Categories
फसवे विज्ञान बुवाबाजी

रेडिएशन पॉवरने पैसे ओढणारे भांडे : या फसवणुकीतून एका पैलवानाचा खून

एप्रिल - २०१८

मानवी दैनंदिन जीवन विज्ञानाने व्यापले आहे. त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीबरोबर आधुनिक बुवाबाजी फसवे विज्ञान वापरून वेगाने सुसाट धावत आहे. यात चुंबकीय उपचार बेड, मिड ब्रेन, रेडिएशन, धनभारित कंपने, वलये, तरंग, अशा क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. हे समाजापुढे आव्हान आहे. संत तुकारामांचे ‘मुखे बोले ब्रह्मज्ञान। मनी धन अभिमान।’ या अभंगानुसार धनदौलत, संपत्ती, सौख्य यांच्या अतिमोहाचा प्रभाव अविवेकी मनाला सैरभैर करून सोडत सर्वनाशाच्या दारात उभा करतो. “अति तिथं माती” ही म्हण खरी ठरवतो, याची प्रचिती पैलवान किशोर गायकवाड ता. कराड याच्या खुनाच्या प्रकरणी येते .

सांगली जिल्ह्यातील वांगी, ता. कडेगाव या गावी सर्जेराव यशवंत सावंत ऊर्फ बुवा महाराज, शिक्षण जेमतेम बारावी, स्वयंघोषित महाराज दरबार भरवीत, ‘रेडिएशन पॉवर पॉट’ या आधुनिक फसव्या विज्ञानाचा वापर करीत एका भांड्यात चुंबक लपवून चिल्लर भांड्यात आल्याचे दाखवून दुसर्‍याचे पैसे आपल्याकडे येण्यासाठी ‘रेडिएशन पॉवर तंत्र’ आहे, असे भासवून लोकांना फसवून शोषण करीत होता.

पैलवान किशोर गायकवाड हा आर. टी. ओ. एजंट वाळू व्यावसायिक म्हणून पुण्यात कार्यरत होता. त्याने अति मोहापायी वेळोवेळी बुवा महाराज सावंत यास 11 लाख रुपये दिले व रेडिएशन पॉवर पॉट वापरले; पण कालांतराने काहीच उपयोग होत नाही, हे उमजल्याने त्याने महाराज सावंतला पैसे परतीचा तगादा लावला. वारंवार होणार्‍या मागणीला, धमकीला बुवा त्रासला आणि त्याने कट रचून पैलवान किशोर गायकवाड याचा खून केला. मृत देह विशाळगड परिसरात टाकला व मृताची स्कॉर्पिओ गाडी दुर्गम भागात सोडली. मृताचा मोबाईल वेगवेगळ्या शहरात फिरवला व किशोर जिवंत आहे, असे पोलिसांना भासवले. शांत डोक्याने बुवाने आठ महिने खून पचविला.

एल. सी. बी. सातारा यांनी आधुनिक बुवा महाराज सावंत व त्याचे साथीदार देसाई, शिंदे यांच्या मुसक्या आवळल्या. या व अशा प्रकारात ‘जादूटोणाविरोधी कायदा 2013’ अंतर्गत कार्यवाही होऊ शकते.

‘बक ध्यान धरी। सोंग करुनी मासे मारी।’ या अभंगानुसार समाजात असे बगळे खूप फैलावत आहेत. फक्त भंगलेली, तंगलेली, खंगलेली माणसेच बुवांच्या आहारी जातात असे नाहीतर मोह, स्वार्थ माणसाच्या जीवांवर बेततात. फसवे विज्ञान सर्वस्व नष्ट करते.

चला, ‘विवेकवादी, अहिंसवादी, नीतिवान, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाजनिर्मितीच्या कामात सहभागी होऊयात.’

– डॉ. दीपक माने, सातारा