डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) हा देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा होत आहे.
तो ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आहे तरी काय? हे समजावून घेण्यासाठी डॉ. दाभोलकरांचा यावरील ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकातील लेख येथे पुर्नमुद्रित करीत आहोत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची महत्ता
कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ अशी साधी, सुलभ व्याख्या करता येईल; परंतु या साध्या व्याख्येच्या आधारेही भारतीय समाज या विज्ञान युगातही अवैज्ञानिक आहे, हे स्पष्ट दिसते, कबूल करावे लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी रुजविण्यासाठी वैज्ञानिक असण्याची गरज नाही आणि विज्ञान शाखेची पदवी घेणेही अनिवार्य नाही. आपल्याभोवतालची सर्व भौतिक सृष्टी काही अंगभूत नियमांनी वागते. त्या नियमांचे स्वरूप जाणून घेण्याचे कुतूहल असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो. युरोपमध्ये प्रबोधनाचे वारे वाहिले, तेथील अंधश्रद्धेचा धुरळा खाली बसला आणि सर्वसामान्य माणसाचे बौद्धिक व्यवहार खूपशा प्रमाणात उजळून निघाले. भारतामध्ये इंग्रजांची सत्ता आली, युरोपच्या वैचारिक जागृतीकडे डोकावून बघण्याची संधी उपलब्ध झाली, स्वातंत्र्यानंतर शिक्षणप्रसाराचे उद्दिष्ट वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती असे मानण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे याचा भारतीय संविधानातील नागरिकांच्या कर्तव्यांत समावेश करण्यात आला; परंतु प्रत्यक्षात समाजजीवनात वैयक्तिक, सामाजिक सुखसोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावयाचे आणि त्याचवेळी त्यामागची वैज्ञानिक सूत्रे नाकारून गतानुगतिक वर्तन करायचे, असा व्यवहार सुरू झाला.
‘सत्तासंपादन’ हा ज्ञानार्जनाचा एक महत्त्वाचा भौतिक फायदा झाला; परंतु प्रत्येक प्रकारचे ज्ञान भौतिक फायद्याशी निगडित करता येत नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करणे शक्यही नाही; परंतु ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असा डोळसपणा अंगी रुजवणे प्रत्येकास सहज शक्य आहे. ज्ञानाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला, तर व्यक्तिगत जीवनातील घटना व स्वत: भोवतालची सृष्टी यांचे पृथ:करण अधिक नेमकेपणाने जमेल. म्हणजे दैनंदिन जीवनातील व्यक्तिगत व सामाजिक घटनांची विवेकनिष्ठ कारणमीमांसा केली तर प्रत्येक व्यक्तीस अकारण भीती, मानसिक क्लेश यापासून मुक्ती मिळू शकेल. चुकीचे कार्यकारणभाव शोधून त्यासाठी आत्मक्लेश व परपीडन करणारी उलट्या पावलांची वाटचाल थांबू शकेल.
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रक्रिया
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सोपा अर्थ असा की, जेवढा पुरावा उपलब्ध असेल, तेवढा विश्वास ठेवणे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात निर्णय घेताना अगदी सहजपणे; परंतु याच प्रकारे विचार करून निर्णय घेत असतो. समजा, आपणास एक माहिती हवी आहे. चार व्यक्तींनी आपणात ती माहिती दिली. त्यातील पहिल्या व्यक्तीच्या मते ही माहिती त्याला पडलेल्या स्वप्नांच्या द्वारे प्राप्त झालेली आहे. दुसर्या व्यक्तीच्या मते एक अनोळखी व्यक्ती दुसर्या अनोळखी व्यक्तीला ही माहिती सांगत असताना तिने रेल्वे स्टेशनवर ती ऐकली आहे. तिसर्याच्या मते ही माहिती देणारी काही पुस्तके त्याने वाचली आहेत आणि काही माणसेही त्याला भेटली आहेत. चौथी व्यक्ती असे सांगते की, तिने स्वत: संबंधित माहिती प्रत्यक्ष जागी जाऊन पाहून, तपासून