अनेक सामाजिक कार्यात अनेक वर्षे हिरिरीने काम करणारा व प्रसिद्धीपासून दूर राहणारा असा मिलिंद हा कार्यकर्ता. अलिबागमध्ये राजकारणाचा पिळ असणारी अनेक माणसे दिसतात; पण मिलिंद सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांशी समान जवळीक ठेवणारा एक दुर्मिळ माणूस ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अलिबाग शाखेमध्ये हा बिनीचा शिलेदार होता व संघटनेच्या कौटुंबिक सहली, मेळाव्यात बायको-मुलांसह सहभागी होई. त्यामुळेच दु:खातही विचारांवर ठाम राहण्याचे बळ त्याला मिळाले. जेएसएम कॉलेजच्या एनएसएस शिबिरात माझे व्याख्यान ऐकून तो मअंनिसशी जोडला गेला होता व अनेक वर्षे शाखेत पद न घेता आवर्जून पडेल ते श्रमाचे काम करीत होता! होय, तो कधी विचारमंचावर बसायचा नाही; पण सतरंजी, खुर्च्या उचलण्यापासून चहाची किटली, चहा देणे, कप विसळणे ही कामे हिसकावून घ्यायचा! शाखा बैठकीत चहा, नाष्टा विषय निघाला की फुलगावकरबाई म्हणत, ‘ते मिलिंद मुळेंवर सोपवा;’ मग कार्यक्रमाचे, नाटकाचे बॅनर्स लावणे, तिकीट-विक्रीपासून हॉलवर तयारी करायची असू दे, मिलिंद सर्वांच्या आधी हजर असे. कार्यक्रम, रॅली वगैरेसाठी पोलिसांत, कलेक्टर, नगरपालिका कार्यालयात अर्ज देणे, त्याचा पाठपुरावा करणे हे काम त्याने अंगावर घेतलेले असे.
31 डिसेंबरला अलिबाग शाखेने ‘द दुधाचा, द दारूतला नव्हे’ हा दारूच्या दुकानाजवळ ठळक कार्यक्रम केला. ते सर्व मिलिंदमुळे घडून आले. आम्ही फक्त बॅनर घेऊन घोषणा दिल्या; पण ती स्पेशल किटली, दूध विकत घेणे, कप, स्टूल, डस्टबीन व महत्त्वाचे म्हणजे बायकोला दूध गरम करायला सांगितले व ते गरम दूध स्वत: घेऊन येत होता. मी त्याला म्हणालो, ‘मिलिंद कशाला घरात त्रास? आपण बाहेरून गरम दूध घेऊ.’ तर म्हणाला, ‘अंनिसचे काम करायला तिला खूप आवडते.’ मग दोन तास ‘खाऊ नका गुटखा -पिऊ नका बीअर’च्या मोठमोठ्याने घोषणा मिलिंद देत होता. त्यातही मला प्लास्टिकचे कप चालणार नाहीत, हा त्याचा आग्रह म्हणून कागदी कपातून दूध वाटप झाले. दुसर्या दिवशी सकाळी त्याचा फोन आला, ‘राऊत सर, मोघे खानावळचे मालक यांनी किटलीचे भाडे माफ केले.’ मोघे म्हणाले, ‘अंनिसने चांगला उपक्रम राबवला, पैसे देऊ नका.’ इथे दुसरा कोण असता, तर ते पैसे घेऊन खिशात टाकले असते; पण इतका पारदर्शक होता मिलिंद. खरे तर सर्वांचाच मिलिंद गेला; पण मअंनिस अलिबाग शाखेचा आधारस्तंभ गेला; पण जाताना एक विचार देऊन गेला, ‘नेत्रदान करा, अंध व्यक्तींना हे जग पाहू द्या’ व ‘देहदान करा’ ज्यावर भावी पिढीसाठी तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करा. मिलिंद, खरंच तू देऊन गेलेल्या डोळ्यांनी दोन व्यक्ती हे जग बघत राहतील व आमचे पुढील कार्यही पाहतील. तुला आदरांजली, सोबत तुझ्या कुटुंबाला सलाम !!
–नितीनकुमार राऊत