दि.20 ऑगस्ट 2013 रोजी विज्ञाननिष्ठ समाजसुधारक, विवेकवादी चळवळीतील द्रष्टे नेतृत्व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात खून झाला. खुनाच्या पश्चात तरूणाई ज्या प्रमाणात रस्त्यावर उतरली त्यावरून डॉक्टरांच्या कामाचा पसारा आणि लोकप्रियता लक्षात येईल. डॉक्टरांच्या अशा जाण्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरूणाईने डॉक्टरांचा विवेकवादाचा, अहिंसेचा मार्ग जपत शांततेच्या व लोकशाही मार्गाने पूर्ण 1 वर्ष वेगवेगळी आंदोलने करून आपला निषेध व्यक्त केला.
डॉ.दाभोलकरांसारख्या समाजसुधारकांच्या खुनाचे दु:ख मनात ठेवून त्याच चिकाटीने काम करण्याची जिद्द दाखवणारी तरूणाई अंनिसचा घटक बनू लागली. अंधश्रद्धा निर्मूलनावरती व्याख्याने देणे, चमत्कार सादरीकरणातून बुवाबाजीचा भांडाफोड करणे इ.उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होऊन विचारांची लढाई विचारांनीच लढत विवेकाचा आवाज बुलंद करू लागली; परंतु याच्याही पलिकडे जाऊन सांस्कृतिक अंगाने लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या तरूणाईला अभिव्यक्त होण्यासाठी जे माध्यम हवे होते ते त्यांना ‘रिंगण नाटका’च्या माध्यमातून मिळालं.
“रिंगण नाटक” नवीन नाट्य प्रकार. त्याच्याबद्दलची उत्सुकता, नेमकं रिंगण नाटक म्हणजे काय? ते कसं करायचं? कोणी करायचं यासारखे असंख्य प्रश्न घेऊन ही तरूणाई या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नाट्यप्रशिक्षण शाळेमध्ये सामील झाली, मार्गदर्शक होते प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे, सोबत राजू इनामदार. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, शहादा इ.ठिकाणी या कार्यशाळा पार पडल्या व त्यातून तब्बल 20 संघ तयार झाले.
‘रिंगण नाटक’ एक मुक्त नाट्याविष्कार ज्याला नाट्यगृहाची गरज नाही, की लाईटची, नेपथ्याची गरज नाही, रंगरंगोटी तर अजिबात नाही. ज्याठिकाणी लोकांशी व्यवस्थित संवाद साधता येईल अशी जागा मिळाली की, 10/20 कलाकार कार्यकर्त्यांचा समुह रिंगणामध्ये आपलं नाटक सादर करतो. नाटकासाठी लागणार्या परंतु अगदी सहज उपलब्ध होणार्या अशा बाबी उदा.नेपथ्य मेगाफोन/स्पीकर इ. सोबत घेऊन कलाकार नाटक करतात, नाटक झाल्यानंतर लोकांशी नाटकावर त्याच्या विषयावर/आशयावर चर्चा करतात. रिंगण नाटक हे प्रामुख्याने सडकनाटक व नाट्यगृहात केले जाणारे नाटक यामधील मध्यम मार्ग आहे असे यावरून दिसून येते.
“रिंगण नाटक” हे निखळ मनोरंजन करणार्या नाटक/सिनेमा करणार्या जात-वर्ग वर्णश्रेष्ठींचे गुलाम नव्हे, तर ते आहे परिवर्तनाचा, विवेकाचा प्रचार आणि प्रसार करणार्या कार्यकर्त्यांसाठीचे सशक्त सांस्कृतिक माध्यम, अभिव्यक्त होण्यासाठी. या नाटकांना कोणी नावाजलेला दिग्दर्शक नाही की, नटनटी नाही तसेच प्रतिथयश लेखकही नाही, हे सारं करायचं ते कार्यकर्त्यांनीच ज्याला चळवळीचा विचार माहीत आहे, त्याला तो पटलेला आहे असाच कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने नाटकांतून विचार मांडून लोकांना विचार करायला भाग पाडू शकतो अशी त्यामागची धारणा! बरं नाटक म्हटलं तर गाणंही आलंच या नाटकातील व नाटकाव्यतिरिक्त रचलेली गाणी ही सुद्धा कार्यकर्त्यांनीच रचलेली व त्याला चालदेखील कार्यकर्त्यांनीच लावलेली.