गोळा केली आहे. सामान्य माणूसही अशा परिस्थितीत कसा निर्णय घेईल? आपल्या माहितीला स्वप्नाचा आधार देणार्या व्यक्तीवर तो सर्वांत कमी विश्वास ठेवेल आणि ज्याने स्वत: माहितीचा पडताळा घेतला आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवेल. थोडक्यात, ज्या प्रमाणात पुरावा उपलब्ध आहे, त्याच प्रमाणात माहितीवर विश्वास ठेवला जाईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन हीच बाब एका शास्त्रीय पद्धतीने अमलात आणते. या पद्धतीचे घटक आहेत निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग. वैज्ञानिक दृष्टिकोन सुरू होतो, तो कुतुहलाने निरीक्षण करण्यापासून व प्रश्न पडण्यापासून. इंग्लंडला जाणार्या बोटीत सी. व्ही. रामन रोज डेकवर बसून वर अथांग निळे आकाश आणि खाली अथांग निळा समुद्र पाहत; मात्र त्यांनी कधीही ‘देवा, तुझे किती सुंदर आकाश’ असा विचार केला नाही. आकाशही निळे व समुद्रही निळा; या निरीक्षणातून त्यांनी त्यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून ‘रामन इफेक्ट’ या सिद्धांताचा जन्म झाला व त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. कुतूहल असणे, प्रश्न पडणे, जाणीवपूर्वक निरीक्षण करणे या सर्व बाबी फक्त माणसातच शक्य आहेत. आपले भक्ष्य गिळून झाडाखाली पडलेल्या अजगराला कधीही आकाशात चांदण्या का लुकलुकतात, असा प्रश्न पडत नाही. मात्र प्रत्येक घटनेेचे निरीक्षण करता येते असे नाही. त्यावेळी आधार घेतला जातो तर्कपद्धतीचा अथवा अनुभवाचा. दोन उदाहरणे सुप्रसिद्ध आहेत. समजा, तुमच्या मित्राने तुम्हाला ‘उद्या सकाळी मी तुझ्याकडे येतो. आपण दोघे सूर्य उगवताना फिरावयास जाऊ,’ असे सांगितले, तर तुम्ही त्या मित्राला कधीही असे विचारत नाही की, ‘तू म्हणतोस उद्या सकाळी सूर्य उगवल्यावर फिरावयास जायचे म्हणून; पण उद्या सूर्य उगवणारच आहे, याची काय खात्री?’ खरे तर एका अर्थाने हा प्रश्न बरोबर आहे; परंतु तरीही तो विचारला जात नाही. कारण गेली कोट्यवधी वर्षेरोज सकाळी ठरलेल्या वेळी सूर्य उगवतो. या निरीक्षणाच्या आधारे असा तर्क केला जातो की, दुसर्या दिवशीही तो त्याचवेळी सकाळी उगवेल. जंगलात संध्याकाळच्या वेळी वाट चुकलेल्या वाटसरूंना रस्ता सापडत नाही; पण त्यांना जंगलाच्या एका कोपर्यात 15-20 ठिकाणांहून वर येणारा धूर दिसतो. संध्याकाळच्या वेळी माणसे स्वत:चे भोजन शिजवतात. जंगलातील माणसे त्यासाठी लाकूड वापरतात. जेवण प्रत्येकाच्या घरी स्वतंत्र शिजते आणि त्यासाठी जाळलेल्या लाकडातून प्रत्येकाच्या घरातून धूर बाहेर पडतो. या सर्व पूर्वमाहितीवरून असे अनुमान रचले जाते की, धूर येणार्या दिशेला माणसांची वस्ती असेल आणि ते नंतर सत्यही ठरते. वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आणखी एक गरज आहे प्रत्यक्ष प्रचितीची. वैज्ञानिक दृष्टिकोन कधीही सांगोवांगीच्या कथांवर अवलंबून नसतो. अमक्या औषधाने अमका रोग बरा होतो, असा जर कुणाचा दावा असेल; तर त्या रोगाचे रुग्ण मिळवले जातात, त्यांना योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात ती औषधे दिली जातात आणि रुग्ण व्याधीमुक्त झाले की नाही, याची साक्षात प्रचिती घेतली जाते. ही प्रचिती कधीही व्यक्तिनिष्ठ नसते; ती वस्तुनिष्ठ असते. काही रुग्ण पुण्यवान होते म्हणून ते बरे झाले आणि काही पापी होते म्हणून औषधाचा गुण आला नाही- हा युक्तिवाद वैज्ञानिक दृष्टिकोनाला मंजूर नाही. याबरोबरच ही प्रचिती वैश्विक असते. त्याच परिस्थितीत सर्व जगभर त्याच स्वरुपाच्या रुग्णावर ते औषध तोच गुण देते, अशी प्रचिती आली नाही, तर ती का आली नाही, या त्रुटीचे शास्त्रीय भाषेत स्पष्टीकरणही वैज्ञानिक दृष्टिकोनाने देता येते.
