Categories
पुस्तक परिचय

परिवर्तनाच्या वाटेवरील काटे

फेब्रुवारी – २०१७

चंद्रसेन टिळेकर या ज्येष्ठ विज्ञानवादी कार्यकर्त्याचा ‘परिवर्तनाच्या वाटेवरील काटे’ हा लेखसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मुखपृष्ठावरील चित्रात सावित्रीबाई व जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परिवर्तनाचा रथ हाकताना दिसत आहेत व सनातनी, धर्मांध व प्रतिगामी यांच्या वाटेत अडथळे निर्माण करत आहेत.

समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती अनेकदा परिवर्तनाच्या प्रक्रियेला अडथळा ठरेल, असे वक्तव्य करताना दिसतात. या पुस्तकात अशा प्रतिष्ठितांचा समाचार घेण्यात आला आहे. या लेखसंग्रहाला शरद बेडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेचा संपादित अंश खाली देत आहे…

चंद्रसेन टिळेकरांच्यासारख्या एका विज्ञानवादी, वाक्पटू अन् सामाजिक कार्यकर्त्याने; किंबहुना ज्यांना कृतिशील समाजसुधारक म्हणता येईल, अशा व्यक्तीने माझ्यासारख्या केवळ लेखन-वाचन आणि विचारात रमणार्‍या (परंतु स्पष्टपणे निरीश्वरवादी असलेल्या) लेखकाला त्यांच्या ‘परिवर्तनाच्या वाटेवरील काटे’ या लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्यास सांगणे, ही माझ्या दृष्टीने मोठी आनंदाची बाब आहे. या वीस लेखांद्वारे टिळेकरांनी उघडलेल्या त्यांच्या विचार-कोठारात (किंवा विचार – वाटिकेत असं म्हणा) एखाद्या संथ झुळकीसारखे वाहणारे सुखद विचार तर आहेतच; पण त्यांची रोखठोक विचारपद्धती अन् भाषेमुळे अनेकदा त्यांचे विचार वादळरूप घेतात, हेही तेवढेच खरे! अनेकदा समाजातील दिग्गज असे वक्तव्य करतात की, ते परिवर्तनाच्या मार्गावरील धोंडे ठरावेत. या पुस्तकात अशा अनेक दिग्गजांचा समाचार घेतला आहे. या धोंड्यांना टिळेकर ‘परिवर्तनाच्या मार्गातील काटे’ म्हणतात.

डॉ. विजय भटकरांसारख्या ज्येष्ठ व प्रथितयश शास्त्रज्ञाने ‘ज्योतिष व प्लांचेट’ सारख्या भंकस अंधश्रद्धांना पाठिंबा द्यावा, ही विसंगती टिळेकरांना फार जाचते व त्यांना ते दोन्ही हात जोडून पत्र लिहितात. तसेच भारतातील मध्ययुगीन अन्यायकारक समाजरचना उखडून टाकण्यासाठी तिच्यावर घणाघात करणारे, वंचितांना व स्त्रियांना शिक्षण दिले जावे म्हणून समाजरणांगणी सर्वप्रथम शिंग फुंकणारे, समाजजीवनातील घातक रुढीप्रियता व सनातनी अंधत्व घालवून मानवतेचा प्रकाश दाखवणारे आद्यक्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांच्यावर स्वत:ला धार्मिक म्हणवणारे संघटितपणे आणि दुष्ट हेतूने जेव्हा चिखलफेक करतात तेव्हा टिळेकरांसारख्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या व्यक्तीने स्वस्थ बसणे शक्यच नसते. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली नाही तरच नवल!

अशा बुरसटलेल्या विचारांच्या व्यक्तींना, प्रतिगामी अन् धार्मिक संघटनांना कुणीतरी सांगितले पाहिजे की, आधुनिक जग ज्या विकासाच्या वाटेने जात आहे, त्याच वाटेने आमच्या राष्ट्राने जाणे हेच शहाणपणाचे आहे. दुसरी कुठलीही वाट धरणे हे राष्ट्रघातकीच ठरणारे आहे.

