अपघातात मित्राच्या आईचं निधन झाल्याचं कळालं आणि मी कोथरूडहून हडपसरला निघालो. वाटेत पाच-सहा मित्र-मैत्रिणींचे फोन आले- ‘कुठंयस, ठीक आहेस ना,’ अशी विचारणा करणारे. शेवटच्या एका फोनला मी विचारलंच ‘नक्की काय झालंय.’ त्यावर मैत्रीण म्हणाली, ‘शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त फोटो ‘पोस्ट’ केल्यामुळे तणावग्रस्त वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बसेसची तोडफोड करण्यात आलीय.’ मी फेसबुकवर बर्यापैकी सक्रिय असतानाही मला त्यावेळी या फोटोविषयी कल्पना नव्हती. वातावरण पेटलंय, अशी खबरही कुठे नव्हती. मित्राच्या आईचं निधन अपघातात झालेलं असल्याने पोलिस आल्याशिवाय बॉडी मिळणार नव्हती नि पोलिस व्यस्त होते तणाव आटोक्यात आणण्याच्या कामात. मी कसाबसा स्वारगेटला रात्री 2 वाजता पोचलो. एकही बस बाहेर सोडली जात नव्हती. भरदिवसा गर्दी असावी तशी गर्दी स्टॅन्डवर. लोक घाबरलेले होते. दुसर्या दिवशीही या तणावग्रस्त परिस्थितीची बातमी आली नाही. आणि पुढच्या दिवशी बातमी आली ती हडपसरमधल्या आय. टी. इंजिनिअर मोहसिन शेखच्या हत्येची.दोन दिवसांपूर्वी मी त्या ठिकाणाच्या अगदी जवळ होतो जेव्हा परिस्थिती तणावग्रस्त झाली, ज्या मोहसिनचा आणि दंगलीचा काहीही संबंध नव्हता, जो आपल्या हिंदू रूममेटला डबा आणण्यासाठी बाहेर गेलेला होता, ज्याला फेसबुक, व्हॉट्सअॅपवरच्या वादग्रस्त फोटोबाबत माहितीही नव्हती, तो निरपराध मोहसिन मारला गेला. त्याचा गुन्हा काय होता? त्याचा गुन्हा इतकाच होता की त्याच्या दिसण्यावरून तो मुस्लिम असल्याचे समजत होते. एका धर्मात जन्माला येणं हा त्याचा दोष होता. दाढी ठेवणं हा त्याचा अपराध होता. मोहसिनची हत्या झाली जून 2014 मध्ये. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना. यानंतर झुंडींनी हत्या करण्याचे सत्रच सुरू झाले.
झुंडींनी चालवलेले हत्यासत्र
भाजप बहुमतासह सत्तेत आल्यानंतर जमावाने केलेली पहिली हत्या मोहसिन शेखची. हिंदू राष्ट्र सेना या संघटनेचे कार्यकर्ते आरोपी म्हणून पकडले गेले. निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याकरिता धार्मिक ध्रुवीकरण करण्याची आवश्यकता भाजपला सातत्याने भासते आणि या ध्रुवीकरणाचा त्यांना सतत फायदा होत आल्याचे येल अमेरिकेतील विद्यापीठाचा अभ्यासही स्पष्ट करतो. बिहार निवडणुकांच्या पूर्वी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे मोहम्मद अकलाख याचीही जमावाने हत्या केली. अकलाखच्या घरी बीफ शिजवलं जातं आहे, अशी अफवा पसरवण्यात आली. शेकडोंचा जमाव त्याच्या अंगावर चालून आला आणि त्याची हत्या करण्यात आली. दादरीची घटना सर्वाधिक चर्चिली गेली. मीडियामध्ये या घटनेचं रिपोर्टिंग झालं. या घटनेमध्ये जे आरोपी होते ते स्थानिक भाजप नेत्याचे नातेवाईक होते. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर, केंद्रीय सांस्कृतिक महेश शर्मा यांनी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन केले. आरोपींना पकडण्याच्या ऐवजी जे मांस अकलाखच्या घरी शिजत होते ते बीफ आहे की नाही, ते तपासण्यासाठी पाठवण्यात आले. राजकीय नेतृत्वाने अशा हत्येचं समर्थन करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर काहीही भूमिका घेतली नाही. या सार्याचा निषेध म्हणून अनेक कलावंत-साहित्यिक यांनी आपले पुरस्कार परत केले. देशभरात वाढलेल्या असहिष्णुतेला विरोध केला गेला. यानंतरही राजकीय नेतृत्वाने ठोस अशी भूमिका घेतली नाही; उलट अशा