Categories
जो.वि.नि

जोडीदाराची विवेकी निवड

सप्टेंबर - २०१६

अंधश्रध्दा निर्मूलन ते विवेकवाद या मोठ्या पटलावर संघटना चालवताना डॉ. दाभोलकर विवेकी समाजनिर्मितीचे स्वप्न पाहत होते. काळाच्या पुढच्या आव्हानांचा अचूक वेध घेत दूरदृष्टी बाळगणारे डॉक्टर तरुणांमध्ये लोकप्रिय होतेच; विवेकी समाजनिर्मितीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तरुणांचा सहभाग आणि त्यांची कृतिशीलता डॉक्टरांना जास्त महत्त्वाची वाटत होती. त्यांच्याच कल्पकतेतून तरुणाईशी संवाद साधत प्रबोधन करण्यासाठी ‘मअंनिस’च्या ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ या एका नवीन अभियानाची रूजवात झाली.

आजच्या झपाट्याने बदलत जाणार्‍या जीवनशैलीतून आणि जीवनमूल्यांतून समाजाला एका संक्रमण अवस्थेतून जावे लागत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह. या संकल्पनेभोवती असलेल्या रूढी, परंपरा, मानपान, अवाजवी खर्च, हुंडा, देणं-घेणं, कर्जबाजारीपणा यांमुळे अनेक सामाजिक प्रश्नही उभे ठाकलेले दिसतात. पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्राला ‘ऑनर किलिंग’ सारख्या भयाण वास्तवाचा डाग आहेच. नाशिकमधील आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या प्रमिला कुंभारकर या गर्भवती मुलीचा तिच्या वडिलांकडून झालेला खून, हे याच वास्तवाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. सामाजिक बहिष्काराच्या अनेक प्रकरणांमध्ये देखील तरुणांचा ‘स्वेच्छा आंतरजातीय विवाह’ हे एक कारण असल्याचे दिसते.

तसं पाहायला गेलं तर आपल्या समाजव्यवस्थेमध्ये सर्वांनाच लग्नसंस्थेविषयी भरप्ाूर आकर्षण असते. लग्नाळू मुलामुलींसह त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना हे आकर्षण जास्त असते. या आकर्षणात भर घालण्याचं काम प्रसारमाध्यमांकडून देखील होत आलेले आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच ब्रह्मदेवाने बांधलेल्या असतात, हा समज आहेच; पण अनेक मुली देखील देखणा राजकुमार घोड्यावरून येईल, अशी स्वप्न पाहतात; तर अनेकांना लग्न म्हणजे स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस वाटतो. ‘लग्नानंतर तडजोड केलीच पाहिजे,’ असं म्हणत ‘लग्न म्हणजे जुगारच,’ असे सल्ले देणारे जसे असतात, तसं गळ्यात पडलंय, ते निभवायला हवं’ पासून ‘पदरी पडलं पवित्र झालं,’ असं म्हणणारी जोडपी आपल्याला भेटतात. घटस्फोटांचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय असतो, त्याचवेळी ‘लग्न ः करार की संस्कार’ हे शोधताना ‘अरेंज मॅरेज’ करायचं की ‘लव मॅरेज’ हा गोंधळही दिसतो. ब्रह्मदेवाने बांधलेल्या गाठीचं दुसरं टोक तरुणांनी स्वतः शोधून काढलेलं असू शकतं, हे तितकंस अजूनही पचनी पडताना दिसत नाही. समाज चाकोरी सोडायला तयार नाही, तर तरुणांना कांदेपोहे खाण्यात आणि खायला घालण्यात रस नाही. मोकळ्या जीवन शैलीमुळे असेल; पण तरुणांची अनुरुपतेची व्याख्या बदलताना दिसते. वैचारिक जुळणी आणि सुरक्षा, सन्मान व समानता यांचा आग्रह तरुणांकडून वाढताना दिसतो; मात्र याबाबतीतला कौटुंबिक संवाद मात्र दिसत नाही. कुंडलीतले 36 गुण मनोमिलनाकडे लक्ष देत नाहीत, लग्नसमारंभासाठी केलेला वारेमाप खर्च कर्जाच्या बोजापालिकडे काही देत नाही. खोटया प्रतिष्ठेपायी सामाजिक दबावाला बळी पडल्याने विवाहाची यशस्विता वाढताना दिसत नाही. या सगळ्या प्रकारात ज्यांना परस्पर साथीने नातं फुलवायचं आहे, त्यांचाच विचार कुठं दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘मअंनिस’च्या या अभियानाचे महत्त्व जास्त उठून दिसते.

