Categories
कार्याध्यक्षांची डायरी

20 जुलै ते 20 ऑगस्ट अंनिसचे राज्यव्यापी ‘जबाब दो’ आंदोलन

जुलै - २०१७

माननीय साथींनो,

नेहमीप्रमाणे मागील महिना देखील धावपळीतच गेला. वाई मधील महाराष्ट्र अंनिसची अडीच दिवसीय विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक 2 ते 4 जून दरम्यान अत्यंत उत्साही सहभाग, संयोजनाने संपन्न झाली. त्यानंतर ‘नशामुक्त महाराष्ट्रासाठी’ महाराष्ट्र अंनिस आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्या एकत्रित पुढाकाराने महाराष्ट्रभर विभागीय पातळीवर बैठकांचं सत्र सुरू आहे. त्यामधील 7 जूनला ‘ग्रामगीता’कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज मोजरी आश्रमात विदर्भ पातळीवरची बैठक संपन्न झाली. विदर्भातील आठ जिल्ह्यांतून एकूण 57 कार्यकर्तेउपस्थित होते. पुढे कोकणातली बैठक 9 जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील गोपुरी आश्रमाच्या पुढाकाराने झाली. सर्वोदयी विचारांना वाहिलेला, विनोबांच्या वास्तव्याने बहरलेला हा परिसर आहे. रात्रीचा मुक्काम मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विजय परबांच्या गावी.. खंबाळवाडी.. कोकणातलं पारंपरिक खेडं. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले.. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अजूनही मोबाईलला तेथे रेंज नाही.. त्या दिवशी वीज पुरवठाही गेलेला… शांत आणि निवांत. आधीच्या झालेल्या धावपळीत अचानकपणे लाभलेल्या या शांततेने खूप आनंद दिला. 10 जूनला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या आपल्या थांबलेल्या जुन्या शाखेला भेट दिली.. काही जुने आणि नवे असे सहकारी भेटले. राधानगरी तसं विशेष गाव आहे, राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं प्रसिद्ध राधानगरी धरण येथेच. शाखा नव्याने सुरु व्हावी अशी चर्चा झाली. त्यानंतर कोल्हापुरात येऊन निळूभाऊंच्या नवव्या स्मृतिदिनापासून म्हणजे 13 जुलैला करावयाच्या निळू फुले फिल्म सर्कलबाबत नियोजनाचे तपशील निश्चित करण्याची छोटी बैठक घेतली. सायंकाळी समविचारींसह मेहरून्निसा दलवाईंची आदरांजली सभा कोल्हापुरात झाली. 11 जूनला सातार्‍यात परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राच्या पुढाकाराने पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रस्तरीय नशामुक्त महाराष्ट्रासाठीची बैठक झाली. सततचे दौरे शारीरिक थकवा निर्माण जरूर करतात; पण कार्यकर्ते, सहकार्‍यांच्या प्रत्यक्ष संपर्कातून, संवादातूनच संघटनेची वीण घट्ट करीत असतात. एवढं सातत्याने फिरून देखील संघटनेची प्रत्यक्ष संवादाची भूक ही अपूर्णच राहते आहे, याची खंत वाटते.