स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाला व तेथील देवपूजेला विरोध, त्यांना ‘त्या’ विशिष्ट चार दिवसांत अशुद्धच नव्हे, तर अपवित्र मानणे, वारीतील प्रचंड गर्दीच्या मानवी घाणीने पंढरपूरचा परिसर भरून जाणे आणि किंवा वारीत अनैतिक व अनिष्ट गोष्टी घडणे अशा कितीतरी अनुचित घटना टिळेकरांचे लक्ष वेधून घेतात; परिणामी त्या सर्व गोष्टींच्या विरोधात टिळेकरांची लेखणी सज्ज होते. ही सज्जता इथेच थांबत नाही, तर गुरू, बाबा, माता यांच्याकडून सर्रास त्यांच्या भाबड्या भक्तांची जी फसवणूक, पिळवणूक होते त्यांच्याही विरोधात ती उभी ठाकते. त्या संदर्भात ‘गुरूविना कोण लावील वाट’ हा लेख वाचण्यासारखा आहे.

पितृपक्ष चालू असताना (5 ते 23 सप्टेंबर 2014) भारताचे मंगळयान त्याच्या प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात होते. त्याने 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश गेला. सगळ्या जगाने भारताचे कौतुक केले. कारण इतर देशांना, अगदी अमेरिकेलाही पहिल्या प्रयत्नात जे जमले नव्हते. पण भारतीय जनता मात्र ‘पत्रिका जुळविणे’, ‘मुहूर्त पाहणे’, ‘शुभाशुभ पाहणे’ असल्या अशास्त्रीय गोष्टी करण्यात दंग होती, हे पाहून टिळेकर त्वेषाने लेख लिहितात, तो म्हणजे, ‘अज्ञानाची पंढरी उद्ध्वस्त झाली!’ श्राद्धासारख्या अंधश्रद्धेचे मूळ त्यांना धर्मग्रंथ समजले गेलेल्या पुराणात सापडते. उदा. कर्मपुराण, मार्कंडेय पुराण, आदित्य पुराण. या ग्रंथांची आणि ऋग्वेदाचीही निर्भत्सना या संदर्भात ते ‘श्राद्धाचे एक श्राद्ध’ या लेखात करतात.

साईबाबासंबंधी त्यांच्या लेखात टिळेकर प्रश्न विचारतात की, भारतासारख्या असंख्य धर्म, पंथ असलेल्या देशाने सर्वधर्मसमभाव जोपासला, तर त्यांचा विकास होईल की, धर्म-धर्मात बेबनाव घडवून आणून तो होईल?’ अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद आणि गीता समर्थित वर्णभेदाचे उच्चाटन, निष्फळ रुढी-परंपराविरोधी प्रबोधन किंवा एकूणच परिवर्तनी समाजसुधारणेला लोकांनी विरोध करणे हे महाराष्ट्र अन् भारतदेशीही काही नवीन नाही. अलिकडच्या असहिष्णु वातावरणातही ते होत असताना टिळेकर हे आपले विवेकी लिखाण व इतर माध्यमांतून प्रचार धारिष्ट्याचे चालूच ठेवतात, याबद्दल नवल करावे तेवढे थोडेच आहे.

असे आधुनिक विचार आपल्यासारख्या रुढी-परंपराप्रेमी समाजाला वारंवार सांगितल्याशिवाय ते समाजमनात रुजणार नाहीत, वाढणार नाहीत. त्यासाठी अर्थातच टिळेकरांनी आणि त्यांच्यासारख्यांनी असे लिखाण नेटाने केले, तर ते मराठीजनांच्या हिताचेच होईल, असे मला खात्रीपूर्वक वाटते.

शरद बेडेकर

पुस्तकाचे नाव – परिवर्तनाच्या वाटेवरील काटे

लेखक – प्रा. चंद्रसेन टिळेकर, मुंबई.

प्रकाशक व मुद्रक – उषा वाघ,

सुगावा प्रकाशन, 562, सदाशिव पेठ, पुणे.

दूरध्वनी (020) 24478263