जून : लातूर शाखेची, अंनिसची नियमित बैठक, रूटीन वर्क झाल्यावर बावगे सरांनी ‘रिंगण नाट्य’ व त्याची सोलापूर येथील कार्यशाळा याची माहिती दिली व नोंदणीसाठी नाव द्या असं सांगितलं. मी शांतच होते. आकनगिरे मॅडम म्हणाल्या, ‘आपण दोघी नाव देऊ या’ पण युवा वर्गासाठी हे सारं आपण काय करायचं? त्यावर बावगे सर म्हणाले, ‘प्रत्येकाला स्टेजवरच संधी मिळेल असं नाही. नाटकाच्या विविध बाबींची माहिती उपयुक्त ठरू शकते, झालं, हे ऐकल्यावर आम्ही नावनोंदणी केली. जवळपास पंचवीस एक लोकांची नावनोंदणी झाली.
जुलै : बाबा हलकुडेंचा फोन-11, 12, 13 जुलै 2014 रोजी सोलापूर येथील श्राविकाश्रमच्या समोरील, कार्यालयात आहे, रिंगणनाट्याची कार्यशाळा. 5 वाजता मिटींग आहे, तुम्हाला हजर राहता येते का बघा. आम्ही नंतर येतो. ठीक आहे, मी निघते. अन् मी पोहोचते साधारण 4.30 वाजता. बर्यापैकी सामसूम, खरंच कार्यशाळा आहे किंवा नाही याबद्दल माझ्या मनात शंका. कारण वर्दळ तर नव्हतीच पण ओळखीचा चेहराही कुठे दिसेना. पुन्हा बाबांना फोन. त्यांनी व्यवहारे सरांचं नाव सांगितलं. त्यांना भेटून माझं नाव, गाव सांगितलं.
थोड्या वेळात शालिनीताई, उषा शहा या आल्या. मधूही होती. मी माझ्या स्टाईलनं त्यांचं स्वागत केलं. “या सोलापूर करानो, सोलापूरच्या कार्यशाळेत आपलं स्वागत असो” हसत खेळत नाव नोंदणी, आगळ्या वेगळ्या प्रकारानं छान सुरवात झाली. पण नऊ वाजले तरी लातूरकरांचा पत्ता नव्हता. त्यामुळे काय करावं ते कळत नाही. रात्री दोन वाजता लातूरहून बाबा हलकुडे, दगडू पडिले, बाबाजी कोळी, सतीश रावजादे, प्रणिल नागुरे, काजोल हलकुडे, सूरज बायस व सुधीर भोसले हे हजर झाले. अन् माझा जीव भांड्यात पडला. सार्यांना मी सांगितलं की, सकाळी बरोबर 7 वाजता कार्यशाळेची सुरवात होतेय.
11 जुलै – बरोबर 7 वाजता सेशन सुरू झाले; राजू इनामदारांच्या गोड अन् धारदार आवाजातील गाण्याने “आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो” सारं वातावरण त्या सुरांनी भारावलेलं. त्यानंतर परिसरातल्या पडलेल्या वस्तूपासून फूल तयार करणे. त्यावर चर्चा, झालेल्या 6 गटामधूनही 6 फुले, जेवण, स्वच्छता करणार्यांना अर्पण करून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले जाते. आपल्याला ही मोठी माणसं, असं आदरानं वागवताहेत, हे पाहून अचंबित झालेले अन् आनंदाने न्हालेले त्यांचे चेहरे पाहून सारेच मोकळे झाले. मनाचं, शरीराचं अवघडलेपण क्षणात संपून गेले. प्रत्येकाचा आदर केला पाहिजे हा धडा न गिरवता पक्का झाला. ओळीनं चप्पल लावणं, मोबाईल स्वीच ऑफ, शिस्तही पटली, व्यायाम कसा करावा, त्याचे फायदे, आवश्यकता सारं कसं छान मनोरंजक पद्धतीने पण शिस्तीने, तसूभरही कंटाळा सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत जाणवला नाही. रिफ्रेश झाल्यागत रोमारोमात तरतरी, चर्चा, गाणी, खेळ, आपल्या भागातल्या समस्या, त्यांची कारणं, परिणाम, उपाय सारं काही लिखीत स्वरूपात चार्टवर तयार. गटचर्चा, जेवण, दिलेले वर्क पूर्ण करणं, गाणी, नकला, नाच, संवाद, स्फूट लेखन, रात्रीचे किती वाजले? घड्याळ्याचे तास जणू आमच्यासाठी आकुंचित झाले होते.
