पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्रामध्ये आजही अनेक अनिष्ट रूढी, परंपरा जातवास्तव टिकून आहेत. “भारतीय राज्य घटने”नुसार कायद्याचे राज्य असताना जात पंचायत पूर्णत: बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. सध्या राज्यात जातपंचायतच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातील झारगडवाडी(ता.बारामती, जि.पुणे) येथील घटना अंगावर शहारे आणणारी आहे.
झारगडवाडी बहुतांशी वैदू लोकांचे राहण्याचे ठिकाण गावच्या सरपंचाच्या वार्डात येत असल्याने जातपंचायतचा पंच व गावचे सरपंच याचे संबंध छान होते. एकमेकांना पूरक होते. पीडित परिवारातील एका मुलाचे रितसर लग्न जमले. मात्र जमातीतील मुलगी असूनही पंचांनी मुलीला नापसंती दाखवली. पंचांचा विरोध डावलून लग्न केल्यामुळे परिवारास बहिष्कृत करण्यात आले. जातीतून बाहेर टाकण्यामुळे पीडित कुटुंबियांचे जीवन असह्य झाले. पुढे काही दिवसांनी या कुटुंबातील एका मुलीचे लग्न ठरले. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या पाहुण्यांना पंच शंकर शिंदे, मोतीराम शिंदे, मंगेश मासाळ, राहुल कुडाळे, मच्छिंद्र घोरपडे, मारूती घोरपडे, गोविंद रामा शिंदे, चिन्नू रामा शिंदे, रमेश बापू शिंदे, गोविंद बापू शिंदे, युवराज शिंदे, जिगरया शिंदे, दुर्गाप्पा शिंदे यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम हाणून पाडला. पाहुण्यांसाठी बनविलेले जेवण ओतायला लावले व आलेल्या पाहुण्यांना सांगितले की, हे कुटुंब जातबहिष्कृत आहे त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही, व सोयरिक करायची नाही. कारण यांनी पंचाचा निर्णय मान्य केला नाही. अशा पद्धतीने जगण्याच्या सर्व व्यवहारावर बंदी घालण्यात आली. पुढे कुलदैवताच्या यात्रेत येण्यास पीडित कुटुंबियांना नाकारण्यात आले. यात्रेत पूर्वजांच्या नावाने देवाला बोकडबळी न दिल्यामुळे पीडित कुटुंब प्रचंड भयभीत झाले. देव आपल्यावर कोपणार, ही अंधश्रद्धा मनात घर करून राहिली असतानाच एका व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका आला. यात्रा न केल्याने देवाचा कोप झाला, असा (गैर)समज वाढत गेला. मग पुन्हा जातीत घेण्यासाठी पंचांना त्यांनी विनंती केली. पंचांनी जातीत परत घेण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली. गरीब कुटुंबांने अर्थातच पैसे देण्यास नकार दिला. यात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पीडित हनुमंत रामा शिंदे, मारूती यल्लप्पा शिंदे कुटुंबियांनी गावकर्यांना विनंती केली.
पीडित हनुमंत शिंदे व मारूती शिंदे हे बारामती शेजारील झारगरवाडी येथे राहतात. त्या गावात वैदू समाजाची बरीच मोठी वस्ती आहे. मल्हारी शिंदे हा या सर्वांचा मुख्य पंच त्याचेच जातीवर नियंत्रण होते. जातपंचायत भरवून तो न्याय निवाडे, दंड व शिक्षा करायचा. गावातील इतर समाजातील व्यक्ती, पंच मंडळी व पीडित कुटुंबीय यांची दि.19 जानेवारी रोजी ग्रामपंचायतजवळ बैठक झाली. पंचांनी आपला ठेका काही सोडला नाही. बैठक काहीही निर्णयाविना संपली. परंतु आपल्या जातीच्या प्रश्नात इतर जातीच्या व्यक्तींना सहभागी करून घेतल्यामुळे पंच पीडित कुटुंबावर चिडले. तो राग मनात धरून काही वेळाने पंच व त्यांच्या साथीदारांनी म्हणजेच पंच मंडळींनी संगनमत करून शंकर शिंदे, मोतीराम शिंदे, मंगेश मासाळ, राहुल कुडाळे, मच्छिंद्र घोरपडे, मारूती घोरपडे, गोविंद रामा शिंदे, चिन्नू रामा शिंदे, रमेश बापू शिंदे, गोविंद बापू शिंदे, युवराज शिंदे जिगरया शिंदे, दुर्गाप्पा शिंदे यांनी 19/12/2014 रोजी तलवार, गज, काठ्या, कुर्हाड, विटा अशा तीक्ष्ण हत्यारांनी रामा शिंदे व यल्लप्पा शिंदे यांच्या पीडित कुटुंबियांवर हल्ला केला. ही संपूर्ण घटना आजूबाजूचे वस्तीतील लोक भयभीत होऊन बघत होते कारण ते पण पंचांना घाबरले होते. आरडाओरड ऐकून काही गावकरी मध्यस्थी करण्यासाठी धावले. हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. हल्लेखोरांनी पीडित कुटुंबातील एका महिलेला अर्धनग्न करून मारहाण केली तर दुसर्या महिलेच्या योनी मार्गात मिरचीची पूड टाकून विनयभंग केला तसेच काहींच्या डोक्यावर जबर मारहाण झाली. लहान मुलांना देखील मारले त्या मारहाणीत आठ व्यक्ती जखमी झाल्या. इतर गावकर्यांनी जखमींना बारामतीच्या देवकाते रूग्णालयात दाखल केले. तीन जखमींची प्रकृती गंभीर होती. एक व्यक्ती तीन दिवस बेशुद्ध होता. पीडित कुटुंबांचे काही हितचिंतक पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तेथे पंचासहीत गावचे सरपंच असल्याचे दिसले. पोलिसांनी मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या नावे तक्रार दाखल केली. मात्र त्यात जातपंचायत अथवा महिलांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराचा उल्लेख नव्हता. पंधरा आरोपीपैकी पाच पकडले गेले. मुख्य पंच मात्र फरार झाले. सरपंचाच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित व इतर गावकर्यांनी केला. आठव्या दिवशी अंनिसचे कार्यकर्तेजाईपर्यंत पोलीस मुख्य पीडित व महिलांना भेटलेसुद्धा नाही व त्यांची जबानीसुद्धा घेतली नव्हती.
