Categories
आरोग्य

मासिक पाळी : मिथक कथा व गैरसमजुती

जुलै - २०१७

मानवनिर्मितीसाठी अत्यंत आवश्यक अशा जीवनशास्त्रातील ज्या एका स्वागतक्षम बदलाला आपल्या भारतीय धर्मप्रवृत्तींनी परंपरागत गैरसमजुतींच्या चौकटीत बंद करून ठेवले आहे, ती म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी, त्यातील काही गैरसमजुती पौराणिक व वैदिक काळातीलही आहेत. त्या अशा

1) एकदा देव शंकराच्या काखेत गळू झाले. त्या सतत वाहणार्‍या जखमेच्या त्रासाचे संकट पार्वतीने स्वत: स्वीकारले. तेव्हा तिच्या पातिव्रत्याने प्रसन्न होऊन शंकराने तिला म्हटले की, ‘तुला ही सतत वाहणारी जखम नेहमीच सांभाळावी लागणार नाही, तर प्रत्येक महिन्यास तीन ते चार दिवसांचा रक्तस्त्राव मात्र सहन करावा लागेल.

शंकराची जखम बरी होण्यासाठी पार्वतीला जन्मभर ताप? हा कुठला न्याय?

2) इंद्रदेवाने देवांचा गुरू असलेल्या बृहस्पतीला एकदा अपमानित केले. या पातकामुळे राक्षसांचा स्वर्गात शिरकाव झाला व त्यांनी स्वर्ग जिंकून घेतला. इंद्राचे राज्य, ऐश्वर्य संपुष्टात आले. जेव्हा इंद्राने ब्रह्माकडे आश्रय घेतला, तेव्हा ब्रह्माने त्याला एका ब्रह्मज्ञानी मुलाची सेवा करण्याने बृहस्पती प्रसन्न होतील, असे सांगितले. गुरुस्थानी असलेला हा मुलगा मातेकडून राक्षसकुळातील होता व राक्षसांसाठीच यज्ञयाग करीत होता. त्यामुळे संतापून इंद्राने या मुलाचा वध केला. या ब्रह्महत्येपासून व राक्षसांपासून वाचण्यासाठी इंद्राने तेथून पळ काढून एका फुलामध्ये आश्रय घेतला. तेथे एक लक्ष वर्षेतप केल्याने इंद्राची राक्षसांपासून सुटका झाली; परंतु ब्रह्महत्येचे पातक शिल्लक राहिले. ते त्याने जल, झाड, भूमी व स्त्री या चौघांत वाटून दिले. त्यासाठी या प्रत्येकाला वरदान दिले. पण ब्रह्महत्येच्या अंशामुळे सर्वांना काही ना काही शापही मिळाला. त्यामध्ये स्त्री व तिच्या संततीला शाप म्हणून महिन्यातून एकदा मासिक पाळीचा अनुभव घ्यावा लागतो.

पाणी, झाड, जमीन तशीच बाई, हे स्त्रीचे अवमूल्यन नव्हे काय?

3) या जगाची उत्पत्ती होण्याअगोदर मानववंशाचे आद्यअस्तित्व असलेले आदम व ईव्ह हे जोडपे स्वर्गीय नंदनवनात सुखी जीवन जगत होते. एकदा ज्ञानवृक्षाचे फळ खाण्याची लालसा ईव्हला झाली. तिच्या नंतर आदमनेही ते खाल्ले. त्यामुळे त्यांच्यामध्ये लैंगिक भावना जागृत झाली. या पातकामुळे त्यांना पृथ्वीवर यावे लागले. त्यामुळे ईव्हला पुढे दर महिन्याची मासिक पाळी व संततिजन्माच्या वेदना भोगाव्या लागल्या. लैंगिक भावनेतून नवनिर्मिती होणे, हे पाप कसे? हा कसला धर्म? धर्माने स्त्रीला अपवित्र समजून लादलेली बंधने तर कमालीची अन्यायकारी आहेत. याबाबतच्या काही पारंपरिक गैरसमजुती अशा