वैज्ञानिक दृष्टिकोन तपासण्यातील शेवटचा निकष आहे प्रयोगाचा. पाणी 100 डिग्री सेंटिग्रेडला उकळते, हे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहता येते. पुन्हा प्रयोगाने सिद्ध झालेली बाब ही सार्वकालिक व वैश्विक असते. एक लाख वर्षांपूर्वी पाणी 100 डिग्री सेंटिग्रेडलाच उकळत होते आणि एक लाख वर्षांनीदेखील ते 100 डिग्री सेंटिग्रेडलाच उकळेल. जगातील कोणत्याही देशात हेच सत्य शाश्वत राहील. मुंबईत धार्मिक लोक फार राहतात. त्यांच्यावर देवाची मर्जी आहे म्हणून मुंबईला पाणी 90 डिग्री सेंटिग्रेडला उकळेल आणि मास्कोला नास्तिक लोकांचे प्रमाण अधिक म्हणून पाणी 110 डिग्री सेंटिग्रेडला उकळेल-असे कधीही होत नाही आणि ही बाब प्रयोगाने सिद्ध करून दाखवता येते. पाणी कमी अथवा अधिक तापमानाला उकळले, तर पाण्याचा उत्कलनबिंदू वाढण्याचा अथवा कमी होण्याचा जो नियम असतो, तोही सार्वत्रिक असतो आणि प्रयोगाद्वारे सगळीकडे त्याची सारखीच प्रचिती येते. ‘ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते’ असे विधान केले, तर ते प्रयोगाने सिद्ध करता आले पाहिजे. मेणबत्ती पेटवून ती उघड्या हंडीखाली ठेवली, तर हंडीतील ऑक्सिजन संपल्यावर ती विझते. या प्रयोगावरून हा निष्कर्ष काढता येतो की, हंडीतील प्राणवायू ज्वलनाला मदत करतो. मेणबत्ती जळत असताना त्यासाठी हंडीतील प्राणवायू वापरला जातो आणि तो संपला की, मेणबत्ती विझतेच. कारण प्राणवायूशिवाय ज्वलन होऊ शकत नाही.
निरीक्षण, परीक्षण, तर्क, काटेकोर गणित, प्रचिती यांच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोन एक गृहितक मांडतो. प्रयोगाद्वारे विविध ठिकाणी विविध परिस्थितीत या गृहितकाची चाचणी घेतली जाते आणि त्यानंतरच गृहितकाला सिद्धांताचे स्वरूप प्राप्त होते. उदा. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते, असे गृहितक मांडले जाते. मग झाडावरून पडणारे फळ किंवा तरंगणारे पीस, फांदीवरून तुटलेले पान अथवा इंजिन बंद पडलेले विमान किंवा हवेत भिरकवलेला दगड हे जमिनीकडेच येतात आणि गॅस भरलेला फुगा उलटा वर जातो, या सर्व गोष्टी प्रयोगातून वेगवेगळ्या प्रकारे तपासून सिद्ध केल्या जातात आणि मगच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्राप्त होतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये
ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची पद्धत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. धार्मिक श्रद्धा ही माणसातील एक मूलगामी बळकट प्रेरणा आहे, यात शंका नाही; पण त्याचप्रमाणे चिकित्सक विचार करण्याची शक्तीही माणसाला आहे. व्यवहारातील निर्णय घेताना माणूस याच शक्तीचा सतत उपयोग करतो. या दृष्टीची काही वैशिष्ट्ये आहेत –
1) कोणत्याही अधिकारी व्यक्तीने सांगितले म्हणून वा ग्रंथात लिहिले म्हणून खरे मानणे चूक आहे. सत्याचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण वा निरीक्षण. धर्म व विज्ञान यातील खरा झगडा हा शब्द व ग्रंथप्रामाण्य एका बाजूला आणि प्रत्यक्ष प्रयोग व निरीक्षण दुसर्या बाजूला असा होता. आवश्यक ते निरीक्षण व प्रयोग करावयास तयार असलेल्या कोणाही व्यक्तीला स्पष्ट बोध होऊ शकेल, अशा वस्तुस्थितीवर ही तत्त्वे आधारलेली होती. या नवीन पद्धतीला एवढे अमाप व व्यावहारिक यश लाभले की, धर्मशास्त्राला विज्ञानाशी तडजोड करावी लागली.
