भारतामध्ये ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून काम करण्यासाठी सेरामपूर(कलकत्ता) सारख्या काही मान्यताप्राप्त ख्रिस्ती विद्यापीठाचीच धर्मशिक्षणाची पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. अशा जागतिक मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर धर्मगुरूच पुढे बिशप किंवा मॉडरेटर, आर्च बिशप म्हणून वरिष्ठ पदावर जातात. अशाच बिशप्सला नव्याने धर्मगुरू म्हणून नेमण्यात येणार्या नवीन पदवीधरांना धार्मिक दीक्षा देता येते व त्यांची वेगवेगळ्या सेवांसाठी किंवा चर्चसाठी नियुक्ती करण्यात येते. कॅथोलिक ऑर्थोडॉक्स, सीरियन ऑर्थोडॉक्स, मार्थोमा, अॅडव्हाँटिस्ट, साल्व्हेशन आर्मी, प्रेसबिटेरियन, अँग्लिकन, बाप्टीस्ट, मेथडिस्ट वगैरे अनेक पंथ गेल्या काही दशकांपर्यंत मुख्य प्रवाहातील(ऐतिहासिक) चर्च म्हणून ओळखले जात. याची शासकीय नोंदणी केली जाते.
निरनिराळ्या कारणांमुळे गेल्या काही दशकांत इव्हँजलिकल, पेंटीकॉस्टल चर्चेस उदयाला येत आहेत ज्यांना मुख्य प्रवाहाच्या बाहेरील नवीन विचारांचे चर्चेस/सहभागिता म्हणून ओळखले जात आहे, जेथे अशा प्रकाराच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवीचा अट्टाहास नसतो. शासकीय परवाने/नोंदणी बहुदा नसतेच. वेगवेगळ्या सामाजिक मान्यताप्राप्त व्यक्तींचे शिफारसपत्र गरजेचे नसते. ज्यामुळे समाजाचा व ज्ञान आणि विवेकाचा जो वचक अशा धर्मगुरू लोकांवर असणे गरजेचे असे, त्याला मोकळीक मिळाली. अनेक स्वयंघोषित धर्म गुरू/बिशप्स तयार होऊ लागले. सामान्य माणसाला यातले काहीच कळत नसल्याने देवाच्या व धर्माच्या नावात जे काही सांगितले जाते, तेच प्रमाण मानून तो स्वत:च्या व्यापातून सुटण्याचा प्रयत्न करतो.
सबॅस्टियन मार्टिनबद्दल हेच समजते की, धर्म क्षेत्रातील मान्यताप्राप्त पदवी त्याच्याकडे नाही. त्यामुळे धर्मतत्वांचा गैरवापर होणे साहजिक आहे.
आता बायबल(पवित्रशास्त्र) काय सांगते ते आपण पाहू.
सध्या ख्रिस्ती धर्मियांचे उपवास चालू आहेत, असे म्हटले जाते. या प्रथेचा संदर्भ यशया संदेष्ट्याचे पुस्तक 58 अध्याय 1 ते 12 या वचनात आहे. मात्र त्या तिथ्या आजच्या तारखांशी जुळत नाहीत. तेथे परमेश्वराचा हा संदेष्टा म्हणतो,
वचन 6 : ‘दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच परमेश्वराला पसंत असा उपवास नाही काय?
वचन 7: ‘तू आपले अन्न भुकेलेल्यांस वाटावे, लाचारांस व निराश्रीतांस आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, आपल्या बांधवांस तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल……’
वचन 10, ‘जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेलेल्यांस देशील, दु:खग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंध:कारात झळकेल……’
सदर वचने ही ‘जर…. तर’च्या भाषेतील आहेत. पूर्वी जे झाडपाल्याचे उपचार केले जात, ते बायबलने नाकारले नाहीत. शिवाय ‘शारीरिक जखमे’पेक्षा मानसिक, सामाजिक, धार्मिक जखमेबद्दल संदेष्टा बोलतो, हे संपूर्ण परिच्छेद वाचल्यावर जाणवतेच. (बीखा 6:13 मध्येही अशाच जखमेचा उल्लेख आहे, जी शारीरिक नाही.) पण हे लक्षात घेतले जात नाही. अशा वचनांचे अर्धवट वाचन व त्यावर अयोग्य प्रवचन यातून समाजाची दिशाभूल होते.
‘येशू ख्रिस्तानेही चमत्कार केले’ या नावाखाली हे प्रकार सर्रास चालवून दिशाभूल केली जाते. धर्माच्या चौकटीतूनच उत्तर द्यायचे तर,
1. ‘हे कोणास सांगू नका’, हे येशूने आवर्जून बजावले व प्रसिद्धी किंवा मोबदल्यापासून तो दूर राहिला.
2. त्याने मोठ्या जनसमुदायास, ‘मी आरोग्य देतो’ वगैरे म्हणून जगजाहीरपणे कधीच बरे केले नाही.