12 जुलै : 7 वाजता दिनक्रमाची सुरवात. नेहमीच्याच आनंददायी पद्धतीने. 18 ते साधारणपणे 65 च्या वयोगटातील सारीच मंडळी बालकांसारखी उत्साहाने भरलेली अन् भारलेली. सकाळच्या सत्रात सोलापूर अंनिस कार्यकर्त्यांचा गट, युवा वर्गाचा गट, मोहोळचा गट अन् लातूरचा गट 4 गटांची निर्मिती. प्रत्येक गटाला विषय निवडण्याचे स्वातंत्र्य. आमच्या गटाकडे दोन विषय. एक ‘सर्पप्रबोधन’, पण त्यात प्रविण नागुरे व बालाजी कोळी हे सर्पमित्र सोडले तर इतरांचा सहभाग कसा होणार? अन् दुसरा विषय ‘आंतरजातीय विवाह’ लातूर शाखेने एकूण 159 विवाह लावलेले. आंतरजातीय अन् दुसरं म्हणजे नुकतंच घडलेलं खर्डा येथील नितीन आगे याचं हत्याकांड.
आपण यावरती काम केलं तर? देता येईल संदेश आपल्याला? कारण नाटकाच्या बाबतीत एकटी मी, तीही वासरात लंगडी गाय शहाणी अशी. सार्यांची पाटी जवळपास कोरी. त्याउलट सोलापूर व मोहोळचे गट तुलनेने अधिक सामर्थ्यशाली. कारण व्यावसायिक व शहरी संस्कृतीच्या संपर्कातले. नाटकाचा सोलापूरकरांचा समृद्ध वारसा. भाई फाटेमुळे मोहोळही याबाबत माहिती असलेले. पण आमच्याकडे एक हुकमी एक्का होता ‘सतिश रावजादे’. आवाज, अभिनय, आत्मविश्वास. सार्यातच एकदम बावनकशी सोनं.
वेळेच्या बंधनात राहून कमीत कमी संवादात विषय पोहोचण्यासाठी सार्यांच्या सूचनांचा विचार, सूरजकडे लेखनाचं काम, चर्चा नव्हे, आरडाओरडा, प्रचंड गोंधळ, ताण, चिडणं, रूसणं सारं काही. मजा आली.
सार्यांचं छान छान पाहून निराशा दाटून आली. आपलं काय नी कसं होणार? बहुतेक डच्चू मिळणार असं वाटत असताना सार्यांनी ज्या उत्साहानं सादरीकरण केलं त्याचं कौतुक अतुल सरांनी केलं ते पाहिल्यावर मन पिसागत भन्नाट गिरक्या घेत सुटलं. अतुल पेठे नावाच्या जादूगाराची किमया होती ही सारी. त्यांच्या स्वर्णशब्दांनी सार्या सामान्य जनाचं सोनं होऊ घातलेलं. परिसाच्या स्पर्शानं आत्मविश्वासरूपी सोनं गवसलं सार्यांनाच. आमच्यासाठी ही बाब खूप अपरूक होती. ती घटना समोरच्यांच्या मनात आपण जागा करू शकतो याची जाणीव झाली. त्याचं प्रत्यंतर आलं सातार्यात. शहादाच्या गटाने आमचं नाटक खूप आवडल्याचं डोळे पुसत सांगितलं. राजूदादा व अश्विनला ते आवडलं हे जाणून तर आनंद पोटात माईना ही अवस्था. शैलाताईंनी अलिंगन देऊन कौतुक केलं. तो क्षण तर अविस्मरणीय. सार्यांनी आमचं कौतुक केलं ही आमच्यासाठी लाखमोलाची गोष्ट अन् ती मिळाली अतुल पेठे ह्या नाटकाने झपाटलेल्या व्यक्तीमुळे.
आता पुण्याला जायचंय रात्रीच्या रेल्वेनं. त्याअगोदर गांधी चौकातलं सादरीकरण. हातात माईक धरून हातवारे करायचे कसे? धमाल आली. प्रयोग उत्तम झाल्याची पावती उपस्थितातून.
पुण्यात सतिश वाघमारेने दिलेल्या सूचनासह सादरीकरण. छानच झालं. अनेक मान्यवरांनी कौतुक केलं. खंत एकच. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरांना(अतुलजी) ते प्रत्यक्ष पाहता नाही आलं. त्यांनी ते ऐकलं. ‘बढिया’ हे त्यांच्या तोंडून ऐकताना खूप तरल झाल्यागत वाटलं.
रात्री उशिरा खेडेगावात थांबून कार्यकर्त्यांची नोंदणी करणे, संपर्कात राहून पाठपुरावा वेळेअभावी करता आला नाही. कारण निवडणुका, पाऊस, परीक्षा, कार्यालयीन व अन्य अडचणींमुळे. अतिशय प्रभावी प्रबोधनाचे हे साधन सिद्ध होतेय. याद्वारे जनसामान्यापर्यंत सहजी आपण पोहचू शकतो.
कमी वेळात सहज, सुलभतेने लोकांच्या मनात विचारांचे रोपण करण्याची क्षमता अत्यल्प खर्चात प्रचार, प्रसार प्रबोधन शक्य ही या रिंगणनाट्याची शक्तीस्थाने आहेत.
–प्रा. चारूशीला भोसले
लेखक संपर्क: 9422941691