कल्पना चावला ‘नासा’ या अंतरिक्ष क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्थेत निवड झालेली वीरांगना. अवकाशातून भ्रमण करीत असताना तिने समस्त पृथ्वीवासियांना एक वाक्य ऐकविले. ती म्हणाली, ‘ही पृथ्वी बघताना मला एकच वाटते, हे संपूर्ण ब्रह्मांड माझे घर आहे.’ जात, धर्म, लिंग भेदाच्या पलिकडे नेणारे हे उद्गार आपणा सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.
आठ मार्चला ‘महिला गौरव दिन’ आहे. हा दिवस जगभर महिलांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. भेदाभेद, अन्यायी रुढी, पुरुष वर्चस्व अशा विविध अडथळ्यांना ओलांडून आधुनिक स्त्री विविध क्षेत्रात मोठमोठ्या जबाबदार्या सांभाळताना दिसते. कल्पना चावला हे अंतराळ क्षेत्रात कर्तृत्व गाजविणार्या तरुणीचे प्रतीकात्मक उदाहरण ठरेल. चूल आणि मूल एवढ्यापुरतंच सीमित राहून चार भिंतीच्या आत वावरणार्या भारतीय स्त्रियांना घटनेने सर्व क्षेत्रांत संचार करण्याचे पंख दिले. सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविण्याचा हक्क दिला. घटनेतील या अधिकाराचा वापर करून भारतीय स्त्रिया विविध क्षेत्रात वावरू लागल्या. त्या प्राध्यापक बनल्या, डॉक्टर झाल्या, प्रशासन अधिकारी म्हणून काम करू लागल्या. बस, रेल्वे आणि विमान चालवू लागल्या. एवढंच नव्हे, तर अंतराळात भरारी घेऊन पृथ्वीवासियांना संदेश देऊ लागल्या. ‘समुच्च ब्रह्मांड मेरा घर है।’
स्त्रीकर्तृत्वाला सलाम करताना राजकारण, शिक्षण, उद्योग, क्रीडा आणि कला अशा विविध क्षेत्रात स्त्रिया चमकू लागल्याचे समाधान आहे. विज्ञानाचा प्रसार आणि लोकशाहीचा स्वीकार यामुळे स्त्रियांना व्यक्तिमत्त्व विकासाचे स्वातंत्र्य मिळत गेले. पण स्त्रियांना हे स्वातंत्र्य अगदी अलिकडे मिळालं आहे. प्राचीन काळापासून स्त्री-पुरुष समतेचा विचार रुजेपर्यंतच्या काळात किती स्त्रियांची प्रतिभा आणि कर्तृत्व मारलं गेलं असेल, त्याची कल्पनाही करवत नाही. पण या समतेच्या काळातही अजून स्त्रियांवरील अन्याय पूर्णपणे कमी होताना दिसत नाही. अजूनही स्त्रियांना त्यांच्या एकत्र कुटुंबात दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांना प्रॉपर्टीमध्ये हक्क दिला जात नाही. सात-बाराच्या उतार्यावर पत्नीचे नाव नसते. तोंडी तलाकची क्रूर प्रथा अजूनही थांबत नाही. स्त्रियांची सुंता केली जाते. स्त्री ही उपभोग्य वस्तू समजून तिच्यावर धावत्या बसमध्ये बलात्कार होतो. मुलींना मुलाबरोबर कुटुंबात समान वागणूक मिळत नाही. काही मंदिरामध्ये आणि दर्ग्यामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. ही यादी आणखी लांबविता येईल. एका भटक्या जातीत स्त्रीचे कौमार्य विवाहापूर्वी तपासण्याची क्रूर चाल आजही आढळते. अशा अन्यायातून स्त्रियांची सुटका करण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण मिळायला हवं. समाजातील सुजाण राज्यकर्त्यांनी आणि स्त्री-पुरुषांनी स्त्री-मुक्तीसाठी आवर्जून प्रयत्न करायला हवेत.
‘सर्व ब्रह्मांड हेच माझं घर’ असं म्हणणार्या कल्पनाला हा खरा सलाम ठरेल.