3. तेल, पाणी, रूमाल विकले नाहीत.
4. बायबलनुसार ज्यांना आरोग्य प्राप्त झाले ते परत त्याच आजाराने आजारी पडले नाहीत.
5. येशू स्वत: म्हणाला, ‘रोग्यास वैद्याची(डॉक्टराची) गरज असते, निरोग्यास नाही.’
म्हणजे येशूला वैद्यकीय सेवा मान्य आहे. जागतिक चर्च म्हणून येशूच्या कार्याला तीन सेवांमध्ये विभागतात. एक : प्रवचनाची सेवा, दोन : शिक्षणाची सेवा आणि तीन : आरोग्य दानाची सेवा. तिसरी सेवा लक्षात घेता चर्चने अनेक वैद्यकीय महाविद्यालये, दवाखाने, समुपदेशन केंद्र, मोकळ्या व स्वच्छ हवेसाठी व वातावरण बदलासाठी हिल स्टेशन्स/सॅनेटोरियम्स चालवली.
6. ‘आरोग्य देणे’ हे एक ‘दान’ (विशेष गुण) जर असेल तर येशू म्हणाला, ‘जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतो, तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी सभास्थानांत व रस्त्यावर आपणापुढे कर्णा वाजवितात, तसे करू नको. तर उजव्या हाताने दिलेले दान तुझ्या डाव्या हाताला कळू नये.’ (मत्तय 6:2 ते 4) त्याची गुप्तता राखली तरच तुम्ही धार्मिक, नाहीतर ढोंगी.
7. येशू म्हणाला, ‘मोहरी एवढा विश्वास जरी तुमच्यात असेल, तरी तुम्ही डोंगर हलवू शकता.’ येथेही शब्दश: ‘डोंगर हलवणे’ असाच अर्थ काढला जातो व चमत्कारांची पाठराखण केली जाते. आजपर्यंत कोणी असे डोंगर हलवल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे आपणात मोहरीच्या दाण्याएवढाही विश्वास नाही. मग असे आरोग्य देणे तर दूरची गोष्ट; शिवाय एकट्या सबॅस्टियन मार्टिनसारख्या माणसालाच का बरे देव असे दान देतो? बिशप, आर्च बिशप, पोप किंवा माझ्यासारख्या धर्मगुरूला का देत नाही? असे असेल तर सबॅस्टियन मार्टिन सारख्यांचीच ‘पश्चात्तापाची प्रार्थना’ देव ऐकतो, असा त्याचा अर्थ होतो. मग इतरांनी इमाने इतबारे चर्चला जाऊन किंवा ‘मानवतेचा धर्म’ पाळून काय फायदा?
एकीकडे देव सार्वभौम, सर्वव्यापी, अंत:करण ओळखणारा, वगैरे जर आपण म्हणतो व गरीब-श्रीमंत, पापी-पुण्यवान, काळे-गोरे वगैरे कसलाच भेद न करता सर्वांवर प्रेम करतो, तर फक्त सबॅस्टियनलाच त्याने सगळी दाने देणे अन्यायकारी आहे. सर्वांनीच मागावे व सर्वांना मिळावे. म्हणजे अशी दाने प्राप्त करून, नोकरीधंदा सोडून सर्व सरकारी दवाखान्यांतून सर्वांना अनेक जण बरे करतील.
अशा दानांवर विश्वास ठेवणार्या ख्रिस्ती माणसाने कुठल्याही वैद्यकीय सेवेत नोकरी करू नये. एकीकडे सरकारी/मिशनरी दवाखान्यांत नोकर्या करायच्या व दुसरीकडे देशाचे/देवाचे कायदे मोडायचे, हे कोठले ख्रिस्तीपण? कारण स्वत: येशू म्हणाला, ‘देवाचे ते देवाला दे आणि कैसराचे ते कैसराला दे.’ कैसराचे(देशाचे) कायदे सर्वांनाच माहीत आहेत. देवाचे कायदे सबॅस्टियन व अनुयायी कसे विसरले? “हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवाबरोबर राहून नम्रभावाने चालणे यावाचून देव तुजजवळ काय मागतो?” (मीखा 6:8) इतके साधे सोपे आहेत. ते पाळायला हे कसे विसरले? अशा लोकांनी स्वत:ही कधी वैद्यकीय औषधोपचार करून घेऊ नयेत. मुख्य चर्चचे सभासदत्वही सोडावे व त्याचे फायदेही सोडावेत.
8. जगात अनेक प्रकारची बायबल्स उपलब्ध आहेत. काही लिखाणांत येशू जन्माला आल्यापासूनचे चमत्कार विदीत केलेत. ते अंधश्रद्धांना वाव मिळू नये म्हणूनच बायबलमध्ये घेतले गेले नाहीत, याची माहिती अनेकांना नाही व ती जाणून घेण्याची इच्छाही नाही. जगातील सर्वच बायबल्ससुद्धा सारखी नाहीत. पंथ, उपपंथानुसार त्यात अनेक तफावती आढळतात. नवीन संशोधनानुसार, सर्वच उपलब्ध माहिती बायबल म्हणून छापली तर अशी 100 पेक्षा जास्त बायबल तयार होतील. मग त्यातले काय काय स्वीकारणार व पाळणार?