1) मासिक पाळीच्या काळात मुली व स्त्रियांना शहरी भागात देवघरात तर ग्रामीण भागात स्वयंपाकघरात प्रवेश नाकारला जातो. 2) या काळात मुली, स्त्रिया अपवित्र व अस्पर्श असतात. म्हणून त्यांनी देवाची प्रार्थना म्हणणे किंवा धार्मिक पुस्तकांना स्पर्श करणे निषिद्ध आहे. 3) मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी बनविलेले किंवा हाताळलेले खाद्यपदार्थ इतरांना हानिकारक असतात. 4) प्रथम मासिक पाळीच्या काळात घराबाहेर पडल्यास मुलींना भुताची बाधा होते. 5) या काळात मुलींनी दही, चिंच, लोणचे असे आंबट पदार्थ खाऊ नयेत, जे पाळी अनियमित करतात. 6) या काळात स्त्रियांच्या शरीरातून काही विशिष्ट गंध किंवा किरणे बाहेर पडतात, त्यामुळे साठवून ठेवलेले लोणच्यासारखे पदार्थ बिघडतात. 7) पाणी हे हिंदूंसाठी पवित्र आहे म्हणून मासिक पाळीच्या अपवित्र काळात मुली, स्त्रियांनी आंघोळ करायची नसते. 8) या काळात घरात वेगळ्या ठिकाणी बसून राहावे. इतर कोणालाही स्पर्श केल्यास तेही अपवित्र बनतात. 9) या काळात गायीला स्पर्श केला, तर ती भाकड बनते. 10) काही भागात अशी समजूत आहे की, मासिक पाळीच्या स्त्रावावर काळी जादू करून त्या स्त्रियांना अपाय करता येतो. 11) हा स्त्राव वापरून स्त्रिया एखाद्या पुरुषाकडून आपली इच्छा पूर्ण करून घेऊ शकतात.

वरील सर्व गैरसमजुती पूर्णत: अवैज्ञानिक आहेत.

मासिक पाळीचे शरीरविज्ञान

स्त्री शरीरशास्त्रानुसार मुलींमध्ये सामान्यत: 11 ते 14 या वयोगटात घडून येणारी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रथम प्रक्रिया आहे. दर महिन्यास साधारण 21 दिवसांनंतर त्यांच्या शरीरातील बीजकोष, जननपेशी व गर्भाशय यांच्यात काही स्थित्यंतरे घडतात. गर्भधारणा हेच याचे उद्दिष्ट असते. परंतु ही गर्भधारा झाली नाही, तर बीजकोष फुटून बाहेर आलेल्या स्त्रीजननपेशीबरोबर गर्भाशयात तयार झालेले रक्तयुक्त अस्तर सुटून तोच मासिक पाळीचा स्त्राव म्हणून बाहेर पडतो. ही पुन्हा पुढील गर्भधारणेसाठीची पूर्वतयारीच असते. तेव्हा मासिक पाळीसंबंधीचे वास्तव जाणून घेतल्यानंतर तिचे स्वागत व स्त्रीच्या आरोग्याचे रक्षण करणे, हेच अपरिहार्य ठरते. अर्थातच, पुराणकाळातील दाखले आता फोल व निरर्थच, तसेच पारंपरिक गैरसमजुती आता पालबाह्य वाटायला हव्यात. कारण आपल्याच समाजातील मुली, स्त्रियांसाठी त्या बंधनकारक व जाचक वाटतात. शिवाय त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी त्या घातक आहेत. म्हणून त्याविरुद्ध वैयक्तिक; तसेच सामाजिक पातळीवर काही धोरणे राबविली गेली पाहिजेत.

