Categories
संपादकीय

सायन्स काँग्रेसचे अभिनंदन!

मार्च - २०१८

देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या लोकविज्ञान चळवळीतील संस्था, संघटना व कार्यकर्तेयांच्या भुवनेश्वर येथे नुकत्याच भरलेल्या सोळाव्या ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स काँग्रेस’ या परिषदेत 20 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव व निर्धार करण्यात आला आहे. या निर्धाराबद्दल सायन्स काँग्रेसचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हार्दिक आभार मानीत आहे.

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या झाली. धर्मांध दहशतवादी संघटनांनी दाभोलकरांना जीवे मारण्याच्या धमक्या वारंवार दिल्या होत्या; परंतु या धमक्यांना न जुमानता, निर्भीडपणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे आणि बोगस गुरू, तांत्रिक-मांत्रिक यांचे बिंग फोडण्याचे आपले कार्य डॉ. दाभोलकर नेटाने करत राहिले. त्यांचे हे धैर्य धर्मांधांना सहन झाले नाही, त्यांचे विचार त्यांना खोडता आले नाहीत, म्हणून त्यांनी दाभोलकरांची हत्या केली.

सायन्स काँग्रेसचे अभिनंदन अशासाठी की, दाभोलकरांच्या या अपूर्व त्यागातून प्रेरणा घेऊन, संमेलनामध्ये प्रतिज्ञा करण्यात आली. छद्मविज्ञान, अंधश्रद्धा व धर्मांधतेविरुद्ध लढण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक गावात, शाळेत आणि शहरात पोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. हा निर्धार राष्ट्रीय पातळीवरच्या विज्ञानाबद्दल आस्था असणार्‍या संस्थेने केला, यांचे आम्हाला सर्वाधिक मोल वाटते.

सायन्स काँग्रेसच्या या निर्धाराद्वारे महाराष्ट्र अंनिसच्या लढ्याला बळ लाभेलच; पण अंधश्रद्धेविरोधी लढा सर्व भारतभर गतिमान होईल. भारतातील सर्व विवेकवादी नागरिक आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील विचारवंत या लढ्यात हातात हात घालून कार्यरत होतील. धर्मांधता वाढविणार्‍या शक्तींना एकटे पाडून त्यांना पराभूत करण्याच्या प्रयत्नांना यामुळे प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.

सध्या भारतात हिंदुत्ववादी विचारसरणी जोर धरत आहे. धर्म-निरपेक्ष लोकशाही समाजवादाला नख लावण्याचा प्रयत्न जोर धरीत आहे. भारत हे एकधर्मी राष्ट्र होऊ शकत नाही. हजारो वर्षेया देशात मिश्रसंस्कृतीचे लोक नांदत आहेत. त्यांचे वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे आचार आहेत. घटनेने त्यांना त्यांची जीवनपद्धती आचरण्याला व उपासना करण्याला त्यांच्या घरात पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. भारतीय समाज हा अनेक रंगांच्या पाकळ्या असलेल्या फुलासारखा आहे. हे वैविध्य असले, तरी विभिन्न जाती-धर्मांच्या लोकांनी शांततापूर्ण सहजीवनाच्या मार्गाने भारताची एकात्मता जपली आहे. या एकात्मतेला धक्का लागू नये व विविध जाती-धर्मांचा समतोल विकास व्हावा म्हणून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे. पण या वैज्ञानिक दृष्टिकोनाला गुंडाळून हे फक्त हिंदूचे राष्ट्र आहे, अशी विचारसरणी भारतीय समाजात फूट पाडून सामाजिक स्थैर्याला सुरुंग लावेल अशी परिस्थिती राज्यकर्ते निर्माण करू पाहत आहेत.

छद्मविज्ञानाचा प्रचार राज्यकर्तेच करू लागलेत. सर्व विज्ञान आमच्या धर्मग्रंथांत अगोदरच सांगितलं आहे, असा प्रचार ते करतात. बुवा-बाबांना अभय देऊन राजसिंहासनाजवळ मान देण्यासाठी राज्यकर्तेपुढं येतात. हे थांबवायचं असेल, तर लोकशाहीतील मतदानाच्या अधिकाराचे शस्त्रच उपयोगी पडेल. यासाठी भारतीय नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मोठी जनचळवळ उभारावी लागेल. या चळवळीसाठी सायन्स काँग्रेसच्या निर्धाराची आपणाला मोठीच मदत होईल. 20 ऑगस्ट हा दाभोलकरांचा स्मृतिदिन राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करणार्‍या सायन्स काँग्रेसचे पुनश्च: अभिनंदन!