2) विश्व विशिष्ट नियमांनी बद्ध आहे. या नियमांचे ज्ञान प्रयोग, तर्क व पडताळा या पद्धतीने मिळते. विज्ञानाचा विषय असणारे भौतिक जग माणसाच्या जाणिवेच्या बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. ते निश्चित अशा नियमबद्ध प्रक्रियेमधून बदलत असते. या जगाला हे जे स्वयंभू अस्तित्व आहे, नियमबद्धता, गतिमानता आहे; ती बाहेरच्या कोणत्याही ईश्वरी शक्तीमुळे लाभलेली नाही. तिचे स्पष्टीकरण या जगातील वस्तू, घटना यांच्या व्यापारातूनच शोधायला हवे. माणूस या जगाचा भाग आहे. त्याच्या जाणिवेला जगाचे ज्ञान होण्याची क्षमता आहे. ही क्षमता कोणत्याही ईश्वराच्या कृपेमुळे माणसाला येत नाही; तर त्याच्या व्यवहाराचे स्वरूपच असे आहे की, त्यातून त्याला जगाचे ज्ञान होते.
3) अंतिम व श्रेष्ठ ज्ञान बुद्धीच्या साहाय्याने प्राप्त होत नाही; साक्षात्कार या अतींद्रिय अनुभवांद्वारे प्राप्त होते, ही तत्त्वज्ञान व धर्मविचारांतील श्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन साफ नाकारतो. साक्षात्कारी ज्ञान श्रेष्ठ मानण्याचा एक लोकशाहीविघातक परिणाम होतो; ते ज्ञान एक विशेष प्रकारची सिद्धी आहे, असे मानले जात असल्याने समाजात ज्ञानी अधिकारी पुरुष व सर्वसामान्य भक्तगण असे दोन वर्ग तयार होतात आणि सर्वसामान्यांना वैयक्तिक साक्षात्काराच्या अभावी, परंपरेने चालत आलेल्या, अधिकारी पुरुषाने निरुपण केलेल्या ज्ञानाचा स्वीकार करणे हाच एकमेव मार्ग उरतो. ही मनोभूमिका विज्ञानाच्या उत्कर्षाला मारक आहे.
4) वैज्ञानिक दृष्टिकोनाची सिद्धता करण्यासाठी करावयाच्या प्रयोगात प्रयोगाच्या परिस्थितीवर वैज्ञानिकांचा पूर्ण ताबा असतो. अज्ञेय शक्ती आपोआप काही घडवून आणतील; यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विश्वास नसतो. वैज्ञानिक सत्याच्या बाबतीत वारंवार नियंत्रित परिस्थितीत काटेकोर तपासणीनंतर एक जरी अपवाद निघाला, तरी पत्त्याचा बंगला कोसळावा, तसा विज्ञानाच्या संबंधित सिद्धांताचा डोलारा कोसळतो.
5) विज्ञान हे सार्वजनिक असते. वैज्ञानिक सत्य सर्वांसाठी खुले असते. ज्या कोणाला त्याविषयी कुतूहल असते, त्याला ते तपासून घेता येते. वैज्ञानिक दृष्टिकोनाला मताचा अभिनिवेश मंजूर नसतो. कारण मताच्या अभिनिवेषाचे स्वरूप व्यक्तिनिष्ठ असते आणि त्याचा पाया पूर्वग्रह असतो, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. श्रद्धाधिष्ठित मत वैयक्तिक स्वरुपाचे आहे, असेच वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा वस्तुनिष्ठ असतो; व्यक्तिनिष्ठ नसतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन भारतात का रुजला नाही?