गेल्या महिन्यात महाराष्ट्राने ठळकपणे नोंद घ्यावी अशा दोन घटना घडल्या. एक दु:खद आणि दुसरी समाधान देणारी. मेहरून्निसा दलवाईंचा मृत्यू ही दु:खद घटना आणि गरजवंत शेतकर्‍यांची कर्जमाफी ही समाधान देणारी बाब. दोन्हींबाबत माझ्या काही भावना आहेत. मेहरून्निसा दलवाईंच्या मृत्यूने मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचा प्रेरणास्रोत महाराष्ट्राने गमावला. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेद्वारे हमीद दलवाईंनी मुस्लिम समाजात सत्यशोधक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मेहरून्निसा दलवाईंनी अखंडपणे साथ दिली. ‘मी भरून पावले आहे…’ हे त्यांचं आत्मचरित्र वाचल्यावर त्यांच्याही जीवनाची दाहकता आपल्याला कळते. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या चळवळींच्या भावकीतलं संघटन आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्र अंनिसने गेल्या दोन वर्षांपासून बकरी ईदला रक्तदान शिबीर घेण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. यावर्षी बकरी ईदला – 2 सप्टेंबरला – संघटना तो मोठ्या प्रमाणावर घडवून आणेल. आता समाधान देणार्‍या गोष्टींचा उल्लेख म्हणजे गरजवंत शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा झालेला निर्णय. महाराष्ट्र अंनिसने आपल्या वाई येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीत शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचा ठराव केला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना, नेत्यांना बाजूला सारत सामान्य शेतकरी आक्रमकपणे पुन्हा एकदा यासाठी रस्त्यावर उतरला. अनेक गट, संघटना यात सक्रिय सहभागी झाल्याचे दिसते. प्रचंड असंतोषाचे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले, याचा विस्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने याबाबत चर्चा आणि नंतर मागण्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला. तरीही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींपासून शासन बर्‍यापैकी दूर आहे असेच म्हणावे लागेल. पण मला या आंदोलनाच्या निमित्ताने एका वेगळ्या मुद्याकडे आपणा सर्वांचे लक्ष वेधायचे आहे. सुरुवातीला निवेदने, बैठका, सभा, रास्ता रोको या प्रकारच्या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केले, केवळ दुर्लक्षच नाही तर या आंदोलनाची हेटाळणीही केली. मग पुढे हे आंदोलन चिघळले आणि हिंसक झाले. धान्य, भाजीपाला रस्त्यावर फेकण्यापासून तर जाळपोळीपर्यंत या आंदोलनाने रूद्र रूप धारण केले. तेव्हा शासनाने या आंदोलनाची दखल घेतली. महाराष्ट्र अंनिसने आजवर अनेक आंदोलने केलीत.. आणि मागील जवळपास 4 वर्षांपासून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी, शासनावर दबाव आणण्यासाठीही विविध सनदशीर मार्गाने आंदोलन सुरूच आहे. पण त्याची ठळकपणे नोंद घेतली जात नाही. म्हणजे सनदशीर मार्गाने जाणार्‍यांचं उपद्रवमूल्य नसलं की त्याकडे दुर्लक्ष करायचं किंवा सोयीने लक्ष द्यायचं. जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हाच नोंद घ्यायची, प्रतिसाद द्यायचा असं सध्या सुरू आहे. ही संसदीय यंत्रणेतील ‘असंवेदनशीलता’ कमालीची अस्वस्थ करते. यातून निराश होऊन कायदा हाती घेणं हे यावरचं उत्तर खचितच नाही.. तर याचं उत्तर आहे येथील लोकशाहीतील जबाबदार घटकसंस्थांना अधिक उत्तरदायी बनवणं.. त्यासाठीची लढाईदेखील दीर्घकाळ लढावी लागेल अशीच आहे. तरीही न थकता आम्ही येत्या 20 जुलैपासून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाला गती यावी, फरार आरोपींचा त्वरित शोध घ्यावा यासाठी ‘जवाब दो’ आंदोलन करणार आहोत. हा जवाब केवळ प्रशासनाकडून नकोय, तर लोकप्रतिनिधींकडूनही हवा आहे. त्यासाठी आखणी, नियोजन करण्यात आले आहे.

संघटनांतर्गत ‘भविष्यवेध 2025’ ध्येयनिश्चितीचं ब्रेन स्टॉर्मिंग सुरू आहे. महाराष्ट्र अंनिसचा भविष्यवेध घेतांना कामाची सघनता वाढविणे आणि त्याचवेळी वाढविस्ताराच्या संधीही घेणे, अशी दुहेरी कसरत आम्ही करू इच्छितो. संघटनेकडे एवढं बळ नक्कीच आहे. विशेषत: संघटनेतील तरुणाई यासाठी तयार आहे, असा मला विश्वास आहे. शेवटी एक आनंदाची बातमी सांगतो.. दिल्लीस्थित दिवंगत पत्रकार व पर्यावरणवादी कार्यकर्तेप्रफुल्ल बिडवई यांच्या स्मृती संस्थेकडून दिला जाणारा देशपातळीवरील दुसरा पुरस्कार यावेळी महाराष्ट्र अंनिसला मिळाला आहे. राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाची दखल घेतली गेली, याचं समाधान आहे. आपण नेता गमावल्यानंतरही संघटनेने कामाचा पोत आणि खोली तसूभरही कमी होऊ दिली नाही, उलट त्यात वाढच केली. याचं श्रेय कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेला व योगदानाला जातं. यासाठी वाई विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक अनेक अर्थांनी ऐतिहासिकच झाली. महाराष्ट्र अंनिस ‘भविष्यवेध 2025’ ची चर्चा पूर्ण एक दिवस चालली आणि बैठकीची विषयपत्रिका पूर्ण करण्यासाठी कार्यकर्तेरात्री पावणे बारापर्यंत बैठकीला बसून होते. कार्यकर्त्यांचे जबाबदारीपूर्ण वर्तन आणि संघटनेच्या सूचनेला व गरजेला प्राधान्य देणार्‍या संघटनेचा भविष्यकाळ केवळ उज्ज्वल नव्हे, तर त्याही पलिकडे जाणारा असणार आहे. असा जजबा हीच आपली शिदोरी आहे, या शिदोरीच्या बळावर आपण जरूर ऐतिहासिक कामगिरी करू. याचे आपण सर्व शिलेदार, भागीदार, साथीदार आहोत, ही आपल्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट आहे.

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, मअंनिस

संपर्क : 9422790610