माझा श्रद्धां-अंधश्रद्धांंशी फारसा संबंध नव्हता. नंतर मात्र अंधश्रद्धांंचं वाढतं प्रमाण प्रकर्षाने दिसायला लागलं. पुरुषप्रधान व्यवस्थेने ज्यांना टाचेखाली ठेवायचा प्रयत्न केला. त्यांनी अंधश्रद्धां वापरली. आयुष्यात हव्या त्या गोष्टी माणसाला मिळत नाहीत. मग ती हतबल आणि अगतिक होतात आणि त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी जातात. आज विवेकाने विचार करण्याचा कल नाही. तशी तयारी नाही. बहुतांश शिकलेल्या माणसांना याच्याशी विशेष देणे-घेणे नाही, हे माझं निरीक्षण आहे. व्यक्ती ग्रामीण असेल की शहरी, सुशिक्षित असेल वा अशिक्षित, महिला असेल वा पुरुष सर्वांनाच झटपट यश पाहिजे. ते सहज मिळत नाही आणि मग ते कोणत्याही प्रकारे मिळविण्यासाठी माणूस अंधश्रध्देच्या आहारी जातो. अगदी विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोगही माणूसच अंधश्रद्धां वाढविण्यासाठी करतोय. माणसाला विचार करता येतो. म्हणून तो विवेकी असला पाहिजे. चार पायांचे प्राणी अविवेकी वर्तन करतात. तसेच वर्तन जर दोन पायांचे प्राणी करू लागले. तर त्यांना माणूस कसं म्हणावं? माणसाची अगतिकता आणि अपुर्या इच्छा त्याला अंधश्रध्देकडे ओढतात. परीक्षेतील अपयश, बाई म्हणून येणार्या अडचणी, लग्नासाठी कुंडलीचे पाहणे, त्यातील व्रतवैकल्य, सुख लागावं म्हणून किंवा वास्तू लाभावी म्हणून घरातल्या भिंती पाडून होत असलेली रचना अशा अनेक बाबी सांगता येतील. सुख-दु:ख सर्वांनाच असतं पण सुखाने उन्मादी न होता आणि दु:खाने गलितगात्र न होता विवेक आणि आत्मभान जागवणं माणसाला जमल समजलं पाहिजे आणि तस शहाणं करण्याचं काम ‘मअंनिस’ करते. माणसानं डोकं चालवायला पाहिजे हे आम्ही सांगतो. खांद्याच्या वरचा अवयव ज्याला लैकिकार्थानं डोकं म्हणतो ते फक्त ओझं वाहण्यासाठी किंवा ताण घेण्यासाठी नाही, तर विचार करण्यासाठी आहे, हे शिक्षण व्यवस्थेने सांगायला पाहिजे परंतु शिक्षणव्यवस्थेमध्ये झालं नाही म्हणून डॉ. दाभोलकरांना हे काम करावं लागलं. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविणं हे शिक्षक, नागरिक आदी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आमच्या संविधानाने आणि प्रत्येक संतांनी हेच सांगितलं आहे. दु:खाकडे समतोलपणे पाहणं जमलं पाहिजे. हा समतोल ढासळला की माणसं अंधश्रध्देकडे वळतात.
अंधश्रद्धां निर्मूलन कायद्याचा प्रवास आणि अंमलबजावणीकडे आपण आज कसे पाहता?
महाराष्ट्रात अंधश्रद्धां निर्मूलनाचा हा कायदा झाला आहे. त्याचा प्रवास सर्वांना माहीत आहे. डॉ. दाभोलकर सरांनी जेव्हापासून या कायद्यासाठी काम सुरू केलं. तो संपूर्ण प्रवास अहिंसक, सातत्यपूर्ण आणि चिकाटीचा राहिलेला आहे. इतका अथक संघर्ष, इतकी चिकाटी एखादा माणूस दाखवू शकतो, हे खरे तर आश्चर्य आहे. स्वत:चा कुठलाही स्वार्थ नसताना केवळ कायदा म्हणून डॉक्टरांनी विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आमदार आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सर्वांपर्यंत पोचले. अठरा वर्षे ते सर्व करत आले. काळी पत्रिका जाहीर केली. कितीतरी मोहिमा, आंदोलनं यासाठी झाली. कधीकधी डॉक्टर म्हणायचे, ‘आंदोलन वयात आलं; पण कायदा झाला नाही.’ त्याच कायद्यासाठी डॉक्टरांना जीव गमवावा लागला. त्यानंतर हा कायदा झाला आहे. हा साराच प्रवास अत्यंत क्लिष्ट होता. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ व्हायचे. सर प्रत्येक बैठकीत प्रगती सांगायचे. भूमिका तयार करणे, त्याचा पाठपुरावा करणे, हे सर्व सरांनी अथकपणे केलं म्हणूनच महाराष्ट्र हे असं कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं. आता आजूबाजूच्या राज्यांनी असा कायदा करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकताच आम्ही कर्नाटक राज्यात दौरा केला. केंद्र सरकारने हा कायदा करावा, हा आमचा प्रयत्न आहे. हा कायदा केवळ अंधश्रद्धां निर्मूलनाचा नाही तर बाईचं जगणं समृध्द करणारा, तिला मुक्त करणारा आहे. बाई सक्षम झाली, मुक्त झाली तर त्याचा कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला फायदा आहे, हेच आम्ही मांडत आहोत. निव्वळ कायदा करून प्रश्न मिटत नसतात. तो सर्वांपर्यंत पोचला पाहिजे, तरच त्याचा वापर केला जातो. यासाठी आम्ही पोलीस आणि वकिलांची प्रशिक्षणं घेतली. आज या कायद्यासाठी दोनशेहून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. काही प्रकरणात शिक्षाही झाली आहे. समाजाला या कायद्याप्रति सजग आणि प्रबोधित करण्याचं काम चळवळीनं केलं आहे.