या घटनेची माहिती मिळताच प्रशांत पोतदार व शंकर कणसे हे पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले. त्यांना जे काही समजले ते अंगावर काटा आणणारे होते. मारहाण करताना पंचांनी एका महिलेच्या योनी मार्गात मिरची पूड टाकून विनयभंग केला होता. हे अत्यंत वेदनादायी आहे. या पीडित कुटुंबियांनी असा काय गुन्हा केला होता की, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी असे अमानुष अत्याचार करावे? हे समजून घ्यायला 26/12/2014 रोजी पुन्हा प्रशांत पोतदार व शंकर कणसे सोबत कृष्णा चांदगुडे, नंदिनी जाधव, नितीन हांडे, भारत विठ्ठलदास बारामती येथे पोहोचले. देवकाते हॉस्पिटलमध्ये जखमी झालेल्या पीडितांची भेट घेतली. आठ दिवस झाले तरी पोलिसांनी या महिलांची भेटसुद्धा घेतली नव्हती. प्रकरण नेमके काय आहे, हे समजावून घेतले. कार्यकर्त्यांनी पोलिसांना या बाबत विचारणा केली व सरकारच्या जातपंचायत विरोधी परिपत्रकाचा आधार घेत पुरवणी तक्रार दाखल करून घ्यायचा अर्ज दिला. जातपंचायतच्या या अमानुष अत्याचाराचा व्हॉटस्अॅप वरील मजकूर व्हायरल झाला. तो वाचून सुप्रिया सुळे व निलम गोरे यांनी कृष्णा चांदगुडे यांना संपर्क करत मदतीचे आश्वासन दिले. पुन्हा 28/12/2014 रोजी कृष्णा चांदगुडे, मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, अॅड.मनिषा महाजन, भारत विठ्ठलदास, सरिता कांबळे, सुशील शेवकरी, बारावकर, श्रीराम नलावडे इत्यादी कार्यकर्तेझारगरवाडीत दाखल झाले, पीडित कुटुंबाची भेट घेऊन, सर्वांना एकत्रित करत चर्चा केली. जात पंचायतीच्या अन्यायी फतवे व अंधश्रद्धा यावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले. कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेतली. इतर महिला संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद केला. इलेक्ट्रॉनिक मीडियाने हा विषय लावून धरला. ग्रामीण पोलिसांना पुन्हा एकदा निवेदन देऊन पीडित महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल कडक कारवाई व्हावी असे नमूद केले. दुसर्या दिवशी म्हणजे घटनेच्या नवव्या दिवशी पोलिसांनी महिलांची आपबीती कागदावर लिहून घेतली. आणखी दोन आरोपींना पकडले. मुख्य पंच मात्र अजूनही फरार आहे. न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला आहे. हे वास्तव आजही समाजात आहे.
वरील घटनेचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, आजही जातपंचायत खुलआम त्यांची दुष्कृत्ये करत आहेत आणि त्याचा दबाव जातींमध्ये आजही विलक्षण आहे. हे जर थांबवायचे असेल तर जातपंचायत विरूद्ध नवीन कायदा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. कारण सध्या अस्तित्वात असलेले कायदे पूरक नाहीत. अंनिसची स्पष्ट भूमिका आहे जात मानणे हीच एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळे कायद्याच्या राज्यात जातपंचायतींना मूठमाती देणे आवश्यक आहे, हे सुद्धा कायदेशीररित्या. म्हणून अंनिसचे कार्यकर्तेअशा सामाजिक व जातीय दुष्कृत्याचा निषेध करतात. तसेच पीडितांना लवकर न्याय मिळाला पाहिजे व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे त्यासाठी पोलीस व सरकार यांनी जागृत असणे आवश्यक आहे.
– अॅड. मनिषा महाजन
संपर्क 9422308780