भारतापुरता विचार केला, तर ख्रिस्ती सनाच्या तिसर्या व चौथ्या शतकांत नागार्जुन या विख्यात रसायनतज्ज्ञाचे ‘रसरत्नाकर’ व काल्कपुरतन्त्रम’ हे ग्रंथ प्रसिद्ध होते. गंधक, पारा, तांबे, चांदी, सोने यापासून तयार करण्यात येणार्या रासायनिक संयुगांची माहिती व उपयोग त्यात वर्णिले आहेत. विख्यात भारतीय ज्योतिर्विद वराहमिहिर हा देखील याच काळात होऊन गेला. त्याच्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात सूर्य हा तारा आहे, अशी नोंद आहे व इतर ग्रहांची माहिती आहे. याच दरम्यान होऊन गेलेल्या अमरसिंह या कोषकाराने वनस्पती व प्राणी या सजीवांच्या सवयी, वैशिष्ट्ये, जननप्रकार यांची काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदवून त्यांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला आहे. शून्याचा शोध भारतात लागला. आर्यभट व भास्कराचार्य यांच्या ग्रंथांत गणिते व खगोलशास्त्र यावरील महत्त्वाचे सिद्धांत आढळतात. मात्र इ.स.च्या 8 व्या शतकाच्या अखेरीपासून भारतात ‘बाबावाक्यम् प्रमाणम्’ ही प्रवृत्ती वाढली आणि ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती कमी झाली. कारागिरी परंपरेने चालत आलेले ज्ञानाचे झरे आटत गेले. त्यांची खंत वा खेदही उरला नाही. पुढील जवळपास हजार वर्षांत काही अलौकिक कर्तृत्वाचे राजे झाले, तत्त्वज्ञानाचे ग्रंथ लिहिले गेले; मात्र एकही शास्त्रज्ञ निर्माण झाला नाही. या संपूर्ण कालखंडात कोणाच्या पंगतीला बसावे, चातुर्मासात कांदा खावा किंवा खाऊ नये, गंध उभे लावावे की आडवे, जानवे किती पदरी घालावे, गायीचे शेपूट तोंडावरून फिरवले की पुण्य मिळते का, गोमूत्र प्राशन केल्याने आत्मा उद्धरून जातो का, हेच वादविवादाचे मुख्य विषय बनले. या घटपटादी चर्चेत, निरर्थक कर्मकांडात, विवेकशून्य रुढींत, शोेषणप्रधान धर्मात जनमानस निपचित पडून राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देण्यात आलेल्या शिक्षणाकडे नजर टाकली; तर हे दुर्लक्ष आजपर्यंतही चालूच आहे, असे दिसते. शिक्षणाची संधी न लाभणार्या अफाट वर्गाची बाब आणखीच अवघड आहे; परंतु शाळेत व महाविद्यालयात जाणार्या युवक वा कुमार गटातील मुलांवरचे आजचे संस्कार तरी कोणते आहेत? शिक्षणात विज्ञान आहे; पण चिकित्सक व संशोधनात्मक अंग कमजोर आहे. धर्मात सांगितलेले सर्वश्रेष्ठ मानले जात आहे. आपली जात श्रेष्ठ व कनिष्ठ आहे, असेच आजचा विद्यार्थी मानतो. यश-अपयश परमेश्वराच्या हाती. मुहूर्त, पूजन, स्वर्ग-नरक, तीर्थ-प्रसाद, पूजा-अर्चा, प्रार्थना-उपासना, गतजन्म-पुनर्जन्म, कर्मविपाक अशा अवैज्ञानिक कल्पना आजच्या शिक्षकांच्या मनात, संस्कारांत बळकट आहेत. त्यांच्याद्वारे त्या संक्रमित होत असतात. अगदी सहजपणे या कल्पना शिकविल्या जातात. सोमवार शंकराचा, मंगळवार देवीचा, बुधवार विठोबाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार पुन्हा देवीचा, शनिवार मारुतीचा, रविवार ज्योतिबाचा, असे विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते. विष्णूला पांढरी व गणपतीला लाल फुले आवडतात, हे कळल्यावर विज्ञानाच्या जिज्ञासेचे फूल उमलण्याची शक्यताच उरत नाही.