आपण प्राचार्य म्हणून काम करता. हे पूर्ण वेळ जबाबदारीचे, प्रशासकीय पद आहे. मग यातून चळवळीसाठी वेळ कसा निघतो?
मला या कामाची आवड आहे आणि ज्या कामाची आपल्याला आवड असते, त्या कामासाठी आपण वेळ काढतो. म्हणूनच प्राचार्य पदाची पूर्णवेळ जबाबदारी असतानाही ते काम व्यवस्थित पूर्ण करून मी चळवळीला वेळ देते. यातून मला ऊर्जा मिळते, आनंद मिळतो.
प्राचार्य म्हणून काम करताना आपण कोणते वेगळे उपक्रम राबविले?
प्राचार्य म्हणून काम करत असताना मी जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकी भान, सामाजिक भान रुजविण्याचा प्रयत्न केला. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून मी विद्यार्थ्यांच्या मनावर हे बिंबवत गेले. अगदी सुरुवातीला आमच्या महाविद्यालयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांचे फोटो लावणे, नारळ फोडणे, गुलाल लावणे, असे होत होते. मी त्यात बदल केला. शैक्षणिक संस्थांमधून धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, कोणत्याही एका धर्माच्या प्रतीकांचा वापर व्हायला नको. महापुरुषांचं दैवतीकरण नको. ही भूमिका मी मांडली. आज आमच्याकडे कार्यक्रमाची सुरुवात झाड लावून आणि समारोप पाहुण्यांना पुस्तक देऊन होतो. हा उपक्रम सर्वत्र पोचला पाहिजे.
यासोबतच महाविद्यालयात काम करताना समाजाशी जोडलं गेलं पाहिजे, त्यांना सामाजिक भान आलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून मुलींनी ग्रामीण भागात निवासी राहिलं पाहिजे. तेथील प्रश्न समजून घेतले पाहिजेत, तेथील महिलाचं जगणं त्यांना कळलं पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला ग्रामीण भागात मुलींना निवासी ठेवायला पालक तयार नसायचे. त्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न विचारायचे. 1992 ला ही जी परिस्थिती होती, ती आजही कायम आहे. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
समाजातील वंचित आणि उपेक्षितांसोबत आपल्याला राहता आले पाहिजे, याच भावनेतून आम्ही एचआयव्ही बाधितांसाठी बारगजे दांपत्य चालवत असलेल्या ‘इनफंट इंडिया’ या आश्रमावर राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे सुरू केली. आता अनेक महाविद्यालये तिथे जात आहेत. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या माध्यमातून आम्ही हमालांशी संवाद साधला. महिलांमध्ये आरोग्यबाबत जागृती नसते. त्यातून त्या अंधश्रध्देकडे वळतात. म्हणून आम्ही विद्यार्थिनींच्या आरोग्याची तपासणी महाविद्यालयात करत असतोच. त्यासोबतच आम्ही झोपडपट्टीतील महिलांच्या रक्तगटाची, एचबीची तपासणी करतो. त्यांना आरोग्याच्या दृष्टीने कोणता आहार घ्यावा, ते पदार्थ कसे बनवावेत, याचीही प्रात्यक्षिके देतो. सासु-सून संमेलन घेतले. स्त्रिया व कौटुंबिक हिंसा यावर राष्ट्रीय परिषद घेतली.
परिवर्तनाच्या चळवळीत कार्य करताना जसा सुरुवातीला संघर्ष विरोध होतो, अगदी तसंच कालांतराने समाज तुमच्या कार्याची दखल घेतो. या बाबतीत आपला अनुभव काय?