9. जुन्या करारातील (यहुदी धर्मशास्त्रातील) सर्वच नियम येशूने बाजूला सारले व ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर (जात, धर्म, प्रांत, वंश याचा येथे विचार नाही तर केवळ मानव असा त्याचा अर्थ आहे.) प्रीती कर’ येथपर्यंतच नियम आणून ठेवले. दरवेळेस खुर्ची बुक करण्यासाठी 300 रुपये गरिबांकडून घ्यायचे ही कसली सेवा? शिवाय उशिरा येणार्यांकडून दंड म्हणून आणखी रु.150 घेणे याला धर्माचरण कसे म्हणायचे? शिवाय स्वत:च्या आजारपणात ज्याला दवाखाना लागतो त्याने इतरांवरही ‘तशीच’ प्रीती करावी.
10. ‘इतरांनी तुझ्याशी जसे वागावे, असे तुला वाटते तसे तू इतरांशी वाग’ हे सांगताना येशू हेही म्हणतो, ‘…. जो कोणी मला अनुसरतो त्याने आपला वधस्तंभ उचलावा व मला अनुसरावे.’ (मत्तय 17:24) म्हणजे मरणाला घाबरणार्या माणसाने माझा मार्ग स्वीकारू नये.
जर सबॅस्टियन स्वत:ला येशूचा अनुयायी समजतो तर ‘अटकेला’ इतका का घाबरला. येशूचे अनेक शिष्यही तुरुंगात गेले होते. पण ते ना घाबरले, ना पळवाट शोधण्यासाठी आजारी पडले. तुरुंगातील आजार्यांना बरे करण्याची किती छान संधी सबॅस्टियनला होती! पण राजकीय लोकांसारखा तो स्वत:च दवाखान्यात दाखल झाला. असा माणूस दुसर्यांना कसे बरे करणार?
11. ज्या फार महत्त्वाच्या व मुख्य आज्ञा मानल्या जातात त्या दहा आज्ञांमधील चार आज्ञा सबॅस्टियनच्या फसवणुकीने मोडल्या जातील :
1) देवाचे नाव व्यर्थ घ्यायचे नाही(निर्गम 20:7). ढोंगीपणासाठी देवाचे नाव घेतले जाणे म्हणजे आज्ञा मोडणेच आहे. 2) फसवणूक झालेल्यांपैकी कोणी मेले तर हा ‘खून’ होईल. 3) फसवणूक झालेल्यांचे पैसे परत न देणे ‘चोरी’ होईल. कारण ‘खोट्या तागडी’चा देवाला वीट आहे. 4) त्याचे प्रसारक अशा गोष्टींचा प्रचार करून ‘खोटी साक्ष’ देत आहेत. शेजारी म्हणून ज्याच्यावर प्रेम करावे त्याच्या ‘द्रव्याचा लोभ’ धरत आहेत.
सारांश, धर्माची सर्वच वचने जर तंतोतंतपणे पाळली जात नाहीत, तर सोयीचीच का धर्माच्या व देवाच्या नावात पाळली जातात?
या वेळेस अनेक धर्माचे ठेकेदार सबॅस्टियनच्या समर्थनार्थ उभे राहिले. (यापैकी कोणीच धर्माचा रीतसर अभ्यास केलेला नाही.) त्यांच्या म्हणण्यानुसार ‘हे धर्मावर आलेले संकट आहे, या वेळेस आपला हा भाऊ कितीही चुकला तरी आधी त्याला सोडवणे गरजेचे आहे.’ अशा भावांना मला विचारावेसे वाटते, की आतापर्यंत अनेक निर्दोष ख्रिस्ती माणसांवर संकटे आली. माझ्यासारखीवर तर गेल्या 15 वर्षांत आपल्याच लोकांकडून दोनदा जीवघेणे हल्ले झाले. त्यावेळेस ही मदतीची भावना कुठे होती? मला एक महिला धर्मगुरू म्हणून मदत करता आली नसेलही. पण गुन्हेगारांना त्यांच्या चुकीचा जाब तरी विचारला का?
म्हणजेच यामागे काहीतरी स्वार्थ आहे. धर्माचा बाजार करणार्यांचा येशूलाही वीट आला व त्याने मंदिरातून त्यांना हाकलून दिले.
पण काय करणार? पाण्यापर्यंत घोडा नेता येतो, पाणी त्याचे त्यालाच प्यावे लागते ना!
-रेव्ह. चित्रलेखा जेम्स्
B. Sc., B.D., Dip. Software Packages,
Dip. Theology (Copenhagen University, Denmark)
संपर्क : 9960520484