प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला गेला. उधमपूरमधल्या ट्रक ड्रायव्हरला बीफच्या मुद्द्यावरूनच मारण्यात आलं आणि काश्मीरमध्ये प्रथमच बीफ हा राजकीय मुद्दा झाला. काश्मीरसारख्या आधीच चिघळलेल्या प्रश्नात वाढत्या जमातवादाने परिस्थिती तणावग्रस्त झाली. मार्च 2016 मध्ये झारखंडमध्ये लाटेहार इथं मोहम्मद मजलूम आणि इनायतुल्ला खान या दोघांना गायींचं स्मगलिंग करत असल्याच्या संशयावरून एका झाडाला लटकवून ठार मारण्यात आलं. आसाममध्ये अबू हनिफा आणि रियाजुद्दीन अली या दोघांना गाय चोरत असल्याच्या आरोपावरून झुंडीने ठार केलं. राजस्थानमधील अल्वर येथे पहलू खान या दूधविक्रेत्याला गायी घेऊन जात असताना मारण्यात आलं. त्याची व्हिडीओ क्लिप बनवण्यात आली. लाखो लोकांनी ही क्लिप पाहिली. त्यानंतर पहलू खानच्या हत्येबाबत संसदेत संसदीय कामकाजाचे राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, ‘अशी काही घटनाच घडली नसून मीडिया अफवा पसरवत आहे.’ उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये गुलाम मोहम्मद यांची हत्या करण्यात आली. सध्या मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आरोपी असल्याचे समोर येते आहे. मे 2017 मध्ये नईम, शेख सज्जू, शेख हलीम, शेख सिराज या चार व्यापार्यांच्या मुलांचं अपहरण केल्याच्या संशयावरून तथाकथित गोरक्षकांनी हत्या केली. त्याच सुमारास गौतम आणि विकास वर्मा, गंगेश गुप्ता या हिंदूंचीही जमावानं हत्या केली, गायींचा व्यापार करत असल्याच्या नि मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून. लातूरमध्ये युन्नूस शेख या पोलिस अधिकार्याला ‘जय भवानी’ म्हणण्याची जबरदस्ती करत झुंडीने मारहाण केली. मालेगावमध्ये दोन मांस विक्रेत्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती करत मारहाण करण्यात आली. झारखंडमध्ये ऐनुल अन्सारी इफ्तार पार्टीसाठी बीफ नेतो आहे, या संशयावरून जमावानं त्याची हत्या केली. तामिळनाडूतील सरकारी अधिकारी अधिकृत कागदपत्रांसह राजस्थानहून गायी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. काश्मीरमध्ये आयुब पंडित या डीएसपीची जमावानं हत्या केली. काश्मीरमधली परिस्थिती तर प्रचंड चिघळली आहे. आधीचे पेच; त्यात जमातवादासाठीच्या चिथावण्यांनी परिस्थिती भयावह झाली आहे. उघड्यावर शौच करणार्या स्त्रियांचे फोटो घेणार्यांना विरोध केला म्हणून कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता जफर हुसैन याला ठार मारण्यात आलं. यानंतर सोळा वर्षांच्या जुनैदची हत्या झाली, ट्रेनमध्ये तो मुस्लिम असल्याच्या कारणावरून. जुनैदच्या हत्येचं रिपोर्टिंग मोठ्या प्रमाणावर झालं. यंदाच्या ईदला डाव्या दंडात काळी फीत बांधून अनेक मुसलमानांनी या घटनेचा निषेध केला. ‘नॉट इन माय नेम’ या नावाने एक आंदोलन सुरू झालं. यात सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले. माझ्या नावावरून हिंसा नको, असे सांगत रस्त्यावर आले. दिल्ली, लखनौ, बंगलोर, मुंबई, पुणे अशा अनेक शहरांत लोक रस्त्यावर आले. या आंदोलनानंतर इस्त्राइल दौर्यावरून परतलेले मोदी प्रथमच या हत्येच्या विरोधात एक वाक्य बोलले साबरमती आश्रमात. याआधी गोरक्षेच्या नावावर धंदा सुरू असल्याचे विधान त्यांनी केले होते. मोदी म्हणाले, ‘गांधींच्या भारतात गायीच्या नावावर होणार्या हत्या चुकीच्या आहेत; पण भारत गांधींचा राहिला कुठं!’ मोदींच्या या विधानानंतर अवघ्या काही तासात झारखंडमधल्या रामगढ येथे अलिमुद्दीन शेखची हत्या करण्यात आली. एवढंच काय, अगदी जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात नागपूरमध्ये भाजपच्याच मुस्लिम कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. झुंड करत असलेल्या हत्यांचे सत्र भयानक आहे. गुजरातमधील उना इथे गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केला. दहाहून अधिक लोक जखमी झाले. जिग्नेश मेवानी या तरुण कार्यकर्त्याने याविरोधात मोठा आवाज उठवला. गुजरातमधील दलितांना दिली जाणारी वागणूक किती हीन दर्जाची आहे, याचे अहवाल आलेले आहेत. त्यातून आजही अस्पृश्यतेसारख्या गोष्टी पाळल्या जातात. पण याच ‘अस्पृश्य’ दलितांचा हिंदू राष्ट्रवादाचा अजेंडा रेटण्यासाठी वापर केला जातो. उनामधल्या दलितांवरील हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूरमध्ये ठाकूर-दलित दंगा सुरू झाला तो महाराणा प्रताप यांचा सन्मान करणार्या मिरवणुकीवरून. दलितांवर हल्ले करण्यात आले. अनेकजण गंभीर जखमी झाले, तर काहींची घरं जाळण्यात आली. ‘भीम आर्मी’चा प्रमुख चंद्रशेखर यालाच अटक करण्यात आली. परिस्थिती आणखी चिघळली. 2017 मधला मोदींचा भारत हा असा छिन्नविछिन्न, भवताल रक्ताळलेल्या डागांचा भेसूर चेहर्याचा आहे. वर उल्लेख केलेल्या लांबलचक यादीहून अधिक हल्ले आणि याहून अधिक व्यक्तींच्या हत्या झाली असण्याची शक्यता आहे. मीडियामध्ये रिपोर्ट झालेल्या या केसेस आहेत.
हिंसक झुंडीला राजाश्रय
अलिकडच्या काळात तुम्ही असा काही मुद्दा उपस्थित केला की हे काही आताच होत नव्हतं, पूर्वीही घडलेलं आहे, अशी एक मांडणी होत असते. नॅशनल क्राइम ब्युरो झुंडीने केलेल्या हत्यांचं वेगळं रेकॉर्ड ठेवत नसल्याने याविषयीची निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र ‘इंडिया स्पेंड’ यांच्या अभ्यासानुसार 2010 ते 2017 या कालखंडात झुंडीने केलेल्या हत्यांपैकी 97 टक्के हत्या या 2014 नंतरच्या आहेत. एकूण हत्यांपैकी 86 टक्के हत्या मुसलमानांच्या आहेत. झुंडींनी चालवलेलं हत्यासत्र हा मोदी आणि परिवार सत्तेत आल्यानंतरचीच घटना आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अर्थात, आकडेवारीपेक्षाही जे हिंसक जमातवादी वातावरण निर्माण केले आहे, त्याचे अनेक पुरावे समोर आहेत आणि अनेकजण या भीतीच्या सावटाचे, दहशतीचे साक्षीदार आहेत. 2014 नंतर असं काय घडलं की ज्यामुळे झुंडींना मोकळं रान मिळालं? नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून मुस्लिमांना दहशतीखाली ठेवण्याचं काम प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या सुरू आहे. भाजपला जो ऐतिहासिक विजय मिळाला, त्या विजयी 283 खासदारांमध्ये एकही मुसलमान खासदार नाही, हा पहिला अप्रत्यक्ष संकेत. मुस्लिमांना दुर्लक्षून, टाळून, त्यांच्या विरोधात थेट राजकारण करून आम्ही सत्तारूढ होऊ शकतो, हे दाखवण्यात भाजप यशस्वी झाला. त्यांना उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्येही प्रचंड मोठ्या विजयासह याची पुनरावृत्ती करता आली. भाजपच्या 312 विजयी आमदारांमध्येच काय, ज्यांना तिकीट दिले त्यातही एकही मुसलमान नाही. मोदी सत्तेत आल्यानंतर संघ परिवाराशी संबंधित संस्था-संघटनांनी डरकाळ्या फोडल्या. मुसलमानांनी दुय्यम नागरिक म्हणून भारतात राहावे इथपासून ते बॉलिवूडमधल्या ‘खान’ मंडळींचे सिनेमे पाहू नका, इथवर विधानं केली गेली. हिंदूंनी किती मुलं जन्माला घालावीत, याचे सल्ले देण्यात आले. मुस्लिमांना धडा शिकवण्याची गोष्ट केली गेली. ‘अब्दुल कलाम मुस्लिम होते;पण देशभक्त होते’ असं