भारतात जातिव्यवस्था अस्तित्वात आली, बळकट झाली. स्त्री या समाजाच्या निम्म्या घटकावर ज्ञानबंदी लावण्यात आली; दलितांनाही ज्ञानबंदी होतीच. इतर जातींना अधिकार होता फक्त त्यांच्या जातीसंबंधातील ज्ञानाच्या ग्रहणाचा आणि वापराचा. श्रम करणारी व्यक्ती कनिष्ठ मानण्यात आली. ज्या निरीक्षण, परीक्षण, प्रचिती, प्रयोग यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो; ती प्रक्रिया व्यापक पातळीवर पार पाडण्याची परवानगीच नव्हती. त्या ज्ञानाला तर्काची कसोटी लावणे त्यांना मंजूर नव्हते. जातिव्यवस्था हीच मुळात माणूस जन्मजात श्रेष्ठ-कनिष्ठ या अत्यंत तर्कदुष्ट विचारावर आधारलेली होती. त्यामुळे तर्कावर व प्रयोगावर आधारलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास त्यातून होणे शक्यच झाले नाही. ब्रह्म सत्य आहे आणि जग माया आहे, हाच या देशातील तत्त्वज्ञानाचा पाया होता. जे जग हरक्षणी आपल्यासमोर अस्तित्वात आहे आणि प्रत्यक्ष जाणिवांचा भाग आहे, ज्यामधून निर्माण होणारे सुख-दु:ख आपण भोगतो, ती सर्व माया आहे म्हणजेच फोल आणि अर्थहीन आहे, असे सांगण्यात, शिकवण्यात व रुजवण्यात आले. ब्रह्म म्हणजे काय, याचा कसलाही पुरावा न देता तेच माझे मूळ अस्तित्व आहे (अहम् ब्रह्मास्मि) असे सांगण्यात आले. विश्वातील परब्रह्म (म्हणजे काय कोणास ठाऊक) व माझ्यातील ब्रह्म यांचे जीवा-शिवाचे मीलन हाच जीवनाचा उद्धार समजण्यात आला. अशा वातावरणात व विचारसरणीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे शक्यच नव्हते.
वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याचे तिसरे कारण आहे चाकोरीबद्ध शिक्षणपद्धती व आपल्या शिक्षणव्यवस्थेत (व समाजव्यवस्थेतही) प्रश्न विचारणे हे जिज्ञासेऐवजी उद्धटपणाचे, शिक्षकांप्रति अनादराचे लक्षण मानले जाते. खरे तर शिक्षणप्रक्रियेत ‘का’ अथवा ‘असे का?’ या प्रश्नांना असाधारण महत्त्व आहे. अनेकविध शंकांचे धुमारे मुलांच्या मनाला फुटत असतात. चौकस दृष्टीने ती आजूबाजूला बघत असतात. आपल्या आजूबाजूच्या घटना का घडतात आणि तशाच का घडतात, याबद्दल त्यांना अनेक प्रश्न पडत असतात. हे प्रश्न विचारण्यासाठी त्यांना उत्तेजन देईल, अशी आजची शिक्षणपद्धती नाही. आपल्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेकविध प्रश्नांना शिक्षक उत्तर देतात, ‘कार्ट्या, किती वटवट करशील, गप्प बैस देवासारखा.’ म्हणजे या संस्कृतीमधला देव माणसांना गप्प बसायला शिकवतो. ज्या संस्कृतीमधील देव हा ‘अळी मिळी गूप चिळी, हाताची घडी तोंडावर बोट’ शिकवितो; त्या समाजातील तरुणांना, लहान मुलांना प्रश्न विचारायला शिकवावे लागते. कारण या प्रश्न विचारण्याच्या डोळस प्रवृत्तीमधूनच उद्याचे राष्ट्र घडणार असते. अर्थात, शिक्षणामधून प्रश्न विचारावयास शिकवावयाचे, तर पहिल्यांदा ते शिक्षण मिळावे लागते. या देशात याबाबत गंभीर स्थिती आहे. अजूनही या देशातील 30 टक्के विद्यार्थी शाळेतच जात नाहीत. महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 8 ते 9 टक्के एवढेच आहे. तेव्हा मुळात शिक्षण नाही आणि जे आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना चौकस बनविले जात नाही, हे वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