1) किशोरवयीन मुली; तसेच स्त्रियांनी मासिक पाळीसंबंधीचे शास्त्र समजून घेतले पाहिजे. त्यायोगे उत्पत्ती करण्याची शक्ती ही निसर्गाकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट आहे, हे जाणून त्यांनी अभिमान बाळगावा व त्याची योग्य ती काळजी घ्यावी. पाळीच्या प्राथमिक काळात व पाळी थांबताना काही त्रास असेल, तर त्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीबाबतीतील गैरसमजांविरुद्ध प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. 2) मासिक पाळीविषयीची बंधने घरातल्या पोक्त मंडळींना नाकारता येतील. त्यामुळे घरातील पत्नी, कन्या, सून यांना मुक्त, आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद घेता येईल. 3) मासिक पाळीसंबंधीची सामाजिक, पारंपरिक बंधनांची खोलवर रुतलेली मुळे नष्ट करण्यासाठी पुरुष सहकार्‍यांच्या सहभागाची गरज आहे. मासिक पाळीसंबंधीचे सखोल ज्ञान व शिक्षकांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ते आपल्या पत्नी, माता, भगिनी, विद्यार्थिनी, स्त्री कर्मचारी आणि स्त्री सहकारी यांना याबाबत सकारात्मक आधार देऊ शकतील. 4) फॅमिली डॉक्टर्सनी मासिक पाळीविषयी स्त्रियांच्या परिवारातील सदस्यांचे प्रबोधन करावे व पाळी लांबवण्याच्या गोळ्यांची शिफारस करू नये. 5) प्रायमरी केअर फिजिशियन्सनी त्यांच्या भागातील मासिक पाळीविषयीच्या प्रचलित गैरसमजुतींशी पूर्ण परिचित असणं आवश्यक आहे आणि त्याविषयी संबंधित व्यक्तींशी समक्ष बोलून त्यावर योग्य उपचार केले पाहिजेत. 6) किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेणारी जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक आरोग्य विभागाचे अधिकृत कार्यकर्ते आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत ही मोहीम राबविता येते. मासिक पाळीसंबंधीचे जीवशास्त्र ओळखून त्यांनी संवेदनशीलतेने कार्य केले पाहिजे. त्यामुळे त्यांना समाजामध्ये या ज्ञानाचा योग्य प्रसार करता येईल. 7) किशोरवयीन मुलींना आधार देणारी व आरोग्यसेवा पुरविणारी चिकित्सालये यांनी याबाबत बोलण्यासाठी प्रशिक्षित वर्ग नेमला पाहिजे. 8) पाणी व स्वच्छता याविषयीच्या योजना आणि शारीरिक संरक्षणाचे अनेक घटक हे आरोग्याविषयीच्या शिक्षणाशी व प्रजननाच्या आरोग्याविषयीच्या कार्यक्रमांशी जोडले गेले पाहिजेत व त्यायोगे त्यांच्या सर्व बाजूंवर संबंधित समाजाशी बोलता आले पाहिजे. 9) मासिक पाळीतील स्वच्छता सुधारण्यासाठी भारत सरकारने 2010 सालापासून ‘नॅशनल रूरल हेल्थ मिशन’ या मोहिमेद्वारे ग्रामीण भागातील 1.5 कोटी किशोरवयीन मुलींना कमी खर्चातील सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्याची योजना मंजूर केली आहे. तरीसुद्धा स्थानिक पातळीवर कमी खर्चात सॅनिटरी नॅपकिन्स तयार करून ती ग्रामीण व झोपडपट्टी भागात वाटली जाऊ शकतात. 10) मासिक पाळी, अपत्य जन्माला घालणे, कुटुंबनियोजनाच्या साधनांचा वापर, नसबंदी, गर्भपात, मासिक पाळीच्या काळातील जाचक बंधने अशा निसर्गाने; तसेच पुरुषवर्गाने बहाल केलेल्या जबाबदार्‍या फक्त स्त्रीलाच सांभाळाव्या लागतात. तेव्हा यातील कोणकोणत्या बंधनातून तिला मुक्त करता येईल, याचा सारासार विचार पुरुषवर्गानेच करावा.

स्त्रीसुद्धा माणूस आहे, याबद्दलची संवेदना जागी ठेवणे हे पुरुषयवर्गाचे कर्तव्य नाही का?

आशा धनाले

मोबा. 9860453599