‘जोडीदाराची विवेकी निवड’ या संकल्पनेतील विवेकी हे विशेषण अतिशय जबाबदारीने वापरण्यात आलेलं आहे. डॉ. दाभोलकरांची यामागील भूमिका अतिशय स्पष्ट होती. जोडीदार निवडीनंतर येणार्‍या विवाहात विवेकाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसायलाच हवे. हुंड्याला नकार हवा, जन्मकुंडली आधारे स्वतःचा जीवनसाथी नक्की करणे, यातील फोलपणा समजून घ्यायला हवा, विवाहसोहळा शक्य तितक्या साधेपणाने करावा, किमान उभय बाजूंनी कर्ज न काढता विवाह साजरा करणे, याचे महत्त्व जाणले पाहिजे. जोडीदाराला कसलेही व्यसन नसावे, याचा आग्रह विशेषतः तरुणींनी दाखवायला हवा. यानंतर सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साथीदाराच्या जातीचा व धर्माचा! यामागे व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याचा पैलू तर आहेच, त्याहीपलिकडे जी जात आणि धर्म आपल्याला जन्मजात मिळतो, त्यात ना आपले काही कर्तृत्व असते, ना काही संधी. अशावेळी जोडीदाराची निवड करताना या निकषाला ओलांडून मानवतावादी दृष्टिकोन बाळगण्यासाठी तयार असणार्‍या तरुणांच्या मदतीसाठी ‘मअंनिस’ नेहमी सक्रिय व तत्पर असेल, अशी डॉ. दाभोलकरांची भूमिका होती.

‘मअंनिस’चे हे अभियान खरं तर जातिअंताच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्राला ज्या महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे, असे आपण म्हणतो त्यांनी या जातिव्यवस्थेवर कठोर प्रहार केलेले दिसतात. त्यांच्या योगदानामुळे रोटी व्यवहार जरी शिथील झालेले दिसत असले, तरी बेटी व्यवहार फारसा अजूनही रूळलेला दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील जातिअंतासाठी आंतरजातीय विवाह हा एक मार्ग असल्याचे म्हटले आहेच. तरीही समाजातून स्वीकारले न जाण्याची आणि हिंसेची भीती यामुळे अनेक तरुण-तरुणी पळून जाण्याचा मार्ग पत्करताना दिसतात. अशा मदत मागण्यासाठी येणार्‍या तरुणांचे समुपदेशन करत, त्यांना मार्गदर्शन करताना मुलाखत घेऊन संभाव्य जबाबदारीचे भान देत या तरुणांचा विवाह सत्यशोधक पदधतीने लावून देण्याचे काम समितीच्या लातूर शाखेकडून करण्यात येत आहे. असे 200 विवाह या माध्यमातून आजवर लावण्यात आले आहेत, हे विशेष. तरुणांना जोडीदार निवडीचे सन्मानपूर्वक स्वातंत्र्य मिळवून देत जातिअंताच्या लढ्यात त्यांना सक्रिय करण्यात ‘अंनिस’चे प्रधान सचिव माधव बावगे यांचा मोलाचा वाटा आहे.