चौथे कारण आहे कुटुंबव्यवस्थेचे. व्यक्तीची जडणघडण कुटुंबात चालू होते आणि त्याचे स्वतंत्र जीवन चालू होईपर्यंत आई-वडील हेच त्याच्या जडणघडणीतील महत्त्वाचे भागीदार असतात; परंतु आपल्याकडील कुटुंबातील वातावरण बहुधा एकाधिकारशाहीचे असते. सर्व निर्णय कुटुंबप्रमुख या नात्याने वडीलकेंद्रित असतात. मोठे व महत्त्वाचे निर्णय सोडाच; छोट्या-छोट्या गोष्टींच्याबाबतही आईचा वा घरातील अन्य जणांचे उत्तर – ‘वडील काय म्हणतात, त्याप्रमाणे करूया,’ असे असते. एकाधिकारशाही म्हणजे शिस्त नव्हे आणि मनमोकळी चर्चा म्हणजे अनागोंदी नव्हे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी, लहानांचे मतही ऐकून घ्यावे, असे वातावरण जाणीवपूर्वक घडवावे लागेल. ‘बालदपि सुभाषितम् ग्राह्यम्’ अशी म्हण आहे. मुलगा लहान का असेना, त्याला स्वत:चा वेगळा विचार मांडण्याची संधी मिळावयास हवी आणि तो विचार योग्य असल्यास तो मान्यही केला जावयास हवा; तरच कुटुंबव्यवस्था समृद्ध व बळकट होईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याचे पाचवे कारण आहे व्यक्तींचे दैवतीकरण. सध्या समाजामध्ये अभिमानाची जागा अस्मितेने, अहंकाराने आणि अभिनिवेशाने घेतली आहे. अशा वातावरणात कोणतीही चिकित्सा करणे अवघड होऊन बसते. कारण चिकित्सेचा अर्थ संबंधित व्यक्तीचे आणि विचाराचे जाणून-बुजून केलेले अवमूल्यन असा घेतला जातो. याबाबत समाजाची भूमिका दिवसेंदिवस अधिकाधिक संवेदनशील आणि हिंसक होत चालली आहे. पुन्हा प्रत्येकाची दैवते वेगळी असतात. यामुळे कशाला वाद म्हणून व्यक्ती, श्रद्धास्थानांचे अन्य विषय यांची चिकित्साच टाळली जाते. काही व्यक्ती, विचार, घटना यांना असे दैवतीकरण बहाल केले की, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे अवघड होते.
या सर्वांबरोबरच आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे, समाजजीवनाची घडी पुरोगामी विचारांच्या सहाय्याने बसवणार्या वा बसवू इच्छिणार्या राजकीय शक्तींचा अभाव अथवा अपुरेपणा. समाजजीवन सर्व पातळ्यांवर तपासणे, त्याचे मूल्यमापन करणे आणि ते बदलणे यासाठी कार्यरत असणार्या पुरोगामी शक्ती समाजजीवनात बळकट व प्रभावी असतील, तर वैज्ञानिक दृष्टिकोन लवकर पसरू शकतो. धर्म, रुढी, परंपरा यांना आपल्या समाजात आधीच पावित्र्य आणि सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. रुढी कालबाह्य व निरर्थक असेल, परंपरा शोषणावर आधारित असेल, तरीही त्याबाबत तपास करणे आपल्या जनमानसास रुचत आणि पचत नाही. अन्यथा होळीसारखी प्रचंड लाकडाचा व पुरणपोळीसारख्या खाद्य पदार्थांचा नाश करणारी, बीभत्स शिव्या देणे आणि बोंब मारणे यांना प्रतिष्ठा देणारी प्रथा आपल्याकडे आधुनिक काळात टिकूच शकली नसती; परंतु बहुधा सर्व रुढी-परंपरांचे प्राबल्य अजूनही समाजात टिकून राहिलेले दिसते. ते प्राबल्य वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण होण्याचे कार्य दूरच ठेवते; परंतु ही परिस्थिती आता आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. लोकांच्या रुढी-परंपरा, श्रद्धास्थाने यांना गोंजारून त्याआधारे राजकारण करणार्या प्रतिगामी शक्तींचे बळ जनजीवनात वाढले आहे. यामुळे स्वाभाविकच वैज्ञानिक दृष्टिकोनाला अडचण निर्माण होते.