विधान सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केलं. त्यातून एका धर्मीयांच्या देशभक्तीविषयीचा संशय स्पष्ट व्यक्त केला गेला. साध्वी, बाबा, बुवा, योगी (जे नंतर मुख्यमंत्री झाले) या सार्यांच्या विधानांविषयी दररोज भाषण करणार्या मोदींना बोलावंसं वाटलं नाही. हनी सिंगच्या वाढदिवसाला ट्वीट करणार्या मोदींना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर निषेधाचा एक शब्दही उच्चारता आला नाही. यावरच्या त्यांच्या मौनाचा आवाज भाषणांपेक्षाही अधिक होता, आहे म्हणूनच झुंड हत्या करते. मारहाण करते. कॅमेरे असतानाही त्यांना भीती वाटत नाही. पोलिस असतानाही त्यांचा हात कचरत नाही. कोर्टरूमच्या समोर कन्हैय्या कुमारला मारहाण होते, पत्रकारांना मारलं जातं. गोरक्षक कायद्याला हरताळ फासत हिंसेचे थैमान घालतात. कधी ‘भारत माता की जय,’ कधी ‘जय श्रीराम’ तर कधी ‘जय भवानी,’ वेगवेगळ्या घोषणा देत झुंड हिंसेचे तांडव करते आहे. तिला भीती नाही. कारण सिंहासनांवर आरुढ झालेली मंडळी आपल्याला वाचवतील याची तिला खात्री आहे.मोहसिनच्या हत्येतील आरोपी हिंदू राष्ट्र सेनेतील असल्याचे समोर आले. अकलाखच्या हत्येतील आरोपींपैकी दोनजण थेट भाजप नेत्याचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशमधील गुलाम मोहम्मद यांच्या हत्येतील आरोपी योगी आदित्यनाथांच्या हिंदू युवा वाहिनीचे सदस्य असल्याचे वृत्त आहे. संघ-भाजप परिवारातील व्यक्तीच या कृत्यात सामील आणि सत्तेतही तेच; त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता किमान. त्यातून जमातवाद वाढत चालला आहे.
झुंडींनी चालवलेल्या हत्यांचं वेगळंपण
या झुंडींनी केलेल्या हत्यांविषयी मुद्दा उपस्थित होताच ‘खून, बलात्कार, चोर्यामार्या होत राहतात, यात वेगळं ते काय’, असा एक बालिश अज्ञानमूलक सवाल केला जातो. सर्व गुन्हे एकसारखे असतात, असं समजणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. झुंडींनी केलेल्या हत्या या सर्वसामान्य गुन्ह्यांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या उत्स्फूर्त नाहीत; पूर्वनियोजित आहेत. विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून केलेल्या या हत्या आहेत. एखादा खून होतो तेव्हा तो सर्वसाधारणपणे खासगी वैयक्तिक स्पेसमध्ये लपून केला जातो. खून करणार्याला आपण सापडले जाऊ, अशी भीती असते. आपण जे कृत्य करत आहोत, ते चुकीचे आहे, हे त्या व्यक्तीला अप्रत्यक्षरित्या मान्य असते. झुंडींनी केलेल्या हत्यांमध्ये ही भीती अजिबात नाही; उलट आपण योग्य आहोत, असा अरेरावीयुक्त अहंभाव आहे. खासगी आयुष्यात केलेल्या खुनात कुणाचे समर्थन मिळवणे, हा घटक नसतो. झुंड सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या डोळ्यांदेखत हत्या करते तेव्हा ती प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष समर्थन मागत असते, मिळवत असते. झुंड करत असलेल्या हत्येची मूक साक्षीदार असणारी व्यक्तीही हत्येच्या आरोपींपैकी एक असते. एखादा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा त्याचा निषेध सर्व स्तरातून होतो आणि सर्वांना हे मान्य असते की असे हल्ले निषेधार्ह आहेत; मात्र गोरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या हत्यासत्राचं समर्थन विशिष्ट वर्गाकडून खुलेआम होत राहतं. हमरस्त्यावरून आपला विखारी पदन्यास सादर करत हिंसा पुढच्या दाराने राजसत्तेच्या सिंहासनावर सार्वजनिक प्रतिष्ठेसह आरूढ होते, गौरवली जाते, हे भयानक चिंताजनक आहे.