आजची ‘टेक्नोसॅव्ही’ तरुणाई सगळ्यात जास्त सापडते, ती सोशल मीडियावर. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करत ‘मअंनिस’ या अभियानासाठी ‘व्हॉटसअ‍ॅप’चे देखील माध्यम प्रभावीपणे वापरते. तरुणांच्या संवादशाळा जोडीदाराची विवेकी निवड या ‘व्हॉटसअ‍ॅप’ समूहाच्या माध्यमातून घेतल्या जातात. विवेकी निवडीचे निकष, त्यामागील भूमिका, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांची मतं यांचा विचार करत एक प्रकारचे ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ या समूहातून देण्यात येते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील, विभागातील तरुण-तरुणी जोडल्या जातात, चर्चा घडवून आणल्या जातात. संसार आणि सहजीवन याचा मेळ घालत समानता तत्त्वाचा अंगीकार करणे आणि विवाहानंतर येणार्‍या नवीन जबाबदार्‍या, नवीन नाती यासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी म्हणून गेली नऊ महिने हा समूह कार्यरत आहे. हा वधूवर सूचक समूह नाही; मात्र जोडीदार निवडीचा विवेकी दृष्टिकोन मिळाला, तर स्वतःपासून परिवर्तनासाठी तयार होणारा तरुण या माध्यमातून नक्कीच घडू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरचा विजयकुमार माळी हा तरुण. समूहामध्ये चर्चांमध्ये सहभागी होणारा, आपली मतं ठामपणे मांडणारा, विजय कुटुंबियांच्या अनुकुलतेविषयी साशंक होता. हुंडा, मानपान, देणं-घेणं याला विरोध करण्यामागे त्याची ठाम भूमिका होती. लग्न साध्या पद्धतीने करण्याबाबत तो आग्रही होता; मात्र याच मुद्द्यावरून आई-वडिलांशी विसंवाद होता. सामाजिक बंधने आणि चालत आलेल्या रुढी सोडायला तयार नसलेल्या कुटुंबाला विजयचे म्हणणे अजिबात मान्य नव्हते. ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबाशी यशस्वी संवाद साधत मध्यम मार्ग काढला आणि आई-वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे जातीतील मुलीशी; मात्र काहीही देणं-घेणं न करता साध्या ‘सत्यशोधक पद्धती’ने या 7 ऑगस्ट रोजी तुळजापुरात हा विवाह संपन्न झाला. विजयच्या सासर्‍यांना देखील जावयाच्या अजब विचारांनी सुरुवातीला धक्काच बसला होता. समाजात कुठलं तोंड घेऊन जाऊ, हा प्रश्न विचारणार्‍या रडवेल्या सासर्‍यांना विजयने धीर दिला. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात शेवटी व्यक्तिपरिवर्तनाने होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या ‘व्हॉटसअ‍ॅप’ समूहातील असाच नवी मुंबईतील ‘अंनिस’चा कार्यकर्ता तुषार शिंदे याच समूहातील नागपूरच्या ‘बार्टी’ येथील समतादूत असणार्‍या नंदना गजभिये हिच्याशी गेल्या महिन्यात, 13 जुलैला सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाला. त्यांच्या या आंतरधर्मीय विवाहास आणि ‘सोशल मीडिया’वर जुळलेल्या विवाहास कुटुंबियांनी दिलेली साथदेखील तितकीच महत्त्वाची आहे. दोघांनीही लग्नाचा वाचलेला खर्च सामाजिक भान जपत संस्थांना देणगी स्वरुपात दिला, हे विशेष. अशा आगळ्यावेगळ्या पध्दतीने चालणार्‍या या उपक्रमास तरुणांचा प्रतिसाद उदंड आहेच; परंतु पत्रिकेला फाटा देत वैद्यकीय तपासण्यांचा आग्रह धरणारे, साधेपणाच्या विवाहासाठी तयार असणारे, पालकत्वासंदर्भात महत्त्वाचा विचार करत, एका अनाथ बाळाला दत्तक घेऊन, त्याला घर देण्याची इच्छा व्यक्त करणारे तरुण खर्‍या अर्थाने सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याच्या नांदीचे शिलेदार वाटतात.

तरुणांच्या इच्छाशक्तीला पालकांची साथ असेल, तर जास्त वेगाने बदल घडू शकतील, हे लक्षात घेत तरुणांसह पालकांसाठी देखील या उपक्रमांतर्गत संवादशाळांचे आयोजन केले जाते. या संवादशाळेच्या माध्यमातून पालक आणि तरुण यांच्या मनातील विवाहविषयक संकल्पना समजून घेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ का करावी, कशी करावी, सहजीवनासाठी आवश्यक बाबी कोणत्या, यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली की, ‘लग्न’ ही कॅज्युअली घेण्याची गोष्ट नसून विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे, हे पालकांसह तरुणांना देखील पटते, हा अनुभव आहे. पालक देखील त्यांच्या जात, धर्म याबाबतीतील आग्रहाचा गांभीर्याने विचार करू लागतात. सामाजिक दबावापेक्षा तरुणांचे निरामय सहजीवन व निर्णयामागील व्यावहारिकता किती महत्त्वाची आहे, हे पालकही कबूल करताना दिसतात.

दशकातील महत्त्वाचा कार्यक्रम यादृष्टीने या अभियानाकडे पाहत असताना आजपर्यंत दोन मोठ्या युवा संकल्प परिषदाही घेण्यात आल्या आहेत. लातूर आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी या परिषदांना मिळालेला प्रतिसाद पाहता राज्यभर तरुणांसाठी अशा संवादशाळांचे आयोजन करण्याचा ‘अंनिस’चा मानस आहेच.