निश्चितच. समाजात एखादे काम करताना जसं संघर्षाला सामोरं जावं लागतं, अगदी तसंच तुम्ही जर एका विशिष्ट ध्येयाने, तुमच्या भूमिकेवर ठाम राहत काम करणार असाल तर समाज तुम्हाला स्वीकारतो, हे देखील वास्तव आहे. माझ्या कामाची समाजाने दखल घेतली. शासन आणि अंधश्रद्धां निर्मूलन चळवळच नव्हे, तर समाजाच्या प्रत्येक स्तरातून या कामाचा गौरव केला गेला. मला महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (2000-2001) मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धां निर्मूलन समितीच्या वतीने दोन वेळा आधारस्तंभ पुरस्काराने (2004, 2013) गौरविण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रेरणा पुरस्कार (2015) आणि कृतज्ञता पुरस्कार (2016) या पुरस्कारांनी मला माझ्या चळवळीने गौरविले. यासोबतच बीड नगरपालिकेचा स्त्रीशक्ती पुरस्कार (2013) जवाहर महाविद्यालय अणदूरचे कर्तृत्ववान महिला गौरव मानचिन्ह, मुंबईच्या हुंडाविरोधी चळवळीच्या वतीने दिला जाणारा राधाबाई कुलकर्णी स्मृती विद्यापक कार्यकर्तां पुरस्कार, शिवा संघटनेच्या वतीने बसव सेवागौरव पुरस्कार या सोबतच मुथ्थुट फायनान्स, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यावतीने सन्मानपत्रे देण्यात आली. समाजाने घेतलेली ही दखल आपले काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी मिळालेली प्रेरणा असते.
या संपूर्ण प्रवासात मागे वळून पाहताना काय वाटतं?
सुरुवातीला हे काम छान वाटलं म्हणून या कामाकडे वळले होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बीड येथे शाखा सुरू करून ‘मअंनिस’च्या कामात सुरुवात केली. आज त्या कामाचं गांभीर्य आलंय. जगणं समृध्द करण्यासाठी, निर्भय आणि विवेकी जगण्यासाठी हे काम महत्त्वाचे आहे. याची आता जाणीव झाली आहे. जगण्याचं भान शिकवणारं हे काम आहे. माणूस घडवणारं हे काम आहे. माझ्या स्वत:साठी या कामाचा बराच उपयोग झाला. ‘माणसं बदलू शकतात; आपण कमी पडतो,’ असं डॉक्टर सांगायचे. या कामाच्या माध्यमातून माणसं बदलण्याचं बळ मिळालं. आपण जसं नकळत श्वास घेतो. श्वास घेताना कोणाला सांगत नाही. तितक्या नकळत हे विवेकी जगणं हाडीमांसी रूजलं पाहिजे, मानसिक गुलामगिरी संपली पाहिजे, कोणतंही काम योग्य पध्दतीने, विवेकीपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून करेल, अशी जीवनपध्दती झाली पाहिजे. व्यक्ती कोणीही असो; पण तिच्या बाबतीत असं घडलं पाहिजे. मला माहितीये, मी बोलतेय तितकं हे सोपं नाहीय. अवघड आहे, कठीण आहे आणि म्हणूनच ते करणं आवश्यक आहे आणि ते अशक्य नाही. पण हे झालं पाहिजे, यासाठी खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आहे, याचं मला भान आहे. पण ते करत राहिलं पाहिजे. याच भूमिकेतून चळवळीतील माझे काम सुरू आहे, सुरू राहील.
आज समाजात हतबलतेतून, अगतिकतेतून अंधश्रद्धां वाढत आहेत. ‘हायटेक’ बुवाबाजी, आध्यात्मिक बुवाबाजीचं प्रमाण वाढतंय म्हणूनच अंधश्रद्धां निर्मूलनाच्या चळवळीसमोरची आव्हानेही वाढत आहेत. हे बदलण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. ‘ माणसं बदलू शकतात, फक्त आपण कमी पडतो,’ असं डॉ. दाभोलकर सर नेहमी सांगायचे. तोच विचार पुढे नेत आपल्याला काम करायचे आहे. आपण जसा श्वास घेतो, अगदी नकळत मी श्वास घेतला….आता सोडला…. असं न सांगता. ज्या नकळतपणे श्वास घेण्याची क्रिया होत असते अगदी तसंच विवेकी जगणं हाडीमांसी रूजलं पाहिजे असे मला वाटते. मानसिक गुलामगिरीतून मुक्त, शोषणमुक्त, विवेकी समाज घडवणं हेच महाराष्ट्र अंधश्रद्धां निर्मूलन चळवळीच्या माध्यमातून आमचं ध्येय आहे. आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे.
– प्राचार्या सविता शेटे, बीड
संपर्क : 9422243236