‘क्राइम अॅन्ड कन्टेक्स्ट’ या ‘इंडियन एक्सप्रेस’मधील लेखात आशुतोष वार्शनी यांनी म्हटले आहे- झुंडींनी चालवलेल्या हत्यांच्या संदर्भात जगभरात दोन प्रकारचे प्रवाह दिसतात. एक- इंडोनेशियासारख्या देशात जिथे छेडछाड, बलात्कार, चोर्या करणार्या व्यक्तींची जमाव हत्या करतो. दोन- एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील श्वेतवर्णीय जमाव कृष्णवर्णियांच्या हत्या करत असे. भारतात आज दुसरा प्रवाह दिसतो आहे. माथं भडकलेल्या झुंडीने केलेल्या हत्यांच्या अभ्यासात भारत ही कधीच सॅम्पल केस नव्हती. आज सुरू असलेल्या या हत्यासत्रानंतर झुंडीने केलेल्या हत्यांच्या अभ्यासातलं भारत एक उदाहरण झाला आहे. भारताच्या बहुसांस्कृतिक बहुधर्मीय सहिष्णू परंपरेत मोठा खंड पडला असून हा सांधा जुळवायचा कसा, हा मोठा यक्षप्रश्न आहे.
मध्यमवर्गाची स्मशानशांतता
आजूबाजूला हे प्रचंड थैमान सुरू असताना कोणतीच वैचारिक भूमिका नसलेला, कशाशीच बांधिलकी नसलेला एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे. भवतालात काहीही घडो, हा वर्ग आपल्याच विश्वात मश्गुल असतो. मानवतेच्या शाश्वत मूल्यांप्रती कटिबध्द नसलेल्या भूल दिल्यासारखा हा संवेदनाहीन वर्ग रोम जळत असताना पार्ट्या झोडणार्या निरो राजासारखा, त्याच्या पाहुण्यांसारखा निव्वळ सुखवादी झाला आहे. परवा झुंडीने अकलाखला मारलं, काल गौतमला, आज आयुबला, उद्या कदाचित आपली वेळ असू शकते, हे देखील या वर्गाच्या गावी नाही. झुंडीला कुठे मेंदू असतो, तिला असतात सळसळणारे हात. विखाराने ओतप्रोत असलेल्या झुंडीला मोहसिनला किंवा पहलू खानला नसतेच मारायचे. तिचा खरा हल्ला असतो आपल्या विवेकावर, संवेदनशीलतेवर. आपली ही संवेदनाही मेली तर तो हल्ला यशस्वी होतो.
सर्वेश्वर दयाल सक्सेना यांनी एका कवितेत म्हटलंय-
यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो
तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो ?
यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रहीं हो
तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो ?
यदि हां, तो मुझे तुम से कुछ नहीं कहना है।
मध्यमवर्गाची ही दीर्घकालीन भोवळ समकालाचा गळा आवळणारी आहे. अगदी अलिकडेच एका शाळकरी मुलीने मला मॉब लिंचिंगचा (Lynching-झुंडीने केलेली व ठेचून मारलेली हत्या) अर्थ विचारला. भाषिक विकासात शब्दसंग्रह वाढणं हे चांगलंच;पण सार्वजनिक चर्चाविश्वाचा भाग झालेलं ‘लिंचिंग’ हे उद्याच्या पिढ्यांच्या भावविश्वाचा भाग असेल, त्या लालबुंद आसमंतात किमान आपल्याला आरशात पाहता यावं म्हणून आज याविरोधात लढायला हवं, नाहीतर उद्या कदाचित हे बोलायलाही आपण नसू!
-श्रीरंजन आवटे