‘मअंनिस’ला नुकतीच 27 वर्षे पूर्ण झाली. तरुण असलेल्या संघटनेला तरुणांचा प्रतिसाद लक्षात घेता, असं आवर्जून म्हणावसं वाटतं की, डॉ. दाभोलकरांनी विवेकी समाजनिर्मितीचे जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण होण्यासाठी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हे अभियान खूप महत्त्वाचे आहे. कारण विवेकी समाजनिर्मितीला कुटुंबापासून सुरुवात होते आणि लग्नासारख्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या बाबीमध्ये जे तरुण विवेक वापरतील ते कुटुंबात देखील परिवर्तन घडवू शकतील, याच अपेक्षेने समिती तरुणांसह विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद साधू इच्छित आहे. तरुणांचा आश्वासक प्रतिसाद खर्‍या अर्थाने डॉ. दाभोलकरांना आदरांजली आहे. विवेकाचा आवाज असाही बुलंद होऊ पाहत आहे.

-आरती नाईक

व्हॉट्स अ‍ॅप’वर विचार ‘शेअर’ झाले, सत्यशोधक पद्धतीने केला विवाह

दोघांची ओळख पुण्यातील एका कार्यशाळेत झाली. त्यानंतर ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमात भाग घेत यासाठी बनवलेला ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ त्यांनी जॉईन केला. गु्रपवर विचारलेल्या प्रश्नांची गु्रपवरच दोघांनी प्रामाणिक उत्तरे दिली. त्यातून विचार जुळत असल्याची जाणीव दोघांना झाली. लग्नापूर्वीच्या वैद्यकीय तपासण्या करून एकमेकांप्रती विश्वास वाढविला अन् नंतर पत्रिका, मध्यस्थ, कांदेपोहे या सर्व रुढींना फाटा देत आणि जात, धर्माच्याही भिंती तोडत दोघे विवाहबद्ध झाले. ‘जोडीदारांची विवेकी निवड’ या उपक्रमातील राज्यातील हा पहिलाच विवाह आहे.

आयुष्याचा जोडीदार निवडताना केवळ ‘दिसणं’ ही बाब महत्त्वाची नसते, तर दोघांचे विचारही जुळणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन ‘जोडीदाराची विवेकी निवड’ करण्यासाठी पनवेल येथील आरती आणि महेंद्र नाईक दांपत्याने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वधू-वर सूचक मंडळ सुरू न करता समचिवारी तरुण-तरुणींमधील संवाद ‘व्हॉट्स अ‍ॅप गु्रप’द्वारे वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहास इच्छुक किंवा विधी-परंपरांना फाटा देत विवाह करू इच्छिणार्‍यांसाठी हा गु्रप तयार करण्यात आला.

मूळचा रत्नागिरीचा तुषार शिंदे आणि नागपूरची वंदना गजभिये या दोघांचेही विचार याच गु्रपवर जुळले. सहजीवन कसे असावेे, रुढी-परंपरांना दिले जाणारे महत्त्व, देव आहे की नाही, मंगळसूत्र घालावे की नाही, अशा प्रश्नांची उत्तरे दोघांची जवळपास सारखीच होती. तुषार मराठा समाजाचा असून, मुंबई पोलीस आहे, तर बौद्ध समाजाची वंदना ‘बार्टी’त समतादूत म्हणून काम करते. तुषार लहानपणापासूनच विवेकी विचाराचा. देवधर्म, जातीपाती, रुढी-परंपरा यावर विश्वास नाही. त्याच्या या विचारांमुळे घरातील सदस्यांनाही त्याच्या विवाहाचे नवल वाटले नाही. जातीच्या भिंती तोडून विवाहबद्ध होत नाही, तोपर्यंत मला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही, असे त्याचे ठाम मत होते. वंदनादेखील समतेच्या चळवळीत वाढलेली. मातृ-पितृ छत्र हरपलेली वंदना काकांकडे वाढली. पण काका उच्च विचारांचे असल्याने तिची जडणघडणही त्याच पद्धतीने झाली. दोघांनी गेल्या 13 जुलैला सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. त्यात वाचलेला 50 हजारांचा खर्च त्यांनी नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान आणि नागपूरच्या श्रीकृष्ण शांतिनिकेतन या संस्थेस मदत दिला.