जागतिकीकरणाच्या, चंगळवादाच्या या जमान्यात मनोरंजन करणारी नाटकं, चित्रपट हे लोकांची क्षणिक मनोरंजनाची भूक शमवतीलही, परंतु आपली वैचारिक भूक शमविण्यासाठी ‘रिंगण नाटक’ महत्वाची भूमिका पार पाडते.
आज मितीला मरगळलेल्या नाट्य चळवळीला उर्जितावस्थेत आणण्याचं काम या रिंगणनाटकांच्या माध्यमातून केलं जात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या रिंगण नाटकांमधून अंधश्रद्धा निर्मूलन, अध्यात्मिक बुवाबाजी ते अगदी विवेकवादांपर्यंतचे विचार मांडून लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केलं जात आहे.
अंनिस लोकरंगमंच आयोजित या क्रांतिकारक रिंगण नाटकांची सुरवात झाली तीदेखील क्रांती दिनी व अंनिसच्या वर्धापन दिनादिवशी सातार्यात. अंनिस आपल्या विवेकवादी वाटचालीचा 25 वा टप्पा पूर्ण करत असताना आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 1 वर्ष पूर्ण होत असताना 20 ऑगस्ट 2014 रोजी त्यांच्या खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे येथे 200-250 तरूण तरूणी एकीकडे दु:ख व दुसरीकडे आनंद अशा भावना घेऊन आपल्या नाटकांच्या माध्यमातून विवेकाचा आवाज बुलंद करीत होती, लोकांशी संवाद साधत होती, त्यातूनच एका नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे “सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम” या नाटकाने.
अंनिस शाखा इस्लामपूरचे जुने जाणते कार्यकर्ते संजय बनसोडे, डॉ.नितीन शिंदे, अवधूत कांबळे, विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे हे या नाटकामध्ये सहभागी झालेले, सोबत आताच्या पिढीचे प्रतिनिधी सागर सूर्यवंशी, अजय काळे, अजय भालकर, विनय कांबळे, सुयश तोष्णीवाल. याआधी या शाखेने एक प्रश्न, प्रोडक्ट, आक्रित घडलं, धोंड्या इ. दर्जेदार सडकनाटके करून प्रबोधन करण्याचं काम केलेले. नव्या उमेदीनं रिंगण नाटक करायचं तर नाटक ही तसंच हवं, यासाठी ज्येष्ठ लेखक राजा शिरगुप्पे तसेच दिग्दर्शक विजय पोवार यांच्या प्रयत्नांनी विषय पक्का झाला तो म्हणजे विवेकवादाचा, परिवर्तनाचा प्रवास दाखवायचा अगदी सॉक्रेटिस पासून दाभोलकरांपर्यंतचा! या विवेकवादाच्या प्रवासामध्ये सत्यासाठी विष प्राशन करणारा सॉक्रेटिस दाखवला आहे, धर्माची विधायक चिकित्सा करायला सांगणारे संत तुकाराम दाखवलेत व अलिकडच्या काळातले विज्ञानाचा, विवेकवादाचा प्रसार आणि प्रचार करणारे शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा सामाजिक प्रवास दाखवला आहे.
बुद्ध, सॉक्रेटिस, संत तुकाराम ते डॉ.दाभोलकर यांच्या सामाजिक परिवर्तनाचा इतिहास मांडत असताना, सत्य शोधताना सॉक्रेटिसला आपला जीव गमवावा लागला, तुकारामांना वैकुंठाला धाडलं गेलं आणि डॉ.दाभोलकरांचा खून करण्यात आला, पण अशा तर्हेने माणसं मारली तरी त्यांचे विचार संपू न देण्याचे आश्वासन व बुद्धांपासून-दाभोलकरांपर्यंतच परिवर्तनाचं रिंगण अबाधित राखण्याचं अभिवचन या नाटकातले कलाकार कार्यकर्ते देतात. नाटकात पारंपरिक नृत्याचा, वाद्याचा वापर तसेच गाण्यांचा व कवितांचा वापर करून प्रेक्षकांना या लढाईत सामील होण्याचे आवाहन करतात. नाटक संपता संपता प्रेक्षक डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत क्रांतीचं नवं स्वप्न आणि नवी आस घेऊन उठतो आणि नाटकातील गाण्याला साथ देतो, “संकटे दाही दिशा, जडली झुंजायाची नशा!”
–प्रा. योगेश कुदळे
लेखक संपर्क: 9850122713